'बळीराजानं' दिवाळी साजरी करायची कशी ?
BLOG : राज्यात परतीच्या पावसानं थैमान घातलय. आभाळ फाटल्यागत पाऊस पडतोय आणि पडणाऱ्या पावसात बळीराजा उद्धवस्त होतोय. या पावसानं हातची पिकं वाया गेलीत. सगळीकडं पाणीच पाणी दिसतंय. सगळ्यात जास्त फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसलाय. तसेच अहमदनगर, नाशिक त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातही शेती पिकांचं मोठं नुकसान झालय!
सोयाबीनची माती आणि कापसाच्या वाती झाल्यात, ही परिस्थिती खरी आहे. भाजीपाला, कांदा, द्राक्ष, केळी यांचं देखील मोठं नुकसान झालंय. सुरुवातीला अतिवृष्टी झाली, त्यात काही पिकं वाया गेली, काही ठिकाणची कशी बशी वाचली, पुढं गोगलगायच संकट आलं, या संकटातून शेतकरी सावरत असताना उरलं सुरल सगळं पिकं परतीच्या पावसानं हिरवून घेतलय. हाती काहीच लागणार नसल्यानं दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसोर पडलाय.
असो इतकं सगळं होत असताना राज्यात 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी होतेय. पण माननीय राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणतायेत की ओला दुष्काळ जाहीर करावा अशी स्थिती नाही. आता सत्तारांना एकच प्रश्न आहे की, ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी नेमकं काय होणं अपेक्षित आहे?आणखी किती पावसाची गरज आहे? सद्या #पिकं पाण्यावर तरंगतायेत, आता माणसं पाण्यावर तरंगण तुम्हाला अपेक्षित आहे का? संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करणं तुम्हाला शक्य होत नसेल तर, जिथं अतिवृष्टी झाली तिथं तरी ओला दुष्काळ जाहीर करा.
मागच्या तीन चार दिवसात नुकसानग्रस्त भागातील काही शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललय. विदर्भात 3 दिवसात 3 आत्महत्या झाल्यात. यामध्ये भंडारा, यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्याचा समावेश आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात परभणी 2 नांदेड 1 आणि बीड 1 अशा चार शेतकरी आत्महत्या मराठवाड्यात झाल्या आहेत. हे खूप भयाण आहे. याला जबाबदार कोण. खरंतर आत्महत्या करणं हा पर्याय नाही, पण तरीदेखील शेतकरी आत्महत्या करतायेत. त्यामुळं या काळात त्यांना दिलासा देणं गरजेचं आहे.एक एक जीव जात असताना राजकारणी मात्र फेकाफेकी, फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहेत.
परभणी, लातूर आणि औरंगाबादमधील काही शेतकऱ्यांशी बोललो. खरच परिस्थिती विदारक आहे. हाती काहीच लागण्याची शक्यता नाही. जे काही उरलं सुरल आहे त्यात गुडघाभर पाणी आहे. सद्या पाऊस सुरूच आहे, कधी वापसा होणार आणि कधी पिकं हाती येणार? हे काहीच सांगू शकत नाही. राजकारण्यांचं, स्थानिक लोकप्रतिनिधीच काहीच लक्ष नाही, सगळे दोष मात्र, शेतकऱ्यांना देतायेत. शेतकऱ्यांना पण आय, बहीण, भाऊ, बायको, लेकरं, बाळ आहेत. याची जाणीव सरकारला, राजकारण्यांना असेल तर तत्काळ बळीराजाला दिलासा द्यावा!