आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी येथे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा रुग्ण आढळला. घनदाट लोकवस्ती असलेल्या या अशा परिसरात रुग्ण सापडणे म्हणजे तशी धोक्याची घंटाच होती आणि शेवटी जे घडायचं तेच घडलं. त्यानंतर या परिसरात रुग्ण संख्या इतकी झपाट्याने वाढली की संपूर्ण देशाचे लक्ष या कोरोना 'हॉटस्पॉट'ने आकर्षित करून घेतले. त्या दरम्यान आरोग्य यंत्रणेतील सगळ्यांनीच म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री, केंद्रीय पथक आणि महापालिकेचे उच्चपदस्थ अधिकारी या सगळ्यांनीच या भागाला भेट देऊन युद्धपातळीवर कोणत्या उपायजोयाना करता येतील यासाठी विविध प्रयत्न केले.


1 एप्रिल ते 8 जुलै या दरम्यान सुरू असलेल्या (अजूनही सुरुच आहे ) या कोरोनाच्या युद्धात सगळ्याचं यंत्रणांना यश संपादन झाले असे म्हणता येईल असा दिवस अखेर उजाडलाच. दिवसागणिक नव्याने शेकडोने सापडणाऱ्या रुग्णसंख्येत हळू-हळू वाढ कमी झाली आणि मंगळवारी केवळ एकच नवीन रुग्णांची नोंद धारावी परिसरात करण्यात आली. साथीच्या आजारांवर मिळविलेला हा ऐतिहासिक विजय असून यापुढेही पावसाच्या काळातही नागरिकांनी सुरक्षित राहणे आणि प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे आहे.


धारावीचा एकूण परिसर 2.5 स्वेअर किलोमीटरचा असून या परिसरात 9 लाखांपेक्षा जास्त लोकवस्ती आहे. या भागातील कोरोनाला पायबंद करण्याकरीता महापालिकेतर्फे 'मिशन धारावी' ही हाती घेतले होते. या अंतर्गत त्यांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या. तसेच 5 हजारापेक्षा जास्त व्यवसाय या भागात असून ते रीतसर जी एस टी नोंदणीकृत आहेत. 15,000 सिंगल रुममध्ये कारखाने आहेत. तसेच अनेक वस्तूंची निर्यात या भागातून होत असून 1 बिलियन यू एस डॉलॉर्स ची आर्थिक उलाढाल वर्षाला या भागातून होत असते. 'मिशन धारावी' अंतर्गत सुरवातीपासून 4 'T' या ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट तत्वावर काम करण्यास सुरुवात केली गेली. तसेच त्यांनी 'चेस-द-व्हायरस' ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली. या मध्ये 'डॉक्टर रुग्णाच्या घरी' या गोष्टीचा अवलंब केला गेला. डॉक्टर रुग्णाच्या घरी जाऊन तपासणी करून त्याला कोणत्याही पद्धतीचा आजार आहे कि नाही हे तपासात होते. 10 बाय 10 च्या लहान घरात 8-10 लोक येथे दाटीवाटीने राहत असतात. लहान-लहान गल्लीतील येथील घराची रचना ही इमारतीसारखी आहे, ग्राउंड अधिक 1, अधिक 2 आणि अधिक 3 प्रमाणे आहेत. या सगळ्या प्रकारात सामाजिक अंतराचा अवलंब करणे अत्यंत जिकिरीचे होते, त्यामुळे या आजराचा प्रसार रोखण्याकरिता जास्तीत जास्त लोकांना संस्थामक विलगीकरणात ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला.


धारावी हा परिसर महापालिकेच्या जी-उत्तर विभागात येतो. या विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर गेली वर्षभर या विभागात काम करत असून त्यांच्या करिता या परिसरातील रुग्ण संख्या कमी करणे हे मोठे आव्हानात्मक काम होते. त्यांनी एबीपी माझा ऑनलाईनशी बोलताना सांगितले की, "या सगळ्यात महत्वाचे काम म्हणजे येथील खासगी डॉक्टरांबरोबर सवांद साधून त्यांना आधी विश्वासात घेतले गेले. येथील 24 दवाखान्यातील डॉक्टरांना पीपीइ किट, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, मास्क आणि ग्लोव्हस देऊन त्यांना आणि महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या मदतीने घरोघरी जाऊन स्क्रिनिंग सुरू केले. तसेच त्यांना त्यांचे दवाखाने उघडून जे कोणी संशयित रुग्ण त्यांना आढळतील त्यांना महापालिकेच्या दवाखान्यात पाठवा असे सांगण्यात आले. तसेच येथील तीन खासगी हॉस्पिटल साई हॉस्पिटल, फॅमिली केअर हॉस्पिटल आणि प्रभात नर्सिंग होम ही कोविड-19 च्या उपचारकरिता ताब्यात घेण्यात आली. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या मदतीने आतापर्यंत 47,500 घरी डॉक्टरांनी भेटी देऊन तेथील रुग्ण तपासले गेले. 14,970 रुग्णांना फिरत्या दवाखान्यात तपासण्यात आले आहे. साडेतीन लाखापेक्षा जास्त नागरिकाची तपासणी करण्यात आली आहे. 8,246 वरिष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच अत्यंत कमी म्हणजे 14 दिवसांच्या कालावधीत 200 ऑक्सिजनयुक्त बेड्सचे हॉस्पिटल धारावी येथेच उभारण्यात आले. कोरोना काळजी केंद्र, फिवर क्लिनिक या परिसरसातील विविध ठिकाणी उघडण्यात आली. रात्र-दिवस डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. सुमारे दहा हजारापेक्षा जास्त लोकांचे संस्थामक विलगीकरण करण्यात आले."


दिघावकर पुढे असेही सांगतात की, "एप्रिलपासून आतापर्यंत 2335 रुग्ण सापडले असून त्यापैकी 1735 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. तर सध्या 352 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. मृत्यूची आकडेवारी निशिचत सांगता येणार नाही मात्र 80 पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये रुग्ण वाढ दुप्पट होण्याचा दर सरासरी 18 दिवस इतका होता, तर रुग्ण बरे होण्याचा दर हा 33% होता. तर जुलै महिन्यात म्हणजे आतपर्यंत रुग्ण वाढ दुप्पट होण्याचा दर सरासरी हा 430 दिवस इतका होता, तर रुग्ण बरे होण्याचा दर हा 74% इतका आहे. या काळात हजारोच्या संख्येने लोकांच्या घरी घरपोच रेशन देण्यात आले आणि कम्युनिटी किचनच्या माध्यमातून हजारो जणांना 2 वेळचे जेवण आणि नाष्टा देण्यात आला आहे."


कोरोना हा तसा संसर्गजन्य आजार, त्यामुळे धारावी सारख्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाल्याने आरोग्य यंत्रणा आणि महापालिका प्रशासनाची एकच धावपळ सुरु झाली. या घटनेमुळे पुढे काय वाढून ठेवलय याचा डॉक्टरांना अंदाज आला असेलच आणि मग जे प्रतिबंधात्मक उपाय करणे शक्य आहे आणि सापडणाऱ्या रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यास सुरुवात झाली. लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी उपलब्ध करण्यांत प्रशासनाला सुरुवातीच्या काळात अडचण येत होती. तसेच त्या भागातील खासगी डॉक्टरांचे दवाखाने बंद होते. त्यानंतर शासनाने सूचना केल्यानंतर सर्व जास्तीत जास्त दवाखाने उघडण्यात आले. मोठ्या प्रमाणात कर्मचारी हा येथेच राहतो. येथील 80% नागरिक सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. वैद्यकीय तज्ञाच्या माहितीनुसार शौचालयांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. या परिसरातील वाढत्या रुग्णसंख्येची दाखल घेत आरोग्यमंत्री राजेश टोपे स्वतः यांनी या परिसराला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी काही महत्तवपूर्ण सूचना केल्या होत्या. त्यापैकी, धारावीसारख्या दाटीवाटीच्या ठिकाणी जे सार्वजनिक स्वचछतागृहे आणि शौचालये आहेत त्याचा वापर दिवसभरात मोठ्या प्रमाणावर होतो, अशा ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने आणि पॉवर जेटचा वापर करून हे शौचालये वारंवार स्वछ्च करणे. ड्रोनचा वापर करुन निर्जुतकीरणासाठी फवारणी कराण्याचे काम करावे, असे काही उपाय सुचविले होते.


तसेच 30 वर्षापेक्षा जास्त काळ रुग्णांना सेवा देणारे आणि या परिसराची खडा-न-खडा माहिती असणारे, नेहमी येथील नागरिकांच्या संर्पकात असणारे आणि इंडियन मेडिकल असोशिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचनेकर सांगतात की, "सुरुवातीच्या काळात लोकं डॉक्टरांकडे जायला घाबरत होते. कारण परिस्थतीती तशी भयाण होती. मात्र, येथील खासगी डॉक्टरांचा येथील लोकांशी संवाद असल्याने हळूहळू लोकं घराबाहेर यायला लागली. त्याआधी घरोघरी जाऊन लॊकांना समपुदेशन आणि तपासणी करण्यात आली होती. नागरिकांनी कोणतेही लक्षण असल्यास डॉक्टरांशी संपर्क करावा असे सांगण्यात आले होते. या सगळ्या प्रक्रियेत रुग्ण आणि डॉक्टरांमधील विश्वास महत्वाचा, तो जिंकल्यामुळे रुग्ण डॉक्टरांना संपर्क करू लागले आणि त्यामुळे शक्यतो तात्काळ उपचार देणे शक्य झाले. अनेक लोकांना बाधित रुग्णाचा संपर्क टाळण्यासाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या परिसरातील खासगी डॉक्टर आणि महापालिकेचे डॉक्टर, वॉर्डबॉय, आशासेविका, यांच्या मदतीने येथील रुग्णांना आळा घालणे शक्य झाले. हे सर्वांचे यश आहे."



२२ एप्रिल रोजी, मनोज जोशी, अतिरिक्त मुख्य सचिव,(अन्न प्रक्रिया उद्योग) याच्या अध्यक्षतेखाली केंद्राच्या समितीने मुंबईतील विविध भागांना भेट देऊन पाहणी केली. विशेषतः त्यांनी धारावी येथे जाऊन कशा पद्धतीने राज्य सरकारने आणि महापालिकेने व्यवस्था केली त्यांच्या कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सूचना केल्या आहेत. त्यांमध्ये त्याणी येणाऱ्या काळात रुग्ण संख्या कशी वाढली जाऊ शकते याचे अनुमान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर त्यांनी अलगीकरणाकरिता जास्त व्यवस्था करावी, त्याच प्रमाणे आयसोलेशन चे बेड अधिक प्रमाणात वाढवावे, ऑक्सिजन सहित असणाऱ्या बेड ची संख्या वाढवावी, तसेच टेस्टिंगच प्रमाण वाढवावं अशा काही महत्वाच्या सूचना केल्या होत्या.


तर ५३ वर्षांपासून अधिक काळ राहणारे येथील नागरिक आणि धारावी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त राजू कोरडे यांच्या मते, " रमजान ईद नंतर येथील बऱ्यापैकी मजूर आपल्या गावी निघून गेली त्यामुळे येथील ३० टक्के लोकं निघून गेली आणि तेवढा धारावीवरील भार कमी झाला. आज रुग्ण संख्या आटोक्यात येण्याचे श्रेय महापालिका प्रशासन यांच्यासोबत येथील स्वयंसेवी संस्था, सहकारी गृह निर्माण संस्था, चाळ कमिट्या, छोटी-मोठी मंडळे यांना खऱ्या अर्थाने जाते. या सगळ्यांनी मिळूनच एकत्रितपणे येऊन कोरोनाला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. या मंडळांनी प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून काही औषध गोळ्याचा वाटप या परिसरात केले. निर्जंतुकीकरणाचे मोठे काम येथे लोक सहभागातून उभे राहिले आहे."


धारावी येथील कोरोनाच्या 'हॉटस्पॉट' ला नॉर्मल करण्यात प्रशासनाला सगळ्याच्या मदतीने आटोक्यात आणण्यात चांगलंच यश मिळालं आहे. त्यांच्या कामाची दखल केंद्रीय पथकाने घेऊन उत्तम कामगिरी केल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे 'धारावी पॅटर्न' ची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. या आणि अशाच पद्धतीने शासनाने जर इतर ठिकाणी अशा पद्धतीने कामाची आखणी केली तर कोरोनाला आटोक्यात आणणे शक्य होईल आणि मग या धारावीतील कोरोनाच्या उच्चाटनचा सर्वच स्तरात जय-जयकर झाल्याशिवाय राहणार नाही.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग