तीन-साडे तीन महिन्यानंतरही राज्यातील धार्मिक स्थळे आजही बंदच ठेवण्यात आली आहे. धार्मिक सण उत्सव म्हटलं म्हणजे हमखास मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात. मागच्या महिन्यांमधील काही सण उत्सव पहिले तर गुढीपाडवा, शिवजयंती उत्सव, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, आणि ईद सारखे सर्वच सण सध्या पद्धतीने साजरे केले. विशेष म्हणजे दरवर्षी आषाढीसाठी लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाकरिता पंढरीची वाट धरतात. मात्र या ऐतिहासिक परंपरेला कोरोनामुळे वारीला मर्यादित स्वरूप प्राप्त झाले. शासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करून हा उत्सव साजरा केला गेला. त्याचप्रमाणे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेला गणेशोत्सव काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. अनेक मंडळांची एव्हाना तयारी करण्यास सुरुवात सुद्धा झालेली असते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षत घेता शासनाने यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे सर्वच मंडळांनी शासनाच्या या निर्णयाचं स्वागत केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर मुंबईतील 'गोविंदा उत्सव' म्हणजे दहीहंड्या रद्द केल्या गेल्या आहेत.
कोरोना विषाणुच्या संकटांचे भान ठेवून, आरोग्याची काळजी घेऊन गणेशोत्सव साजरा करू या, असे आवाहन काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मंडळांना केले होते. तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने व्हिसीद्वारे संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी, कोरोना विषाणुचे सावट असल्याने यंदा सार्वजनिक गणेश उत्सवाच्या स्वरुपावर मर्यादा येईल. त्यामुळे यंदा उत्सव मंडळांनी मुर्तींची उंची लहान ठेवण्याबाबत विचार करावा. प्रत्येक छोट्या – मोठ्या गोष्टींचे कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठीच्या उपाय योजनांच्या अंगाने नियोजन करावे. उत्सव मंडपही लहान असावेत. सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्यविषयक सर्व काळजी घेण्याचे नियोजनही याठिकाणी करावे लागेल. विषाणूचे संकट टळल्यानंतर, पुढच्या वर्षी हाच गणेश उत्सव गतवर्षीच्या उत्सवाच्या कितीतर पट उत्साहाने साजरा करता येईल. हा विश्वास बाळगून यंदाचा उत्सव साजरा करू या, असेही आवाहन केले होते.
त्यानंतर, मुख्यमंत्र्याची आणि मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळांशी चर्चा झाली. त्यात, शिस्तीचे व सामाजिक भान ठेवून उत्सव करावा यावर एकमत झाले. तसेच गणरायांचे आगमन घरी होईल तसे सार्वजनिक उत्सव मंडपांतही होईल. गणराय येताना महाराष्ट्रासाठी आशीर्वाद, सुरक्षा कवच घेऊनच येतील. पण भव्य मूर्तीऐवजी 4 फुटांपर्यंतच्या मूर्तीचीच मंडपात प्रतिष्ठापना व्हावी, यावर एकमत झाले आहे. मोठ्या मूर्तीमुळे त्यांचे आगमन व विसर्जनप्रसंगी जास्त कार्यकर्ते लागतात. ते टाळावे लागेल. शेवटी मूर्तीची उंची नाही तर भक्ती महत्वाची आहे. मंडपात नेहमीची गर्दी नको. गणरायांचे विसर्जन कमीत कमी गर्दी, नियमांचे पालन करत होईल. उत्सवास भीतीचे गालबोट लागू नये यासाठीच सार्वजनिक मंडळांशी चर्चा करून हे सर्व ठरले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या 'लालबागचा राजा' ची प्रतिष्ठापना न करण्याचा निर्णय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोउत्सव मंडळाने घेतला आहे. उत्सवाच्या ह्या काळात मंडळ आरोग्यउत्सव साजरा करणार असून त्या 11 दिवसात महारक्तदान शिबीर, महापालिकेच्या साहाय्याने प्लाझ्मादान उपक्रम राबविण्यात येणार आहे. मंडळाच्या या भूमिकेचं सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. हे मंडळ वर्षभर आरोग्यच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवित असतात. यापूर्वीही मंडळाने मोठ्या रक्तदान शिबिराचे आयोजन करून दीड हजारांपेक्षा जास्त बाटल्या रक्त संकलित केल्या होत्या. अशा प्रमाणे काही मंडळांनी यावेळी उत्सव साजरा न करता माघी (फेब्रुवारी) महिन्यात उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने गणपती दर्शनासाठी गर्दी मुंबई आणि पुणे शहरात होत असते. सध्या हा रोगराईचा काळ पाहता नागरिकाचे आरोग्य महत्वाचे आहे. त्यामुळे प्रशासन सर्व त्या खबरदारी घेत आहे.
बृहन्मुंबई गणेशोउत्सव समन्वय समितीचे, अध्यक्ष, नरेश दहिबावकर सांगतात की, "सध्याची परिस्थिती पाहता, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सार्वजनिक गणेशोउत्सव मंडळांना जे आवाहन केले त्याचे बहुतांश सर्वच मंडळांनी स्वागत केले आहे. कारण कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे गर्दी टाळणे पाहणे फार गरजेचे आहे. त्यामुळे बहुतेक मंडळांनी यंदा गणपतीची मूर्ती छोटी ठेवण्याचा निर्णय मान्य केला आहे. विशेष म्हणजे या काळात आगमन आणि विसर्जन मिरवणूक होणार नाही. चौपाट्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी गणपतीचे विसर्जन पण या यावेळी कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे. आमची शासनाकडे आणि महापालिकेकडे एवढीच विनंती आहे की त्यांनी यावर्षी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी जेणेकरून एकाच तलावावर जास्त गर्दी होणार नाही."
ते पुढे असेही सांगतात की' "मुंबई शहरात एकूण 12000 सार्वजनिक गणेशोउत्सव मंडळे हा उत्सव साजरी करीत असतात. त्यातील ९९ टक्के मंडळांनी मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य केला असून यंदाच्या वर्षी चार फुटीच मूर्ती आणण्यात येणार आहे. कोरोनाच्या या संकटामुळे यंदा उत्सव साध्या पद्धतीनेच साजरा करण्यात येणार आहे. पोलिसांवर आणि प्रशासनावर अगोदरच खूप ताण आहे, त्यामुळे उत्सवाच्या कामाचा ताण त्यांच्यावर अधिक पडता कामा नये अशीच भूमिका बहुतांश मंडळांनी घेतली आहे."
एकंदरच काय तर या सर्व कोरोनाच्या आजारामुळे सध्या सर्वच गोष्टी या साध्या आणि सावधपणे साजऱ्या केल्या जात आहेत. कारण या संकटाची व्याप्तीच इतकी मोठी आहे की या आजाराचा प्रसार भराभर होतो. सुरक्षिततेचे नियम ना पाळल्यास आपल्याला साधं कळायच्या आत या आजाराचा संसर्ग नागरिकांना होत आहे. त्यामुळे शक्य तेवढी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. यंदाच्या वर्षी या सर्वच मानवी उत्सवांवर कोरोनामुळे चाप आला आहे.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | लक्षणविरहित रुग्णाचं काय?
- BLOG | कोरोनाबाधितांची ओळख परेड?
- BLOG | कोरोनामय 'डायबेटिस'