दिल्लीदूत : शरयूच्या काठावरून...
भू रामचंद्राची नगरी असलेल्या अयोध्येत जाण्याची ही दुसरीच वेळ होती. मागच्या वेळी दिवाळीला गेलो होतो आणि यावेळी नेमकी ईद होती. दिवाळीच्या वेळी शरयूच्या काठावर होणाऱ्या दीपोत्सवासाठी अयोध्या सजली होती, तर यावेळी सगळीकडे ईदचा माहौल होता. आधीच्या मिरवणुकीत भगव्या रंगाची छटा, तर यावेळी हिरवा रंग सगळीकडे पसरला होता. हा रंगाचा फरक सोडला, तर बाकी सेलिब्रेशन सारखंच.
अवध तो बहुत पहलेसे सेक्युलर रहा हैं, नवाब वाजिद अली शाह के जमाने से यहा पर दोनो समाज बिलकुल शांती से, भाईचारे से रहते आए है. अशी सुरुवात करुन हाजी मेहबूब अयोध्या आणि इथल्या परिसराच्या भूतकाळातच घेऊन गेले. अयोध्येतल्या सध्याच्या वातावरणावर मुस्लिम समाजाच्या मनात नेमकं काय चालू आहे, याचा वेध घेण्यासाठी एका मुस्लिम मोहल्ल्यात आलो होतो. तिथे हाजी मेहबूब नावाचे हे गृहस्थ भेटल्यानंतर गावाबाहेरच्या मशिदीत बसूनच आमच्या गप्पा सुरु होत्या. वाजिद अली शाहची प्रतिमा इतिहासात अय्याश, अक्षम राजा अशी असली तरी संगीताचा प्रेमी आणि हिंसेबद्दलचा तिटकारा हे त्याच्या व्यक्तिमत्वातले दोन गुण त्याला नि:संशय सेक्युलर ठरवण्यास पुरेसे आहेत. हाजी मेहबूब यांनी त्याचा पुरावा म्हणून अवधच्या या नवाबाचा एक विलक्षण किस्सा ऐकवला. लखनौमध्ये त्यावेळी मोहर्रम आणि होळीचा सण एकत्र आला होता. आता मोहर्रम म्हणजे मातमचा, दुखवटा साजरा करण्याचा सण. त्यावेळी हे क्षेत्र शियाबहुल मुस्लिमांचं. सगळ्या शहरात दुखवटा, त्यामुळे हिंदूंना काही होळी साजरी करता आली नाही. वाजिद अली शाहाच्या कानावर होळी साजरी न होण्याचं कारण आल्यावर त्यानं स्वत: होळीच्या उत्सवात साजरं व्हायचं ठरवलं. मुस्लिमांनाही या सणात सहभागी व्हायचं फर्मान निघालं. मुस्लिम राजा आहे, म्हणून त्याच्याच धर्माच्या लोकांना सण साजरा करायची संधी मिळतेय हा संदेश प्रजेत जाऊ नये म्हणून मातमच्या संकेतांची पर्वा न करता या नवाबानं स्वत:च्या अंगावर रंग मिरवला. वाजिद अलीच्या या उदारमतवादाचं दुसरं रुप त्यानं स्वता लिहिलेल्या एका ठुमरीतच प्रतीत होतं. श्रीकृष्णाला संबोधून लिहिलेल्या या ठुमरीचे बोल आहेत- मोरे कान्हा जो आए पलट के, अब के होली मैं खेलूंगी डट के..
प्रभू रामचंद्राची नगरी असलेल्या अयोध्येत जाण्याची ही दुसरीच वेळ होती. मागच्या वेळी दिवाळीला गेलो होतो आणि यावेळी नेमकी ईद होती. दिवाळीच्या वेळी शरयूच्या काठावर होणाऱ्या दीपोत्सवासाठी अयोध्या सजली होती, तर यावेळी सगळीकडे ईदचा माहौल होता. आधीच्या मिरवणुकीत भगव्या रंगाची छटा, तर यावेळी हिरवा रंग सगळीकडे पसरला होता. हा रंगाचा फरक सोडला, तर बाकी सेलिब्रेशन सारखंच. देशाच्या राजकारणाला ज्या शहरानं नवं वळण दिलं, जिथल्या एका जागेच्या मालकीहक्कावरुन देशभरात दंगली झाल्यात, त्या संवेदनशील शहरात दोन्ही उत्सव तितक्याच दिमाखानं, शांततेत, परस्पर सहकार्यानं साजरे होतात हे पाहणं दिलासा देणारं होतं. मुळात अयोध्या शांतच आहे. इथलं वातावरण खराब केलं ते बाहेरच्या लोकांनी, ही इथल्या दोन्ही समाजाच्या बोलण्यात जाणवलेली गोष्ट.
पण या शांत डोहावर ओरखडे मारण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरु झालंय. आताही लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना पुन्हा एकदा रामनामावरुन जप सुरु झालाय. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसांचा अयोध्या दौरा आणि विश्व हिंदू परिषदेची विराट धर्मसभा हे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी होत असल्यानं अयोध्येच्या सुरक्षा व्यवस्थेवरचा ताण स्पष्ट जाणवत होता. 25 नोव्हेंबरला म्हणजे, ज्या दिवशी हे दोन्ही कार्यक्रम एकावेळी होत होते, त्यावेळी रामजन्मभूमीचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. वादग्रस्त जागेच्या जवळपास चार किमी अंतरावर चारही बाजूंनी नाकाबंदी करण्यात आली होती. अनेक दुकानंही बंद होती. या दौऱ्याआधी व्यापाऱ्यांच्या विरोधाची जी बातमी आली होती, त्याचंही कारण हेच होतं. व्यापाऱ्यांच्या एका गटाचं म्हणणं होतं की, असे कार्यक्रम करणारे अयोध्येत येतात आणि आपला राजकीय स्वार्थ साधून निघून जातात. पण त्यांच्यामुळे आमची दुकानं बंद होतात, गिऱ्हाईक बाहेर पडत नाहीत आणि नुकसान होतं. उद्धव ठाकरे अयोध्येत येण्याआधी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये व्यापाऱ्यांच्या निषेधाचा सूर प्रकट झाला होता. पण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी या व्यापाऱ्यांच्या संघटनांना भेट देऊन त्यांची नाराजी दूर केली, त्यानंतर हे प्रकरण मावळलं.
अयोध्येत जाण्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केली, तेव्हापासूनच शिवसेना या कार्यक्रमाच्या तयारीला लागलेली होती. त्यातही खासदार संजय राऊत यांच्याकडेच या नियोजनाची सूत्रं असल्याचं दिसत होतं. शिवसेनेतल्या खासदारांमध्ये राज्यसभावाले आणि लोकसभावाले असा एक अंतर्गत विरोध असल्याचं अनेकदा जाणवत असतं. यावेळीही त्याची झलक पाहायला मिळाली. लक्ष्मण किला इथे जो कार्यक्रम होणार होता, त्यात शिवसेनेच्या एका खासदारामार्फत आलेल्या उत्तर भारतीय शिवसैनिकांना एक भेट उद्धव ठाकरेंना द्यायची होती. पण कार्यक्रम अगदी काही तासांवर आला तरी त्याबद्दलची निश्चितता होत नव्हती. काय झालं का फायनल, असं विचारल्यावर प्रतिक्रिया आली की जनहित याचिका अजून हायकोर्टात प्रलंबित आहे. आमच्याकडे आता कसं आहे, सुप्रीम कोर्टापाठोपाठ एक हायकोर्टही तयार झालंय. हायकोर्टातनं परवानगी मिळाली की मग पुढे. आपली नाराजी लपवत, चेहऱ्यावर हसू आणत हे नेते सांगत होते.
ठाकरे घराण्यातली एखादी व्यक्ती पहिल्यांदाच अयोध्येत येत असताना बाबरी विध्वंसात प्रत्यक्ष सहभाग असलेला शिवसेनेचा महाराष्ट्राबाहरेचा पहिला आणि (आत्तापर्यंत) शेवटचा आमदार मात्र त्याच शहरातल्या दुसऱ्या कार्यक्रमाच्या (विहिंपच्या) तयारीत मग्न होता. पवन पांडे असं या आमदाराचं नाव. बाबरी मशीदीवर मीर बाकीच्या नावाचा जो शिलालेख होता, त्याचे दोन तुकडे आजही आपल्याकडे आहेत हे अभिमानानं सांगणारा इसम. पवन पांडेनं 1991 ते 1996 या काळात धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवली, 1998 ला पक्षातल्या काही अंतर्गत मतभेदांमुळे शिवसेना सोडली. नंतर एकदा बसपाकडून आणि एकदा अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवलीय. गेल्या तीन वर्षांपासून तो आता विश्व हिंदू परिषदेचं काम करतोय. 1992 ला अयोध्येत जवळपास पंधरा हजार शिवसैनिक आले होते, सतीश प्रधान, मोरेश्वर सावे या नेत्यांची सगळ्यांसमोर भाषणं झाली. जी कारसेवा प्रतीकात्मक होणार आहे त्यात आम्ही सहभागी होणार नाही, आम्ही हा कलंक मिटवून टाकणार असं वक्तव्य कार्यशाळेत शिवसेनेच्या नेत्यांनी केलं होतं असं पवन पांडे मुलाखतीत सांगत होता. बाबरीचा विध्वंसक या प्रतिमेसोबतच मुंबईतल्या अंडरवर्ल्डशी संबंध असलेला शिवसैनिक अशी त्याची प्रतिमा स्थानिकांच्या मनात आहे. माझी या माणसासोबत भेट झाली ती विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमासाठी जेवणाच्या तयारीचं काम बघताना पाकशाळेत. त्यामुळे या माणसाची ही बँकग्राऊंड आणि सध्या तो सांभाळत असलेली जबाबदारी याची सांगड घालणं थोडंसं अवघड गेलं. कदाचित माणसं आपल्या पापाचं प्रायश्चित म्हणून असल्या कामात मन रमवत असावेत असा विचार मनात आला.
अयोध्येत ज्या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेची कार्यशाळा आहे त्याच्या पाठीमागेच एका मैदानावर त्यांचा कार्यक्रम होणार होता. ही कार्यशाळा पाहायला गेलो तेव्हा तिथे भेटले अन्नूभाई सोमपुरा. हे अन्नूभाई मूळचे गुजरातचे. त्यांनी सोमनाथ मंदिरासाठी प्रसिद्ध आर्किटेक्ट प्रभाशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं होतं. 1990 साली त्यांना इथे पाचारण करण्यात आलं , तेव्हापासून आपल्या कुटुंबासोबत ते इथेच राहतायत. आज त्यांचे जावई रजनीकांत सोमपुरा हे कार्यशाळेत दगडांना आकार द्यायचं काम करतात. या कार्यशाळेत आता उरलेले ते एकमेव कारागीर आहेत. कधीकाळी इथे अडीचशे तीनशे कारागीर हे काम करायचे. अन्नूभाई सोमपुरा यांनी सांगितलं की मंदिरासाठीचे 106 खांब बांधून तयार आहेत. म्हणजे जवळपास पहिला मजला तयार आहे. आता दुस-या मजल्यासाठी तितकेच 106 खांब बनवावे लागणार आहेत. पण मुळात हे खांब इथून हलल्याशिवाय नवे खांब इथे येऊन आमचं काम सुरु होणार नाही. आत्तापर्यंत दोनवेळा जीवघेण्या अपघातातून बचावलेले वयोवृद्ध अन्नुभाई हसत हसत म्हणतात, मंदिर बनाये बिना नहीं जाऊंगा इस दुनिया से.
नव्वदच्या दशकात राममंदिराची मोहीम सुरु झाली, तेव्हाच अयोध्येत ही कार्यशाळा उभारली गेली. या कार्यशाळेत कोरीवकाम केलेले सगळे दगडी खांब पडून आहेत. एका बाजूला वेगवेगळ्या भाषांमध्ये जय श्रीराम लिहिलेल्या विटांचा ढीग रचलेला आहे. काचेमध्ये बंदिस्त अशी प्रस्तावित राम मंदिराची प्रतिकृतीही ठेवली गेलीय. आज ही कार्यशाळा म्हणजे एक पर्यटनस्थळ बनलंय. बाहेरुन आलेले लोक हे बंदिस्त मॉडेल पाहतात. दगडी खांब, विटांच्या ढिगा-यामधून एक फेरफटका मारत निघून जातात. काही बहाद्दरांनी तर राममंदिराच्या या खांबांवरही आपल्या प्रेमाच्या खुणा कोरुन ठेवल्या आहेत. कार्यशाळेत जाऊ देत असतील का असा एक विचार अयोध्येत शिरताना येत होता, पण इथे तर सगळा आयाराम-गयाराम मामला सुरु होता.
शरयूची आरती हा काय प्रकार आहे याची उद्धव ठाकरेंच्या दौ-याआधी फार कल्पना नव्हती. वाराणसीमधल्या घाटावर गंगेची आरती आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असेल, त्याच धर्तीवर ही आरती 2013 सालापासून सुरु झालीय. या घाटावर ही आरती करणा-या पुजा-यांना शिवसेनेच्या कार्यक्रमामुळेच अच्छे दिन आले. कारण दोन तीन दिवस आधीपासूनच मीडिया ही आरती कव्हर करायला येऊ लागल्यावर आरतीसाठी नव्या लखलखीत समया, तबकं, नवी वस्त्रं शोधण्याची धावाधाव सुरु झाली. रोज संध्याकाळी सहा वाजता शरयूच्या तीरावर ही आरती होते.
विश्व हिंदू परिषदेच्या विराट धर्मसभेला गर्दी प्रचंड होती, त्या तुलनेत शिवसेनेची गर्दी मर्यादित होती. पण साधू-संतांकडून आशीर्वाद, शरयू आरती, रामलल्ला दर्शन..दौ-यातल्या कार्यक्रमांची आखणीच अशी केली होती, की मीडियामध्ये सतत फोकस शिवसेना पक्षप्रमुखांच्या कार्यक्रमांवर राहिला. विराट धर्मसभेसाठी बाईकस्वार येत होते, त्यांना कुठल्या अंगाने रामभक्त म्हणावं हे कळत नव्हतं. बाईकवर काठया नाचवत, शर्टाची कॉलर उडवत हे मवाली-गुंडछाप तरुण मुखाने जय श्रीरामचा गजर करत मैदानावर दाखल होत होते. या गर्दीत भाजपच्या अनेक जिल्हाध्यक्षांच्या, खासदार- आमदारांच्या गाडयाही दिसत होत्या. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या या कार्यक्रमामागे कुणाची राजकीय ताकद आहे हे उघड दिसत होतं. या धर्मसभेच्या मैदानात फिरताना रामलल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाऐंगे सारख्या जुन्या घोषणांसह तेल लगाओ डाबर का, नाम मिटा दो बाबर का सारख्या काही नव्या घोषणाही ऐकायला मिळत होत्या. अयोध्येतल्या एका ज्येष्ठ नागरिकासोबत शरयू काठावर झालेलं बोलणं त्यावेळी आठवलं. अयोध्या मे तो पहले सियावर रामचंद्र की जय का नारा होता था, हमारे साथ स्कूल में मुस्लिम भाई भी खुशी से यह नारा लगाते थे. हाथ जोडकर यह नारा लगानेसे जो भाव प्रकट होता हैं, वह मुठ्टी जोडकर गला तानकर जय श्रीराम कहनें मे बिलकुल भी नहीं. राम को भगवान से एक राजकीय नेता के रुप में छोटा कर दिया हैं इन लोगोंने.
अयोध्या शहराला वेढा घालत एक परिक्रमा मार्ग इथे तयार करण्यात आलाय. या परिक्रमा मार्गावरची एकमेव मशीद पाहायला गेलो होतो. बाबरी मशीद अँक्शन कमिटीचे हाजी अखलाख इथले इमाम आहेत. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात हिंदू एकवटणार असल्यानं मुस्लिमांच्या मनात थोडीशी धाकधुक होती. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिका-यांना भेटून एक निवेदनही दिलं होतं. 1992 ची स्थिती पुन्हा होतेय की काय अशी भीती त्यांच्या मनात होती. आमचा विरोध मंदिराच्या निर्मितीला नाही तर ते त्याच जागेवर करण्याला आहे. याच वादग्रस्त जमिनीच्या आसपास इतकी जमीन आहे तिथे किंवा इतरत्र बनवायला आमची हरकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पण मग वादग्रस्त जागेवर काय बनायला हवं या प्रश्नावर मात्र ते म्हणत होते, आमची तर मागणी आहे की आता वादग्रस्त जागेवर काही नाही बनलं तरी चालेल, ती आहे तशीच ठेवा. मंदिर टूटते किसी ने नहीं देखा, मस्जिद टूटते सबने देखा हैं हे वाक्य ऐकवून त्यांनी या चर्चेचा शेवट केला. अयोध्येतलं वातावरण इतकं गढूळ नव्हतं हे सांगताना त्यांचाही स्वर तुटत होता. बानवे में जली शहर की कितनी मस्जिदों को तो बुझाने यहा के हिंदू साधू आगे आए थे. बाबरी मशीदीच्या विध्वंसानंतरच्या काळात आत्तापर्यंत या शहरात दोन समाजांत तेढ निर्माण झाल्याची एकही घटना नाहीय असं ते सांगत होते. पण बाहेरचे लोकच हा तणाव वाढवण्याचा कसा प्रयत्न करतात हे ते सांगत होते. अयोध्येत वर्षातून तीनवेळा हिंदूंची मोठी यात्रा असते. यावेळी शहराला परिक्रमा करत भाविक याच मार्गावरुन जात असतात. या यात्रेसाठी आलेले बाहेरचे लोक परिक्रमा मार्गावरची ही एकमेव मशीद दिसली की ओरडून ओरडून जय श्रीरामच्या घोषणा देतात. काय म्हणणार त्यांच्या वेडेपणाला असं ते अगदी हसत हसत सांगत होते.
रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येत छोटी मोठी सहाशे मंदिरं आहेत. पण ज्या वादग्रस्त जागेवर सध्या रामलला विराजमान आहेत तिथे मात्र ते गेल्या 26 वर्षांपासून तंबूत आहेत. हा तंबू जुना झाला की त्याला नव्यानं बनवण्यासाठीची परवानगी, तो बदलण्याची सगळी प्रक्रिया सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन पार पडतं. सकाळी सात वाजता रामलल्लाचं दर्शन सुरु होतं, त्याआधी तुम्हाला किमान चार वेळा सिक्युरिटी चेकिंगला सामोरं जावं लागतं. बरं आतमध्ये गेल्यानंतरही मोकळेपणानं दर्शन नसतं. देव तंबूत आणि भक्त पिंज-यात..अशी काहीशी स्थिती असते. कारण मोजकीच हालचाल करता येईल इतकी जागा ठेवून इथे लोंखंडी पिंजरे उभारले गेलेत. याच पिंज-यांमधून फिरत फिरत तुम्हाला एका ओसाड जागेवर थोड्या उंचीवर एक तंबू दिसतो. त्याच्या समोर गेलं की तिथेच उभे राहून सुरक्षा रक्षकांच्या पहा-यात दर्शन घेऊन पुन्हा पिंजरे पार करत बाहेर यायचं असतं. हा प्रश्न कसा सुटणार आहे माहिती नाही. पण त्यामुळे या देशाच्या उदारमतवादी संस्कृतीची उसवली गेलेली वीण आता आणखी तुटू नये एवढीच प्रार्थना करत बाहेरचा मार्ग पकडायचा.