एक्स्प्लोर
ब्लॉग : जळगाव जिल्हा परिषदेत 'काँग्रेसयुक्त' भाजप

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष अमित शहा हे प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसमुक्त भारतचा नारा देत असतात. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीनंतर विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवणुकांमध्ये भाजपने विरोधकांच्या कित्त्येक पाऊल पुढे जाऊन यश मिळवले आहे. अपवाद वगळता जवळपास बहुतेक निवडणुकांत काँग्रेसची पिछेहाटच झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात सन 1936 ला अखिल भारतीय काँग्रेसचे ग्रामीण अधिवेशन झाले होते. त्यानंतर सन 2000 पर्यंत जळगाव जिल्ह्यात काँग्रेस अस्तित्वात होती.
मधल्या काळात केंद्रात व राज्यात काँग्रेसची सत्ता असताना जवळपास सर्वच सत्तापदे काँग्रेसकडे होती. महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा काळ सुरु झाला आणि जळगाव जिल्ह्यातून काँग्रेस हळूहळू सत्तेतून हद्दपार झाली. त्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही. जी. पाटील यांच्या खून प्रकरणानंतर काँग्रेस बदनाम होत नामशेष झाली. जळगावात काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाची इमारत आहे म्हणून तेथे नामधारी पदाधिकारी येवून तरी बसतात. अगदीच शेलक्या भाषेत म्हणायचे तर जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष हा पक्षातील नेत्यांनीच संपवला आहे.
एकीकडे भाजप नेत्यांची काँग्रेसमुक्त भारतची घोषणा आणि दुसरीकडे संपलेली काँग्रेस अशा वातावरणात जळगाव जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी भाजप उमेदवारांना काँग्रेसच्या 4 सदस्यांनी सभागृहात बोट वर करून मतदान केले. अशा प्रकारे भाजप नेत्यांच्या घोषणे विरोधात जळगाव जिल्हा परिषदेत काँग्रेसयुक्त भाजपचा अध्याय लिहीला गेला.
जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या सौ. उज्ज्वला पाटील व उपाध्यक्षपदी नंदकिशोर महाजन हे प्रत्येकी 37 मते मिळवून विजयी झाले. यात काँग्रेसचे सदस्य सौ. सुरेखा पाटील, प्रभाकर नारायण सोनवणे, सौ. अरुणा रामदास पाटील आणि दिलीप युवराज पाटील यांनी उघडपणे मतदान केले. शिवाय, भाजप उमेदवारांचा सहज विजय व्हावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 सदस्य पल्लवी पाटील, मीना पाटील व आत्माराम कोळी हे विशेष सभेला अनुपस्थित राहिले. काँग्रेसचा थेट पाठींबा व राष्ट्रवादीच्या तिघांची गैरहजेरी यामुळे भाजप विरोधात एकत्र आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीचे प्रयत्न फसले. अर्थात जि. प. एकूण 67 पैकी 33 सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे त्यांना विजयासाठी साध्या बहुमताकरिता केवळ 1 मत हवे होते. राष्ट्रवादीचे 3 सदस्य आले नाही व काँग्रेसचे 4 मतदान बोनस मिळाले.
भाजप अंतर्गत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे उमेदवार ठरविण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यात रस्सीखेच झाली. पण शेवटच्या टप्प्यात खडसेंनी तडजोडीचे उमेदवार म्हणून दिलेली नावे महाजन यांना स्वीकारावी लागली. असे असले तरी महाजन - खडसे यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्ह्यात भाजपच्या विजयाची घोडदौड सुरुच आहे.
वाईट परिस्थिती आहे ती विरोधकांच्या जिल्हाध्यक्षांची. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतिश पाटील आहेत. त्यांचे निवासाचे शहर व तालुका पारोळा आहे. पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी नव्हती. आता ग्रामीण मधूनही राष्ट्रवादी संपली आहे. पक्ष संघटनेवर डॉ. पाटील यांची पकड नाही. सतत अपयशाचे धनी होवूनही त्यांनी जिल्हाध्यक्षपद अडवून ठेवले आहे. जि. प. त निवडून आलेल्या 16 पैकी तिघांनी पक्षाचा व्हीप भिरकावला. अपयश स्वीकारुन पद सोडण्याची नैतिकता डॉ. पाटील यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील स्वीकारणार नाहीत. ॲड. पाटील यांच्या काळात औषधालाही काँग्रेस शिल्लक असेल की नाही अशी शंका आहे. पालिका निवडणुकीत स्वतःच्या शहरात उमेदवार मिळाले नाही. तालुक्यात काँग्रेस नावाला आहे. जि. प. त जे चार सदस्य निवडून आले त्यांनी परस्पर भाजपला पाठिंबा देवून टाकला. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची ही स्थिती केविलवाणी व दयापात्र आहे.
खान्देशात जळगाव व धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा हंगाम आटोपला आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, तळोदा व नवापूर या 3 पालिकांच्या निवडणुकांचा हंगाम तोंडावर आला आहे. सहा महिन्यांनी या निवडणुका होतील. नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस विरुध्द भाजप असाच सामना रंगेल. डॉ. विजय गावीत यांनी कुटुंबासह राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केल्यापासून नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादीमुक्त झाला आहे. पण डॉ. गावीत भाजपवासी होऊन 3 वर्षे होत आली तरी त्यांना भाजपात उपरेच समजले जाते. शहादा-तळोदा मतदार संघाचे भाजपचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी डॉ. गावीत यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात भाजपला गटबाजीचा त्रास राहणार आहे. दुसरीकडे काँग्रेस अंतर्गत चंद्रकांत रघुवंशी नंदुरबार, सुरुपसिंग नाईक व माणिकराव गावीत नवापूर तसेच माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी तळोदा येथे लक्ष घालतील. नंदुरबार, नवापूर व तळोदा पालिकेत सध्या काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे पालिकांचा सामना काँग्रेस विरोधात गटबाजीयुक्त भाजप असा राहील.
View More


























