एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतीय क्रिकेटचा जेम्स बॉण्ड - धोनी
धोनी – द अनटोल्ड स्टोरी मध्ये मला 3 सीन खूप महत्त्वाचे वाटले. त्यातले दोन सीन मला जास्त आवडले. दोन्ही प्रसंगात एकही डायलॉग नाही. तिसरा प्रसंगही भारी जमलाय त्यात 1 डायलॉग आहे.
पहिला प्रसंग म्हणजे धोनी शाळेत असतानाचा किस्सा आहे. मॉर्निंग शिफ्ट असूनही त्याच्या वडिलांना रात्री अकराला उठावं लागतं, ग्राऊंडवर लॉनला पाणी देण्याची जबाबदारी असते, ते घराबाहेर पडतात. ‘मही’ धोनी जागाच असतो. वडील घराबाहेर पडले की तो हळूच उठतो, गॅलरीत जातो, त्या थंडीत वडील काम करताना/ लॉनला पाणी देताना तो शांतपणे बघत असतो. आपण प्रत्येकाने कधी ना कधी आपल्या वडिलांना असं ‘आपल्यासाठी’ काहीतरी करताना पाहिलंय, त्या सीनसोबत आपण रिलेट करतो, म्हणूनच कदाचित त्या लहानग्या महिच्या मनात काय चाललंय याचा आपण अंदाज लावू शकतो.
दुसरा प्रसंग बहुतेक खरगपूरच्या फलाटावरचा आहे. ‘मही’ आपलं मन मारत 4 वर्ष रेल्वेत काम करतोय, करिअर आणि आयुष्य प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 3 मध्ये चकरा मारतंय, स्वप्न आणि सत्य यातला फरक लक्षात आलाय.. सोबतचे आणि मागून आलेले पुढे गेलेत. गाडी मिस झाल्याची भावना आहे. निराशा, फ्रस्ट्रेशन आहे. पण अजूनही आशा सोडलेली नाहीय, विचारात गुरफटलेल्या महिच्या चेहऱ्याचे वेगवेगळ्या अँगलने फक्त क्लोजप्स दिसतात. आपल्या प्रत्येकाच्या किंवा बहुतांशांच्या आयुष्यात असे प्रसंगही आलेत/येतात, त्यामुळेच कदाचित महीच्या मनात काय चाललंय याचा अंदाज आपण लावू शकतो.
आपण ज्याला माही म्हणतो तो खरं तर ‘मही’ आहे हे मला हा सिनेमा बघताना कळलं, तशाच महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यातल्या आणखी काही गोष्टीही.
लहानपणी धोनीचं पहिलं प्रेम फुटबॉल, गोलकिपींगचा भारी शौक त्यानंतर टेनिस, बॅडमिंटनचा नंबर, क्रिकेट तर दूरवर कुठेच नाही, ‘छोटे बॉलसे कौन खेलेगा’ हे त्यामागचं साधं सोपं कारण. शाळेतल्या शिक्षकांमुळे हातातले गोलकिपरचे ग्लोव्ह्ज कसे जातात आणि विकेटकिपरचे ग्लोव्ह्ज कधी येतात ते त्यालाही कळत नाही.
अंडर-19 कूचबिहार क्रिकेट चषकाची फायनल मॅच अनेक अर्थाने धोनीसाठी महत्वाची. चांगलं खेळून निवड समितीचं लक्ष वेधायची संधी, पुढच्या कारकिर्दीची चावी, नेमक्या याच सामन्यात त्याचा सामना युवराज सिंह सोबत होतो, या सामन्याचा किस्सा खूप मस्त आहे. सिनेमात धोनीच्या तोंडूनच ऐकण्यात मजा आहे. या खेळीमुळे वर्षभरात युवराजला भारतीय संघातही संधी मिळते. धोनी मात्र मागे फेकला जातो, तिथून पुढे यायला त्याला तब्बल 4 वर्ष वाट पाहावी लागते.
याकाळात युवराज, मोहम्मद कैफ, गौतम गंभीर, झहीर खान, दिनेश कार्तिक, संजय बांगर अशा तब्बल 30 खेळाडूंना भारताकडून खेळायची संधी मिळाली होती. धोनी मात्र दूर कुठेतरी विनातिकीट प्रवास करणारे प्रवाशाकडून दंड वसूल करण्याचं काम करत होता.
प्रचंड टॅलेंट असूनही संधी न मिळाल्याने होणारी घुसमट सहन करत होता, खरंतर कुणीही खचून जावं अशी ही परिस्थिती. चार वर्षाचा वनवास खरंतर अज्ञातवासच. पण या 4 वर्षानेच धोनीला अनेक गोष्टी शिकवल्या, त्यातली महत्वाची म्हणजे आता धोनीमुळे प्रसिद्ध झालेला हेलिकॉप्टर शॉट. संतोष हा महिचा मित्र हा शॉट भारी खेळायचा, त्याला थप्पड शॉट म्हणायचा, गल्ली क्रिकेट खेळताना समोस्याच्या बदल्यात त्याने हा शॉट धोनीला शिकवला.
धोनीला वेळोवेळी साथ देणारं कुटुंब, शिक्षक, रेल्वेचे अधिकारी आणि मित्र परिवार मोजक्या सीनमधून आपल्याला बऱ्यापैकी कळतो.
मला आवडलेला तिसरा प्रसंग अर्थात ओपनिंग सीन, सगळ्यांना माहितीय 2011 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धोनी वर खेळायला आला, तोवर बॅटिंगमध्ये तो फार काही करु शकला नव्हता. त्यामुळे 275 चं टार्गेट आणि 114 वर 3 अशी अवस्था असताना, धोनीचं वर येणं थोडं रिस्की होतं. या आधीचे काही क्षण या सीनमध्ये दाखवलेत, हा सीन खास नीरज पांडेच्या स्टाईलनं आल्यामुळे जास्त प्रभावी वाटला, आवडला.
पाकिस्तानच्या दुकानातून धोनी त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडला फोन करतो, बोलणं संपवतो. दुकानाबाहेर आल्यावर काही क्षण घुटमळतो, आत विचार सुरुच असतात. त्या घुटमळण्याच्या गिल्टचा प्रभाव पुढे मैदानावरील आणि वैयक्तिक आयुष्यातील महत्वाच्या प्रसंगात तुम्ही नकळत शोधू लागता..
इंटरवलपर्यंतचा म्हणजे ‘मही’ने गाडी पकडेपर्यंतचा प्रवास जास्त भिडला. यातल्या त्रुटींसहित संपूर्ण 3 तास 5 मिनिटांचा सिनेमा मी एन्जॉय केला.
सुशांतसिंह राजपुतने त्याला दिलेलं काम चोख पार पाडलंय, नीरज पांडे माझ्या आवडत्या दिग्दर्शकांच्या यादीत आहे, तो निराश करत नाही.
जेम्स बॉन्ड जेम्स बॉन्ड का आहे? वरवर शांत, थंड, निर्विकार, तुटक, स्थितप्रज्ञ वागण्याच्या तळाशी काय आहे, हे कसिनो रोयालमधे आपल्याला थोडफार कळतं,
धोनी – द अनटोल्ड स्टोरी क्रिकेटच्या मैदानावरच्या आपल्या या जेम्स बॉन्डबद्दल अगदी पुसटशी कल्पना देऊन जातो, धोनीचा पार्ट टू सुद्धा भारी बनू शकतो.
संंबंधित बातमी
धोनीला हेलिकॉप्टर शॉट शिकवणाऱ्या संतोषच्या मृत्यूची दुर्दैवी कहाणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
करमणूक
Advertisement