एक्स्प्लोर
खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी
डिलाईट बंद झाल्यावर बेकार झालेल्या तुकाराम महाडिक नावाच्या तरूणाने मात्र इतरत्र नोकरी न करता, ह्याच भागात स्वतःची वडा आणि भज्यांची हातगाडी काढायचं ठरवलं. आर्यभूषण प्रेसच्या शेजारच्या गल्लीत सकाळपासून स्वतःची हातगाडी लावायला सुरुवात केली.
फर्ग्युसन रोडला खाणं म्हणल्यावर पहिल्या फटक्यात गुडलक, वैशाली, रुपाली, वाडेश्वर ही नावं आठवणं म्हणजे पुण्याचे रहिवासी असल्याची/झाल्याची प्राथमिक लक्षणं. फर्ग्युसनसमोरचं सवेरा(आता रुमानी), ज्ञानेश्वर पादुका चौकातलं निरंजन त्याच्यापुढे ललितमहल ही नावं आठवत असतील तर तुम्ही कॉलेजच्या वगैरे दिवसात फर्ग्युसन रोडला पुण्याच्या भाषेत पडीक होतात हे सिद्ध होतं. पण लकी, पलीकडे आपटे रोडला वळायच्या आधी पूर्वी असलेलं तुलसी किंवा नटराजच्या समोरच्या कॉर्नरचं सनराईझ ही नावं आठवून जर तुमच्या मनातून खराखुरा उमाळा निघाला नाही तर तुम्ही हाडाचे पुणेकर आहात हे पुण्यातलं शेंबड पोर देखील मान्य करणार नाही (चाल-आमच्या वेळचं पुणं आता राहिलं नाही) आत्ता साठीच्या पार असलेल्यांना असाच आंतरिक उमाळा कॅफे डिलाईटच्या नावाने अजूनही येतो. आमच्या पिढीच्या आठवणीत ते असण्याचं काहीच कारण नाही. त्यावेळी डिलाईट बंदही झालं होतं आणि आम्ही शाळेत वगैरे असण्याच्या सुमारास तिथे आत्ताचं सागर आर्केड उभं राहिलं.
एफसी रोडला रुपाली, वैशालीसारखी हॉटेल्स त्याहीवेळी होतीच. पण समोरच्या आर्यभूषण प्रेसच्या कामगारांना, गावातून येऊन होस्टेलमध्ये राहणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना सकाळी, मधल्या वेळात स्वस्तात खायची सोय मात्र फर्ग्युसन रोडला कुठेच नव्हती. डिलाईट बंद झाल्यावर बेकार झालेल्या तुकाराम महाडिक नावाच्या तरूणाने मात्र इतरत्र नोकरी न करता, ह्याच भागात स्वतःची वडा आणि भज्यांची हातगाडी काढायचं ठरवलं. आर्यभूषण प्रेसच्या शेजारच्या गल्लीत सकाळपासून स्वतःची हातगाडी लावायला सुरुवात केली.
महाडिक काकांकडे भांडवल म्हणून होतं, कॅफे डिलाईटमध्ये सगळी कामं केल्याचा अनुभव, हाताला असलेली चव आणि किरकोळ पैसे. मुलं लहान, हाताशी मोजकेच भांडवल. बायको सोडून ना घरचा आधार ना इतर कोणाचा; ही अवस्था अवघड असते फार. पण मुळात व्यवसायाच्या कल्पना क्लियर असल्या आणि कष्ट करायची तयारी असली तर समोरच्या अडचणीही फार काळ टिकाव धरत नाहीत.
