एक्स्प्लोर
दिल्लीदूत : आधुनिक दिल्लीचा मराठमोळा शिल्पकार
मराठी माणसाचं आणि दिल्लीचं अगदी इतिहासकाळापासूनचं नातं आहे. दिल्ली कायम मराठी माणसाला खुणावत आलीय. पण अनेकजण इथे टिकू शकले नाहीत. दुर्दैव म्हणजे देवळालीकरांसारखे जे व्यक्ती इथे पाय रोवून उभारले, ते मराठीजनांच्या विस्मरणात गेलेत.
देशाच्या सुप्रीम कोर्टाची इमारत तुम्ही अनेकदा पाहिली असेल, कधी कामानिमित्त प्रत्यक्ष जाणंही झालं असेल, पण ही इमारत कुणी घडवलीय याचा कधी विचार केलाय? या इमारतीचा शिल्पकार आहे एक मराठी माणूस. गणेश भिकाजी देवळालीकर असं त्यांचं नाव.
सुप्रीम कोर्टाची इमारत ल्युटियन्स दिल्ली परिसरातच असल्यानं अनेकांना वाटतं ती बहुधा ब्रिटीशांनीच बांधलेली असावी. या इमारतीचं बांधकाम, तिची प्रशस्तता आणि इंडो ब्रिटीश स्थापत्यशैली पाहिल्यानंतर असा ग्रह होणं साहजिकही आहे. पण प्रत्यक्ष कल्पनेपासून निर्मितीपर्यंत या मराठी माणसाचं योगदान त्यात सर्वाधिक आहे. गणेश भिकाजी देवळालीकर उर्फ अण्णासाहेब यांनी केवळ सुप्रीम कोर्टच नव्हे तर आधुनिक दिल्लीतल्या अनेक वास्तू डिझाईन केल्यात. स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले चीफ आर्किटेक्ट हे पद भूषवण्याचा मान त्यांना मिळाला.
सुप्रीम कोर्टाच्या इमारतीचं डिझाईन
आज देशाचा बहुतांश कारभार ज्या इमारतींमधून चालतो, त्या कृषी भवन, उद्योग भवनसारख्या इमारती त्यांनी डिझाईन केल्यात. देशाचा ऐतिहासिक वारसा जपणारी राजपथावरची नॅशनल म्युझियमची वास्तूही त्यांचीच कलाकृती. शिवाय फाळणीनंतर दिल्लीत आलेल्या निर्वासितांसाठी तातडीची घरं उपलब्ध करुन देण्याचं आणीबाणीचं संकटही त्यांनी पेललं. एक दोन नव्हे तर तब्बल पाच लाख घरं त्या काळात देवळालीकर आणि त्यांच्या टीमनं वेगानं उभारलीयत. देशाच्या राजधानीत एक मराठी माणूस इतकं काय काय करुन ठेवतो पण त्याची साधी कल्पनाही अनेकांना नाही. महाराष्ट्रातल्याच नव्हे तर दिल्लीतल्या मराठी माणसांनाही देवळालीकरांबद्दल माहिती नाहीय हे पाहून वैषम्य वाटतं.
एकीकडे दिल्लीत मराठी माणूस काही टिकत नाही अशी ओरड करायची आणि दुसरीकडे ज्या माणसानं दिल्लीत इतकं काय काय करुन ठेवलंय, स्वातंत्र्यानंतरची राजधानी ज्या माणसानं वसवली त्याचं योगदान असं इतक्या सहजासहजी विस्मृतीत घालवायचं? महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं राज्याच्या बाहेर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणाऱ्या या मराठी माणसाची कहाणी म्हणूनच अभ्यासणं महत्वाचं आहे.
देवळालीकरांनी किती मोठं काम करुन ठेवलं हे समजून घेण्यासाठी आधी ते ज्या पदावर काम करत होते त्याचं महत्व समजून घ्यायला पाहिजे. राष्ट्रपती भवन, इंडिया गेटसारख्या वास्तू बांधणारा ल्युटियन्स, कनाँट प्लेससारखी इमारत बांधणारा राँबर्ट रसेल यासारख्या दिग्गजांनी ब्रिटीश काळात चीफ आर्किटेक्ट हे पद सांभाळलं होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे पद सांभाळणारे देवळालीकर हे पहिले भारतीय होते. देवळालीकरांनी राँबर्ट रसेलसोबत अनेक इमारतींच्या बांधणीत काम केलेलं होतं. त्यांचं काम पाहूनच या ब्रिटीश अधिका-यांनी आमचा वारसा पुढे सांभाळण्यासाठी हा सर्वात योग्य माणूस आहे अशी शिफारस भारत सरकारकडे केलेली होती. 1947 ते 1954 या अतिशय महत्वाच्या काळात देवळालीकरांनी देशाचे चीफ आर्किटेक्ट म्हणून काम पाहिलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्र घडवण्याचं जे काम करायचं होतं, त्या काळात त्यांनी हे पद सांभाळलंय. आपण बांधलेली प्रत्येक इमारत ही नंतर या देशाच्या संस्थात्मक रचनेचं प्रतीक बनणार आहे ही जबाबदारीची भावना त्यांच्यावर त्यावेळी होती.
नॅशनल म्युझियम कसं असेल, हे तत्कालीन पंतप्रधान नेहरुंना दाखवताना...
देवळालीकरांचं मूळ गाव हे नाशिकजवळचं देवळाली. बडोद्यात गायकवाडी स्थापन झाली तेव्हा त्यांनी नवं राज्य वसवण्यासाठी काही माणसं आवर्जून महाराष्ट्रातून नेली, त्यातले हे देवळालीकर कुटुंब. अण्णासाहेब देवळालीकरांचा जन्म हा 1895 सालचा, बडोद्यातला. बडोद्याच्या कलाभवनमध्ये त्यांनी आर्किटेक्टची पदवी घेतली, त्यानंतर ते कामाच्या शोधात दिल्लीत आले. 1912-13 साली राजधानी कोलकात्याहून दिल्लीला आणायचं काम सुरु झालं होतं. त्या ओघात आपल्याला दिल्लीला काम मिळून जाईल असं त्यांना वाटलं होतं, पण नंतर अचानक पहिलं महायुद्ध सुरु झाल्यानं त्यांची ती संधी हुकली. त्यानंतर ते कामासाठी काही दिवस लाहोरमध्ये गेले. देवळालीकरांची कामातली हुशारी बघून ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्यांना लंडनला पुढच्या शिक्षणासाठी जायचा सल्ला दिला. RIBA अर्थात ROYAL INSTITUTE OF BRITISH ARCHITECHTURE ही पदवी त्या काळात अत्यंत मानाची समजली जायची. अनेकांना ती मिळवायला काही वर्षे घासावी लागत. पण अण्णासाहेब देवळालीकर ही परीक्षा एका झटक्यात पास झाले. त्यानंतर ते भारतात आल्यावरही त्यांचा संघर्ष लगेच संपला नाही. गॅझेटेड आँफिसर्सची वरची जागा गोऱ्या लोकांनाच मिळायची. राँबर्ट रसेल हे तेव्हा देशाचे चीफ आर्किटेक्ट होते. त्यांनी ओळखलं की देवळालीकरांवर अन्याय होतोय, मग त्यांनी दिल्ली इम्प्रूवमेंट ट्रस्टचं अध्यक्षपद त्यांना दिलं. देश सोडून जाताना देशाचं चीफ आर्किटेक्ट हे पद देवळालीकरांकडे आलं.
इंग्लंडमध्ये शिक्षणादरम्याचा फोटो (साल 1928)
ब्रिटीश आर्किटेक्टसना उपलब्ध होणारे रिसोर्सेस, आर्थिक पाठबळ यांचा विचार केला तर भारतीय आर्किटेक्टसचं काम तुलनेनं जास्त जिकीरीचं होतं. शिवाय त्यावेळी फाळणीनंतर अनेक निर्वासितांचे लोंढे दिल्लीत दाखल होत होते. या सगळ्यांना आसरा देण्याचं कामही तातडीनं करायचं होतं. त्यामुळे एकीकडे देशाच्या नवनिर्माणात कलात्योमक योगदान देत असतानाच त्यांना हे आणीबाणीचं कामही कर्तव्य म्हणून पार पाडावं लागलं. दिल्लीतल्या सुंदरनगर, पटेलनगर, जोरबाग, गोल्फ लिंक्स इथल्या अनेक रिफ्युजी काँलनी देवळालीकरांच्या नेतृत्वात बांधल्या गेल्यात. एक दोन नव्हे तर तब्बल पाच लाख घरं त्यावेळी या निर्वासितांसाठी बांधली गेलीयत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश घडवायचा म्हणजे को-या पाटीपासून श्रीगणेशा करण्यासारखं होतं. पण हे करतानाही सातत्यानं भविष्याचा विचार या सगळ्या टीमच्या समोर होता. त्याबद्दलची एक आठवण अण्णासाहेबांचे पुत्र श्रीकृष्ण देवळालीकर यांनी बोलता बोलता सांगितली.
“त्या काळात काकासाहेब गाडगीळ पीडब्लुडी खात्याचे मंत्री होते. मेहेरचंद, देवळालीकर यांच्यासारख्या डायनॅमिक आँफिसर्सची एक टीम त्या काळी हे आव्हान पेलायला सज्ज होती. शंकर मार्केट, खान मार्केट ही दिल्लीतली अनेक मार्केटही याच पुनवर्सितांसाठी बांधली गेलीयत. बाहेरुन आलेल्या निर्वासितांच्या निवासाची,उद्योगाची सोय तिथेच व्हावी यासाठी त्यांना अशा पद्धतीनं खाली दुकानासाठी गाळे, वरती निवासस्थान अशा पद्धतीनं या काँलनी बांधल्या गेल्या. निर्वासितांसाठीच घरं बांधायची तर त्यावर इतका खर्च करायची गरज आहे का असाही सूर काहींना बैठकीत आळवला होता. पण देवळालीकरांनीच त्यावेळी ठासून सांगितलं होती की जे काही बांधकाम करायचं ते परमनंट. निर्वासितांना भावनिकदृष्ट्या देशाशी जोडण्यातही हा निर्णय महत्वाचा ठरला असेल हे वेगळं सांगायची गरज नाहीय. त्या काळात अगदी शब्दश: रातोरात बांधली गेलीयत ही घरं. कमीत कमी 2 बेडरुम, विथ इंडियन कोर्टयार्ड अशी.
खान मार्केट
अण्णासाहेब देवळालीकर हे कडक शिस्तीचे, एकाग्रतेनं काम करणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची कारकीर्द संपल्यानंतर सरकारनं त्यांना पाच वर्षांची मुदतवाढ देऊन ठेवून घेतलं. इतकंच काय नॅशनल म्युझियमच्या क्युरेटरनी या महत्वाच्या कामासाठी देवळालीकरांच्याच नावाचा आग्रह धरल्यानं त्यांना निवृत्तीनंतरही सारखं या कामाच्या देखरेखीसाठी दिल्लीला यावं लागायच.
दिल्लीतल्या 4 महादेव रोडच्या बंगल्यात देवळालीकरांचं तेव्हा वास्तव्य होतं. एक वास्तुविशारद म्हणून शहराचा आराखडा बिघडू नये यासाठी ते किती दक्ष होते याचं एक छोटंसं उदाहरण आहे. शहरावर अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून कुठल्याही सरकारी अधिका-यानं निवृत्तीनंतर दिल्लीत घरोबा करुन राहू नये असा त्यांचा दंडक होता. आपल्या निवृत्तीनंतर त्यांनी हा नियम कसोशीनं पाळला. दिल्लीतल्या अतिशय पाँश वस्तीतला हा बंगला सोडून निवृत्तीनंतर ते बडोद्याला परत गेले.
अण्णासाहेबांनी दिल्लीतल्या या सरकारी इमारती तर बांधल्याच. पण त्याशिवाय त्यांचं देशासाठी आणखी एक हटके योगदान म्हणजे तमाम भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं सोमनाथचं मंदिर. बडोद्याचे असल्यानं त्यांना उत्तम गुजराती बोलता यायचं. सरदार पटेलांशी चांगले संबंध असल्यानं बहुधा त्यांनी अगदी पर्सनल कॅपॅसिटीमध्ये या कामासाठी देवळालीकरांचा सल्ला घ्यायचा ठरवलं. 1946 च्या दरम्यान सोमनाथचं हे मंदिर बांधायचं सरकारनं ठरवलं. तर पटेलांनी एकदा देवळालीकरांना आँफिसमध्ये बोलावून घेतलं, चार दिवसांची सुट्टी घ्या, टी ए डी ए काही मिळणार नाही. कारण आपण वैयक्तिक कामावर चाललोय एवढंच सांगून ते महाराजा रणजीतसिंहांच्या खासगी विमानानं घेऊन त्यांना सोमनाथला गेले. इतक्या महत्वाच्या कामात त्यांना देवळालीकरांचा सल्ला आवश्यक वाटत होता.
राजधानीत संसद, राष्ट्रपती भवन, साऊथ ब्लाँक, नाँर्थ ब्लाँक या ब्रिटीशांनी बांधलेल्या इमारती शेजारी शेजारी आहेत. गंमत म्हणजे याच्या बाजूला लगेचच रस्ता क्राँस केल्यावर ज्या महत्वाच्या इमारती आहेत, कृषी भवन, उद्योग भवन, नॅशनल म्युझियम या सगळ्या देवळालीकरांनी साकारलेल्या आहेत.
महाराष्ट्र भवन
मराठी माणसाचं आणि दिल्लीचं अगदी इतिहासकाळापासूनचं नातं आहे. दिल्ली कायम मराठी माणसाला खुणावत आलीय. पण अनेकजण इथे टिकू शकले नाहीत. दुर्दैव म्हणजे देवळालीकरांसारखे जे व्यक्ती इथे पाय रोवून उभारले, ते मराठीजनांच्या विस्मरणात गेलेत.
ब्रिटीशांनी राजधानी कोलकात्याहून दिल्लीला स्थलांतरित केली, तेव्हा हे शहर नव्यानं वसवायचं काम ब्रिटीश आर्किटेक्टसनी केलं. राष्ट्रपती भवन, इंडिया गेटसारख्या ऐतिहासिक वास्तू उभारुन ल्युटियन्सनं या वास्तुविशारदानं महत्वाचं योगदान दिलं होतं. ब्रिटीश सोडून गेल्यानंतर आजही देशाचा कारभार याच इमारतींमधून चालतो. याच कामाबद्दल कृतज्ञता म्हणून दिल्लीचा हा सगळा परिसर ल्युटियन्स दिल्ली म्हणून ओळखला जातो. पण भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर आत्ताच्या दिल्लीमधल्या अनेक इमारतींमागे देवळालीकरांचा हात आहे. सुप्रीम कोर्ट, कृषी भवन, औद्योगिक भवन असो की नॅशनल म्युझियम..याशिवाय दिल्लीच्या जखमा भरुन काढणारी निर्वासितांची घरं...त्यामुळे आताची ही आधुनिक दिल्ली जितकी ल्युटियन्सची आहे तितकीच ती देवळालीकरांचीही आहे. फरक इतकाच की न्यायदेवतेचं मंदिर उभारणाऱ्या या वास्तुविशारदाच्या कामाला मात्र आपण न्याय देऊ शकलो नाहीय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement