जय विरुचे पडद्यामागचे शोले! दिवस तिसरा; एपिसोडचं टेन्शन, साक्षात दुर्गामाताच आली मदतीला!
Blog : सध्या निवडणुकांचे निकाल जरी लागले असले.. तरी जय-विरुच्या पडद्यामागच्या गोष्टी निकालापेक्षा गरम आहेत. मागच्या भागात तुम्ही वाचलं असेलच की. धंगेकरांच्या मुलाखतीसाठी आम्ही मागितलेली वेळ आम्हाला काही मिळतच नव्हती. धंगेकरांनी फोन उचलला नसल्यानं आम्ही पुन्हा टेन्शनमध्ये आलो. कुस्तीमध्ये तेल लावलेला पैलवान जसा हातातून निसटतो तसे धंगेकर आमच्या हातून निसटत होते. त्यानंतर वैद्य उपहारगृहावरुन आम्ही हॉटेलवर आलो. पुन्हा धंगेकरांना फोन लावले, पण फोन काही लागलेच नाहीत. आम्ही त्यांना पुन्हा फोन केला आणि आम्हाला समजलं की धंगेकर अचानक मुंबईला गेलेत मग आम्ही पुन्हा आमचा पुणे रिपोर्टर मिकीला फोन केला, त्याला घडलेली सगळी कहाणी सांगितली.. मिकी म्हणाला, थांबा मी बघतो... असं म्हणून आम्हाला त्यानं जरा धीर दिला. थोड्या वेळानं मिकीने आम्हाला सांगितलं की, धंगेकर खरंच मुंबईला गेलेत. आम्ही ठरवलंच की आता पुण्यात थांबून चालणार नाही, आपल्याला पुढं सरकलं पाहिजे...
एपिसोडचं टेन्शन, साक्षात दुर्गामाताच आली मदतीला धावून
पण आजचा एपिसोड काढायचा तरी कसा? असा प्रश्न आम्हाला सतावत होता... तेवढ्यात संकेतला कुठून तरी कळालं की सुषमा अंधारे पुण्यातच आहेत. त्या लाईनअप होतील की नाही ते बघितलं पाहिजे. यासाठी त्यानं असाईनमेंट डेस्कला फोन केला.. त्यानंतर निरोप आला, तुम्ही जा त्यांच्याकडे त्या येतील... आम्ही मोहिमेच्या दिशेनं निघालो. तेवढ्यात समजलं की राष्ट्रवादीच्या फायर ब्रँड नेत्या रुपाली पाटीलही पुण्यातच आहेत आणि त्या सुषमा अंधारेंच्या मैत्रिणही आहेत. या रणरागिनींना बोलावण्याचं आम्ही ठरवलं.. दोघींना फोन केला आणि लगेच दोघी तयारही झाल्या. आम्ही सुषमा अंधारेंच्या खराडी येथील घरी शूट करायचं ठरवलं आणि आम्ही क्षणाचाही विलंब न करता त्या दिशेनं रवाना झालो. आमच्या मागोमाग रुपाली पाटीलही तिथे दाखल झाल्या.. दोघीही तिथे दाखल झाल्या आणि त्यांना कार्यक्रमाची रुपरेषा समजावून सांगितली आणि त्या तयार झाल्या.
दोघीच एकमेकींना भिडल्या
एखाद्या चॅनेलवर जसे डिबेट शोज चालतात, तसा आम्हाला या दोघींशी बोलताना क्षणाक्षणाला भास होत होता... या दोघींनी आम्हाला बोलूच दिलं नाही. एका क्षणाला तर मला रुपाली पाटील यांनी जय तू आमच्या पक्षात ये, तुला तिकीट मिळेल, असं म्हणून त्यांनी चक्क मला ओढलं.. बरं या दोघीही चांगल्या मैत्रिणी, पक्ष जरी वेगळे असले तरी यांनी आपल्या मैत्रीला अजिबात तडा जाऊ दिला नाहीये बरं का... शूट झाल्यानंतर त्यांनी एकदम दिलखुलास गप्पाही मारल्या... रुपाली पाटील या आधी मनसेत होत्या.
पुण्यात मनसेत असताना अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग असायचा. कार्यक्रमाचं शूट झाल्यानंतर त्यांच्याशी आम्ही गप्पाही मारल्या आणि आजचा भाग मुंबईला पाठवला. विनोद सरांचे सारखे फोनवर फोन सुरुच होते. फोनवरच त्यांनी सांगितलं, पोरांनो आजचा एपिसोड जाम चालणार आहे... आजचाही दिवस बाप्पानं तारुन नेला.. पण उद्या काय? असाही प्रश्न आम्हाला पडला होता आणि तो अनुत्तरीतच होता.
कोल्हेंचा नकार, आढळरावांचा होकार
आता आम्ही ठरवलं की, पुण्यात न थांबता आता पुढ निघालं पाहिजे. असं म्हणून आम्ही शिरुर लोकसभेच्या दिशेनं कूच केली.. रात्री आम्ही जवळपास 8 वाजता पुण्यावरुन मंचरच्या दिशेनं निघालो, तिकडे निघताना विद्यमान खासदार अमोल कोल्हेंशी संपर्क साधला. मात्र त्यांना या कर्यक्रमाची कन्सेप्ट काही पटली नाही आणि त्यांनी अम्हाला नकार दिला. पण हार न मानता त्यांचेच प्रतिस्पर्धी असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला त्यांनी एका मिनिटांत त्यांना या कार्यक्रमासाठी तयार केलं आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.
हॉटेल मालकाला आली जय-विरुची दया
मंचरमध्ये रात्री साडे अकरा वाजता आम्ही पोहोचलो. एका हॉटेलवर गाडी थांबवली आणि पोटात कावळे ओरडू लागल्यानं जरा जेवायला पाहिजे, असं आमच्या पोटानं सांगितलं. हॉटेल बंद करण्याची वेळ झालीये, असं आम्हाला त्या हॉटेलवरच्या दोन तरुणांनी सांगितलं. दोघेही मराठीच असल्यानं त्यांनी आमची गाडी बघितली आणि त्यावर एबीपी माझाचं मोठं स्टिकर होतं, ते पाहून त्यांनी सांगितलं- या, पण जेवण रेडी व्हायला जरा वेळ लागेल. ठीक आहे म्हणून आम्ही आत गेलो. आम्ही दाल खिचडी ऑर्डर केली आणि तृप्त ढेकर देऊन हॉटेल गाठलं आणि आराम केला.
'शो'ची कन्सेप्ट आणि आढळरावांच्या अटी
सकाळी साडेदहा वाजता आढळरावांनी आम्हाला त्यांच्या निवासस्थानी भेटण्याची वेळ दिली होती. आढळरावांच्या घराच्या इथे गेल्यावर आम्हाला ते खेडं आहे, असं जाणवलंच नाही... घरात प्रवेश केल्यावर बैलगाडा शर्यतीची मोठी प्रतिकृती होती... कारण शिरुरमध्ये बैलगाडा शर्यतीचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रचंड गाजला होता.. आढळरावांनी आम्हाला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आणि त्यांना शोची कन्सेप्ट समजावली, आणि ते तयार झाले. त्यांनी आम्हाला विचारलं, कुठे शूट करायचंय आणि कसं? म्हटलं आमची जय विरुची बाईक आहे. त्या साईडकारमध्ये तुम्हाला बसवून आपल्याला तुमच्या मतदारसंघातून फेरफटका मारायचाय. त्यावर आढळराव म्हणाले, गाडीवर नको, आपण माझ्या गाडीतून जाऊ.. माझ्या गाडीतून माझा मतदारसंघ तुम्हाला फिरवतो... आता आलं का पुन्हा टेन्शन. आता त्यांना आम्ही खूप समजावलं.. ही गाडीच या शोची हिरोईन आहे... पण आढळरावांनी आमचं एक ऐकलं नाही. शेवटी त्यांच्या फॉर्च्युनरमधून त्यांनी आम्हाला फेरफटका मारायला सुरुवात केली...क्रमश:
हे ही वाचा :
मिळालेली संधी, आव्हानांचा डोंगर अन् पेललेलं शिवधनुष्य, अशी झाली सुरुवात 'जय-वीरु'च्या प्रवासाची
धंगेकरांच्या मुलाखतीसाठी पळापळ अन् मुंबईकरांचा पुणेरी पाहुणचार