माफक किमतीत नोकरदार, विद्यार्थी आणि कष्टकऱ्यांना आवडतीलच अशी चविष्ट भजी, बटाटेवडे आणि चहा. ह्या माफक मेन्यूवर महाडिकांची गाडी पहिल्या दिवसापासून सुरु झाली. कोकणी माणसाच्या स्वभावातली कष्टकरी वृत्ती आणि देवाने अपवादानेच जिभेवर पेरलेली साखर ह्यावर महाडिकांनी गिऱ्हाईक एकेक करून जोडलंय. मी स्वतःच साधारण ९४-९५ पासून इथली भजी, वडे अधूनमधून खात आलोय. पण आजही त्या चवीत झालेला बदल शून्य. आजही ते प्रत्येकी पंधरा रुपयात सुरेख चवीची भजी आणि वडापाव विकतात. पण मार्केटचा अंदाज घ्यायची महाडिक काकांची सवय मात्र अजूनही गेली नसल्याची खात्री मला नुकतीच तिथे चहाच्या जोडीला मिळणाऱ्या ‘लेमन टी’ ने मिळाली. कुठल्याही हॉटेलमध्ये ३० ते १०० रुपयात मिळणारा ‘लेमन टी’ चे चार घोट इथे दहा रुपयात मस्त तजेला देऊन जातात.
ह्याच माफक किंमतीत गेले चाळीस वर्ष व्यवसाय करून महाडिककाकांनी आपल्या तीन मुलांना मोठं केलंय, त्यांची शिक्षणं केली, लग्न लावून दिली. मुलगी स्वगृही सुखानी नांदते, एक मुलगा पुन्हा गावाकडच्या घरच्या शेतीकडे वळला, तर एक मुलगा त्यांच्या गाडीवर त्यांना मदत करतो. त्यांच्या पत्नी गाडीवर दिवसभर लागणारी लसणीची ढिगभर चटणी आजही स्वतः वाटतात आणि गाडीवर थांबून तिथल्या कामालाही हातभार लावतात. घरी नातवंड वगैरे असूनही काका दिवसभर सदैव कामात दिसतात.
आता हातगाडीवर लिहिलेलं कश्याला वाचलं? म्हणून अनेकजण ह्या लेखाला नाकं मुरडतील, काहीजणांनी हे वाचणं आधीच थांबवलंही असेल पण भलेमोठे कर्ज घेऊन चकाचक हॉटेल काढण्यापेक्षाही, आहेत त्या मोजक्या भांडवलावर स्वतःची हातगाडी सुरु करणाऱ्याला मी तरी जास्त मार्क्स देईन. हॉटेलच्या आणि हातगाडीच्या स्केलमध्ये फरक अर्थातच आहे पण रस्त्यावर हातगाडी चालवणं हेही खायचं काम नाही. त्याही पुढे जाऊन मी म्हणीन, आपल्या भावी मार्केटचा अंदाज असणं, तिथली गरज आणि स्वतःची मर्यादा नेमकी ओळखून आयुष्यभर इमानाने व्यवसाय करणं हे काम अनेकांना एमबीए किंवा तत्सम डिग्र्या घेऊनही जमत नाही. त्यासाठी जो गुण लागतो त्याला म्हणतात ‘व्यावहारिक शहाणपणा’ आणि ज्या जोरावर कोकणातून रामदास स्वामींच्या शिवथरघळ ह्या छोट्याशा गावातून आलेल्या महाडिक काकांनी आयुष्य जगून दाखवलंय त्याला म्हणतात ‘उद्योजकता’.
माझ्यामते बिझनेस पाहायला कायमच फार मोठ्या व्यावसायिकांचे केस स्टडी करायची गरज नसते; आपल्या आजूबाजूलाही दिसतात अशी माणसं, सदैव उत्साही महाडिक काकांसारखी.
एकदा असा केस स्टडी करायला, भजी खायच्या निमित्ताने जाऊन त्यांना भेटून तर या ! भजी,वडे खाताना माझी आठवण नक्की काढा..
महाडिक काकांच्या गाडीचं ठिकाण-
गोखले स्मारक चौकाकडून (गुडलक) फर्ग्युसनकडे जाताना डावीकडे पहिली गल्ली. वेळ सकाळी साधारण ९ पासून संध्याकाळी ७ पर्यंत.
खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग:
खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा
खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम
खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल
खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा
ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी
खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!
खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement