एक्स्प्लोर
चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात...
कुत्र्यांसाठीची पाळणाघरं आणि कुत्र्यांसाठीची अद्ययावत ब्युटीपार्लर्स देखील आपल्याकडे आहेत. असं सगळं सकारात्मक असताना एखाद्या व्यक्तीला ‘कुत्रा’ म्हणनं ही शिवी कशी काय बनली?
मराठीत एक शिव्यांचा कोश, त्या त्या शिवीच्या मूळ अर्थासह प्रकाशित झालेला आहे. यात लैंगिक संदर्भ असणाऱ्या शिव्या या सर्वांत जास्त असभ्य मानल्या जातात. जातधर्म वाचक शिव्या कायद्याच्या भयाने आजकाल फक्त लपूनछपून वापरल्या जातात, थेट नाही. दुर्गुण सांगणाऱ्या शिव्या सर्वसामान्य. प्राण्यांच्या नावानं दिल्या जाणाऱ्या शिव्या या बाकी शिव्यांच्या मानानं सौम्य मानल्या जातात. यात शिवीसाठी लोकप्रिय प्राणी तीन. पहिलं गाढव... निर्बुद्ध, मठ्ठ व्यक्तीला गाढव म्हटलं जातं. दुसरं डुक्कर. आपल्या देशात डुक्करपालन हे मोठ्या प्रमाणात होत नसल्यानं डुकरं सहसा रस्त्यांवर, घाणीत, गटारांमध्ये, कचराकुंड्यांवर दिसतात; परदेशातल्या सारखी गोंडस गुलाबी पाळीव डुकरं इथं नाहीत; त्यामुळे घाणेरड्या, गलिच्छ व्यक्तीला डुक्कर म्हटलं जातं. तिसरा कुत्रा. बाकी प्राणी, पक्षी, किडे, मासे वगैरे टोमणे मारण्यापुरते मर्यादित आहेत; त्यांना शिवीचा दर्जा नाही.
कुत्रा हा सर्वात जास्त आणि सर्वत्र पाळला जाणारा प्राणी. इमानी म्हणून प्रसिद्ध. वासावरून माग काढण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे संरक्षक, पहारेकरी इथपासून ते मदतनीसाच्या भूमिकेपर्यंत अनेक भूमिका त्याला सन्मानानं दिल्या जातात. त्यांना अनेक प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता वाढवली जाते. पोलीस खातं असो वा अंध व्यक्तींसाठी मदतनीस म्हणून काम करणं असो... ऐकून चकित व्हावं असे कुत्र्यांचे एकेक किस्से आपल्या कानी पडत असतात. शूरवीर कुत्र्यांचे पुतळेही आपल्याकडे आहेत आणि कुकुरदेव सारखं छत्तीसगढच्या दुर्ग जिल्ह्यातल्या खपरी नावाच्या गावात आहे. कुत्र्यांसाठीची प्रशिक्षण केंद्रं, कुत्र्यांसाठीची खास क्लिनिक्स, कुत्र्यांसाठीची पाळणाघरं आणि कुत्र्यांसाठीची अद्ययावत ब्युटीपार्लर्स देखील आपल्याकडे आहेत. सामान्यांना ‘समर्थाघरचं श्वान’ व्हावं वाटावं इतका कुत्र्यांचा हेवाही वाटतो. असं सगळं सकारात्मक असताना एखाद्या व्यक्तीला ‘कुत्रा’ म्हणनं ही शिवी कशी काय बनली?
गौरी लंकेश यांच्या हत्येची बातमी आल्यानंतर निषेधाच्या शेकडो पोस्ट सोशल मीडियावर उमटू लागल्या; तशीच त्याच तीव्रतेने त्यांच्या विरोधी मतांच्या लोकांनी तारतम्य सोडून, फेक न्यूज व चुकीचा माहितीचा आधार घेत, तर्कहीन टीका सुरू केली. आक्षेपांना, मतभेदांना हरकत काहीच नसते; मात्र त्याआधी निदान आपले संदर्भ अचूक आहेत की नाही हे पाहिलंच पाहिजे. विज्ञाननिष्ठ, सत्यान्वेषक, तर्काधिष्ठित विचार मांडणाऱ्या गौरी लंकेश यांच्याविषयी लिहिताना त्यांच्या या गुणांचा लवलेशही नसणाऱ्या जातीयवादी, सांप्रदायिक विचारांच्या आणि हिंदुत्ववादी (?) म्हणवत धर्माचा गैरवापर करणाऱ्या लोकांच्या तिरस्कृत प्रतिक्रिया पाहून संताप येण्यापेक्षा जास्त खेद वाटू लागला; त्यांची कणव वाटू लागली.
आपण हिंदू आहोत, याचा अर्थच या लोकांना अजून कळलेला नाही आणि कळून घेण्याची इच्छाही नाही, हेच यातून स्पष्ट होत होतं. ‘पत्रिके’ (साप्ताहिक / मासिक) हा शब्द रोमन लिपीत घाईने वाचून तो ‘पॅट्रीक’ असा आहे हे जाहीर करून आपल्या अकलेचं प्रदर्शन अनेकांनी मांडलं. म्हणजे त्या ख्रिश्चन असून ते धर्म लपवून त्या हिंदूंवर टीका करतात असा आचरट आरोप त्यातून आला. त्यांचं शव न जाळता दफन करण्यात आलं, हा त्यांच्या ख्रिश्चन असण्याचा पुरावा मानला गेला. लिंगायत समाजात दहन नव्हे दफन केलं जातं आणि हिंदू धर्मात इतर अजूनही काही समाज आहेत, जे परंपरेने दफन करत आलेत हेही आपल्याला नीटपणे माहीत नाही... असं परंपरावाद्यांनाच परंपरेचं असलेलं अज्ञानही या निमित्ताने उघडं पडलं. गौरी लंकेश नास्तिक होत्या, त्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी कोणतेही धार्मिक विधी करण्यात आले नाहीत; त्यामुळेही ‘त्यांचा धर्म कोणता’ ही उठाठेव करणाऱ्या लोकांच्या हाती कोलीत मिळालं. या सर्व गदारोळात एक स्त्री म्हणून त्यांचा अपमान करण्याची संधी विरोधकांनी सोडली नाही. मुस्लिम धर्मात सत्कार्य करून मृत्यू पावलेल्या पुरुषांना स्वर्गात ७० अप्सरा मिळतात, अशी एक कथा सांगितली जाते; त्यापैकी ही एक बाई असेल असं काहींनी म्हटलं. कम्युनिस्टांना नक्षलवादी, माओवादी ही लेबलं तर चटकन लावता येतात; तीही लावली गेली. याहून अधिक म्हणजे अनेकांनी सातत्याने त्यांना ‘कुत्री’ ही शिवी दिली. या शिवीला एक खास पार्श्वभूमीदेखील आहे. २००२ सालच्या दंगलीबाबत रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीतलं ‘कुत्र्याचं पिल्लू गाडीखाली चिरडलं गेलं तर...’ हे मोदींचं वादग्रस्त वक्तव्य ही पार्श्वभूमी निर्माण करण्यास सहायभूत ठरलेलं दिसतं आहे. नेता अशी विधानं करत असेल, तर अनुयायी अधिक बहकणारच.
तर आता पुन्हा हा प्राणीवाचक शब्द शिवीत का, कसा रुपांतरीत झाला या मुद्द्याकडे वळूया. पाळीव कुत्र्यांचे संदर्भ आपल्याकडे पार वेदापुराणांत, महाभारतात सापडतात. ऋग्वेदात इंद्राच्या सरमा नामक कुत्रीने बृहस्पतींच्या हरवलेल्या गायी शोधून दिल्या अशी कथा आहे. ऋग्वेदातच ‘विनाशा’साठी येणाऱ्या कुत्र्यांच्या विव्हळण्याच्या भयप्रद आवाजाचा उल्लेखही आहे. पुराणांमध्ये कुत्र्याला ‘यमाचा दूत’ मानलं गेलं आहे. महाभारतात पांडव स्वर्गारोहण करू लागले, तेव्हा युधिष्ठिरासोबत चालणारा कुत्रा त्याच्यासोबत स्वर्गात गेला, अशी एक कथा आहे. हा कुत्रा म्हणजे रूप बदलून आलेला यमच होता, असाही उल्लेख आहे. यमनगरीचं वर्णन करताना प्रवेशद्वाराजवळ अक्राळविक्राळ रुपाचे, अवाढव्य आकाराचे आणि प्रत्येकी चार डोळे असलेले श्याम व शबल हे दोन कुत्रे पहारा देत असतात, असा उल्लेख आहे. कुत्रा यमदूतांच्या आगमनाची चाहूल देतो, त्याचं वेळीअवेळी ओरडणं हे मृत्यूचं सूचक आहे; असे समज आपल्याकडे इतके प्राचीन काळापासून चालत आलेले आहेत. थोडक्यात, माणसांनी कुत्र्यांचा तिरस्कार करण्याचं ‘मृत्यूभयाची जाणीव’ हे एकमेव कारण आहे. एरवी कुत्र्यांचे बाकी गुण व उपयुक्तता पाहता, हा शब्द कधी शिवी बनूच शकला नसता.
बसवेश्वरांनी समानतेचा पुरस्कार केला. जातिभेद नाकारले. वर्णाश्रमधर्म नाकारला आणि वेदही नाकारले. कर्नाटकातली ही मोठी वैचारिक परंपरा आहे, जिचा अभ्यास करणाऱ्या कलबुर्गींसारख्या विचारवंताची हत्या झाली आणि समतेच्या चळवळींना आपल्या लेखन-संपादनातून उजागर करणाऱ्या गौरी लंकेश यांचीही हत्या झाली. धर्माच्या नावाखाली विनाशाच्या दारात नेणाऱ्या यमदूतांची चाहूल या ‘कुत्री’ला लागली होती आणि त्या तावडीतून माणसांना वाचवण्यासाठी, माणूसकीला वाचवण्यासाठी लेखन करून तिनं आपल्या आयुष्याची किंमत मोजण्याची निर्भीड तयारी दाखवली होती; त्यामुळे आज मी या शब्दावरचा शिवीचा डाग पुसून त्याकडे अभिमानाने पाहीन. कुत्रा / कुत्री असणं निकृष्ट नाही, असं ठामपणे सांगत, गौरीला आदरांजली वाहून म्हणेन...
अनेक ‘कुत्र्या’ आहेत
या देशात
मीही एक आहे
भुंकतो आम्ही
रात्र रात्र जागून
तेव्हा कुठं निजू शकतात मुलं
अंगाई गाऊन नाहीत निजत
आजकाल!
(लेखात व्यक्त झालेली मतं लेखिकेची वैयक्तिक आहेत.)
‘चालू वर्तमानकाळ’ सदरातील याआधीचे ब्लॉग –
चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…
चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत
चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!
चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement