BLOG | मिशन ऑलिम्पिक मेडल ‘पंच’
टोकीयो ऑलिम्पिकमध्ये सध्या भारतीय महिला खेळाडूंचा बोलबाला आहे. नारीशक्तीचं अनोखं दर्शन टोकीयो ऑलम्पिकमध्ये पहायला मिळतेय. ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी मीराबाई चानूनं भारताला सिल्व्हर मेडल जिंकून दिलं. काल त्यात भारतीय महिला बॉक्सर लवलिनाने आणखीन एका मेडलची निश्चिती केलीय. आणि दिवस मावळताना पीव्ही सिंधूने बॅडमिंटनच्या सेमीफायनलमध्ये धडक दिलीय.
बॉक्सर लोवलिनानं चायनिज तैपेईच्या चेन चिनचा 4-1 असा पराभव करीत सेमी फायनलमध्ये धडक दिलीय. चेन चिन या खेळाडूनं दिल्लीत झालेल्या वर्ल्डकपमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. सेमी फायनलमध्ये तीची गाठ आता तुर्कस्तानच्या सुरमेनेली बुसेनाझशी पडणार आहे. या बुसेनाझनं रशियातील वर्ल्डकपमध्ये गोल्ड मेडल मिळवले होते. लक्षात घ्या या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये लोवलिनाला ब्राँझ मेडल मिळाले होते. जर बुसेनाझला पराभूत केले तर ती फायनलला धडकेल. जिंकली तर गोल्ड आणि हरली तर सिल्व्हर. आणि सेमी फायनल हरली तरी बॉक्सिंगच्या नियामानुसार दोन्ही सेमी फायलन पराभूत खेळाडूंना ब्राँझ मेडल दिले जाते. विशेष म्हणजे लोवलिना ज्या वेल्टरवेट गटात खेळते त्या वजनी गटाचा यंदा ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. लोवलिनानं या संधीचं सोने केले. येत्या 4 ऑगस्ट रोजी लोवलिना सेमी फआयनलची मॅच खेळेल.
ईशान्य भारतातील मीराबाई चानू आणि लोवलिना या दोन खेळाडूंनी भारताला मेडल टॅलीमध्ये मानाचे स्थान दिलय. या दोन्ही खेळाडूंत एक साम्य आहे. दोन्ही गरीब कुटुंबातून आल्यात. उद्याच्या खाण्याची भ्रांत दोघींना होती. पोटातील या भुकेलाच या दोघांनी आपली ताकद बनविले. आणि टोकीयोत इतिहास घडविलाय.
भारताची तिसरी कन्या पीव्ही सिंधूने अपेक्षेप्रमाणे बॅडमिंटनमध्ये आपली विजयी आगेकूच कायम राखत सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे. मेडलपासून ती आता फक्त एक विजय दूर आहे. जपानच्या चौथ्या मानांकित यामागुचीचा तिने सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. रिओ ऑलिम्पिकमध्येही सिंधूने जपानच्या त्यावेळेच्या सहाव्या मानांकित ओकूहाराचा पराभव करत फायनलमध्ये धडकी दिली होती आणि एतिहासिक सिल्व्हर मेडल जिंकले होते. यजामान जपानच्या या दोन्ही खेळाडूंना आज क्वॉर्टर फायनलमध्ये पराभव पत्करावा लागालाय. ऑलिम्पिकमध्ये सिंधुपुढे जपानचा निभाव लागत नाही हेच खरे.
जपानवर दुसरा विजयी हल्ला केला तो भारतीय पुरुष हॉकी संघाने. भारताने जपानचा 5-3 असा पराभव केला. अ गटातून दुसऱ्या क्रमांकाने भारताने क्वॉर्टर फायनल गाठली आहे. भारताची क्वॉर्टर फायनलमध्ये आता ब गटातील तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ब्रिटनसोबत गाठ पडेल. 1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतानं गोल्ड मेडल जिंकले होते. त्यानंतर गेली 42 वर्ष ऑलिम्पिक हॉकी मेडलने भारताला हुलकावणी दिली आहे. यंदा भारतीय पुरुष हॉकी टीमचा फॉर्म पहाता मेडलची खात्री देता येईल.
ऑलिम्पिकमधील महाराष्ट्राचे आव्हान होते ते 3000 मीटर स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे आणि नेमबाज राही सरनौबत यांच्यावर. अविनाशं ऑलिम्पिकमध्ये 8 मिनिटे 18.12 सेकंदाच्या नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली, पण तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नाही. प्राथमिक लढतीत त्याच्या गटाता त्याला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
शुटींगमध्ये भारताची निराशाजनक कामगिरी आजही कायम राहीली. महाराष्ट्राची राही सरनौबत 25 मीटर पिस्तुलच्या प्रकारात मेडलची दावेदार मानली जात होती. पण अंतिम फेरीतील आठ खेळाडूतही तिला स्थान पटकावता आले नाही. तीची 32 व्या क्रमांकावर घसरण झाली. एशियाडच्या 25 मीटर पिस्तुलमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी राही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली होती. क्रोएशियात एक महिना आधी झालेल्या वर्ल्ड कपमध्येही राहीने गोल्ड मेडल जिंकून अपेक्षा उंचावल्या होत्या. पण तीला आज सुरु सापडला नाही. आता महाराष्ट्राची तेजस्विनी सावंत रायफल थ्री पोझिशनमध्ये आपले कौशल्य अजमावेल.
दिल्लीतील कॉमनवेल्थमध्ये महान धावपटू मिल्खासिंगशी गप्पा मारण्याची संधी मिळाली होती. मिल्खांना फ्लाईंग शिख म्हटले जायचे. त्यांच्या यशाचं रहस्य काय असा प्रश्न मी त्यांना विचारले होते. तेव्हा ते मिश्किलपणे हसून म्हणाले होते. बेटा बचपनमें इस पेटने बढी भूख झेली है. पेट की यह भूखही आपको दौडना और जितना सिखाती है. मीराबाई... लोवलिना या खेळाडू मिल्खासिंगचा वारसा चालवत आहेत. भारताची मेडलची भूख प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये वाढतेय, आणि त्यात महिलांचे योगदान कौतुकास्पद आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॉक्सर मेरीकोमने ब्राँज मेडल जिंकले होते. गेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने सिल्व्हर तर कुस्तीपटू साक्षी मलिकने ब्राँज मेडल जिंकले होते. यंदाही पहिली दोन मेडल नक्की करणाऱ्या मीरा आणि लोवलिना या महिला खेळाडू आहे. आणि सिंधू ही मेडलच्या नजिक पोहचलीय. नारी शक्तीच्या उदयाचा कौतुक करावे तितके कमी आहे.