एक्स्प्लोर
दिल्लीदूत : यादवांचं महाभारत...
यादवी हा शब्द मराठीत नेमका कुणी रुढ केला माहिती नाही. पण सध्या उत्तरप्रदेशात यादवांच्या घरात जे चालू आहे ते पाहता हा शब्द रुढ करणा-यांच्या दूरदृष्टीबद्दल कमालीचा आदर वाटू लागला आहे.
उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्याचवेळी देशातल्या सर्वात मोठ्या राज्याची सत्ता सांभाळणाऱ्या यादव कुटुंबात अंतर्गत कलहाची नांदी सुरु झाली आहे. एका बाजूला 42 वर्षाचा मुलगा आणि दुसऱ्या बाजूला त्याचा सख्खा बाप, काका आणि इतर काही बाहेरचे कळलावे नारद.
सत्तेचा राजदंड
देशातल्या सर्वात मोठ्या राज्याचं मुख्यमंत्रिपद तर त्याच्याकडे आहे. पण पक्षाची कमान पूर्णपणे त्याच्या हातात नाही. सत्तेचा राजदंड हातात घेण्यासाठी त्याला स्वत:च्या वडिलांविरोधात, काकाविरोधात उभं राहायची वेळ आली आहे. सत्तेसाठी घरातच सुरु असलेल्या या षडयंत्री, मानापमानाच्या लढाईत इतका मसाला भरलाय की अनुराग कश्यप, विशाल भारद्वाजसारख्या दिग्दर्शकांसाठी जणू सगळी स्क्रिप्टच तयार आहे.
मुळात उत्तर प्रदेशात सत्तेसाठी सुरु असलेली ही कौटुंबिक स्पर्धा गंगा-यमुनेच्या खोऱ्यासाठी काही नवी नाही. अशा कित्येक सत्ताधीशांना या भूमीने पाहिलंय, जिथं पहिल्यांदा आपल्याच नातेवाईकांचा काटा काढून, वेगवेगळी कारस्थानं रचून सत्तेचा मुकुट काबीज करावा लागतं. यादवांच्या घरातली ही लढाई याच इतिहासाची पुनरावृत्ती आहे.
निखाऱ्याचा वणवा झाला
गेल्या दोन तीन महिन्यांपासूनचा संघर्ष निखाऱ्यांसारखा होता. आतून पेटलेला असला तरी त्याची आग बाहेर दिसू दिली नव्हती. आता मात्र याचा वणवा पेटलाय. त्यात या परिवाराची वाताहत होणार की अखिलेशचं युवा नेतृत्व तावून सुलाखून निघणार, याचं उत्तर यूपीच्या निवडणूक निकालांमध्ये दडलेलं असेल.
एक मात्र आहे की अखिलेशनं आता सगळं झुगारुन द्यायचं ठरवलंय. मागच्या दीड महिन्यांपूर्वी त्यानं काका शिवपाल यादव यांना जरा हिसका दिलेला होता. मात्र नंतर नेताजींनी इमोशनल अपील केल्यावर तो मवाळ झाला. पण या वरवरच्या दिलजमाईनं आपलंच नुकसान होतंय हे लक्षात आल्यावर त्यानं निर्णायक वार केला.
महाभारतातील पात्रांचा परिचय
या महाभारतातले सगळे रंग समजून घेण्यासाठी यातल्या पात्रांचा थोडक्यात परिचय करुन घेऊयात.
मुलायमसिंह यादव-
राममनोहर लोहियांचं नाव घेत जनता परिवारातून वेगळ्या झालेल्या मुलायम सिंहांनी 4 नोव्हेंबर 1992 ला समाजवादी पक्षाची स्थापना केली. शिक्षक, पैलवान, राजकारणी असा त्यांचा प्रवास आहे. एका बाजूला भाऊ शिवपाल यादव याची पक्षावरची पकड, अनुभव याचा पक्षाला जास्त उपयोग होतो हा त्यांचा विश्वास. नव्या पिढीचं राजकारण करु पाहणाऱ्या आपल्या मुलानं त्याच्या काकाचंही ऐकलं पाहिजे असं त्यांना वाटतं. नेताजी या नावानंच ओळखल्या जाणाऱ्या मुलायम यांना हे संतुलन साधणं अवघड झालंय. आता ते थेट मुलाच्या विरोधात उभे आहेत.
