सगळं काही आल बेल आहे असं नाही, युद्ध आपलं सुरुच आहे. देशभरात जाहीर केलेला लॉकडाऊन संपण्यास दोन दिवस असले तरी परिस्थिती म्हणावी तशी सुधारलेली नाही. कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या वाढतच होती त्याबरोबर या आजाराने होणाऱ्या दुर्दैवी मृत्यूचं प्रमाण वाढलंच आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर नवनवीन औषधांचा वापर करुन रुग्णांना बरे करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतच आहेत. काही ठिकाणचे 'हॉटस्पॉट' बंद करण्यात आरोग्य यंत्रणा यशस्वी होत आहे तर काही ठिकाणी नवीन 'हॉटस्पॉट'ची निर्मिती होत आहे. अनलॉकच्या निमित्ताने राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन काही गोष्टी टप्याटप्याने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, जर केसेस पुन्हा वाढताना दिसल्या तर नाईलाज म्हणून काही भागांत पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल. आता असे होऊ द्यायचे का याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधून केलेल्या सवांदात म्हटले आहे.


रविवारी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. त्यात त्यांनी मिशन बिगिन अगेनमध्ये हालचाल वाढली, संपर्क वाढल्याने रुग्णसंख्या वाढलेली दिसत असली तरी चेस द व्हायरस ही संकल्पना मुंबईप्रमाणे राज्यात सुरू केल्याचे व औषाधोपचार, टेस्ट वाढवण्यात आल्या आहेत. केवळ आर्थिक चक्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्रात मिशन बिगिन अगेन सुरू केलं असलं तरी कोरोनाचं संकट टळलेलं नाही, धोका टळलेला नाही, गर्दी करू नका, आवश्यक कामासाठीच बाहेर जा असे सांगून गर्दी करुन कोरोनाला आपणहून निमंत्रण देऊ नका, गाफील राहू नका असे ही ते यावेळी म्हणाले.


राज्याचे मुख्यमंत्री सतत सुरक्षिततेचे नियम पाळा असे सांगत आहे याचा साधा अर्थ नागरिकांना का कळत नाही. शासनाने खबरदारी म्हणून बेड्सची संख्या वाढवून फिल्ड हॉस्पिटलची निर्मिती केली आहे, याचा अर्थ त्या बेड्सचा वापर केलाच पाहिजे असे नाही. ते बेड्स नागरिक निरोगी राहता असेच रिकामी राहिले तर प्रशासनाला याचा आनंदच होईल. कोरोना बरा होता याचा अर्थ आपण कसंही वागायचं होत नाही, काही जणांच्या कोरोना जीवावरही बेततो. त्यामुळे कुणीही कोरोनाला हल्ल्यात घेण्याची गरज नाही. आज अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पर्याय नाही म्हणून ते आपल्यासाठी जीव धोक्यात घालून सेवा देत आहे. नागरिकांना फक्त सुरक्षिततेचे नियम पाळून वावर करायचा आहे तेही त्यांना शक्य नाही. अनेक नागरिक विनाकारण झुंडीने आणि घोळका करुन नाक्यावर उभे राहत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, यामुळे रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ नागरिक व्यवस्थित सुरक्षिततेचे नियम पाळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे आता तरी लोकांनी याचा विचार करुन स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे अन्यथा आपल्याला मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.


लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अडचणी निर्माण होऊ नये जीवनमान हळूहळू का होईना रुळावर यावे यासाठी काही प्रमाणात शासनाने नियमांमध्ये शिथिलता दिली खरी मात्र, काही लोकं त्याचा गैरफायदा घेतानाचे दिसत आहे. या अशा प्रकारांमुळे रुग्णसंख्या वाढणार नाही तर काय कमी होणार, काही दिवसांचा प्रश्न आहे. एकदा का ह्या विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला की न घाबरता नागरिकांना फिरता येईल मात्र तोपर्यंत काळजी घेतलीच पाहिजे. रुग्णसंख्या वाढण्याला केवळ नागरिकांची बेफिकिरीच जबाबदार आहे, प्रत्येकानेच काळजी घेतली तर नक्कीच रुग्णसंख्या आटोक्यात येण्यात मदत होईल. शासन आणि प्रशासन म्हणजे आपण सगळ्यांनीच मिळून तयार केलेली व्यवस्था आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. अत्यावश्यक कामासाठी आणि वैद्यकीय कारणांसाठी परवानगी दिलेलीच आहे.


ठाणे शहरासह जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत असल्याच्या अनुषंगाने शनिवारी केंद्रीय पथकाने ठाणे जिल्ह्याला भेट दिली. त्यावेळी त्यांनी कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही तर त्यामुळे रुग्णांवर वेळेत उपचार करता येतील पण लोकांचा मृत्यू वाचविणे आणि एकूणच मृत्यूदर कमी करणे याला प्राधान्य द्या अशा सूचना ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना दिल्या. त्याचबरोबर जास्तीत जास्त चाचण्या वाढवा जेणेकरुन रूग्णांना वेळेत उपचार देता येणे शक्य होईल, असेही या पथकाने सर्व महापालिका आयुक्तांना सूचित केले. तसेच त्यांनी प्रतिबंधित क्षेत्राची कडक अंमलबजावणी करणे, रोजच्या रोज रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या आणि ज्यांची प्रकृती गंभीर आहे अशा रुग्णांचा आढावा घेणे आणि त्यांच्यावर उपचार करताना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेणे आदी गोष्टींनाही प्राधान्य देण्याच्या सूचनाही यावेळी केल्या.


मुख्यमंत्र्यांनी आपल्या संवादात ज्येष्ठ डॉक्टरांना पुढे येऊन रुग्णसेवा देण्याचे आवाहन केले. तसेच त्यांना आवश्यक असलेली सर्व सुरक्षा साधने पुरवण्यात येतील असे सांगितले. त्याचप्रमाणे प्लाझ्मा थेरपीची सुरुवात महाराष्ट्रात मार्च-एप्रिलपासून सुरू करण्यात आली. 10 पैकी 9 रुग्ण यामुळे बरे झाले तर 7 जण घरीही गेले. प्लाझ्मा थेरपी करणारे देशातील सर्वात मोठे राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे येत असल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी, ॲण्टीबॉडिज तयार झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन ही केले. राज्याचे मुख्यमंत्री यांनी जनतेला संबोधून केलेल्या संवादाचा सारांश काढला तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी थोडक्यात काय तर नागरिकांनी काळजी घ्या असे व्यवस्थित सांगितले आहे. या आजराची साथ उतरणीला ज्यावेळी यायची त्यावेळी येईल मात्र तो पर्यंत नागरिकच त्यांच्या जीवनाचे शिल्पकार आहेत.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग