BLOG : माझी माय माझी प्रेरणा : शुभदा केदारी, चंद्रकला ठोंबरे
आमचा आई-मुलीचा बाँड आहे. आईशी बोलताना इमेजचा विचार करावा लागत नाही. खूप वैयक्तिक गोष्टी शेअर करतानाही मर्यादा येत नाहीत, सेंट कोलंबा स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभदा केदारी सांगत होत्या.
आपल्या आई चंद्रकला ठोंबरेंबद्दल भरभरुन बोलताना त्या पुढे म्हणाल्या, माझी आई हाडाची शिक्षिका... तिचं शिक्षण वाईमध्ये झालं, तर सेंट अँड्र्यूज, पुणे या शाळेत तिने शिकवलं. जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीची ही शाळा आहे. पुढे तिचं लग्न झालं, साहजिकच जबाबदाऱ्या वाढल्या, त्यामुळे तिला जॉब सोडावा लागला. असं असलं तरीही शिक्षणासोबतची तिची नाळ तिने तुटू दिलेली नाही. आजही तिने बायबल स्टडी घेणं, संडे स्कूल घेणं हे उपक्रम सुरुच ठेवलेत. तिने आजच्या काळाच्या तंत्राशीही जुळवून घेतलंय. ती झूम मीटिंग्ज घेऊन शिक्षणाशी नातं जोडून राहिलीय.
माझ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगायचं तर, माझं आज भाषेवर प्रभुत्त्व निर्माण झालंय ते केवळ आईमुळे. मी माझ्या वाक्पटूत्वाने प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकते , ही कला माझ्या आईमुळे मला आत्मसात करता आली.
आम्ही तीन भावंडं. आमच्या संगोपनातही तिने आमची बलस्थानं आणि कच्चे दुवे ओळखून आम्हाला मार्गदर्शन केलं. आपापल्या क्षमतेनुसार क्षेत्र निवडून वाटचाल कऱण्याचं स्वातंत्र्य तिने आम्हा भावंडांना दिलं.
जसं मी पहाटे उठून अभ्यास करायचे. तर भाऊ रात्री अभ्यास करायचा. माझा भाऊ आयआयटी पवईचा मास्टर्स. मी इंग्लिश लिटरेचरमध्ये एमए केलं. शिक्षणाबद्दलचा तिचा ध्यास, तिची ओढ कमाल आहे.
माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग म्हणजे, माझ्या पतीचं लग्नानंतर काहीच वर्षात झालेलं निधन. माझे पती हे जग सोडून गेले तेव्हा मी खूपच तरुण होते आणि माझा मुलगा अवघा तिसरीत होता. दु:खाचा पहाड कोसळल्याने मी निराशेच्या गर्तेत जाण्याआधीच आईने मला सावरलं. आमच्या घराखाली कार उभी असायची. ती एक दिवस तिथे मला घेऊन गेली आणि म्हणाली, तुला ही कार चालवायला शिकायचीय आणि पुढे प्रवास करायचाय. ही शिकवण फक्त कार चालवण्यापुरती मर्यादित नव्हती तर आयुष्याचा प्रवास कितीही अडचणींनी, आव्हानांनी, संकटांनी भरलेला असो. आपण हताश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. संकटांना समोरुन भिडायचं, हा मंत्र माझ्या आईने मला दिला. तेव्हा माझ्या पतीचं निधन होऊन अवघे 10-15 दिवसच झाले होते. माझ्या त्या मनस्थितीतून आईने मला सकारात्मकतेची शिकवण देत बाहेर काढलं. तो माझ्या आयुष्यालाच कलाटणी देणारा क्षण होता.
ती एक गोष्ट लहानपणापासून मला सांगत आलीय. की, कोणतीही परिस्थिती समोर येवो, त्याचा कांगावा न करणं, त्याचं भांडवलं न करणं फार महत्त्वाचं आहे. शांतपणे सर्वसमावेशक विचार करुनच परिस्थितीचा सामना करावा. आपण नक्की वाट काढू शकतो. हे माझ्या आईने कायम माझ्या मनावर बिंबवलंय.
देवावर विश्वास ठेवा, कष्ट करण्याची तयारी ठेवा, हे आई मला कायम सांगत आलीय. तेच मीही माझ्या मुलाच्या मनावर ठसवण्याचा नेहमी प्रयत्न केलाय.
खाण्यापिण्याच्या आवडीनिवडीविषयी सांगायचं तर, आईने केलेली नॉनव्हेज बिर्याणी माझी ऑलटाईम फेव्हरेट आहे. तर आईसाठी मी पिठलं-भाकरी बनवते ती तिला खूप आवडते.
मला टूरिझमची खूप आवड आहे. तसंच माझ्या आईने काश्मीर पाहावं, अशीही माझी इच्छा आहे. तिला मला काश्मीर दाखवायचंय. झाडाला सफरचंद लगडलेली असताना काश्मीरचा नजारा तिने पाहावा असं मला मनापासून वाटतं.
माझ्या आयुष्यात पतीच्या निधनाचा घाव जो मी सोसलाय. ज्याने मला समाजाबद्दल आणखी विचार करायला भाग पाडलंय. माझ्या पतीला कॅन्सरने गाठलं. त्यातून ते बरेही झाले. पण, औषधांची त्यांच्या शरीरामध्ये अचानक रिएक्शन झाली आणि ते आम्हाला सोडून गेले. नवरा गेल्यावर त्या स्त्रीवर कोणतं संकटाचं आभाळ कोसळू शकतं, हे मी समजू शकते. त्यामुळे
कॅन्सर पेशंट्सच्या फॅमिली मेंबर्ससाठी मला काहीतरी करायचंय. कॅन्सरमुळे ज्यांच्या पतींचं निधन झालंय, अशा महिलांसाठी मला काहीतरी भरीव मदत करण्याची इच्छा आहे. असंही शुभदा केदारींनी गप्पांची सांगता करताना अधोरेखित करुन सांगितलं.