कधी कुणाच्या घरी कोरोनाचं आगमन होईल? हे सांगता येणार नाही अशीच सध्याची काही परिस्थिती आहे. कोरोनाची वक्रदृष्टी कधीही कुणावरही होऊ शकते. यामध्ये श्रीमंत-गरिबी असा भेद नाही. तसं पाहिलं गेलं तर हा कोरोना तसा विनम्र आहे, तो कुणालाही भेटायला स्वतः घरी किंवा कार्यालयात जात नाही. मात्र, सुरक्षिततेचे नियम तुम्ही पाळले नाहीत किंवा विसरलात तर तो तुम्हाला भेटल्या शिवाय राहत नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील विविध राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या दिवसागणिक वाढतच आहे, त्या रुग्णांना उपचार देण्याकरिता आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे. मात्र, दिवसागणिक नवीन वाढणारे नवीन रुग्ण आणि मृत्यूची संख्या थांबवायची कशी? हा मोठा यक्ष प्रश्न शासन आणि प्रशासनासमोर पडलाय.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कोणत्या उपायोजना केल्या पाहिजे यावर आता चर्चा करणे गरजेचे आहे. घनदाट लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे, हे वास्तव असलं तरी ती कशी थांबवता येईल याच्यावर विचारमंथन व्हावेच लागेल. जोपर्यंत लॉकडाऊन होता तोपर्यंत रुग्णांची संख्या मर्यादित होती आणि अनलॉक केल्यानंतर ती वाढली हे सांगायला कुण्या तज्ञाची गरज नाही. राज्यातील विविध भागात टाळेबंदीचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. नवी मुंबईतील काही प्रतिबंधात्मक क्षेत्रात 5 जुलैपर्यंत टाळेबंदी करण्यात आली आहे. मुंबईतील उपनगरात अशाच पद्धतीने काही ठिकाणी नागरिकांच्या दृष्टीने प्रशासन उपाय करीत आहे. ठाणे जिल्ह्यातही काही मर्यादित कालावधीकरिता म्हणजे 10 दिवसांकरिता टाळेबंदी करण्यात आली आहे. शेवटी आरोग्य यंत्रणा रुग्णांवर उपचार करणार आहे, ते नवीन रुग्ण निर्माण होणार नाही याकरिता वैद्यकीय उपायापेक्षा यावर प्रतिबंध कसा घालता येईल, याचा विचार केला गेला पाहिजे.
रुग्णसंख्या वाढत असतानाच राज्याचे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्लाझ्मा थेरपीच्या प्रोजेक्ट प्लॅटिना उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. जगातली सगळ्यात मोठी प्लाझ्मा थेरपीची ट्रायल महाराष्ट्रात होत आहे. आजपासून सोलापुरात प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायलला सुरुवात झाली. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठीक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करुन अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरियाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रुग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात. हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर ठरवतात. मध्यम आणि तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या आणि नेहमीच्या औषधोपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण निवडला जातो. आयसीएमआरतर्फे देशभरात प्लाझ्माच्या क्लिनिकल ट्रायल सुरु आहेत.
रुग्णांवर उपचार देण्यात महाराष्ट्रात विविध औषधांचा वापर केला जात आहे, त्याला काही प्रमाणात यशही प्राप्त होत आहे. मात्र, नवीन रुग्णाचं काय ते तर सुरुच आहे. हे नवीन रुग्णचं निर्माण होऊ नये किंवा त्याचा दर कमी व्हावा यासाठी लॉकडाउन हे प्रभावी शस्त्र आहे. मात्र, संपूर्ण राज्यातील लॉकडाऊन परवडणारा नाही म्हणून टप्याटप्याने शिथिलता दिली जात आहे. मात्र, या सगळ्या प्रकारात रुग्णसंख्या मोठ्या फरकाने वाढत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मिशन बिगिन दोनचा कालावधी 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. यापूर्वी जे नियम होते तेच नियम कायम ठेवण्यात आले आहे. दोन जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्यास बंदी कायम असून सर्वसामान्यांसाठी एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. रुग्ण संख्याला आळा घालण्याचा हा एक महत्वाचा निर्णय आहे. मुख्यमंत्री या प्रकरणी राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सवांद साधून अजून कोणत्या उपाय योजना करता येतील याबाबत आढावा घेणार आहेत.
राज्याचा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग दररोज राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल तयार करत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात लक्षणंविरहित रुग्णांचे प्रमाण असल्याचे स्पष्ट झाले आहे. या विभागाने 29 जून रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, ज्या 159118 रुग्णाचा आकडा घेऊन विश्लेषण केले आहे. त्यानुसार 37 टक्के म्हणजे 59363 रुग्ण हे लक्षणंविरहित असे आहेत. तर लक्षणं असलेल्या रुग्णाची संख्या 5675 म्हणजे 3 टक्के, तर गंभीर स्वरूपाच्या रुग्णाची संख्या 2562 म्हणजे 2 टक्के, तर रुग्ण बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 84245 म्हणजे 53 टक्के इतकी आहे. तर आतापर्यंत एकूण 7273, म्हणजे 5 टक्के रुग्ण दगावले आहेत. विशेष म्हणजे देशात मृत्यू दर 3 टक्के आहे. मात्र, पाच राज्यामध्ये हा दर 3 टक्कयांपेक्षा जास्त असून यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे.
आपल्याकडे पूर्णपणे लॉकडाउन घोषित केला नसला तरी टप्याटप्याने का होईना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी याचा वापर करावाच लागेल. शेवटी नागरिकांचे प्राण वाचविणे गरजेचे आहे. जीवापेक्षा मोठं काही नाही हे आपल्याला कोरोनाने मागच्या काळात दाखवून दिलेच आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर लॉकडाऊन सदृश्य परिसिथिती निर्माण झाली तर आश्चर्य वाटायला नको. सध्याच्या शिथीलतेमुळे नवीन जीवनशैली (न्यू नॉर्मल) अंगिकारताना रुग्णसंख्या वाढली आता हेच 'न्यू नॉर्मल' पुन्हा एकदा लॉकडाउन करावे की अशी शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे ही 'न्यू नॉर्मल' संकल्पनाच धोक्यात आली आहे.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | लक्षणविरहित रुग्णाचं काय?
- BLOG | कोरोनाबाधितांची ओळख परेड?
- BLOG | कोरोनामय 'डायबेटिस'