महाराष्ट्र भूषण पुरस्कार : शासकीय मदतीच्या घोषणेने आयोजनातील त्रुटी झाकता येतील?
गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक गोष्टीचा जबरदस्त इव्हेंट करण्याचा पायंडाच पडून गेला आहे. अगदी बेरोजगारांना नोकरी देतानाही इव्हेंट केला जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून केलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघात होऊन तब्बल 12 श्री सेवक मृत्यूमुखी पडले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार परंपरा सुरु झाल्यापासून वादाची मालिका राज्यात राहिली आहे, पण त्या कार्यक्रमात किमान जिवितहानी होण्याचा प्रसंग कधीच ओढवला नव्हता. मात्र, रणरणत्या उन्हातील इव्हेंटने 12 जणांच्या मृत्यूने गालबोट लागले आहे. फेब्रुवारी महिन्यामध्येही कणेरी मठावर सुमंगलम महोत्सवात झालेल्या गायींच्या मृत्यूनंतर राज्य सरकारची काहीशी अशीच अवस्था झाली होती. गायींचा मृत्यू असाच वेदनादायी होता.
ज्या वातानुकुलित व्यासपीठावरून महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सुद्धा आपल्या भाषणात तापमानाचा उल्लेख केला. मात्र, समोर असलेला लाखो श्री सेवक मात्र जवळपास पाच तास रणरणत्या उन्हात होते. कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नव्हती. भर दुपारी कार्यक्रम पार पाडल्यानंतर जसजसा एक एक जीव उष्माघाताने कोसळू लागला. त्यावेळी या परस्थितीची जाणीव झाली आणि शासकीय पातळीवरून पळापळ सुरु झाली.
शेकडो जणांना उष्माघाताचा त्रास होऊ लागल्यानंतर नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. हा आकडा आता टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार 600 च्या घरात गेला असून 12 जण मृत्यूमुखी पडले आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या श्री सेवकांची संख्या वाढू लागल्यानंतर अत्यंत तत्परतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एमजीएम रुग्णालयात अत्यवस्थ झालेल्या श्री सेवकांच्या चौकशीसाठी पोहोचले. मात्र, ज्यांच्यासाठी पाच तास उन्हात होते त्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेल्या धर्माधिकारी कुटुंबातील काल (16 एप्रिल) मध्यरात्रीपर्यंत कोणीही पोहोचू नये, किंवा झालेल्या घटनेवरून खेदही व्यक्त करू नये हे विरोधाभास दाखवणारे आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदरणीय अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेल्या वेळेवर कार्यक्रम घेतल्याचे म्हणतात. राज ठाकरे यांनीही वेळेवरून फटकारले आहे. राजकीय स्वार्थाशिवाय एवढी लोक बोलावली जातात का? अशी विचारणा केली आहे.
सामान्य जीवाची किंमत 5 लाख आहे का?
रणरणत्या उन्हात झालेल्या कार्यक्रमानंतर मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत चालल्याने मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना तातडीने पाच लाखांची मदत जाहीर करून टाकली. ही एक आता परंपराच होऊन गेली आहे. असे केल्याने प्रश्न सुटतात असा समज झाला आहे का? अशी शंका यावी या पद्धतीने पाच लाख जाहीर करून टाकले जातात. राज्यकर्त्यांच्या अपयशाने सामान्यांना जीवाला मुकावे लागत असेल आणि त्यांची किंमत 5 लाख करत असू तर हा असंवेदनशीलतेचा कळस आहे. पैसे देऊन तोंड बंद करणे हा प्रघात पडला आहे का? अशी शंका येऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांना अलीकडे वेगाने मदतीची घोषणा करण्याची सवय आहे. शासकीय दिरंगाई पाहता त्याचे एका पातळीवर स्वागत करता येईल, म्हणून व्यवस्थेतील अपयश लपून राहणार आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दुर्दैवी घटना घडल्यानंतर त्याचे उत्तरदायित्व स्वीकारून अशा घटना पुन्हा होणार नाहीत, याकडे लक्ष देण्याची गरज असताना 5 लाखांचे हुकमी अस्त्र नेहमीच बाहेर काढले जाते.
आखाती देशात उन्हात उघड्यावर काम करण्यास बंदी
आखाती देशांमध्ये उन्हाळ्यातील पारा सरासरी 40 आणि कमाल तापमान 48 ते 50 च्या घरात जाते. हवेत आर्द्रताही 90 टक्क्यांवर असते. त्यामुळे अनेक आखाती देशात प्रखर उन्हाळ्यात दुपारी 12 ते 3 या वेळेत ओपन एरियातील कामे सक्तीने बंद ठेवली जातात आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. यासाठी शासकीय नियम आहेत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना जबर दंड ठोठावला जातो. सरकारच्या नियमांची खासगी कंपन्यांना सुद्धा त्याठिकाणी धास्ती आहे.
सौदी अरेबियात प्रत्येकवर्षी 15 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत सरकारकडून दुपारी 12 ते 3 या वेळेत काम करण्यास सरकारकडून बंदी आहे. तसेच बहारीन, कुवेत, ओमान, कतार, युएईमध्ये अशाच पद्धतीने बंदी आहे. तीच परिस्थिती आता आपल्याकडेही येत आहे का? इतकी उष्णता गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. चंद्रपुरावर सूर्य कोपला की काय? अशी परिस्थिती होऊन गुरुवारी (13 एप्रिल) जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करताना या परिस्थितीचा अंदाज का आला नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. राहुल गांधी यांची कर्नाटकातील पहिली सभा काल (16 एप्रिल) दुपारीच झाली, पण व्यासपीठासमोर सभेसाठी आलेल्या लोकांना मंडप उभारण्यात आला होता.
सोहळा आयोजनावर कोट्यवधींचा खर्च
वातावरणातील बदलामुळे देशासह अख्खा महाराष्ट्र होरपळून निघत आहे. हवामान विभागाकडूनही अवकाळी पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात वैशाख वणवा पेटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कार्यक्रमासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आलाच होता तर समोरील निष्पाप जनतेला डोक्यावर छत करण्यासाठी कितीसा खर्च आला असता? पुरस्कार सोहळ्याचा खर्च, पुरस्काराची रक्कम आणि अत्यवस्थ आहेत त्यांच्या उपचारावरील खर्च तसेच मृत्यूमुखी पडलेल्यांना सोयीची 5 लाखांची मदत याचा आकडा एकत्रित केल्यास हा इव्हेंट किती कोटीला पडला याचा अंदाज न केलेला बरा. शासकीय पाच लाख त्या पीडित कुटुंबाला किती दिवस आधार देतील? त्या कुटुंबाचा त्यामध्ये काय दोष होता? मुल बाळ शिकत असतील तर त्या 5 लाखांचे करायचे तरी काय? याचा विचार लोकांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिधींना का पडत नसावा? याची विचार करण्याची वेळ आली आहे.
राज्यावर संकटाची मालिका
राज्यात एका बाजूला सरकार गॅसवर असताना दुसऱ्या बाजूला अवकाळी आणि गारपीटीमुळे शेतकरी पूर्णत: झोपला आहे. अजूनही त्याच्यापर्यंत मदत पोहोचलेली नाही. पुरस्कार सोहळ्याला ज्या पद्धतीने उष्माघाताने गालबोट लावले त्याच पद्धतीने गेल्या दोन महिन्यात तीनदा अवकाळीने बळीराजाला जिवंतपणी मरणयातना दिल्या. त्यावेळी सुद्धा सरकार अयोध्येमधील इव्हेंटमध्ये गुंग असताना शेतकरी बांधावर कोसळला होता. या सर्व परिस्थितीचे भान ठेवून महाराष्ट्र भूषण सोहळ्यावरील खर्च आटोपता घेऊन आणि एका सभागृहात हा कार्यक्रम पार पाडला असता तर राज्यावर आणि सरकारवर कोणते अस्मानी संकट कोसळणार होते? अजूनही राज्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होऊन मदत पोहोचलेली नाही. महाराष्ट्र भूषण सोहळ्यात मृत्यूमुखी पडलेले जीव परत येणार नसले, तरी निर्दयीपणे इव्हेंट करणारे किमान भविष्यात अशा चुका टाळून कार्यक्रम करतील, इतकी माफक आशा ठेवायला हरकत नाही.