अखिलेश यादव
राजस्थानच्या एका सैनिक शाळेत शिक्षण. नंतर सिडनीमधून ENVIORMENTAL ENGINEERING ची पदवी पूर्ण करुन तो भारतात परतला. १९९९ मध्ये आपली जोडीदार स्वतः निवडत डिंपल रावत या तरुणीशी प्रेमविवाह केला. भारतात परतल्यानंतर राजकारणाशी त्याचा लगेच संबंध आला नाही. मात्र २००९ मध्ये त्याच्याकडे पक्षाची सूत्रं सोपवली गेली. त्याच्याच फ्रेश चेहऱ्यावर 'सपा'नं २०१२ ची निवडणूक ४०३ पैकी तब्बल २२४ जागा पटकावत एकहाती जिंकली.
अखिलेश सीएम बनला तरी यूपीत घरातलेच पाचजण प्रतिसीएम आहेत. या बुजुर्गांच्या ओझ्याखाली तो सुरुवातीला दबून राहिला. पण आता या दबावातून बाहेर पडत तो स्वतःचं राजकारण करु पाहतोय.
शिवपाल यादव
सैफईतल्या सुघरसिंह यादव यांना चार मुलं. त्यातले मुलायम हे दोन नंबरचे तर शिवपाल हे सगळ्यात धाकटे. लहानपणापासूनच मुलायम हे कुटुंबाचा चरित्रार्थ चालवण्यासाठी बाहेर पडले. शिक्षक, नंतर राजकारणी बनल्यामुळे त्यांचा अधिक वेळ बाहेरच जायचा. कुटुंबासाठी मुलायम जे कष्ट सोसत होते ते पाहतच शिवपाल लहानाचे मोठे झाले. त्यामुळे त्यांच्या मनात मुलायम यांच्याविषयी प्रचंड आदर.
अखिलेश राजस्थानातल्या सैनिक स्कूलमध्ये शिकायला असताना त्याला पालक म्हणून भेटायलाही शिवपाल आणि त्यांची पत्नीच अनेकदा जायचे. नंतरच्या काळात राजकारणातही मुलायम यांचा उजवा हात अशी ओळख शिवपाल यांनी मिळवली. अतिशय भिडस्त स्वभाव, पण कार्यकर्त्यांच्या तक्रारी मनापासून ऐकणारा, योग्यवेळी त्या मुलायम यांच्यापर्यंत पोहचवणारा हा माणूस. राजकारण्यांच्या घरात अनेक परोपजीवी राजकारणी निर्माण होतात. शिवपाल हे मात्र तसे नाहीत. ते स्वतःही उत्तम राजकारणी आहेत.
रामगोपाल यादव
हे मुलायम यांचे चुलतभाऊ. सध्या राज्यसभेचे खासदार. राजकारणात येण्याआधी ते आग्रामध्ये फिजिक्सचे प्राध्यापक होते. पक्षात त्यांना प्रोफेसर म्हणून ओळखलं जातं. सपाचा दिल्लीतला चेहरा असंही त्यांचं वर्णन करता येईल. घरातल्या भांडणात ते कायम अखिलेशच्या बाजूनं उभे राहिलेले आहेत. अखिलेशची सपाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी झाल्यावर मुलायम यांच्या या भूमिकेवर जाहीर रोष व्यक्त करणारे हेच आहेत.
अर्थात पक्षातल्या एका गटाला मात्र रामगोपाल हे फारच उद्धट वाटतात. त्याबद्दल लखनौमधल्या पत्रकारांना विचारल्यावर ते म्हणाले की कार्यकर्त्यांची तक्रार असते, की त्यांना काही सांगायला गेलं की ते आम्हाला विद्यार्थी समजूनच व्यवहार करतात.
अमरसिंह
या महाभारतातलं हे एकमेव महत्वाचं पात्र आहे जे यादव कुटुंबातलं नाही. सध्याच्या सगळ्या प्रकारात हे पात्र तुम्हाला दृश्य स्वरुपात कुठेच दिसणार नाही. पण पडद्यामागे मात्र त्याची फारच कमाल आहे. शिवाय अनेक वादांचं मूळ कारणदेखील हेच. समाजवादी पक्षात त्यांचा पुर्नप्रवेश झाला तो शिवपाल यादव यांच्यामुळे.
