BLOG | माणसाने माणसाशी माणसासम वागणे
कोरोनामय वातावरण दिवसेंदिवस अधिक 'रोगट' होत चालले असून रुग्णांच्या मनात या आजाराने दहशत निर्माण केली आहे. रुग्णाची चाचणी पॉजिटीव्ह आली की तो रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय याची अवस्था फारच केविलवाणी होत आहे. सध्या कुणी आजारी पडूच नये विशेष करून कोरोना संसर्ग होऊच नये अशी परिस्थिती आहे. कितीही मोठी ओळख असली तरी ऑक्सिजन बेड्स, कोरोनाच्या उपचारावर लागणारी औषधे तात्काळ मिळत नाहीत. सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते सतत मदत करून अपुऱ्या असणाऱ्या व्यवस्थेपुढे हतबल झाले आहेत. या अशा काळात नागरिकांनीच नागरिकांना कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षित वावर ठेवून मदत करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
राजकीय नेत्यांनी पण आता श्रेयवादाची लढाई लढता कामा नये कारण ती ही वेळ नव्हे. तुम्ही जे काय चांगलं काम करताय ते जनता लक्षात ठेवेलच. काही लोकं आपल्या मतदार संघाकरिता, जिल्ह्याकरिता, पक्षाकरिता औषधं घेऊन जात आहे. त्यात अनेक राज्याचे नेते, मंत्री आहेत. पण ते राज्याचा नाही तर आपापल्या मतदारसंघाचाच विचार करतात. हा महाराष्ट्र कुणाचा मतदारसंघ नाही का? त्यांच्या मतदारसघाबाहेरील ज्यांना ती औषधं मिळत नाही ती पण माणसचं आहेत हे विसरायला नको. सगळ्या गोष्टी ह्या आपल्याकरिता आपल्या लोकांकरिता करू नका काही तरी समाजासाठी पण केले पाहिजे ज्याचा तुमचा त्या लोकांशी तेथील व्यवस्थेशी काही संबंध नाही. मागच्या काळात काहींनी आपल्या नातेवाईकांना मेडिकलचा स्टाफ दाखवून लशी दिल्या. हे सगळं आता कुठे तरी थांबलं पाहिजे. एकंदरच सगळं चित्र कीव आणणारे आहे. सामान्य नागरिकांचे कुणाला काही घेणे देणे नाही. त्याला आरोग्याच्या योग्य सुविधा मिळत आहे की नाही. दिवसाला लाखो नवीन रुग्ण या देशात येत आहे. आपल्याकडे प्रांतिक वाद उभे केले जात आहेत किंवा राजकारण्यांनी ते स्वतःहून वाद उकरून काढले आहेत. ते एकता, बंधुत्व, समता कुठे गेले का फक्त भाषणापुरते हे शब्द मर्यादित राहिले आहे. कोरोनाचा हा विषाणू नागरिकांचा जीव घेत आहे. दिवसागणिक शेकडो माणसं मरत आहे, आता तरी सावध व्हा.
रोज नव्याने निर्माण होणारे कोरोना बाधित रुग्णांचे आकडे वाढत आहेत. अनेक रुग्णांचे नातेवाईक सैरभैर झाले आहेत. रुग्णाला सांभाळायचं की स्वतःची काळजी घ्यायची, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. एक पॉजिटीव्ह रुग्ण संपूर्ण कुटुंबाबाला या आजाराच्या विळख्यात आणत आहे. त्यानंतर त्या कुटुंबीयांची होणारी वाताहत पाहवत नाही अशी भयाण परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी एकमेकाना साथ देणे गरजेचे आहे. कारण आजूबाजूला परिस्थिती भयावह होत चालली असताना सर्वसामान्य नागरिकांनी बाधित रुग्ण जे आहेत त्यांना मोबाईलद्वारे मानसिक आधार दिला पाहिजे. रुग्णांना ह्या आजारापेक्षा तो आजार झाल्याची भीती अधिक वाटत आहे. त्यात 10-14 दिवसाचे विलगीकरण ह्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी आरोग्य साक्षर होऊन कोरोनाच्या विरोधातील लढाईत खारीचा वाटा कसं उचलता येईल याचा विचार केला पाहिजे. रुग्णांना मदत करण्यासाठी थेट 'फील्डवर' उतरण्याची गरज नाही. कारण त्यासाठी संबंधित वैद्यकीय व्यवसायात काम करणारे तज्ञ काम करीत आहे. कोरोनाच्या या विषाणूला घेऊन जी काही समाजोपयोगी माहिती आहे त्याला घेऊन जनजागृती केली पाहिजे. कारण सध्याच्या काळात अनाठायी भीती पसरवणारे अनेक फेक मेसेज समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. ते कसे योग्य माहिती घेऊन खोडता येतील याचा विचार केला पाहिजे.
या सगळ्या कठीण काळात माणूस म्हणून माणसाच्या संवेदना जाग्या ठेवल्या पाहिजे. माणूस म्हणून माणसाला वागणूक मिळाली तर कोरोनाच्या या आजाराचे संकट वाटणार नाही. आपल्याकडे धीर देणाऱ्या माणसाची कमी आहे. चार चांगल्या शब्दांमुळे रुग्णांमध्ये या आजारातून बाहेर पडण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. मात्र, आपल्याकडील व्यवस्थेत अशी यंत्रणाच नाही. 'जो तो आपले आपण आपले लोक' यामध्येच मश्गुल आहे. तरीही समाजात काही चांगले लोक आहे जे निस्वार्थी भावनेने काम करीत आहेत. त्या लोकांना बळ मिळेल त्यांचे मनोबल उंचावेल असे आपले वागणे अपेक्षित आहे. आपल्याकडे सरकारने एखादा नियम आणला की तो कसा चुकीचा आहे यावरून रान उठविले जाते. चुकीच्या ठिकाणी आवाज उठविलाच पाहिजे, मात्र काही वेळा समाज हिताकरिता एकत्र येऊन विचारांची देवाण घेवाण करून काही ठोस निर्णय घेऊन त्यास पाठींबाही दिला पाहिजे.
कोरोनाची साथ आहे, त्याचा धीराने सामना केल्यास यात नक्की यश मिळेल. मात्र, या काळात माणसं वाचल्याचे समाधान आयुष्यभर राहणार आहे. शाब्दिक चकमकी करून, एकमेकांवर कुरघोडी करून कार्यकर्ते खुश होतील. सामान्य जनता मात्र कायम दुषणच देत राहील हे वास्तव आता सर्व राजकीय पक्षातील पुढाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे. सामान्य रुग्णांना सध्याच्या काळात आरोग्याच्या सुविधा हव्या आहेत, त्या कुणीही द्या. त्या लोकांना हव्याच आहे, एका विशिष्ट पक्षाने ती सेवा पुरविली तर लोकं नाही म्हणणार नाही. या काळात जो कुणी आरोग्य व्यवस्थेचे चांगले काम करेल त्याच्या मागे जनता उभी राहील. टीका, टिप्पणी करायला पुढचे खूप मोठे आयुष्य बाकी आहे, खूप निवडणुका आहेत.
देशातील सर्वच राज्यात कोरोना बाधितांची कमी जास्त प्रमाणात संख्या आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व सगळ्यांनाच पटले आहे. या काळात मोठ्या सुविधा राज्यात कशा पद्धतीने उभारता येतील याचा विचार करून त्या दृष्टीने नियोजन करून त्याची घोषणा आताच केली पाहिजे. त्यासाठी राखीव रकमेची तरतूद केली पाहिजे. पुतळे, प्रार्थनास्थळे उभारण्यापेक्षा आरोग्याच्या मोठ्या सुविधा उपलब्ध करून देणे हा प्राधान्यक्रम ठरायला हवा. लोकांना जगण्यासाठी ह्या सुविधा हव्या आहेत आणि आपल्याकडे त्या अपुऱ्या प्रमाणात आहे याचा अंदाज हा सगळ्यांनाच आला असेल. आपल्या या राजकीय व्यवस्थेत आरोग्य हा मुद्दा कायम दुर्लक्षित राहिला आहे. यापुढे या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे कसे सक्षमीकरण करण्यात येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
देशभरात कोरोनाच्या साथीने थैमान घातलं असून केवळ शासन, प्रशासन आणि कोविड योद्धे यांनी कोरोना विरोधातील लढाई लढून चालणार नाही. या वैश्विक महामारीला आळा घालायचा असेल तर लोकसहभाग फार महत्त्वाचा आहे, नागरिकांनी आता कोरोनाविरोधी लोकचळवळ उभी करायची गरज आहे. ही चळवळ करीत असताना मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता प्रशासनाने आखून दिलेल्या नियमाचे पालन करणे अपेक्षित असून वाड्या-वस्त्यांवर, गाव-शिवारात, गृहनिर्माण संकुलात, चाळ -कमिट्यांनी या संसर्गजन्य आजाराविरोधात आता आवाज पुकारण्याची हीच ती वेळ. आपला देश वर्षभरापेक्षा अधिक काळ कोरोनाविरोधात लढा लढत आहे तर, राज्यातील प्रशासकीय यंत्रणा वर्षभर काम करीत आहे. खासगी, सरकारी आणि आरोग्य व्यवस्थेवर दिवसागणिक ताण वाढतच आहे. त्या व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी कोणते उपाय आखता येतील हेच या चवळीचे उद्दिष्ट ठेवून काम करत पुढे जावे लागणार आहे. लोकांनी लोकांसाठी उभी करण्याची गरज असलेल्या या कोरोनाविरोधी चळवळीला बळ प्राप्त होण्यासाठी सकारात्मक संवादाची झालर असणे क्रमप्राप्त आहे.
सध्याच्या या कोरोना विरोधातील लढाईत काही कोविडयोद्धे घायाळ होत आहेत. मात्र, ते पुन्हा बरे होऊन नागरिकांना सेवा देण्यासाठी सेवेत हजर होत आहे. त्यांच्यावरील ताण हा दिवसेंदिवस वाढत आहे. किमान त्यांच्यावरील ताणाचं कारण आपण होऊ नये असे जर प्रत्येक नागरिकाने ठरविले तर कोरोनाबाधितांची संख्या झटकन कमी होईल. प्रत्येक नागरिकाने प्रतिज्ञा केली कि मी सर्व कोरोनाचे सुरक्षिततेचे नियम पाळेन. तर कोरोनाचा संसर्ग थांबण्यास जास्त कालावधी लागणार नाही. कारण शेवटी नागरिकांकडून नागरिकांसाठी तयार होणार हा आजार थांबविण्याची हिंमत फक्त नागरिकांमध्येच आहे. यावेळी 'उबुंटु’ सिनेमातील प्रार्थना आठवते. त्यामधील काही ओळी आहे ज्या सध्याच्या परिस्थितीसाठी चपखल बसतात. समीर सामंत यांचे हे शब्द आहेत.
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
उद्याचा सूर्य उगवणार आहे याची आम्हाला खात्री आहे. पण तोपर्यंत छोटासा प्रकाश देणाऱ्या त्या काजव्यांची जागत राहण्याची शक्ती सगळ्यांना दे, हे या प्रार्थनेतून समीर सामंत यांनी मांडले आहे. तसेच त्यांनी माणसाने माणसासोबत माणसासारखे वागले पाहिजे हा मोठा संदेश या माध्यमातून मांडला आहे. कारण सध्या याच गोष्टीची समाजात प्रकर्षाने गरज आहे.