राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बंद झालेली हॉटेल आणि बार उद्यापासून सुरु होत आहेत. या अगोदर पार्सल व्यवस्था सुरु होतीच. खवय्ये याआधीही रुचकर पदार्थांची चव चाखत होतेच. आता मात्र थेट हॉटेलमध्ये बसून आवडत्या पदार्थाचा आस्वाद ते घेण्यास उत्सुक असतीलच. मात्र, हा आनंदाचा क्षण नसून सर्वजण एका महाभयंकराच्या अवस्थेतून जात आहोत, याचं भान प्रत्येकानेचं ठेवलं पाहिजे. मोठ्या काळानंतर हॉटेल उघडी होत आहे, शाळा उघडण्याचा पहिला दिवस असल्यासारखे लगेच हॉटेलमध्ये हजेरी लावलीच पाहिजे असे बंधनकारक केलेले नाही.


हॉटेल आणि बार उघडण्याची परवानगी काही अटी आणि शर्ती घालून दिली आहे. हे हॉटेल मालकांनी आणि गिऱ्हाईकांनी लक्षात ठेवले पाहिजे. कोरोना होऊ नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टळावे याबाबत वैद्यकीय तज्ञांनी दिलेला इशारा लक्षात ठेवावा. सगळ्या नियमांची चोख अंमलबजावणी केलीच पाहिजे. हॉटेल उघडलीत म्हणून लगेच पार्ट्या सेलिब्रेशन करण्याची ही वेळ नाही. राज्यात रोज या आजारांमुळे शेकडो नागरिक बळी पडत आहे, तर संसर्ग झाल्यामुळे हजारो रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहे. कोरोनाचे संकट गहिरं होत असताना नागरिकांनी आपला वावर सुरक्षित ठेवला पाहिजे. एवढ्या मोठ्या काळानंतर हॉटेल उघडणार आहे, म्हणून त्याचे साक्षीदार होण्यासाठी काही 'उपहारगृहे प्रेमी' झुंबड उडवतील तर तसे न करता ही हॉटेल कायमस्वरूपी पूर्ण क्षमतेने उघडी राहावीत यासाठी सावधगिरी बाळगने अपेक्षित आहे.


राज्याच्या आरोग्य विभागाने शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार रोज नवीन रुग्ण सापडतच आहे. राज्यात सध्याच्या घडीला आजही 2 लाख 58 हजार 108 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. देशावर आलेल्या या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सगळ्याचे योगदान फार महत्त्वाचे आहे. राज्यातील काही शहरात आजही मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर डॉक्टर मोठ्या शिताफीने उपचार करून त्यांना या आजारातून बाहेर पडण्यासाठी उपचार करत आहे. हळू-हळू सर्व गोष्टी पूर्वपदावर आण्यासाठी प्रशासन- शासन दोन्ही प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. मात्र, हे सर्व प्रयत्न होत असताना त्याचा गैफायदा कोणी नागरिकांनी घेऊ नये. अनलॉक करताना मिळालेली शिथीलता ही सामन्याचे जीवन पुन्हा व्यवस्थिपणे सुरु व्हावे याकरिता दिलेली असते. एकाच ठिकाणी गर्दी केल्यास या संसर्गाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे गर्दी होईल असे कोणतेही कृत्य कुणीच करू नये. हॉटेल उघडत आहे याचा अर्थ कोरोनाचा नायनाट झाला आहे, असा अर्थ कुणी काढू नये आणि फाजील आतमविश्वास तर कुणीच बाळगू नये. राज्यात मास्क न घालणाऱ्यांवरती कडक कारवाई सुरु आहे, महापालिका कर्मचाऱ्यांसोबत पोलीस मंडळी या कामांसाठी मेहनत घेत आहे. मास्क न घातल्यामुळे पकडले गेल्यानंतर अनेक सबबी देण्यापेक्षा तो मास्क व्यवस्थित नाका तोंडावर लावण्यात नागरिकांनी धन्यता मानली पाहिजे.


29 सप्टेंबरला 'अति घाई ... संकटात नेई' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते, त्यामध्ये, महाराष्ट्रात गरजेपुरत्या काही गोष्टी यापूर्वीच्याच अनलॉकमध्ये सुरु करण्यात आल्या आहेत, केवळ इतर राज्यात अमुक ह्या गोष्टी चालू झाल्यात म्हणून आपल्याही राज्यात त्या चालू झाल्या पाहिजे, असा अट्टाहास असता कामा नये. कारण कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही, अजूनही कोरोनाला पायबंद करण्यात अपेक्षित असे यश आलेले नाही. सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. आरोग्य आणीबाणीच्या काळात वैद्यकीय शास्त्राचा आधार घेऊन शिथीलता किती द्यावी याबाबत विचार करणे अपेक्षित आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्यामध्ये विशेषतः लोकल हा कळीचा मुद्दा आहे.


राज्यातील वैद्यकीय तज्ञ आणि राज्य शासनाचे मार्गदर्शक तत्वे सोशल डिस्टन्सिंग पाळा असे कायम सांगत आहे. या अशा परिस्थितीत दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या आणि मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेच्या अनुषंगाने रोज प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्राला अनलॉक करताना देशातील इतर राज्याच्या तुलनेत वेगळा विचार करावा लागणार आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असणारे राज्य म्हणून आपली ओळख आज राष्ट्रीय पातळीवर निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणतीही घाई न करता सध्याच्या अघोरी संकटाचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे.


संपूर्ण राज्यात पुणे शहर आणि जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे पुणे शहरात हॉटेलांची मांदियाळी आहे. येथील अनेक नागरिक खाण्यासाठी हॉटेलात जात असतात. त्यामुळे या शहरातील नागरिकांना 'आस्ते कदम'ची भूमिका घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई शहराला हाच नियम लागू होतो. कारण या दोन शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यातील इतर कोणत्याही जिल्हा आणि शहरांपेक्षा अधिकच आहे. झुंबड आणि गर्दी या दोन गोष्टी म्हणजे कोरोनाला विकतचे आमंत्रण आहे. सध्या राज्याला आरोग्याच्या अनुषंगाने परिस्थिती नियंत्रणात ठेवणे हे आव्हान आहे. आरोग्य व्यवस्था त्याचे काम करीत आहे. मात्र, अनपेक्षितपणे वाढणारी रुग्णसंख्येमुळे व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी नागरिकांना सेवा मिळावी म्हणून इमाने इतबारे काम करीत आहे. सहा महिन्यापेक्षा जास्त काळ संपूर्ण राज्यातील व्यवस्था या आजाराशी लढत आहे. त्यांनी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरता कामा नये. एका व्यक्तीच्या चुकीमुळे अनेक नागरिकांना त्रास होऊ शकतो हे लक्षात ठेवले पाहिजे. कोणत्याही प्रकारची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये. सगळ्यांना स्वतःच काळजी घ्यावी लागणार आहे.


हॉटेल व्यवस्थापनाने शासनाने ज्या हॉटेल उघडण्यासाठी अटी सांगितल्या आहे, त्याचे पालन केले पाहिजे. आदेशानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि फूडकोर्ट हे सर्व त्यांच्या 50 टक्के क्षमतेनुसार सुरू राहणार आहेत. ह्या नियमांचे पालन केले पाहिजे नाही तर गिऱ्हाइक येत आहेत म्हणून ही अट मोडू नये. हॉटेल चेक करायला कोण येणार आहे? या मानसिकतेत राहून हॉटेल चालवू नये. शासनाने हे नियम सुरक्षिततेच्या दृष्टीने आखून दिले आहे, यामध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीचा विचार केला गेला आहे, हे हॉटेल चालकांनी विसरून चालणार नाही. अशा काळात हॉटेल चालू होणे हे संकेत आहेत कि परिस्थिती सुधारण्याच्या मार्गावर आहे, सुधारलेली नाही. ती सुधारवण्यासाठी प्रशासन सर्व गोष्टीचा विचार करून निर्णय घेत आहेत. हॉटेल मालकांनी प्रत्येक येणाऱ्या गिऱ्हाइकाचं स्क्रिनिंग केलेच पाहिजे, सॅनिटायझरचा योग्य प्रमाणात वापर केला पाहिजे. रुग्णसंख्या वाढू नये यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, ही केवळ शासनाची जबाबदारी आहे असे कुणीही समजू नये.


हॉटेल उघडे होणार याचा काही खवय्यांना आनंद नक्कीच झाला असेल. मात्र, तो आनंद गगनात मावेनासा होईल अशा पद्धतीचे वर्तन अपेक्षित नाही. हॉटेल व्यवसाय बंद असल्यामुळे अनेक लोकांचा रोजगार अडचणीत आला होता तो सुरु होईल, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. मात्र, आपण ह्या काळात माणुसकी सोडून जगता कामा नये. आज काही नागरिकांचे नातेवाईक कोरोनाच्या या आजारामुळे रुग्णालयात उपचार घेत आहे, काही रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. हा काळ आनंदोउत्सवाचा नसून आरोग्यत्सवाचा आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून लोकांना मदत करणे शक्य आहे त्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आरोग्य व्यवस्थेस काही योगदान देता आले तर त्या दृष्टीने पावले टाकली गेली पाहिजे.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग