BLOG : जरांगे आणि खूप काही प्रश्न…
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणच्या मुद्द्याने पुन्हा एकदा धग धरली आणि याचबरोबर एक सामान्य नाव प्रत्येकाच्या तोंडावर उमटू लागलं. अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाचं आंदोलन एका सामान्य ताकदीने उभं राहिलं. खरंतर या नावासोबत अनेक नवे प्रश्न देखील महाराष्ट्रासमोर उभे राहिले. खरंतर या प्रश्नांची उत्तरं मिळतील की नाही किंबहुना ती शोधावी की नाही हा मुद्दा फार तांत्रिक आहे. पण तरिही या नावासोबत येणारे प्रश्न मांडणंही तितकचं गरजेचं असावं.
आंदोलनं तशी खूप होतात. पण जरांगेंचंच तेवढं गाजतं. अनेकांच्या आंदोलनांची चर्चा होते, काही आंदोलनांमुळे चर्चेत येतात आणि इतिहासात लक्षात राहतात. बहुतेक त्यापैकीच एक असणारेत जरांगे. इथे पॅाझिटीव्ह आणि निगेटीव्ह प्रतिक्रियेचा प्रश्नच नाही पण इतर अनेक प्रश्न आहेत, ज्याची उत्तरं तशी देणं कठिणचं पण तरीही महाराष्ट्राच्या जनतेला मात्र भेडसावत आहेत. महाराष्ट्रातल्या कित्येकांना जे पडले असतील असेच काही प्रश्न मलाही पडलेत.
उसळलेल्या समुद्रात नाव हेलकावे घेते त्याचप्रमाणे अनेक मोठ्या हालचालींनी हेलकावे घेणारं ठरलं महाराष्ट्र राज्य. देशातल्या एखाद्या सो कॅाल्ड राजकीयदृष्ट्या समृद्ध असणाऱ्या या राज्यातल्या एका जिल्ह्यातल्या लहानशा गावात कोणत्यातरी ठिकाणी एका साधारण आंदोलनाचा जन्म होतो. कुठेही चर्चेत नसलेलं नाव एका सामुदायाला गोळा करतं आणि एक विषय घेऊन आंदोलन करतं. आंदोलनाचं स्वरुप लहान असूनही राज्यातल्या पोलीस यंत्रणांकडून लाठी चार्ज होतो. मग जन्माला येतं मनोज जरांगे पाटील नावाचं वादळ!
पण या वादळाला वादळ केलं कोणी, कशासाठी? पुढे इतकं व्यापक रुप होण्यासाठी फक्त एक लाठी चार्ज कारणीभूत आहे का? ज्या नावाची सामान्यांमध्ये चर्चाच नाही त्यावर यत्रणांचा उपयोग झाला पण झालाच नसता तर चर्चा झालीच नसती का? चर्चा झाली नसती तर जरांगे मोठे झाले असते का? प्रश्न हा आहे की आरक्षणाचा मुद्दा व्यापक आणि सामाजिक भावनांसोबत जोडलेला असूनही विषयाने पेट घ्यायला इतकी वर्ष का लागली? एखाद्या समाजाची वर्षानुवर्षाची खदखद बाहेर यायला आणि त्याला वाट मोकळी करुन द्यायला फक्त एक नाव पुरेसं कसं? असलं तरी जरांगेना स्वतःला कधी याची पूर्वकल्पना मिळाली असावी का? आंदोलनाआधी किती दिवस आधीपासून कायद्याच्यादृष्टीने जरांगेंनी अभ्यास सुरु केला असणार?
मात्तबर मंडळी मनधरणी करतायत. आंदोलन थोपवण्याचे अनेक प्रयत्न झाले. प्रत्येक प्रयत्न मोडित काढत जरांगे हे नाव मोठं होत गेलं. सुरुवातीला राजकीय वर्तुळातून सहानुभूती मिळणाऱ्या जरांगेचे आता राजकीय विरोधक बनू लागले. एवढं सगळं होताना, राजकीय वर्तुळात जरांगे नावाचा जप होताना खुद्द जरांगेंनाच राजकारणात रस असल्याचं बोललं गेलं. ते खरं असेल का? असेल किंवा नसेलही… पण त्यात खरा प्रश्न हा आहे की हा विषय चालणार कधीपर्यंत? मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंतच? आरक्षण मिळाल्यावर जरांगेंच्या बातम्या संपणार? बरं शरीराने काटक दिसणारे जरांगे अनेकदा सलाईनवर जगले, प्रसंगी पाणीही सोडलं. जरांगेंची आंदोलनासाठी असणारी मानसिक ताकद जितकी आहे त्याहून अधिक शारीरीक ताकद भक्कम दिसतेय.
आंदोलन, मागण्या आणि राजकारण हे सगळं जरा बाजूला ठेवलं तर जरागेंना त्यांच्या स्वत:च्या जिवाची भीती कधी वाटत नसेल का? जीव गेलाच तर पुढचे काही दिवस महाराष्ट्र पेटेलही पण हीच गर्दी काही काळाने त्यांच्या पश्चात विसरुही शकते, असं काही झालंच तर पुढे काय? असे प्रश्न त्यांनाही पडले असतील ना? यात नवीन वादाचा जन्म. इतर समाजाचं आरक्षण विरुद्ध मराठा आरक्षण. मोठी राजकीय नावं यात सामिल झाली तसा जरांगेंचा भाषणातला जोर आणखी वाढला. छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे वाद उभा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतोय.
गेले कित्येक वर्ष आक्रमक न दिसलेले छगन भुजबळ सध्या खूप आक्रमक आहेत. मोठ्या नावांसोबत थेट वाकडं घेताना जरांगे कोणत्या शक्तीचा वापर करत असतील? जरांगेंच्या आंदोलनाला माध्यामांना उपयोग तसा फार होतोय पण सोबतच मराठा संघटनांकडून आंदोवनावेळी हवी ती मदत मिळतेय. या दोन्हीपैकी एक मदत जरी अपूरी असती तर आंदोलन महाकाय झालं असतं का? असो, पण जरांगेंच्या भाषणातल्या शब्दांमध्ये होणारे बदल सूचक आहेत. आंदोलनाने कमवलेलं भाषणाने घालवायची वेळ यावी नाही. पण तरी आरक्षण मिळेपर्यंत हे वारं असंच राहणार की नंतर सगळ्याचा सगळ्यांना कंटाळा येणार? शेवटचा प्रश्न- समजा आंदोलन मिळालंच.... तर पुढे जरांगेंचं काय? पुढे जरांगे हे मनोज जरांगेंच राहतील? की आता जी वक्तव्य राजकारण्यांकडून केली जात आहे त्याप्रमाणे जरांगे पाटील हे एका समाजाचं नेतृत्व पुढे येईल? असे अगणिक प्रश्न सध्या महाराष्ट्रासकट मलाही पडले आहेत. पण त्याची उत्तरंही येणाऱ्या काळातच मिळतील किंबहुना ती उत्तरं येणाऱ्या काळानेच द्यावी इतकीच काय ती अपेक्षा.