ज़रा याद करो कुरबानी
तुम भूल ना जाओ उनको
इसलिए सुनो ये कहानी
आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या अजरामर गाण्याच्या ओळी येथे आठविल्याशिवाय राहत नाही.
रविवारी राज्यातील सर्वच डॉक्टरांच्या मोबाईलवर 'डोंबिवली येथील डॉ. पंकजकुमार चौधरी यांचा कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू' ही बातमी धडकली आणि मग या बातमीविषयी डॉक्टरांमध्ये चर्चा सुरु झाली. खरं तर प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा तितकाच महत्वाचा. प्रत्येक मृत्यूमागे एक कुटुंब असते, त्याची एक आपली सामाजिक व्यवस्था असते. कोरोनासोबत सुरु असलेल्या या युद्धात अनेक योद्ध्यांना युद्ध लढत असताना वीरमरण प्राप्त झाले आहे. मग ते डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आशा वर्कर, आरोग्य सहाय्यक, पोलीस विभाग, राज्य परिवहन महामंडळाचे आणि बी.ई.एस.टीचे चालक, वाहक आणि अन्य कर्मचारी, या ठिकाणी काम करणारे आणि तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या अनेकांना आपले कर्तव्य पार पडताना या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. यापैकी अनेक जण उपचार घेऊन बरे होऊन पुन्हा कामावर रुजूही झाले आहेत. त्याच ठिकाणी त्याच व्यवस्थेत ज्या ठिकाणी त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. केवळ इतर नागरिकांना त्यांच्या सर्व सेवा सुविधा व्यवस्थित मिळत राहाव्यात म्हणून. त्यांना घरी बसण्याचा 'पर्याय' नसतो कारण त्यांचे कामावर जाणे अनिवार्य आणि अत्यंत गरजेचे असते. हे सगळं सुरु आहे सर्व सामान्य नागरिक सुरक्षित आणि निरोगी राहावेत म्हणून. मात्र या सगळ्यात प्रक्रियेत आपण सामान्य नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी पाळतोय का?
डॉक्टरांकडून आजारी पडण्याच्या दिवसापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार
देशभरात 100 पेक्षा जास्त डॉक्टरांचा या संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाला आहे, तर 1300 पेक्षा जास्त डॉक्टरांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. रविवारी मृत पावलेले डॉक्टर हे कुणी वयस्कर डॉक्टर नव्हते. 36 वर्षाचे तरुण युरॉलॉजिस्ट जे या आजाराचा संसर्ग होऊन आजारी पडण्याच्या दिवसापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांना उपचार देत होते. त्यांना दीड वर्षाची मुलगी असून त्यांची बायको सुद्धा डॉक्टर आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरातील जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 8 टक्के डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे. बाधितांमध्ये 150 शल्यविशारदांचा समावेश असून, 566 निवासी डॉक्टर आणि 586 डॉक्टरांचा समावेश आहे. तसेच ही आकडेवारी जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे असोसिएशन कडून सांगण्यात आले आहे. तसेच या व्यतिरिक्त देशभरातील होमियोपॅथी, आयुर्वेद आणि युनानी विषयातील डॉक्टर यांची आकडेवारी समाविष्ट नाही. या विषयातील डॉक्टरांचाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, शिवाय काही जण रुग्णांना उपचार देताना मृत्यू पावले असतील. मात्र या सगळ्याची एकत्र आकडेवारी कुठेही उपलब्ध नाही.
इंडियन मेडिकल असोसिएशन मेडिकल बोर्डाचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ मंगेश पाटे असे सांगतात की, " एक तरुण डॉक्टर या महामारीत जातो, जो की पुढील आयुष्यात 5-6 लाख लोकांना उपचार देऊ शकला असता. शेवटच्या दिवसापर्यंत अनेक डॉक्टर रुग्णांना उपचार देताना मृत्यूमुखी पडले आहेत. फक्त अॅलोपॅथी डॉक्टरच नाही तर अन्य विषयातील डॉक्टरही या लढाईमध्ये आपले कर्तव्य बजावत आहे. प्रत्येक जण आपआपल्या शास्त्रीय ज्ञानाप्रमाणे रुग्णांना उपचार देत आहेत. डॉक्टरांप्रमाणे अन्य आरोग्य कर्मचारी याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे, ते सुद्धा जीवाची बाजी लावून डॉक्टरांसोबत दिवस रात्र काम करीत आहेत. वॉर्डबॉय, नर्स आणि आरोग्य सहाय्यक याना सुद्धा या आजराचा प्रादुर्भाव झाला आहे. काही जणांना प्राणही गमवावे लागले आहेत. सगळे जण रुग्ण वाचाविण्यासाठी काम करत आहेत."
ते पुढे असेही सांगतात की, "डॉक्टरांसहित विविध अत्यावश्यक सेवेतील लोकांना या आजाराचा संसर्ग झाला असून त्यांचाही या आजारामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र ज्यांच्याकरिता हे एवढं सगळं सुरु आहे त्या नागरिकांना हे कळतंय का? त्यांनी खरं तर या काळात या सर्वच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या सर्व लोकांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे अपेक्षित आहे. मात्र गेले काही दिवस मी बघतोय काही जण कोरोनाच्या आजाराच्या नावाने डॉक्टरांची टिंगल-टवाळी करत आहेत. खोट्या बदनामीकारक गोष्टी पसरवत आहेत. चुकीचे संदेश सोशल मीडियावर फिरवत आहेत. एक बाजूला आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचं कायमच आपल्या आयुष्यातून निघून जाणं आणि दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर आरोग्य कर्मचाऱ्यांची बदनामी बघितलं की संताप येतो, चीड निर्माण होते. शेवटी डॉक्टर सुद्धा एक माणूसच असतो त्याला इतर लोकांप्रमाणे कुटुंब आणि नातेवाईक असतात. ते सगळे डॉक्टरांची होणारी बदनामी वाचत असतात. नाईलाजास्तव डॉक्टरांना काम बंद करण्याची वेळ आली तर काय होईल याचा विचार या समाजातील काही महाभागांनी करावा."
'फ्रंटलाईन' वर काम करणारे पोलीस
डॉक्टरांप्रमाणे या युद्धात 'फ्रंटलाईन' वर काम करणारे म्हणजे पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस रात्र आणि दिवस रस्त्यावर उभे आहेत . टाळेबंदीच्या काळात लोकांनी घरातच राहावे, सुरक्षिततेचे नियम पाळावेत म्हणून पोलीस दलातील सर्व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत. त्यांचे हे कर्तव्य बजावताना हजारो पोलिसांना या आजाराचा संसर्ग झाला असून बहुतांश पोलीस उपचार घेऊन कामावर रुजूही झाले आहेत. तर 1 हजार 596 पोलीस राज्यातील विविध रुग्णालयात सध्या उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 87 पोलिसांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. या मृत्यूंमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सर्वांना शासनातर्फे योग्य उपचार दिले जात आहेत. आपल्या कुटुंबाचा विचार न करता हे सर्वजण आपले कर्तव्य इमाने इतबारे बजावत आहेत. देशात अशाप्रमाणे अनेक जण संसर्गाने ग्रस्त झाले असतील.
"मात्र या सगळ्या बलिदानाची देशातील आणि राज्यातील सुज्ञ नागरिकांनी दाखल घेऊन यामधून धडा घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या या महामारीला सगळ्यांनीच युद्धाचा दर्जा दिला आहे. अशा या वेळी युद्ध लढताना 'फ्रंटलाईन' वर काम करणारे हे योद्धे घायाळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तरी हे सगळे योद्धे एकदिलाने या संकटाचा मुकाबला करीत आहे. कुणीही शस्त्र टाकून रणांगण सोडून जात नाही. ज्याप्रमाणे आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी या एखाद्या विषाणू किंवा जिवाणूने शरीरात शिरकाव केल्यावर त्यांच्याबरोबर लढत असतात, त्याचप्रमाणे हे योद्धे म्हणजे 'पांढऱ्या पेशी' या कोरोनाच्या विषाणूशी लढत आहेत. नागरिकांनी या सर्व योद्ध्यांना या काळात सहकार्य केले पाहिजे. त्यांना सहकार्य करायचे म्हणजे सुरक्षिततेचे नियम पाळायचे, सोशल डिस्टन्सिंग पाळायचे, तोंडाला मास्क लावायचा, विनाकारण घराबाहेर जाणे टाळणे. स्वच्छतेचे सर्व नियम अमलात आणायचे. हीच सध्याच्या काळातील देशसेवा आहे. कारण हा सगळा लढा नागरिक व्यवस्थित राहावे म्हणूंनच सुरु आहे," असे, डॉ प्रदीप आवटे सांगतात. डॉ आवटे हे शासनाच्या आरोग्य राज्य सर्वेक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचं योगदानही महत्वाचं
राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अनेक शहरातील लोकांना अडकलेल्या त्यांच्या राज्यातील सीमेवर सोडण्यापासून ते अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या कार्यालयात, रुग्णालयात सोडण्याचं महत्त्वपूर्ण काम राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे. या सगळ्या प्रक्रियेत त्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. प्रत्येक जण या कोरोनाच्या लढाईत आपले योगदान देत आहेत. ज्यावेळी सर्व दळणवळणाची साधने बंद होती तेव्हा ही लालपरी लोकांचा आधार बनली होती. या सेवेत काम करणाऱ्या 329 इतक्या कर्मचाऱ्यांना या आजाराची लागण झाली आहे आणि 9 कर्मचाऱ्यांचा या आजारामुळे या दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 181 कर्मचारी उपचार घेऊन बरे झाले आहेत तर 139 लोकांवर उपचार सुरु आहेत. या सेवेतील कर्मचाऱ्यांची अवस्था आणखीच बिकट आहे.
लोकल बंद बेस्ट कर्मचाऱ्यांची सेवा सुरु
तर मुंबई शहरात रेल्वेच्या लोकल सेवेनंतर सर्व मुंबईकर अवलंबून असतो तो बीईएसटीवर. कारण त्यांचं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मुंबईमध्ये सर्वात मोठे जाळे आहे. कोरोना काळात त्यांनीही लोकल सेवा बंद असताना मुंबई शहराबाहेरून अत्यावश्यक सेवेतील लोकांना आणण्यासाठी मोठं योगदान दिले आहे. जेव्हा लोकल सेवा सर्व सामान्यांसाठी बंद आहे तेव्हा बीईएसटी त्यांना सेवा पुरवत आहे. या सेवा पुरवत असताना या कर्मचाऱ्यांना या संसर्गाची लागण झाली असून इतके जण 1 हजार 160 या संसर्गजन्य आजारामुळे आजारी पडले. त्यापैकी 827 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर काही जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
मनपा कर्मचाऱ्यांसह विविध विभागांचं योगदानही महत्वाचं
या व्यतिरिक्त महापालिकेत, मंत्रालयात, जिल्हा आणि तालुका स्तरावरील शासकीय सेवेत करणारे सफाई कामगार, कर्मचारी, अधिकारी यापैकी काही लोकांना कर्तव्य बजावत असताना या आजाराचा संसर्ग झाला आहे. तर काही जणांचा मृत्यूही झाला आहे. काही लोकप्रतिनिधींचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. त्यांना सुद्धा या आजाराची लागण झाली असून उपचार घेऊन ते बरे होऊन पुन्हा आपल्या कामाला लागले आहेत. तसेच काही खासगी सेवेत काम करणारे टॅक्सी ड्रायव्हर, वीज कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि मीडिया मध्ये काम करणाऱ्या माध्यमकर्मींना या आजाराची या काळात लागण झाली आहे. अनेक अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची एकत्रित आकडेवारी मिळू शकलेली नाही.
विशेष म्हणजे या सर्व अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांचं विशेष म्हणजे प्रत्येक जण उपचार घेऊन बरे होऊन पुन्हा त्याच ठिकाणी काम करीत आहे. या महाभयंकर कोरोनाच्या संकटाबरोबर लढताना अनेक समस्यांचा मुकाबला या सगळयांनाच करावा लागत आहे. मात्र केवळ आपण सर्व नागरिक जे या अत्यावश्यक सेवेत काम करीत नाही ते उत्तम राहावेत त्यांना सर्व नागरी सुविधा व्यस्थित मिळत राहाव्यात, या करीता हे सर्वच जण जीवाचे रान करीत आहे. आजही कुठलेही ठोस औषध या आजाराकरता निघाले नसताना आरोग्य यंत्रणा रुग्णांना बरे करण्यात यश मिळवत आहे. अशा वेळी आपल्यासाठी वेळ प्रसंगी जीव दिलेल्या या 'योद्ध्यांचं बलिदान व्यर्थ' जाऊ द्यायचं नसेल तर आपण शासनाने दिलेले सर्व नियम पाळून त्यांच्या या लढत असलेल्या लढ्याला बळ प्राप्त होईल असे कृत्य केले पाहिजे. देश रक्षणाकरता आपले सगळे योद्धे काम करीत आहे. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना या लढाईत यश मिळावं यासाठी प्रार्थना करून आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे. या सर्व 'दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या' या योद्ध्यांना मानाचा मुजरा.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | लक्षणविरहित रुग्णाचं काय?
- BLOG | कोरोनाबाधितांची ओळख परेड?
- BLOG | कोरोनामय 'डायबेटिस'
- BLOG | संपता संपेना... कोरोनाकाळ
- BLOG | कोरोनाची वक्रदृष्टी पुरुषांवर अधिक!