एक्स्प्लोर
अनटोल्ड अरनॉल्ड : अरनॉल्ड श्वार्झनेगरची दास्तान...
"अरनॉल्डच्या एकंदर आयुष्याकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की नियतीने त्याच्याशी नेहमीच खेळ खेळला आहे. त्याचं बरंच काही हिरावून घेऊन नियतीने त्याच्या हाती काही दिलं तेंव्हाही एका पावलावर तृप्ती तर एका पावलावर वियोग, भ्रमनिरास आणि हिरमोड यांचा मिलाफ दिला. वरवर भक्कम पोलादी देहयष्टीचा हा अफाट माणूस मनस्वी हळव्या मनाचा का आहे हे त्याच्या आयुष्याकडे पाहताच लक्षात येते. 'अरनॉल्ड श्वार्झनेगर' व्हावं वाटणं खूप सोपं आहे पण या माणसाच्या जीवनाचा सतत वरखाली होणारा आलेख पहिला की लक्षात येतं की अरनॉल्ड श्वार्झनेगर बनून जगणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी पोलादी देहासोबत काळीजही पोलादीच हवं !..... "

अरनॉल्ड श्वार्झनेगरचे आयुष्य जितक्या प्रकाशझोतांनी भरलेले आहे तितक्याच काळोखानेही त्याला ग्रासले आहे. एखादी व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर तिच्या लाईमलाईटबद्दल सर्वत्र चर्चा होऊ लागते, मात्र त्याच वेळी तिच्या आयुष्याच्या एका कोनाड्यात बंदिस्त असलेल्या दुःस्मृतींना हात लावण्यास कुणी धजावत नाही. संवेदनशील आणि सच्च्या मनाच्या व्यक्ती स्वतः होऊनच काळाच्या पडद्याआड दडलेल्या या अंधारल्या गोष्टींना जगापुढे आणतात. त्यावर खुल्या मनाने व्यक्त होतात. त्यासाठी खूप मोठं मन आणि धाडस लागतं. अरनॉल्डसारख्या बलदंड बलशाली व्यक्तीसदेखील सुरुवातीला ते नीट जमलं नाही परंतु काही काळ गेल्यावर त्याला सत्य पचवता आलं आणि जगापुढे मांडता आलं.
अजूनही अरनॉल्ड त्याच्या निकटवर्तीयात 'अर्नी' या टोपणनावाने प्रसिद्ध आहे. अरनॉल्ड एक कॅथोलिक कुटुंबात मोठा झाला ज्याने त्याला शिस्त पाळली. 30 जुलै 1947 रोजी ऑस्ट्रियामधील थाल येथे अरनॉल्डचा जन्म झाला. अरनॉल्डची आई ऑरेलिया हिचा गुस्टाव श्वार्झनेगर यांच्याशी विवाह झाला होता. गुस्टाव हे स्थानिक पोलीस प्रमुख होते. दुसऱ्या महायुद्ध काळात त्यांनी सैन्यदलातही काम केलं होतं. त्यांचा जन्म 17 ऑगस्ट 1907 चा. ते अत्यंत कठोर मनाचे शिस्तप्रिय व्यक्ती होते. उंचीपुरी मजबूत शरीरयष्टी, रांगडे व्यक्तिमत्व आणि काहीसा अबोल व संतापी स्वभाव. 1938 मध्ये त्यांनी स्वेच्छेने नाझी पार्टीत प्रवेश मागितला आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये एक लष्करी पोलीस अधिकारी म्हणून काम केले. साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला तेव्हा काही अधिकाऱ्यांना त्याची जबाबदारी देण्यात आली होती, त्यातच एक गुस्टाव्ह होते. मलेरिया निवारणात हलगर्जी केल्याच्या आरोपावरुन त्यांना सैन्यदलातून मुक्त करण्यात आले. युद्धानंतर, ऑस्ट्रियातील वेइझ येथे त्यांना तैनात करण्यात आले होते. तेथे त्यांनी मृत्यूच्या दिवसापर्यंत पोलीस प्रमुख म्हणून काम केले.
अरनॉल्डसाठी आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा व कुटुंबाप्रति असलेली स्नेहभावना जीवापाड महत्वाची होती पण आपल्या सार्वजनिक जीवनांत त्याने तसे कधी जाणवू दिले नाही. अमेरिकेतील वास्तव्यात त्याचं करिअर आकारास येत असताना त्याचा अर्धा जीव कुटुंबात गुंतून पडलेला असे. प्रारंभीच्या काळात त्याचे वडील गुस्टाव यांचे नाव नाझी पक्षाशी आणि त्यातल्या छळ छावण्यांशीही जोडले जायचे तेव्हा अरनॉल्डच्या संपूर्ण कुटुंबास नरक यातना होत. आपल्या वडिलांवर झालेले आरोप त्याला अस्वस्थ करत, पण मनातल्या अशांततेचा उद्रेक त्याने कधीच होऊ दिला नाही, किंबहुना त्याचाच त्वेष त्याने बॉडी बिल्डिंगमध्ये वजन उचलण्यावर काढला. त्याचं हे संयमित वर्तन पाहून अखेरच्या काळात वडिलांनी कुटुंबाचा पुढचा आधार म्हणून त्याचीच निवड केली होती. अरनॉल्डने समाजात मानाचे स्थान काबीज केल्यानंतरही त्याच्या मनातला हा सल काही केल्या जात नव्हता. त्याने जगापासून लपवत वडिलांच्या युद्ध रेकॉर्डची तपासणी करण्यासाठी सायमन विसेन्थल सेंटर या जर्मन युद्ध संशोधन केंद्रात माहितीची मागणी केली. तेथून प्राप्त झालेल्या कागदपत्राच्या संशोधनाच्या निष्कर्षांवरुन असे दिसून आले की, त्याच्या वडिलांचा कुप्रसिद्ध नाझी पक्ष आणि 'एसए' (स्ट्रूमबाईटिंग) विंग यांनी केलेल्या अत्याचारांशी त्यांचा संबंध नव्हता. ऑस्ट्रियामधील गोपनीयतेच्या कायद्यानुसार सैनिकाच्या मृत्यूनंतर 30 वर्षे त्याची खाजगी माहिती सार्वजनिक केली जात नाही. हा नियम गुस्टाव्ह यांनाही लागू राहिला, अरनॉल्डपायी त्यात बदल केला गेला नाही. या माहितीनुसार 1 मार्च 1938 रोजी त्यांनी नाझी पार्टीकडे सदस्यत्व मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांचा स्वभाव आणि वर्तन पाहू जाता हे साहजिक होतं. 'द नॅशनल सोशालिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी'कडेही त्यांनी 1939 मध्ये अर्ज केला होता. मात्र 'एसए' या हिटलरच्या उदयास कारणीभूत ठरलेल्या विंगेने सदस्यसंख्या सातत्याने घटू लागल्यावर गुस्टाव्ह यांना सदस्यत्वच नाकारले होते, आणि थेट नाझी चळवळीशीही त्यांचा संबंध आला नव्हता. ही माहिती कळल्यावर अरनॉल्डला थोडंसं हायसं वाटलं पण तरीही त्याच्या मनाच्या एका कप्प्यात जन्मदात्या बापाबद्दल अपार कटुता राहिली, त्याला कारणही तसेच होते.
अरनॉल्डची आई ऑरिलिया जॅडिनी श्वार्झनेगर हिचा जन्म जानेवारी 1922चा. गुस्टाव्ह श्वार्झनेगरनी ऑरिलियाशी लग्न केलं. या दोघांच्या वयात तब्बल पंधरा वर्षांचे अंतर होते. स्वभाव भिन्न होते. ऑरिलियाचा स्वभाव अत्यंत मृदू, भिडस्त आणि सहनशील होता. ती गुस्टाव्हला घाबरुन असायची. तिला त्याची सदैव दहशत वाटे, तरीही तिचा आपल्या पतीवर अपार जीव होता. त्याच्या कोपिष्ट, चिडचिड्या वृत्तीचा तिने कधी तिरस्कार केला नाही. 20 ऑक्टोबर 1945 रोजी त्यांचा विवाह संपन्न झाला तेव्हा तिला स्वप्नात देखील वाटले नसेल की आपल्या पोटी जन्माला येणारा पुत्र जगातील सर्वात बलदंड पुरुषांपैकी एक असेल. या दाम्पत्यास दोन मुलं झाली. थोरला मीनहार्ड आणि धाकटा अरनॉल्ड. ले - वेंडी यांनी लिहिलेल्या 'अरनॉल्ड एन अनऑथॉराईज्ड बायोग्राफी'नुसार गुस्टाव्ह श्वार्झनेगर यांचा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर विश्वास नव्हता. त्यांना एक अनामिक भीती असायची की आपण नोकरीवर बाहेर असलो की आपली पत्नी ऑरिलियाचे कुणाशी तरी अफेअर असावे. या संशयाने त्यांना पुरते पछाडले होते. याची परिणिती नाती बिघडण्यात झाली.
गुस्टाव्ह श्वार्झनेगर आपल्या थोरल्या मुलावर म्हणजेच मीनहार्डवर खूप माया करत, त्याच्यावरील प्रेमात कसलीच कसर ते बाकी सोडत नसत. या उलट ते अरनॉल्डशी वागत, त्यांना शंका असे की आपण या मुलाचे जैविक पिता नाही. मीनहार्डला त्याने मागितलेली कोणतीही वस्तू मिळे, त्याचा लाड पुरवला जाई, त्याचं शिक्षण पालन पोषण सगळं ऐटीत झालं तर अरनॉल्डच्या वाट्याला सवतीभाव असे. त्याचं बालपण अत्यंत निष्ठुरपणे चिरडलं गेलं. त्याला अनेकदा मार खावा लागला. यातना सोसाव्या लागल्या. अशा वेळी आई ऑरिलियाचं काळीज तुटत असे पण कठोर आणि पराकोटीच्या दडपशाही वृत्तीच्या गुस्टाव्हसमोर तिचे काही चालत नव्हतं. अरनॉल्डने हे कसं सहन केलं असेल हे सांगता येत नाही. कारण एकीकडे मोठ्या भावाचे सगळे हट्ट पुरे होताना दिसत, त्याचे लाडकोड दिसत आणि दुसरीकडे त्याच्याबद्दलचा तिरस्कार बालमनास लक्षात येई. अरनॉल्डच्या बॉडी बिल्डिंगमध्ये या दडपणयुक्त घटकाचा मोठा वाटा राहिला असणार आहे. प्रचंड दमन झाल्यामुळे अफाट जिद्दीने पेटून उठलेल्या अरनॉल्डने स्वप्नातीत शरीरसंपदा कमावली. त्यासाठीची एकाग्र वृत्ती बालपणीच्या अन्यायामुळे अंगी बाणली असावी. तो सेलिब्रिटी झाल्यानंतर या सर्व घटनांनावर हॉलीवूडमध्ये चर्चा होत नव्हती असे नाही, कारण गॉसिप हा अनेक फिल्मी नियतकालिकांचा आत्मा असतो. त्या नुसार अरनॉल्डचा भयानक भूतकाळ हा औत्सुक्याचा विषय होऊन राहिला. खुद्द अरनॉल्डला या सर्वांवर मनमोकळे व्यक्त होण्यासाठी 2016 साल उजाडावे लागले. त्यापूर्वी त्याने अनेकदा या गोष्टींवर अत्यंत त्रोटक भाष्य केलं होतं. त्यातही कन्फ्युजन होतं, त्यानं कधी या बाबी नाकारल्या होत्या तर कधी स्वीकारल्या होत्या. 2004 च्या एका मुलाखतीत तो आपल्या बालपणाविषयी म्हणतो की, My "hair was pulled. I was hit with belts. So was the kid next door. It was just the way it was. Many of the children I've seen were broken by their parents, which was the German-Austrian mentality. They didn't want to create an individual. It was all about conforming. I was one who did not conform, and whose will could not be broken. Therefore, I became a rebel. Every time I got hit, and every time someone said, 'You can't do this,' I said, 'This is not going to be for much longer because I'm going to move out of here. I want to be rich. I want to be somebody."
अरनॉल्डचे वडील गुस्टाव्ह श्वार्झनेगर यांचे 13 डिसेंबर 1972 रोजी ऑस्ट्रियामधील विझ या गावी निधन झाले. त्यांच्या दफनविधीस अरनॉल्ड उपस्थित नव्हता. त्याने वेगवेगळ्या मुलाखतीत याची वेगवेगळी कारणे सांगितल्याने वस्तुस्थितीबद्दल अधिकच संभ्रम पैदा झाला. फॉरच्यून मासिकास दिलेल्या मुलाखतीनुसार तेव्हा सिनेमाचे शूटिंग सुरु असल्याने ते रद्द करुन वडिलांच्या दफनविधीस जाता आलं नाही असं त्याने म्हटलं असलं तरी ते पूर्णसत्य नव्हतं. दुसऱ्या एका मुलाखतीत शरीरसौष्ठव स्पर्धेतील सहभागामुळे आपण अनुपस्थित राहिलो असेही म्हटलं होतं. गुस्टाव्ह श्वार्झनेगर यांना अरनॉल्डबद्दल तिरस्कार होता इतक्यावरच ही गोष्ट संपत नव्हती तर मोठा मुलगा मीनहार्ड याने अरनॉल्डच्या पुढे जावे असे त्यांना मनोमन वाटे. खुद्द मीनहार्ड मात्र याला राजी नसे. आपल्या धाकट्या भावावर आणि आईवर त्याचा जीव होता. वडील समोर असले की तो त्यांच्या तोंडदेखलं त्यांना हवं तसं वागायचा. पण वास्तवात सगळी परिस्थिती त्याला ठाऊक होती. 'पम्पिंग आयर्न' या डॉक्युमेंट्रीमध्ये याची प्रचिती येते.
20 मे 1971 रोजी दारु पिऊन वेगाने कार चालवत असताना मीनहार्डचे गाडीवरील नियंत्रण सुटले, त्याच्या कारचा अपघात झाला आणि त्यात तो जागीच मरण पावला. खरे तर मीनहार्डच्या अकाली निधनामुळे गुस्टाव्ह श्वार्झनेगर अगदी खचून गेले. पण या नंतर त्यांच्या वागण्यात आश्चर्यकारक बदल होत गेला. आपण केलेल्या चुकांची त्यांना जाणीव झाली. त्यांचा अरनॉल्डवरील द्वेषभाव लोप पावला पण तोवर बराच उशीर झाला होता. अरनॉल्ड आता खूप मोठा माणूस झाला होता आणि इच्छा असूनही कुटुंबासाठीचा प्राईम टाईम तो देऊ शकत नव्हता. दुर्दैवाची बाब अशी की अरनॉल्ड आपला भाऊ मीनहार्ड याच्या दफनविधीसही उपस्थित राहू शकला नव्हता. खरे तर भावावर त्याचे प्रेम होते पण या घटनेमुळे गुस्टाव्ह खचून गेले. त्या नंतर ब्रेन स्ट्रोकमुळे लाडक्या मुलाच्या मृत्यूनंतर अवघ्या दीड वर्षात त्यांचे निधन झाले.
थोरला भाऊ आणि वडील एका पाठोपाठ गेल्याने अरनॉल्डला धक्का बसला होता. त्याने स्वतःला सावरले आणि मीनहार्डचा मुलगा पॅट्रिक मारिओ याला आपल्या मायेची उब दिली. पॅट्रिकला आपल्या पित्याची उणीव कधीही भासू दिली नाही. किंबहुना अरनॉल्डने पॅट्रिकवर आपल्या पोटच्या मुलांपेक्षा जास्त जीव लावला. त्याला अमेरिकेस शिक्षणासाठी पाठवून त्याचे आयुष्य घडवले. यावेळी अरनॉल्डचे वय होते पंचवीस वर्षाचे. एकीकडे बॉडी बिल्डिंगचे करिअर तर एकीकडे तारुण्यसुलभ प्रेमभावना आणि त्याच वेळी घडत असलेल्या कौटुंबिक उलथापालथीमुळे अरनॉल्डचे चित्त स्थिर नव्हते. 1965 मध्ये त्याने ज्युनिअर मिस्टर युरोपचे टायटल पटकावले होते. 1966 मध्ये मिस्टर युरोप, 1966, 1967, 1968, 1969अशी चार वर्षे सलग त्याने हौशी आणि व्यावसायिक मिस्टर युनिव्हर्सचा किताब जिंकला. 1969 ते 1975अशी सलग सहा वर्षे तो मिस्टर ऑलिम्पिया किताबाचा जेता झाला. अरनॉल्डच्या अंगात स्पोर्ट्समनशिप भिनण्यात त्याच्या वडिलांचा वाटा होता, ते खूप ताकदवान आणि चैतन्यशील खेळाडू होते. बालवयात शिक्षणाकडे कल असलेल्या अरनॉल्डने 1960 मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी पहिल्यांदा डंबेल्स हाती घेतले. खरे तर शाळेत असताना त्याला खेळांची प्रचंड आवड होती पण वडील नेमके कसे व्यक्त होतील याचा अंदाज नसल्याने त्याचे मन धजावत नव्हते. शाळेतील क्रीडाशिक्षकांनी गळ घातल्यानंतर मात्र तो फुटबॉलच्या टीममध्ये सामील झाला आणि आपण चांगला फुटबॉलपटू होऊ शकतो हे त्याने सिद्ध करुन दाखवले. मात्र त्याच्या शारीरिक ठेवणीचा आणि क्षमतेचा अंदाज आलेल्या प्रशिक्षकांनी त्याला सॉकरऐवजी शरीरसौष्ठवाकडे लक्ष देण्यास सांगितले आणि येथून अरनॉल्डचे आयुष्य बदलले. पुढे जाऊन त्याला व्यायामाची इतकी आवड निर्माण झाली की एक दिवस जरी व्यायाम चुकला तरी त्यांस कसेसेच वाटे, इतकेच नव्हे तर व्यायाम बुडवल्या दिवशी तो आरशात पाहणे टाळायचा! त्याच वेळी त्याची पोस्टर्स पाहून वडिलांना मात्र आपला मुलगा समलिंगी होतो की काय याची भीती वाटे! 2001 च्या भाषणात त्याने सांगितलं की वडिलांची इच्छा होती की त्याने पोलीस अधिकारी व्हावं आणि आईची इच्छा होती की त्यानं शिक्षक व्हावं!
या सर्व गदारोळात त्याचं प्रेम फुलू शकले नाही. 1969 ते 1974 या काळात बारबरा आऊटलँड या इंग्लिश शिक्षिकेसोबत तो राहिला. आयुष्याचा जोडीदार म्हणून तिला हवा होता तो सामान्य आयुष्य जगणारा प्रेमळ नवरा आणि त्याला तर सामान्य आयुष्य जगायचे नव्हते. अखेर ते विभक्त झाले. मात्र त्यांच्यातले संबंध चांगले राहिले. त्यानंतर 1977-78 या दोन वर्षाच्या छोट्याशा काळात बेव्हर्ले हिल्समधील एका हेअरड्रेसरची असिस्टंट असलेल्या स्यू मरे हिच्याशी त्याचे सूत जमले. दरम्यान ऑगस्ट 1977 मध्ये अमेरिकन प्रेसिडेंट जॉन केनेडी यांची भाची असलेल्या आणि पेशाने दूरचित्रवाणी पत्रकारिता करणाऱ्या मारिया श्रायव्हरशी त्याची भेट झाली. ते दोघे प्रेमात पडले आणि स्यू मरेने त्याच्या आयुष्यातून पाय काढता घेतला. एप्रिल 1986 मध्ये मारियाशी त्याचा विवाह झाला. या दाम्पत्यास चार अपत्ये झाली. दरम्यान 1970 पासूनच त्याचा चित्रपट प्रवास सुरु झाला होता. मात्र हा प्रवासही सुलभ नव्हता. अभिनय करणे हे सुरुवातीला त्याच्यासाठी खूप अवघड झाले होते, त्याच्या एजंटद्वारा त्याला सांगण्यात आले की त्याचा चेहरा खूपच कसनुसा आहे आणि जबडा खूप मोठा आहे. शिवाय त्याचे शरीरही थोडेसे विचित्र आहे, तो एक अजब तऱ्हेचे उच्चारण करतो, आणि भरीस भर म्हणजे त्याचे नाव खूप मोठे आहे. चित्रपटात टिकायचे असेल तर त्याला नाव बदलावे लागेल असंही सांगितलं गेलं. शिवाय त्याच्यासारख्या आडमाप ठोंब्या माणसासाठी इथे वारंवार संधी नाहीत असंही सुनावलं गेलं. मात्र 1982 च्या 'कॉनन द बार्बेरियन'नंतर त्याने बॉक्स ऑफिसवर अनेक धमाके केले. 'कॉनन द डिस्ट्रॉयर' मात्र मोठं अपयश ठरला होता. 'कमांडो', 'प्रिडेटर', 'टोटल रिकॉल',' ट्रू लाईज', 'एक्सपेन्डीबल्स' यांनी अफाट कमाई केली. त्याच्या 'टर्मिनेटर' सिरीजने तर इतिहास रचला. अरनॉल्डने 58 दशलक्ष डॉलर्सच्या मोबदल्यात 'टर्मिनेटर'मध्ये केवळ 10 शब्द उच्चारले होते. 1986 ते 1991 ही पाचच वर्षे त्याला खरं सुख देऊन गेली. अनेक वर्षापासून कँन्सरशी लढा देत असलेली त्याची भावजय एरिका हिचे 1993 मध्ये निधन झाले तर 1998 मध्ये आई ऑरेलियाचं ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 76 व्या वर्षी निधन झालं. अरनॉल्डने आपल्या पित्याच्या कबरीशेजारीच तिचं दफन केलं. यावेळी त्याच्या मनात कोणत्या भावना असतील हे शब्दात व्यक्त करणं अवघड आहे.
अरनॉल्डनं बालपणातल्या प्रतिकुलतेवर मात करत त्याचे रुपांतर संधीत केले हाच गुण त्याच्या राजकीय जीवनात कामी आला. खेरीज पडेल ते काम मनापासून करण्याची त्याची तयारी होती ज्याची चुणूक त्याने 1965 मध्ये ऑस्ट्रियन तरुणांना अनिवार्य असलेल्या लष्करी सेवेत दाखवली होती. त्याचा सच्चेपणा वाखाणण्याजोगा होता. 'अरनॉल्ड अँड स्टिरॉइडस : ट्रूथ रिव्हिल्ड' मध्ये तो स्टिरॉइड सेवनाची कबुली देतो पण त्याची मात्रा आणि त्याचा उपयोग, दुरुपयोग यावरही कटाक्ष टाकतो. त्याने केलेला स्टिरॉइडचा वापर हा स्नायू बिल्ड करण्यासाठीचा नसून स्नायू बळकट ठेवण्यासाठीचा होता हे ही त्याने त्यात स्पष्ट केले. त्याच्या या स्पष्टोक्तीमुळे त्याला मनस्ताप सहन करावा लागला. डॉ. विली हेप या जर्मन डॉक्टरने लवकरच अरनॉल्डचा मृत्यू हृदयविकाराने होईल असे सांगितलं तर 'ग्लोब' या अमेरिकन टॅब्लॉइड वृत्तपत्राने त्याच्या आरोग्याची मृत्यू-भविष्यवाणी केली. या दोहोंवर त्याने दावे ठोकले आणि त्यांना नमवले. चित्रपट, राजकारण आणि समाजजीवन या तिन्ही प्रांतात तो यशस्वी झाला. 2003 ते 2011 अशी सलग दहा वर्षे तो कॅलिफोर्निया प्रांताचा गव्हर्नर होता. सार्वजनिक जीवनातले त्याचे वर्तन चांगले असूनही त्याच्यावर महिलांच्या शोषणापासून ते आरोपींना पाठीशी घालण्यापर्यंतचे विविध आरोप झाले. यातून त्याचे ऑस्ट्रियाचे दुहेरी नागरिकत्व धोक्यात आले होते. हॉटेल्स, मॉल्ससह, फिटनेस इंडस्ट्रीच्या विविध उद्योगात त्याने पॆसे गुंतवले. मात्र त्याची एक इच्छा अपुरीच राहिली, ती म्हणजे त्याच्या मुलांना त्याला त्याच्यासारखे बलदंड करायचे होते, ते या गदारोळात राहून गेले. त्याला क्रिस्टिना आणि कॅथरीन या दोन मुली झाल्या. तर पॅट्रिक आणि ख्रिस्तोफर ही दोन मुले झाली. विवाहपूर्व ओळखीच्या सलगीने त्याची हाऊसकिपर मॉड्रिड बेना हिच्याशी पुढील काळात झालेल्या संबंधातून त्याचा तिसरा मुलगा जोसेफ बेना हा जन्मास आला. ही बाब अरनॉल्डनं सार्वजनिक रित्या स्वीकारली आणि त्याच्या पंचवीस वर्षाच्या वैवाहिक जीवनात खळबळ उडाली. त्यातच 2011 मध्ये पत्नी मारियाने त्याच्यापासून घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज केला.
त्याच्या मुलांमध्ये पॅट्रिकला चित्रपटात जेमतेम यश मिळाले, पण त्याची देहयष्टी मध्यमच राहिली. तर जोसेफने थोडीफार शरीरयष्टी कमावलीय पण अरनॉल्डच्या तुलनेत ती नगण्यच म्हणावी लागेल. अरनॉल्डला मात्र खात्री वाटते की भविष्यात जोसेफ उत्कृष्ट बॉडी बिल्डर होईल कारण त्याचा कोच हाच त्याचा पिता आहे! त्याचा धाकटा मुलगा ख्रिस्तोफर हा तर लठ्ठ वर्गात मोडावा इतका जाड झाला आहे. अरनॉल्डनं लिहिलेल्या 'टोटल रिकॉल' या आत्मचरित्रात आशा व्यक्त केलीय की, 'मारियाशी अजून कायदेशीर काडीमोड झालेला नाही आणि ती कधी न कधी त्याला समजून घेईल व त्याच्या आयुष्यात परत येईल. घटस्फोटाच्या दाव्यानंतर त्याने मुलांची संपूर्ण जबाबदारी घेतली. तथापि, त्याचा असा दावा आहे की, ते उभयता अजूनही रितसर विभक्त झालेले नाहीत कारण मारियाने 7 वर्षांपूर्वी दाखल केलेल्या घटस्फोट कागदपत्रांवर स्वाक्षरी केलेली नाही. आयुष्यभर एका ठराविक अंतराने माणसं गमावलेल्या अरनॉल्डला उतारवयात आयुष्याच्या जोडीदाराच्या परतण्याची तीव्र प्रतिक्षा आहे.
अरनॉल्डच्या आयुष्यात अपघातही पुष्कळ घडलेत. अरनॉल्ड हा जन्मतः बायस्क्युपिड एओर्टिक व्हॉल्व्हच्या हृदयविकाराने ग्रस्त आहे. यात हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनीचे (आर्टरी) चे दोन टप्पे एकमेकांशी संयोग पावतात आणि तीन अर्टेरिक कप्प्यांऐवजी दोन कप्पे राहतात. 1997 मध्ये हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरीत त्याच्याच बॉडीटिश्यूपासून बनवल्या गेलेल्या कप्प्याचे रोपण करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला आठ वर्षाचेच वाढीव लाईफस्पॅन सांगितले, यातून सुटका करण्यासाठी ओपन हार्ट सर्जरीद्वारा यांत्रिक व्हॉल्व्ह बसवणे अपरिहार्य होते. ते त्याने दीर्घकाळ टाळले. परंतु मार्च 2018 मध्ये त्याची ओपन हार्ट सर्जरी यशस्वीरित्या पार पडल्याचे त्यानेच ट्वीट करुन सांगितलेय. तत्पूर्वी 9 डिसेंबर 2001 मध्ये झालेल्या मोटर सायकल अपघातात त्याच्या सहा बरगड्या तुटल्या होत्या. तर 8 जानेवारी 2006 च्या दिवशी कारमध्ये जाणाऱ्या पॅट्रिकसोबत अरनॉल्डची हार्ले डेव्हिडसनवरुन सफारी सुरु होती, पण समोरुन आलेल्या वाहनाशी टक्कर टाळण्याच्या नादात बापलेकच एकमेकाला धडकले, अर्थात पॅट्रिकला काही इजा झाली नाही पण अरनॉल्डच्या ओठाला मार बसला, त्याला तब्बल 15 टाके घालावे लागले. ब्लेन प्रांतातील सन व्हॅली येथे स्कीइंग करताना घसरुन झालेल्या अपघातात 23 डिसेंबर 2006 मध्ये त्याच्या मांडीचे फीमर हे मुख्य हाड मोडले होते. जून 2009 मध्ये त्याच्या विमानाचा अपघात टळला. अपघाताच्या अशा अनेक घटनांना त्याने आपल्या दणकट शरीराच्या जोरावर लीलया तोंड दिलं.
जाताजाता अखेरीस एक खुलासा. काही महिन्यापूर्वी अरनॉल्डसंबंधीची एक पोस्ट सोशल मीडियावर खास करुन व्हॉट्सअॅपवर खूप व्हायरल झाली होती. अरनॉल्ड श्वार्झनेगरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 16 जानेवारी 2016 रोजी स्वतःच्या पुतळ्याखाली रस्त्यावर झोपलेला एक फोटो पोस्ट करत त्याखाली चार शब्द लिहिले होते - 'how times have changed!' (काळ कसा बदलतो) खरे तर यातून अरनॉल्डला सूचित करायचे होते की एके काळी त्याचे पुतळे उभारले जात इतका तो फिटनेस जायंट आणि फेमस होता आता तो रस्त्यावरही निवांत झोपी जाऊ शकतो! अरनॉल्डने पोस्ट केली एका अर्थाने आणि नेटिझन्सनी त्याची पार चव घालवली. त्याच्याच इंस्टाग्रामवरचा हा फोटो वापरत महाभयंकर मजकूर सोबत देत एका तथाकथित दयनीय, केविलवाण्या अवस्थेत येऊन पोहोचलेल्या अरनॉल्ड बद्दल सहानुभूतीची खरडेघाशी त्यात झाली होती. यात 'how times have changed !' (काळ कसा बदलतो)हेच शीर्षक देत म्हटलं होतं की, "अरनॉल्डने हे वाक्य लिहिलेय कारण तो फक्त वृद्ध झालाय म्हणून नव्हे परंतु तो कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर असताना त्याने या स्वतःच्या शिल्पाचे अनावरण केले होते.. एका हॉटेल प्रशासनाला स्वतःचे शिल्प ठेवण्याची परवानगी दिली होती तेव्हा हॉटेल अधिकाऱ्यांनी अरनाॅल्डला सांगितले होते की "कोणत्याही वेळी आपण येऊन आपल्या नावावर एक खोली आरक्षित करु शकता". पण अलीकडेच जेव्हा अरनॉल्ड हॉटेलमध्ये रुम बुक करण्यास गेला तेव्हा हाॅटेल प्रशासनाने त्याला हॉटेल पूर्णपणे बुक केलेले असल्याबद्दल सांगितले तसेच कोणतीही रुम आपणास मिळू शकणार नाही,असे सांगितले. मग अरनॉल्डने एक कव्हर आणले आणि स्वतःच्या पुतळ्याखालीच तो रस्त्यावर झोपला आणि लोकांना कल्पना करायला सांगितले मी असा का पुतळ्या शेजारी झोपलो आहे? तो सांगू इच्छित होता की जेव्हा माझ्याकडे पद होते तेव्हा लोकं माझी स्तुती करत होते आणि जेव्हा मी पद गमविले, तेव्हा हाॅटेल प्रशासन ते वचन विसरले आणि त्यांनी आपले वचन पूर्ण केले नाही.... होय, काळ बदलला आहे. 'yes times have changed !' आपल्या स्थितीवर किंवा आपल्या शक्तीवर किंवा आपल्या बुद्धिमत्तावर कधी अतिविश्वास ठेवू नका. हे सर्व टिकणार नाही.. कधीही गर्व करु नका.. मृत्यू नंतर कोणतेही जीवन नाही... हा सर्व इमोशनल फालुदा होता. प्रत्यक्षात सत्य वेगळंच होतं.
ही सर्व माहिती आणि मजकूर निव्वळ खोटारडा फेक होता. या फोटोतील अरनॉल्डचा आठ फूट उंचीचा पुतळा अशा कुठल्या हॉटेलपुढचा नसून ओहिओ येथील ग्रेटर कोलंबस कन्व्हेन्शन सेंटरसमोरचा आहे. फेक पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे हे कुठले हॉटेल नसून कन्व्हेन्शन सेंटर आहे. काही महिन्यापूर्वी सायमन व्हेसिन्थेयल सेंटरला अरनॉल्डने एक लक्ष डॉलर्सची देणगी दिली आहे, अशा अनेक देणग्या त्याने आजवर दिल्या आहेत. त्याच्या टॅक्स रिटर्ननुसार त्याची मालमत्ता आठशे ते बाराशे दशलक्ष डॉलर्सची आहे. इतकी गडगंज संपत्ती असलेल्या आणि इतक्या फेमस सेलिब्रिटीला कोणते अमेरिकन हॉटेल आपले दरवाजे कधी बंद करेल का याचादेखील युजर्सनी विचार केला नाही आणि अरनॉल्डबाबत अफवांचे काहूर माजवले. अशाच बिनडोक पद्धतीने त्याच्या खाजगी आयुष्यात डोकावून बघणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही आणि त्याची बदनामी करु इच्छणाऱ्यांची संख्याही पुष्कळ आहे. प्रसिद्धी हा कधी कधी शाप ठरतो तो असा!
अरनॉल्डच्या एकंदर आयुष्याकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की नियतीने त्याच्याशी नेहमीच खेळ खेळला आहे. त्याचं बरंच काही हिरावून घेऊन नियतीने त्याच्या हाती काही दिलं तेव्हाही एका पावलावर तृप्ती तर एका पावलावर वियोग, भ्रमनिरास आणि हिरमोड यांचा मिलाफ दिला. वरवर भक्कम पोलादी देहयष्टीचा हा अफाट माणूस मनस्वी हळव्या मनाचा का आहे हे त्याच्या आयुष्याकडे पाहताच लक्षात येते. 'अरनॉल्ड श्वार्झनेगर' व्हावं वाटणं खूप सोपं आहे पण या माणसाच्या जीवनाचा सतत वरखाली होणारा आलेख पहिला की लक्षात येतं की अरनॉल्ड श्वार्झनेगर बनून जगणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी पोलादी देहासोबत काळीजही पोलादीच हवं!
- समीर गायकवाड
1974 मधील अरनॉल्डची तुलनात्मक मोजमापे -
उंची : 6'2" (188 सेमी)
प्रतिस्पर्धेत भाग घेते वेळेसचे वजन : 235 lb (107किलोग्राम)
स्पर्धेखेरीजचे सामान्य वेळचे वजन : 260 lb (120 किलोग्राम)
दंड (Arms) : 22 in ( 56 सेमी)
छाती (Chest): 57 in (140 सेमी)
कंबर (Waist): 34 in (86 सेमी)
मांड्या (Thighs): 28.5 in (72 सेमी)
पिंडरया (Calves): 20 in (51 सेमी)
ही मोजमापे Arnold Schwarzenegger Pro Bodybuilding Profile या आर्टिकलमधून घेतली आहेत

View More