अखिलेशला हे अंकल बिलकुल पसंत नाहीत. शिवाय अखिलेश सीएम बनल्यावर यांनीही अखिलेशची राज्य चालवण्याची कुवत नसल्याचं विधान जाहीरपणे केलेलं होतं. अशी माणसं तुम्हाला पक्षात का लागतात असा प्रश्न विचारल्यावर मुलायमसिंह यादव यांनी लखनौतल्या पत्रकारांना एका वाक्यात उत्तर दिलं होतं..खर्चा,चर्चा,पर्चा. म्हणजे निवडणुकीतला खर्च सांभाळण्यासाठी आणि पक्षाला सतत चर्चेत ठेवण्यासाठी. बाकी समाजवादी या शब्दाच्या बरोबर उलट अशा आचरणाचं हे व्यक्तीमत्व.
लोकसभा गेली, विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
आता आपण पुन्हा विषयाकडे वळू. २०१२ ला एकहाती सत्ता मिळवणा-या समाजवादी पक्षाची २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मात्र वाताहत झाली. अवघ्या पाच जागा त्याही कुटुंबातल्याच लोकांना कशाबशा जिंकता आल्या. त्यानंतर विधानसभा वाचवण्यासाठी पक्षानं कसोशीनं प्रयत्न सुरु केलेत.
गुंडांच्या प्रवेशाला अखिलेशचा विरोध
पक्षात नंबर दोन स्थानावर असलेले शिवपाल आणि मुख्यमंत्री अखिलेश यांच्या प्रयत्नांची दिशा मात्र वेगळी आहे. म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी जो येईल त्याला जवळ घ्यायला शिवपाल यादव यांनी सुरुवात केली. त्यात डी पी यादव सारखा वादग्रस्त पुढारी ज्याच्यावर किमान नऊ खूनाच्या केसेस दाखल आहेत त्याचाही समावेश होता. शिवाय या डीपी यादवांचा मुलगा विकास यादव हा नितीश कटारा खून खटल्यातला आरोपी. समाजवादी पक्षाचा प्रमुख या नात्यानं अखिलेशला याला जोरदार विरोध केला. पक्षाला बदनाम करेल असा कुठलाही चेहरा आपल्याला नको असं त्यानं ज्येष्ठांना सांगितलं.
त्यापाठोपाठ शिवपाल यांनी कौमी एकता दलाला सपात विलीन करण्याचा प्रस्ताव आणला. ही पार्टी आहे मुख्तार अन्सारी या गुंडाची. अन्सारीमुळे आपल्या पक्षाची मुस्लिम मतं आणखी वाढतील हे ज्येष्ठांचं गणित होतं. मात्र परत एकदा अखिलेशनं आपला व्हेटो वापरुन अन्सारीला सपात येण्यापासून रोखलं. अशा लोकांपेक्षा आपण पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक जिंकू असं त्यानं पक्षातल्या लोकांना बजावलं.
वादावादीला सुरुवात
अखिलेश आणि शिवपाल यांच्या कार्यपद्धतीतले फरक हे अशा पद्धतीनं दिसायला लागले होते. त्यातच सप्टेंबर महिन्यात गायत्री प्रजापती, राजकिशोर सिंह या दोन मंत्र्यांना पैशांच्या अफरातफरीच्या आरोपावरुन अखिलेशनं मंत्रिमंडळातून हाकललं. हे दोन्हीही मंत्री शिवपाल यांच्या जवळचे. पण शिवपाल यांच्या नाकाला सर्वात जास्त मिरच्या तेव्हा झोंबल्या जेव्हा अखिलेशनं राज्याचे मुख्य सचिव दीपक सिंघल यांनाच पदावरुन दूर केलं. दीपक सिंघल हे शिवपाल यांच्या सर्वात विश्वासातले. सरकारमध्ये काय चाललंय याची माहिती देणारा हा सगळ्यात मोठा दुवा. या कृतीनं दोघांमधली दरी चांगलीच रुंदावली.
मुलायमसिंह तातडीने लखनऊला
तिकडे दिल्लीतल्या बंगल्यावर मुलायमसिंह यांना याची खबर लागली. ते तातडीच्या विमानानं लखनौमध्ये दाखल झाले. त्यांनी पहिलं पाऊल उचललं ते म्हणजे अखिलेशला थेट पक्षाध्यक्षपदावरुनच हटवलं आणि त्याजागी शिवपाल यादव यांची नियुक्ती केली. अखिलेशही काही कमी नव्हता. त्यानं शिवपाल यादव यांची सगळी महत्वाची खाती काढून घेतली. जवळपास आठवडाभर हा फॅमिली ड्रामा सुरु होता. पण अखेरीस मुलायम यांनी आपलं इमोशनल ब्लॅकमेलिंगचं अस्त्र बाहेर काढून मुलाचं मन वळवलं. त्यानंतर शिवपाल यांची खाती परत मिळाली. बाकीचे दोन मंत्रीही परत आले. पण हा झाला काहीसा फ्लॅशबॅक.
शिवपाल यांचे धडाधड वार
नेताजींचा शब्द अखेरचा असं यादव परिवारातला प्रत्येकजण आजही म्हणत असतो. त्यावेळीही अखिलेशच्या माघारीचं हेच कारण असावं. कुरुक्षेत्राच्या मैदानावर आप्तस्वकीयांना पाहून गोंधळलेल्या अर्जुनासारखी तेव्हाची त्याची स्थिती होती. त्यानं माघार घेतली. पण त्याच्या गटातल्या लोकांची गळचेपी थांबली नाही. कारण आता सपाचे अध्यक्ष शिवपाल बनलेले होते. आणि मुलायम यांच्या नावाचा वापर करत त्यांनी धडाधड एकेक वार करायला सुरुवात केली.
अखिलेशची बाजू घेऊन शिवपाल यादव यांच्याविरोधात बोलणाऱ्या अनेकांची थेट गच्छंती करण्यात आली. शिवाय गुश्शात असलेल्या मुलायम यांची मुलावरची नाराजी अनेकदा जाहीरपणे प्रकट झाली आहे. इतके दिवस एकत्र राहत असलेला अखिलेश नुकताच स्वतंत्र बंगल्यात शिफ्ट झालाय. तर एकदा एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुलायम पोहचले. पण अखिलेशला यायला थोडा उशीर झाला. प्रोटोकॉलप्रमाणे मुख्यमंत्र्यांसाठी सगळे थांबले. तर मुलायम यांचा राग नाकापर्यंत आलेला. थोड्या वेळानं अखिलेश आल्यावरही ते फुगून बसले होते. हातात कात्री घ्यायलाच तयार नव्हते. शेवटी आजम खान यांनी त्यांना मनवलं. आणि हा सगळा प्रकार पाहून तिकडे अखिलेश मात्र मंद हास्य करत होता.
रामगोपाल यांचं मुलायमसिंहांना पत्र
आपल्याच मुलाला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करायलाही मुलायम तयार नव्हते. निवडून आलेले आमदारच नवा मुख्यमंत्री ठरवतील असं विधान केलेलं त्यांनी तिरमिरीत. त्यावर History is ruthless. It spares no one. असं पत्र खासदार रामगोपाल यादव यांनी मुलायम यांना लिहिलेलं. उद्या जर सपाला १०० पेक्षा कमी जागा मिळाल्या तर त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल असं खरमरीत पत्र त्यांनी भावाला लिहिलं. त्यानंतर काहीशा नाईलाजानं का होईना पण शिवपाल यांच्या गटाकडून जाहीरपणे अखिलेश यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलं गेलं. मात्र तरीही कडवेपणा संपला नाहीच.
काकाला हिसका दाखवला
जो जो अखिलेशच्या बाजूनं उभा राहील त्याची मानगुट पकडायचं शिवपाल आणि मुलायम यांनी सुरु केलं होतं. अखेरीस या सगळ्याचा स्फोट झाला. आणि अखिलेशनं दीड महिन्याच्या काळात पुन्हा एकदा आपल्या काकाला हिसका दाखवला. थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन. म्हणजे ज्या शिवपाल यांच्याकडे सिंचन, पीडब्लूडी, महसूल यासह सहा महत्वाची खाती होती ते एका झटक्यात मंत्रिमंडळातून बाहेर फेकले गेलेत. अर्थात या चालीला उत्तर द्यायला मुलायम यांना दोन तासही लागले नाहीत. त्यांनी तातडीनं अखिलेशचे गुरु मानले जाणारे रामगोपाल यादव यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केलं. वर त्यांच्यावर भाजपशी साटंलोटं करुन पक्षाला संपवण्याचा कट रचल्याचा आरोपही केला.
अखिलेशची प्रतिमा
फेब्रुवारी-मार्चमध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुका होतील. त्याच्या तोंडावर सपामध्ये हा सगळा ड्रामा सुरु आहे. काहींना असं वाटतंय की या दुहीचा जोरदार फटका सपाला बसणार. पण दुसरीकडे एक तर्क असाही लावला जातोय की या सगळ्या प्रकरणात अखिलेशची प्रतिमाही उजळून निघालीय. म्हणजे बुजुर्गांच्या छायेतून बाहेर पडून, प्रसंगी आपल्या बापाशीही लढणारा नेता म्हणून अनेकजण त्याचं कौतुकही करतायत.
खरंतर मुलायम यांनी स्थापन केलेल्या पक्षाची प्रतिमा गेल्या काही दिवसांत प्रचंड ढासळलीय. मुळात समाजवाद हा शब्द पक्षाच्या नावातच उरलाय. कारण आता ती यादव कुटुंबाची फॅमिली एन्टरप्राईज वाटावी अशी पार्टी बनलीय. मुलायम यांच्या नात्यातले तब्बल १७ जण या ना त्या पदावर आहेत. इतका मोठा गोतावळा आहे. आताच्या या लढाईचा मूळ हेतू हाच आहे की नेताजींची गादी पुढे कोण चालवणार?
अखिलेशने दंड थोपटले
पक्षात हा सगळा राडा सुरु असला तरी दोन्ही गटांना त्यांचं सरकार कोसळू द्यायचं नाहीय. कारण निवडणुकीच्या आधी तसं झालं तर त्याचा नकारात्मक संदेश जनतेच्या मनात जाईल. एक मात्र खरंय की खुर्चीसाठी मुलापेक्षा आपल्या भावाला पसंती देणारे मुलायमसिंह यांच्यापुढे आता थेट त्यांचा मुलगाच आव्हान देऊन उभा आहे. अमरसिंहांची साथ सोडाल तरच हा सगळा वाद मिटेल असा स्पष्ट इशारा अखिलेशने दिलाय. शिवाय नेताजींचा उत्तराधिकारी मीच आहे असं ठणकावून सांगत त्यानं काका शिवपाल यांनाही शह दिलाय. सत्तेच्या खेळात नात्यांच्या बंधनात अडकून हळवं होऊन चालत नाही. गरज पडली तर दंड थोपटून उभं राहावं लागतं. कुरुक्षेत्रातल्या श्रीकृष्णापासून, चाणक्यापर्यंत सगळ्यांचा राजधर्म हेच शिकवतो. त्यामुळेच अखिलेशच्या या कृतीला अनेक तरुणांचा पाठिंबा मिळाला तर आश्चर्य वाटायला नको.
सुनीता एरॉन यांनी अखिलेश यादववर एक पुस्तक लिहिलंय. त्यात त्यांनी एका घटनेचा उल्लेख केलाय. सिडनीतून आपलं environmental engineering चं शिक्षण पूर्ण करुन अखिलेश नुकताच भारतात परतलेला होता. १९९९ साली डिंपलशी त्याचा प्रेमविवाह झाला. वडिलांना भेटायला कधीकधी त्यांचे राजकारणातले मित्र घरी यायचे. असं कुणी घरात आलं की अखिलेश त्यांच्या पाया पडून लगेच तिथून सटकायचा. राजकारणात त्याला फार रसही नव्हता. २००९ मध्ये जेव्हा त्याच्याकडे पक्षाचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं. तेव्हा ज्येष्ठ समाजवादी जनेश्वर मिश्रा यांनी त्याला सल्ला दिला, आत्तापर्यंत तू पक्षातल्या नेत्यांच्या पाया पडत होतास, एक आदर म्हणून. पण आता तू नेता आहेस. तुला नेत्यासारखंच वागलं पाहिजे. यापुढे तू कुणापुढेही झुकणार नाहीस.
तर राजकारणात कधीकधी अशीही वेळ येते जेव्हा कुणापुढेही या व्याख्येत प्रत्यक्ष पित्याचाही समावेश करावा लागतो. जनेश्वर मिश्रा आज हयात नाहीत. यूपीत छोटे लोहिया म्हणून ओळखला जाणारा हा सच्चा समाजवादी २०१० मध्येच हरपला. पण चंद्रगुप्तला गादीवर बसवण्यासाठी प्रत्येकवेळा चाणक्यच धरतीवर यायला पाहिजे असं नाही. कधीकधी असे जनेश्वर मिश्राही काम करुन जात असावेत नाही का?
'दिल्लीदूत' ब्लॉग मालिकेतील याआधीचे ब्लॉग :
दिल्लीदूत : पवार-मोदी भेटीचं गूढ काय?
दिल्लीदूत : खून की 'दलाली'
दिल्लीदूत : पाकिस्तानसोबत आता साम-दाम-दंड-भेद!
दिल्लीदूत : रामचंद्र गुहा असं का म्हटले असतील?
दिल्लीदूत : जेएनयूमधला 'गुलाल' नेमके काय इशारे देतोय?
दिल्लीदूत: आग्र्याहून सुटकेचा थरार अनुभवताना...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement