एक्स्प्लोर
पैलवानांनो... अच्छे दिन आने वाले हैं..!!!
एकूणच काय, तर फडणवीस आणि पवार यांच्यात सुरु असलेल्या वाक् युद्धावरुन राज्यात निवडणूक सुरु आहे की ‘महाराष्ट्र केसरी’ हेच कळायला मार्ग नाही.
राजकारण आणि कुस्तीचं नातं जुनं असावं बहुदा... कारण, सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कुस्ती, तेल लावलेला पैलवान, आखाडा हे शब्द भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक सभेत ऐकायला मिळतात. तेही राज्यातील दोन सर्वात मोठ्या नेत्यांच्या तोंडून...!
भाजपचे उमेदवार अंगाला तेल लावून उभे आहेत. आखाड्यात ते शड्डू ठोकून तयार आहेत. पण समोर विरोधकांमधून कुणी मल्लं लाल मातीत उतरायलाच तयार नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार विरोधकांना म्हणजे स्वाभाविकरित्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हाणत आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे शिर्षस्थ नेते, ज्यांना खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी तेल लावलेला पैलवान अशी उपमा दिली, ते शरद पवार जोरदार प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतात. सोपलांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकलेल्या बार्शीमध्ये पवार विशिष्ट हातवारे करुन कुस्ती काय ‘अशांशी’ होते का, असा सवाल करतात. पवारांच्या या उत्तराची (खरं तर त्यांच्या हातवाऱ्यांची) चर्चा अशी काही होते, की मुख्यमंत्र्यांना त्यांचं प्रत्युत्तर देणं भाग पडतं. मग मुख्यमंत्री फडणवीस नटरंग सारख्या मराठी चित्रपटाच्या नावाचा आधार घेत, पवारांवर पलटवार करतात आणि मग टाळ्या, शिट्ट्या आणि हुर्रेर्रेर्रेर्रे....
एकूण काय, तर फडणवीस आणि पवार यांच्यात सुरु असलेल्या वाक् युद्धावरुन राज्यात निवडणूक सुरु आहे की ‘महाराष्ट्र केसरी’ हेच कळायला मार्ग नाही. सर्वसामान्य मतदारही याच संभ्रमात आहे. कारण, सध्या सुरु असलेला प्रचार हा पैलवान आणि राष्ट्रीय विषयांवरच फिरताना दिसत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते स्थानिक मुद्द्यांवर बोलताना दिसत नाहीत. मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळामुळे संकटात आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगलीतील नागरिकांचं आयुष्य महापुरामुळे उद्ध्वस्त झालंय. शेतमालाला योग्य भाग मिळत नाही. राज्यातील लाखो तरुण पदवी मिळवून बेरोजगार आहेत. अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे बंद पडत आहेत. या भयावह वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांसारखे बडे नेते कलम ३७०, बालाकोट एअर स्ट्राईक, अशा सर्वसामान्यांपासून कोसो दूर असलेल्या मुद्द्यांवर भर देत आहेत. तर विरोधक सत्ताधाऱ्यांच्या या मुद्द्यांवरच फरफटत जाताना पाहायला मिळत आहेत. त्यात पवारांसारखे नेते आपण आपल्या काळात काय केलं हे सांगण्यात वेळ दवडत आहेत. त्यामुळे प्रचारापासून मूळ मुद्दे कोसो दूर राहत आहेत.
आता स्थानिक आणि मूळ मुद्द्यांना हात का घातला जात नाही याचं अजून एक कारण म्हणजे, निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात झालेली पक्षांतरं. लोकसभा निवडणुकीदरम्यान स्थानिक पातळीवर विकास केला नाही म्हणून ज्या नेत्यांवर टीकेचा भडीमार केला. तोच नेता आज आपल्या पक्षाचा झेंडा हातात घेऊन, उमेदवार म्हणून उभा आहे. तेव्हा आता या नेत्यावर कशी टीका करायची, असा प्रश्न आज भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांनाही पडलेला आहे. त्यामुळे पंतप्रधान, मुख्यमंत्री, पवारसाहेब अशा नेत्यांसह स्थानिक पातळीवरील नेत्यांनाही राष्ट्रीय विषयांचा ‘अभ्यास’ करणं भाग पडत आहे.
निवडणूक आहे म्हटल्यावर टीका तर करायलाच हवी... मग त्यासाठी कुस्तीचा फड सगळ्यात उत्तम पर्याय. म्हणूनच मुख्यमंत्री विरोधकांना आखाड्यात उतरण्याचं आव्हान देत आहेत. त्याला पवारांसारखे कसलेले आणि अनुभवी पैलवान नवनवे डाव टाकताना दिसत आहेत. पण हा तेल लावलेला वयोवृद्ध पैलवान अभी तो मैं जवान हूँ म्हणत बुक ठोकत असला, तरी नव्या दमाचा आणि नवे ‘डाव’ घेऊन लाल मातीत उतरलेल्या पैलवानासमोर जुन्याजाणत्या पैलवानाचा निभाव लागणं जरा कठीणच दिसतंय. मात्र, या प्रचारातून ग्रामीण भागातील तरुणांनी एक बाब लक्षात घ्यायला हवी... लंगोट घाला, लाल मातीत उतरा, सगळे डाव शिका. कारण सध्या पैलवान आणि आखाड्यावरुन जेवढी राजकीय कुस्ती रंगतेय, ते पाहता उद्या पैलवानांना राजकारणात अच्छे दिन येणार, हे निश्चित....
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बातम्या
Advertisement