BLOG | इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाचा मागोवा

गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाशी निकराचा लढा देतंय. कोरोनामुक्त होणं हे प्रत्येक देशासमोरचं आव्हान आहे आणि लक्ष्य सुद्धा. हे लक्ष्य सगळ्यात पहिले साध्य करण्यात इस्रायल हा देश यशस्वी ठरला. पण हाच इस्रायल एका नव्या संकटामुळे अस्वस्थ झालेला आहे. सध्या गाझा पट्टी, पूर्व जेरुसलेम आणि इस्रायल हा सततच्या होणाऱ्या स्फोटांनी हादरतोय. आणि या मागचं कारण म्हणजे, इस्रायलचं सैन्य आणि गाझा पट्टीवर नियंत्रण असलेला पॅलेस्टिनी कट्टरपंथीय गट हमास पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. पण हा वाद काही आत्ताचा नाहीये. गेल्या कित्येक दशकांपासून वादाची ही जखम चिघळलेली आहे. या वादाच्या केंद्रस्थानी आहे ते जेरुसलेम शहर. गेल्या अनेक वर्षांपासून ख्रिश्चन, मुस्लीम आणि यहुदी ज्याना आपण ज्यू म्हणतो यांच्यात वादाच्या ठिणग्या उडतायत.
सुरुवातीला जेरुसलेम शहर हे इतकं महत्त्वाचं का आहे, ते समजून घेऊया. तर पूर्व जेरुसलेममध्ये ख्रिश्चन, ज्यू, अरब, आणि अर्मेनियम धर्माच्या चार महत्त्वाच्या वास्तू आहेत.
मुस्लिमांचं तिसरं पवित्र स्थळ असलेली अल अक्सा ही मशीद इथे आहे. मुस्लीमांसाठी ही मशीद महत्त्वाची आहे. कारण मुहम्मद पैंगबराने इथेच त्यांची जीवनयात्रा संपवली अशी मुस्लीम धर्मियांची धारणा आहे.
तर येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थान याच्या केंद्रस्थानी असलेलं चर्च ऑफ होली सेल्पकर हे ही पूर्व जेरुसलेममध्ये आहे.
या दोन जागांच्या जवळ आहे, ज्यू धर्मियांचं पवित्र स्थळ ज्याला कोटल किंवा पश्चिमी भिंत असं संबोधतात. या भिंतीच्या पायापासून जगाची निर्मिती झाली अशी ज्यू धर्मियांची धारणा आहे. तर चौथी जागा ही अर्मेनियम वंशाच्या लोकांची आहे.
आणि या चारही जागा जेरुसलेमला धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचं आणि संवेदनशील बनवतात. जेरुसलेम प्रशासनाने या चारही जागा मुख्य शहरापासून तटबंदी घालून वेगळ्या केलेल्या आहेत.
आता आपण सध्या भडकलेल्या वादाचं तात्कालिन कारण समजून घेऊया. तर घडलं असं की 7 मे रोजी, रमजानच्या शेवटच्या शुक्रवारी असंख्य मुस्लीम धर्मीय अल अक्सा मशीदीत नमाज अदा करण्यासाठी आले होते. सध्या हा भाग इस्रायलच्या ताब्यात आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण रहावं यासाठी इस्रायली पोलिसही तिथे होते. कारण या आधी इस्रायलमध्ये बॉनफायरच्या उत्सवात चेंगराचेंगरी होऊन तीस नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती. मात्र, इथेच हिंसाचाराची पहिली ठिणगी पडली. त्यानंतर 11 तारखेला इस्रायलने गाझा पट्टीतली 13 मजली हनाडी टॉवर ही इमारत उध्वस्त केली, ज्यात हमास या दहशतवादी संघटनेचं कार्यालय होतं. आणि त्यानंतर हमासनेही इस्रायलच्या दिशने 130 च्या वर रॉकेट डागली आणि हा वाद आणखी चिघळत गेल्या. या हिंसाचारात आत्तापर्यंत 70 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय.
आता या वादाची आणखी काही तात्कालिक कारणं जाणून घेऊया
पॅलेस्टिनी अरबी लोकांमध्ये सध्या प्रचंड असंतोष आहे, कारण पूर्व जेरुसलेममधल्या घरांवर नेमका मालकीहक्क कोणाचा यावरुन सध्या खटले सुरु आहेत. ज्याचा निकाल 11 मे ला लागणार होता, पण या हिंसाचारामुळे आता तो पुढे ढकलण्यात आला आहे. पूर्व जेरुसलेम हा मुस्लीम बहुल लोकवस्ती असलेला भाग आहे, आणि स्वतंत्र पॅलेस्टाईनची मागणी करणाऱ्यांना ते राजधानीचं शहर करायचं आहे. पण, इस्रायल सरकार कायद्याच्या आडून तिथली घरं ज्यू लोकांना देऊन शेख जर्रा इथून अरबांना हुसकाऊन लावण्याचा प्रयत्न करतंय असा अरबांचा आरोप आहे. गेल्या महिन्याभारपासून याच कारणाने तिथे असंतोष खदखदतोय.
पण सध्या सुरु असलेला वाद हा इस्रायल विरुद्ध हमास असा सुरु आहे. हमास ही दहशतवादी संघटना कट्टरतावादी पॅलेस्टिनी नागरिकांच्या हक्कासाठी संघर्ष करते. पॅलेस्टिनी नागरिकांना स्वतःच्या वास्तव्यासोबतच अस्तित्त्वाची चिंताही भेडसावत आहे. आणि जेव्हा अस्तित्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा संघर्ष अटळ असतो याला इतिहास साक्ष आहे.
आता या वादाची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेऊया
पहिल्या महायुद्धाच्या काळात पॅलेस्टाईनमध्ये ज्यूं ची संख्या ही केवळ 3 टक्के होती, तर 30 वर्षात ही लोकसंख्या पॅलेस्टाईनमध्ये 30 टक्क्यांनी वाढली. स्थानिक अरबी लोकांकडून ज्यू लोकांनी मोठ्या प्रमाणात जमिनींची खरेदी केली. त्यानंतर काही वर्षांनी दुसऱ्या महायुद्धापूर्वी जर्मनीमध्ये ज्यू लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात शीरकाण करण्यात आलं. 42 लाख ज्यू लोकांना हिटलरने गॅस चेंबरमध्ये घालून मारलं. जीवाचा थरकाप उडवणारा हा इतिहास अख्ख्या जगाने ऐकलेला आहे. त्यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी असंख्य ज्यू लोकांनी पश्चिम आशियाच्या या भागाकडे धाव घेतली. आणि त्यानंतर या निर्वासित ज्यू लोकांनी ज्यू बहूल भागावर आपला मालकीहक्क सांगत याच भूमीवर स्वतंत्र इस्रायलची घोषणा केली. 18 मे 1948 या दिवशी तेल अवीव या शहरातून इस्रायलच्या निर्मितीची घोषणा झाली. खरंतर या नव्या राष्ट्र निर्मितीला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रखर विरोध झाला, पण सगळ्यात आधी या नवराष्ट्रनिर्मितीला अमेरिकेने मान्यता दिली, त्यानंतर अमेरिकेने अनेक देशांवर दबाव टाकून संयुक्त राष्ट्र संघामध्ये इस्रायल निर्मितीसाठीचा मार्ग मोकळा करुन घेतला आणि यामुळे ज्यूंच्या झियोनिझमला प्रचंड बळ प्राप्त झालं. यानंतर इस्रायलचा विरोध करण्यासाठी अनेक पॅलेस्टिनी संघटनांचा उदय झाला. त्यात पॅलेस्टिनीयन लिबरेशन ऑर्गनायझेशन ही एक महत्त्वाची संघटना होती. न्याय हक्कांसाठी लढा देणं हा या संघटनेचा मुख्य अजेंडा होता.
सुरुवातीच्या काळात हा संघर्ष केवल इस्रायल पॅलेस्टाईन इतकाच मर्यादीत नव्हता, इस्रायलच्या आजूबाजूला असलेल्या देशांनाही इस्रायलचं हे स्वतंत्र अस्तित्त्व मान्य नव्हतं. इस्रायलची स्थापना होताच इजिप्त, सिरिया, इराक, जॉर्डन या देशांनी इस्रायलवर हल्ला केला. पण नुकत्याच जन्म घेतलेल्या इस्रायलने अतिशय धीराने या युद्धाला तोंड दिलं आणि हे अरबी आक्रमण परतवून लावलं, आणि त्यांच्या जागेवर कब्जा केला. इस्रायलचा हा साम्रज्यवादी दृष्टीकोन इतर देशांच्या असंतोषाचं प्रमुख कारण बनला. आणि त्याची परिणीती इस्रायलवर झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात झाली. हे युद्ध सीरिया, जॉर्डन, इजिप्त विरुद्ध इस्रायल असं झालं. इजिप्तने खूप मोठ्या प्रमाणात आपलं सैन्य इस्रायलच्या सीमेवर तैनात केलं. पण खरं युद्ध सुरु होण्याआधीच इस्रायलने इजिप्शियन सैन्यावर हल्ले सुरु केले आणि इजिप्तला मोठा धक्का देत चारी मुंड्या चीत केलं आणि आपल्या राष्ट्राचं अस्तित्त्व आणखी बळकट केलं. या युद्धात सुद्धा इस्रायलने मोठ्या प्रमाणावर भूभाग काबीज केला. अर्थात यामुळे आजूबाजूच्या देशांचं भौगोलिक अस्तित्त्व आणि राजकीय प्रतिमा या दोन्ही धोक्यात आल्या होत्या. आणि त्याचा परिणाम दिसला 1973 च्या लढाईमध्ये.
1973 मध्ये इस्रायलवर इजिप्त आणि सीरियाने हल्ला केला. यातही इस्रायलने स्वतःचा बचाव केला. पण यात एक सकारात्मक गोष्ट अशी घडली की इजिप्त आणि इस्रायलमध्ये संवाद झाला, आणि इजिप्तने अखेर इस्रायला एक देश म्हणून मान्यता दिली. इस्रायलनेसुद्धा इजिप्तचा काबीज केलेला भाग त्यांना परत केला. त्याचे राजकीय परिणाम असे झाले की इजिप्तच्या तत्कालीन राष्ट्रपतींची हत्या करण्यात आली. पण यानंतर अरब देशांनी आपले बंडाचे निशाण म्यान करत इस्रायलसमोर शांतीचं निशाण हाती धरलं.
इथे एक मोठा संघर्ष संपला खरा, पण भविष्यकालीन एका खूप मोठ्या संघर्षाची बीजं इथे रुजली. आता पॅलेस्टाईन स्वातंत्र्य संघटनेने (पीएलओ) ने स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरु केला. 1987-93 या काळात इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या काळात अनेक हल्ले, प्रतिहल्ले झाले, हिंसाचार झाला. पण या सगळ्या वादात हिंसाचाराचा भेसूर चेहरा समोर आला तो हमास या दहशतवादी संघटनेचा उदय झाल्यानंतर.
हमासचा उदय
सध्या इस्रायलवर हल्ले करणाऱ्या हमासचा उदय हा याच काळात झाला. पॅलेस्टाईन स्वातंत्र संघटनेपेक्षा हमासची विचारधारा वेगळी होती. पीएलओ ही न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना होती. तर हमासचा स्थापनेपासूनचा अजेंडा हा पॅलेस्टाईनची राष्ट्र म्हणून स्थापना आणि इस्रायलचा समूळ नायनाट हीच आहे. इस्रायलच्या राष्ट्र म्हणून असलेल्या अस्तित्त्वाला हमासने सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला होता. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये 1993 साली पहिला शांतता करार झाला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याला ओस्लो करार असं म्हटलं जातं. पण दुर्दैवाने हा करार फार टिकला नाही आणि त्यानंतर सुरु झाला संघर्षाचा दुसरा ट्प्पा
संघर्षाचा दुसरा टप्पा
संघर्षाचा हा दुसरा टप्पा जास्त दाहक आणि हिंसक होता. ज्यात असंख्य ज्यू आणि पॅलेस्टिनी नागरिकांनी जीव गमावला. याच काळात इस्रायलच्या राजकीय धोरणामध्ये अमुलाग्र बदल होऊ लागले होते. आत्तापर्यंत चर्चेने पॅलेस्टिनी वाद सोडवण्याचा विचार करणारे पक्ष जिंकत होते, पण यानंतर मात्र नियोजनबद्ध पद्धतीने पॅलेस्टाईनचा खात्मा करु अशी विचारधारा असलेले पक्ष निवडून येऊ लागले होते. त्यानंतर 2005 साली इस्रायलने गाझा पट्टीतून आपलं सैन्य पूर्ण मागे घेतलं आणि गाझामध्ये हमासने निवडणूक जिंकून पूर्ण ताबा मिळवला. अर्थातच ही गोष्ट इस्रायला डोकेदुखी वाढवणारी ठरली. कारण हमासने ताबडतोब इस्रायलवर हल्ले सुरु केले. परिणामी इस्रायलने गाझापट्टीच्या सीमा बंद केल्या आणि गाझामध्ये जाण्यासाठी इस्रायलची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं.
सध्याच्या वादाच्या केंद्रस्थानी जेरुसलेम हे शहर आहे. इस्रायलला हे शहर आपलं राजधानीचं शहर करायचं आहे. पूर्व जेरुसलेममध्ये वेगवेगळ्या चार धर्मियांची पवित्र स्थळं आहेत आणि या भागावर इस्रायलचं नियंत्रण आहे. दुसरा मोठा मुद्दा आणि प्रश्न हा पॅलेस्टिनी विस्थापितांचा आहे. जवळपास 50 लाख पॅलेस्टिनी विस्थापित हे आजूबाजूच्या देशात रहातात. भविष्यात शांतता करार झाला, या विस्थापितांना इस्रायलमध्ये सामावून घेण्याची पॅलेस्टाईनची मागणी आहे, ज्याला इस्रायलचा स्पष्ट नकार आहे.
अमेरिकेची भूमिका
पूर्व आशियामध्ये उद्भवलेल्या प्रत्येक वादात आत्तापर्यंत अमेरिकेने कायम इस्रायलला पाठिंबा दिलेला आहे. याचं मुख्य कारण असं की अमेरिकेमध्ये एखादा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला अपेक्षित निर्णय घेतला जावा यासाठी काही ओपिनियन लिडर काम करत असतात. जे मतप्रवाह निर्माण करुन राजसत्तेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात ज्याला आपण सोप्या भाषेत लॉबिंग असं म्हणतो. या लॉबिंगच्या गटात ज्यू लोक ही उच्च पदावर आणि मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे आत्ताही हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यापासून स्वतःचं संरक्षण करण्याचा इस्रायलला पूर्ण अधिकार आहे अशी भूमिका अध्यक्ष जो बायडेन यांनी घेतलेली आहे.
भारताची भूमिका
सध्या भारत आणि इस्रायलचे संबध हे मैत्रीपूर्ण आहेत. पण काही दशकांआधी भारत हा पॅलेस्टाईनच्या लढ्याकडे सहानुभूतीने पाहायचा. ज्याप्रमाणे ब्रिटन हे ब्रिटीशांचं आहे, फ्रान्स हे फ्रेंच लोकांचं आहे, त्याप्रमाणे पॅलेस्टाईन हे अरबांचं आहे, ज्यू लोकांना अरबांवर लादणं हे चुकीचं आणि अमानवीय आहे असं महात्मा गांधी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. पंडित नेहरु यांनीही पॅलेस्टाईनला समर्थन देत 1949 साली इस्रायलला संयुक्त राष्ट्र संघात सदस्यत्व देण्याविरोधात मतदान केलं होतं. त्यानंतर मात्र भारताने बदलत्या परिस्थितीनुसार इस्रायलविरोधी उघड भूमिका घेणं टाळलं. 1998 मध्ये जेव्हा भारताने अणू चाचणी केली तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर टीका झाली आणि तेव्हा इस्रायलने मात्र भारताला समर्थन दिलं होतं. त्यानंतर भारत इस्रायलचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होत गेले. भारतामध्ये प्रत्येकाला संविधानाने व्यक्तिस्वातंत्र्याचा आणि मतस्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे सध्या भारतीयांमध्ये आय स्टँड विथ इस्रायल आणि सेव्ह गाझा असे दोन्ही हॅशटॅग आणि मतप्रवाह आपल्याला दिसून येतात.
या वादावर तोडगा काय?
जगभरातील तज्ज्ञांच्या मते इस्रायल आणि पॅलेस्टाईन दुहेरी राज्य सिद्धांत मान्य करावा लागेल. इतिहासाने ज्यू लोकांचं शीरकाण पाहिलं तर वर्तमान पॅलेस्टिनी अरब लोकांचं विस्थापिक जीणं सोसतोय. त्यामुळे दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या भावना समजून घेणं. सौदार्ह्याचं वातावरण निर्माण करणं आणि वैश्विक शांती जपणं हे गरजेचं आहे आणि हाच सुवर्णमध्य आहे.
पण इतिहासातील इस्रायलची आक्रमकता, ज्यू लोकांच्या मनात भिनलेलं झियोनिझमचं वेड पहाता इस्रायल पडती बाजू घेईल असं चित्र दिसत नाही. हमासने दिलेला शांततेचा प्रस्तावही इस्रायलने धुडकाऊन लावला आहे. 2014 नंतर पहिल्यांदाच या दोन देशांमध्ये एवढा मोठा तणाव निर्माण झाला आहे. सध्या तरी या संपूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा इस्रायलचा मानस दिसतोय. बाकी भविष्याच्या गर्भात काय दडलंय याचा अदमास आत्तापर्यंत कोण लावू शकलंय? बाकी मानवजातीच्या कल्याणासाठी ‘भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे’ असं म्हणत विश्वबंधुत्वाची आपण फक्त आशा करु शकतो.
























