एक्स्प्लोर
दिल्लीदूत : गुजरातच्या रणधुमाळीत 'पद्मावती' वेठीस
पद्मिनी हे केवळ साहित्यातलं एक चित्र होतं की इतिहासातलं खरंखुरं पात्र याबद्दल दुमत आहे. राजा रतनसिंहाचा काळ तेराव्या शतकातला आहे. मोहम्मद जायसीच्या ‘पद्मावत’ या काव्यातून पद्मिनीची कहाणी लिहिली गेलीये 15 व्या शतकात. मोहम्मद जायसीनं केवळ राजपूत शौर्याची गाथा सांगण्यासाठीच या कथेचा वापर केला असं अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे. पण तरीही सध्या या कथेवरुन सध्या देशात एकच वादळ उठलंय. ज्या पद्धतीनं यात एकामागोमाग एक भाजपचे मुख्यमंत्री बेभान वक्तव्यं करताहेत ते पाहता हे वादळ चालू ठेवण्यात भाजपला राजकीय फायदा दिसतोय.
यह जौहरवाली धरती है, स्वतंत्रता की दिवानी,
टूट गई पर झुकी नही इसकी चट्टाने तुफानी’
राजपूतांच्या इतिहासात बलिदानाची सर्वोच्च परंपरा ज्या ठिकाणी लिहिली गेली त्या जौहर कुंडवर उभे असताना सोबतचे स्थानिक इतिहासकार राजपूत स्त्रियांच्या त्यागाचं वर्णन करत होते. चित्तोडगढ किल्ल्यावर विजयस्तंभाच्या अगदी शेजारीच ही जागा आहे. सध्या अतिशय भग्नावस्थेत. जौहर कुंड अशी एक पाटी सोडली तर तिथे दुसरं काहीच नाही. पण या जागेशी राजपूतांचं नातं मात्र गहिरं आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 16 हजार क्षत्रिय स्त्रियांनी इथे सामूहिक जौहर स्वीकारल्याची गाथा आहे. राजपूत इतिहासातल्या या पहिल्या जौहरची नायिका होती राणी पद्मिनी. रणभूमीत पतीला वीरमरण आल्यानंतर परकीयांच्या तावडीत सापडून अपमानाचं जीणं जगण्याऐवजी वीरमरण पत्करणाऱ्या पद्मिनीची कहाणी खरंतर इथे संपते. पण इथूनच तिच्या अमरत्वाचीही सुरुवात होते. सत्ता, सौंदर्य, लालसेचे महानाट्याला पुरतील असे सगळे गहिरे रंग पद्मिनीच्या या कहाणीत आहेत. म्हणूनच 700 वर्षानंतरही ही कहाणी पुन्हा पुन्हा सांगितली जाते.
पद्मिनी हे केवळ साहित्यातलं एक चित्र होतं की इतिहासातलं खरंखुरं पात्र याबद्दल दुमत आहे. राजा रतनसिंहाचा काळ तेराव्या शतकातला आहे. मोहम्मद जायसीच्या ‘पद्मावत’ या काव्यातून पद्मिनीची कहाणी लिहिली गेलीये 15 व्या शतकात. मोहम्मद जायसीनं केवळ राजपूत शौर्याची गाथा सांगण्यासाठीच या कथेचा वापर केला असं अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे. पण तरीही सध्या या कथेवरुन सध्या देशात एकच वादळ उठलंय. ज्या पद्धतीनं यात एकामागोमाग एक भाजपचे मुख्यमंत्री बेभान वक्तव्यं करताहेत ते पाहता हे वादळ चालू ठेवण्यात भाजपला राजकीय फायदा दिसतोय.
गुजरातमध्ये ध्रुवीकरणासाठी जी कुठली संधी मिळेल ती बहुधा त्यांना सोडायची नाहीये. एरव्ही अशा फालतू विषयावर आपली अक्कल पाजळायचा मान भाजपमध्ये गिरीराज सिंह, साक्षी महाराज, साध्वी निरंजन ज्योती यासारख्या लोकांकडेच राखीव असतो. यावेळी मात्र चक्क राज्याची धुरा सांभाळणारे दोन मुख्यमंत्रीही उतरलेत. उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांनी हा चित्रपट रिलीज झाला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं म्हणून हात झटकलेत. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह हे दिवसेंदिवस स्वतःच्याच कॉमेडी वक्तव्यांचं रेकॉर्ड ब्रेक करताहेत. नुकतंच त्यांना ‘पद्मावती’ ही राष्ट्रमाता असल्याचा साक्षात्कार झाला.
रोज उठून कुणी दीपिकाचं नाक कापायचं, शिरच्छेद करायची भाषा करतोय तर कुणी संजय लीला भन्साळीला राज्यात पाऊल ठेवू देणार नाही अशी धमकी देतोय. सत्ताधाऱ्यांचं कवच असल्याशिवाय हे लोक इतक्या मोकाटपणे फिरु शकत नाहीत. एरव्ही फेसबुकवरच्या कमेंटमुळे, व्यंगचित्रामुळेही मनं दुखावून अटकेच्या कारवाया झालेल्या आहेत. आता मात्र या बहाद्दरांनी खुलेआम टीव्हीसमोर येऊन अशा धमक्या दिल्या तरी पोलिसांचं लक्ष त्याकडे गेल्याचं दिसत नाहीये. ही व्यक्तिरेखा खरंच अस्तित्वात होती की नाही याबद्दल शंका असताना, आज अचानक अनेकजण त्यात आपल्या अस्मितेचं प्रतिबिंब पाहताहेत हे फारच गंमतीशीर आहे.
पद्मावतीशी जोडलेली प्रत्येक गोष्ट ही राजपूतांसाठी पवित्र आहे. ‘माता पद्मावती’ म्हणूनच तिचा उल्लेख होतो. कधी कधी घडलेल्या इतिहासापेक्षा कल्पनेतलं काव्यही समाजावर ठसा उमटवून जातं. महाभारत, रामायणासारख्या काव्यातली पात्रं आज आपण म्हणूनच देवासमान मानतो. खराखुरा इतिहास की केवळ साहित्यिक कल्पनाविलास या प्रश्नाचं उत्तर कुणाकडंच नाही, पण पद्मिनीच्या या कहाणीनं राजपुतांच्या घराघरात, मनामनांत स्थान निर्माण केलंय हे मात्र खरं आहे.
उदयपूर विमानतळावर उतरल्यावर काही क्षणांतच त्याची प्रचिती आली. ‘सर राजा का नाम नहीं बता पाएंगे यहां के लोग, लेकिन रानी का नाम 700 सालों से कोई भूल नही पाया हैं. अपनी बच्चीयोंका नाम भी लोग पद्मिनी रखते हैं यहां.’ आम्ही पद्मावतीच्या शूटिंगसाठी निघालोय म्हटल्यावर गाडीत ड्रायव्हरनं आमच्या ज्ञानात भर टाकली.
चित्तोडगढ हे उदयपूरपासून 120 किमी अंतरावर वसलेलं आहे. साडेपाच किलोमीटर इतका लांबलचक हा किल्ला आहे. जवळपास 700 एकरावर पसरलेला. भक्ती, शक्ती आणि त्यागाचं अजब मिश्रण इथल्या हवेत आहे. कृष्णविरहानं व्याकूळ मीरेच्या भजनांची तान संध्याकाळच्या वेळेला इथल्या वातावरणात प्रतिध्वनित होते. याच हवेत राजपूत स्त्रियांच्या बलिदानाची गाथा ऐकल्यावर जौहरच्या ज्वालांचा दाह तुम्हाला जाणवतो. तर ज्याला वश करण्यासाठी सम्राट अकबरानं जंग जंग पछाडलं त्या मेवाडच्या महाराणा प्रतापच्या त्यागाची गाथाही याच हवेत तुम्हाला अंगावर काटा आणेल.
‘गडों में गड चित्तोडगड, बाकी सब तो है गढीया’ राजस्थानातलं हे वचन केवळ या गडाच्या भव्यतेमुळे नाहीये. चित्तोडगढ म्हणजे मेवाड हा एकमेव राजपूत प्रांत आहे जो कधीच परकीय आक्रमणासमोर झुकला नाही. प्रसंगी इथल्या राजांनी जंगलात दिवस काढले पण मातीशी बेईमान होऊन परकीयांची चाकरी कधी स्वीकारली नाही. कदाचित त्यामुळेच राजस्थानातले शाही राजवाडे आणि नवाबी थाटाशी स्पर्धा करणाऱ्या किल्ल्यांपेक्षाही मेवाडचा जीर्णावस्थेतला चित्तोडगढही जास्त प्रतिष्ठा बाळगून आहे. स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेल्या या मातीचा सुगंध कदाचित महाराष्ट्रवासियांना आपल्या लाडक्या छत्रपतींची आठवण करुन देत असावा. बहुधा त्यामुळेच चित्तोडगढमध्ये फिरणा-या पर्यटकांमध्ये सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रीयन माणसांचं दिसत होतं. राजा “शिवाजी का और महाराणा प्रताप का भी तो कुछ नाता था सर, इसलिए यहां पर महाराष्ट्र के लोग बहोत आते रहते है,” गाईड आमच्या निरीक्षणाला अनुमोदन देत होता.
पद्मावतीबद्दल आपण जे ऐकतो ते बरचंसं मलिक मुहम्मद जायसी या कवीच्या पद्मावत काव्यातलं वर्णन. ‘भारत एक खोज’ या मालिकेमध्ये पद्मावतीची जी कहाणी दाखवलीये त्यात सुद्धा जायसीच्याच काव्याचा आधार घेतला आहे. पण चित्तोडगढमधल्या स्थानिक इतिहासकारांची, राजपूतांच्या मनातली पद्मिनी ही बिल्कुल विरुद्ध आहे.
देशाच्या पश्चिम टोकाला वसलेल्या या भूमीनं जी अनेक परकीय आक्रमणं सोसली, त्यातलं एक हिंसक आक्रमण होतं अल्लादिन खिलजीचं. खिलजी आपल्या रक्ताच्या नातेवाईकांना संपवून सिंहासनावर बसला होता. 13 व्या शतकातला एक क्रूर शासक म्हणूनच कुप्रसिद्ध होता. सत्ताविस्तारासाठी जमीन आणि उपभोगासाठी स्त्री या दोन्हीच्या भूकेपोटीच त्यानं अनेक आक्रमणं केली. जायसीच्या पद्मावतीच्या कथेनुसार मेवाडच्या त्याच्या आक्रमणाचं कारण होतं राणी पद्मावती. पद्मिनी ही मेवाडचे राजे रतनसिंह याची राणी. रतनसिंह यांनी तिला स्वयंवरात जिंकलेलं. पद्मावतीइतकीच तिच्या स्वयंवराचीही कथा अनोखी आहे. असं म्हणतात की पद्मिनी ही सिंहला देशाची राजकन्या होती. युद्ध आणि राज्यशास्त्राचे धडे शिकतच ती लहानाची मोठी झाली होती. त्यामुळे तिच्या स्वयंवराची अटही तिनंच ठरवलेली. जो राजा बुरखाधारी योद्ध्याशी तलवारबाजीत जिंकेल त्याच्याशी ती विवाह करणार होती. हा बुरखाधारी योद्धा म्हणजे दुसरं तिसरं कुणी नव्हे तर खुद्द पद्मिनीच होती..
एक शूरवीर आणि कलाप्रेमी राजा म्हणून रतनसिंह यांची ख्याती होती. त्यांच्या दरबारात अनेक कलाकारांना राजाश्रय होता. पण याच दरबारातल्या एक व्यक्ती खिलजीला जाऊन मिळाला आणि त्यानं मेवाडवरच्या आक्रमणासाठी चिथावलं. हा व्यक्ती होता राघव चेतन नावाचा ज्योतिषी. या ज्योतिषाचे कपटी धंदे राजाच्या कानावर आल्यानं त्यांनी त्याला दरबारातून हाकलून दिलं होतं. नंतर सूड उगवण्यासाठी तो खिलजीला जाऊन मिळाला.
खिलजीनं मेवाडवर आक्रमण करुन रतनसिंहांना कैद करावं यासाठी राघव चेतननं अनेक क्लुप्त्या वापरुन पाहिल्या. पण खिलजीला मेवाडचं आकर्षण काही वाटेना. तेव्हा त्यानं आपला हुकमाचा पत्ता वापरायचं ठरवलं. मेवाडची राणी पद्मिनी हिच्या अफाट सौंदर्यांचं वर्णन त्यानं खिलजीसमोर केलं.
या कहाणीचे लिखित पुरावे नाहीयेत. राजपूत राजाने अशा पद्धतीनं आपली राणी परपुरुषासमोर आणण्याची अट मान्य करणंच शक्य नाही असा आरोप आहे. शिवाय ज्या शीश महल भेटीचं वर्णन आहे. त्याबद्दलही 700 वर्षापूर्वी काचेचा शोध लागला तरी होता का असे प्रश्न उपस्थित करण्यात येतात. काही जण असंही म्हणतात की कुठल्याच राजपूत राजाने आपल्या पदरी चरित्रकार बाळगले नव्हते. त्यामुळे ही कहाणी लुप्त झाली असावी. 200 वर्षानंतर मुहम्मद जायसी या ‘अवधी’ कवीच्या पद्मावात या काव्यातून ती सगळ्या जगासमोर आली.
पद्मिनीच्या मोहापायी खिलजी चित्तोडगढमध्ये दाखल तर झाला. पण इथे आल्यावर त्याला कळलं की किल्याची सुरक्षाव्यवस्था मजबूत आहे. काही लोक असंही म्हणतात की पद्मिनीला पाहण्याची इच्छा ही खिलजीनं केवळ किल्ल्याची अंतर्गत व्यवस्था हेरण्यासाठीच केलेली होती. कुठलाही राजपूत राजा आपल्या राणीला परक्यासमोर आणण्याची अट मान्य करुच शकत नाही असा राजपूतांचा दावा आहे. पण जायसीच्या ‘पद्मावत’मध्ये म्हटलंय की साध्या सरळ मनाच्या रतनसिंहला खिलजीचा कपटी डाव लक्षात आला नाही. त्यामुळे त्यानं ही अट मान्य केली.
या एका भेटीनं मेवाडचा अख्खा इतिहास बदलला. पद्मिनीचं सौंदर्य पाहिल्यावर खिलजी बिथरला. त्याच्या मनात कपटी डाव आला. किल्ल्याबाहेर उभारलेल्या छावणीत त्यानं राजा रतनसिंहाला भेटायला बोलावलं आणि वेळ साधून तिथंच त्याला कैदही केली. खिलजीच्या फौजा आणि मेवाडचे राजपूत यांच्यात घनघोर युद्ध सुरु झालं..
खिलजीच्या अफाट फौजेपुढे राजपुतांचं संख्याबळ अगदी तोकडं होतं. त्यामुळे युद्धाचा निकाल काय लागणार हे स्पष्ट होतं. पण राजपुत शौर्यानं लढले. राजा रतनसिंह यांना लढता लढताच वीरमरण प्राप्त झालं. पण युद्धात विजयी झालेल्या खिलजीला एका मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागणार होतं. कारण ज्या पद्मावतीला प्राप्त करायची इच्छा होती, तिनं मात्र परकीयाच्या तावडीत सापडण्याऐवजी बलिदानाची, जौहरची तयारी सुरु केली होती.
पिसाटलेल्या खिलजीनं चित्तोडगढावर धडका द्यायला सुरुवात केली. पण त्याची कुणकुण लागताच राणी पद्मावतीसह हजारो स्त्रिया अग्नीकुंडाच्या दिशेनं निघालेल्या होत्या. आपल्या पतीचं नाव अभिमानानं घेत, त्याच्या शौर्याची गाणी गात त्या एका निर्धारानं आत्मबलिदानासाठी सज्ज होत होत्या.
जेत्याच्या थाटात खिलजी चित्तोडगढावर दाखल तर झाला. पण इथे आल्यावर त्याचं स्वागत झालं ते जौहरकुंडातल्या या अग्नीच्या ज्वाळांनी आणि गगनभेदी किंकाळ्यांनी. तलवारीचा खणखणाटही जे करु शकला नाही, ते राजपूत स्त्रीच्या बांगड्यांनी करुन दाखवलं. एका क्षणात त्यांनी खिलजीला लाचार पराभूताची जाणीव करुन दिली..
चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं
जौहर हा राजपूत संस्कृतीचा आज एक अभिमानबिंदू आहे. असा जौहर कितपत योग्य याबद्दल काही लोक प्रश्न उपस्थित करतात. पण तत्कालीन परिस्थिती लक्षात घेतली तर या स्त्रियांसाठी हा बलिदानाचा मार्ग रणांगणातल्या वीरमरणाइतकाच पवित्र होता. पद्मिनीच्या या कहाणीचे इतिहासात कुठेही पुरावे सापडत नाहीत. मुहम्मद जायसीनं ती सिंहली देशाची राजकन्या असल्याचं सांगितलंय. पण श्रीलंकेतल्या कुठल्या राजाचे राजपूतांशी असे संबंध ना बौद्ध इतिहासात, ना राजपूत इतिहासात कुठे दिसतात. राजपूत शौर्याची गाथा सांगण्यासाठीच मुहम्मद जायसीनं हे काव्य लिहिलं असं अनेक इतिहासकारांचं मत आहे. अल्लादिन खिलजीला राणी पद्मावतीनं आपलं सौंदर्य आरशात दाखवलं हा केवळ चुकीचा इतिहास असल्याचा राजपूतांचा दावा आहे. खिलजीनं पद्मिनीच्या सौंदर्याचं वर्णन ऐकून तिला आपली राणी बनवण्यासाठी चित्तोडगढवर आक्रमण केलं असावं. पण पद्मिनी हीच केवळ चित्तोडगढच्या आक्रमणाचं कारण नव्हती. खिलजीला जगज्जेता बनायची महत्वकांक्षा होती. पद्मिनी ही केवळ निमित्तमात्र. पद्मिनीचा चेहरा दाखवला तर युद्ध न करता परत जाईन हा खिलजीचा प्रस्ताव कुटीलतेनं भरलेला होता. तो न समजण्याइतकी पद्मिनी निर्बुद्ध नक्कीच नव्हती. म्हणूनच तिनं त्याच कुटीलतेनं उत्तर द्यायची योजना आखली. आपल्या जागी तिनं एका तरुण दासीला सजवून बसवलं होतं. शिवाय येताना माझ्यासोबत सातशे दासींची पालखी असेल अशीही अट टाकली होती. या पालखीत दासीऐंवजी सशस्त्र सैनिक बसवले गेले आणि अशा पद्धतीनं जेव्हा खिलजीनं दगाबाजी केला तेव्हा हेच सैनिक उतरुन लढाईसाठी सज्ज झाले. बाकी खिलजीनं गडावर आक्रमण केल्यानंतर शत्रुच्या तावडीत सापडण्याऐवजी हजारो क्षत्रिय स्त्रियांसह जौहरचा मार्ग स्वीकारला हा भाग मात्र त्यांना मान्य आहे. या जौहरला राजपूत इतिहासात अतिशय पवित्रही मानलं जातं. जौहर म्हणजे अनिच्छेनं, विवशतेनं पत्करलेला मार्ग नव्हता तर शत्रुच्या तावडीत सापडून अपमानित जीणं जगण्याऐवजी खुशीनं स्वीकारलेला बलिदानाचा हा मार्ग होता असं स्थानिक इतिहासकार सुशीला लढ्ढा सांगत होत्या. आजही चित्तोडगढमध्ये राजपूत स्त्रियांच्या या बलिदानाची आठवण म्हणून जौहर मेला हा सांस्कृतिक उत्सव भरतो. या ‘जौहर मेला’साठी राजस्थानातले सगळे राजपूत राजे एकवटतात. आपल्या भवतालच्या सामाजिक, राजकीय वातावरणात जे घडतंय, त्यावर काय भूमिका घ्यायची याचंही मंथन याच व्यासपीठावर ठरतं. एकूणच आपापल्या इतिहास बाजूनं सांगण्याची स्पर्धा सुरु आहे. भन्साळीनं चित्रपट बनवायला घेण्याआधी राजस्थानच्या बाहेर किती लोकांना पद्ममिनी माहिती होती हा प्रश्नच आहे. आपल्यालाही महाराष्ट्रात चित्तोडगढ म्हटलं की पहिल्यांदा महाराणा प्रतापच आठवायचा. पण आता पद्मावतीचा वाद सोयीस्कररीत्या वाढवला जातोय. गुजरातचं मतदान होईपर्यंत तो पेटवण्यात भाजपला फायदा आहे. कारण काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाची कास धरल्यानंतर भाजपला आपल्याच हिंदुत्वाचा रंग कसा जास्त गडद आहे हे दाखवायची घाई झालीये. त्यामुळेच गुजरातच्या निवडणुकीसाठी पद्मावतीही वेठीस धरली गेलीय. खरंतर चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख 1 डिसेंबर ठरल्यानंतर ती पुढे जायचं काही कारण नव्हतं. सेन्साँर बोर्डानं प्रमाणपत्रात तांत्रिक चुका दाखवून वेळकाढूपणा करणं, निर्मात्यांनीही लगेच प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यास तयार होणं या सगळ्याच बाबी संशयास्पद आहेत. कुणाला तरी हवंय म्हणून हे सगळं चाललंय हे त्यातून स्पष्ट होतंय. त्यामुळेच गुजरातचं वारं शांत झालं की हा बिनकामाचा वादही आपोआप थंडावेल. बाकी पद्मावतीच्या निमित्तानं आपण आपल्या इतिहासात किती गुरफटलोय, अस्मितेचं राजकारण किती निर्बुद्धपणे जनमानसाचा ताबा घेऊ शकतं हे दिसतं आहेच. ‘दिल्लीदूत’ सदरातील याआधीचे ब्लॉग: दिल्लीदूत : राहुल गांधींचा कायापालट : कुमारवर्मा की बाहुबली?दिल्लीदूत : मंत्रिमंडळ विस्तारात या 10 गोष्टींवर सर्वांची नजर असेल
दिल्लीदूत : सेक्युलरवाद्यांचा खांब कोसळला! दिल्लीदूत : काश्मिरीयतचा अनुभव देणारी कारगील मॅरेथॉन दिल्लीदूत : नितीश, मोदींच्या आडोशातलं रोपटं बनणार की विरोधातला वटवृक्ष? दिल्लीदूत : मोदींची कुणाशी स्पर्धा सुरु आहे? दिल्लीदूत: राष्ट्रपती निवडणुकीचा इतिहास काय सांगतो? दिल्लीदूत : राष्ट्रपतीपदासाठी मोदींचं दलित कार्ड BLOG: मनमोकळ्या मूडमधले अमित शहा दिल्लीदूत : कोण असणार मोदींचे कलाम? दिल्लीदूत : भ्रमाचा भोपळा दिल्लीदूत : लोकसभेत ‘सेना स्टाईल’ कामगिरीनं गाजलेला दिवस ! दिल्लीदूत : मराठा तितुका झोडपावा.. इलेक्शन डायरी- मोदी वाराणसीत, तसे राहुल अमेठीत का नाही? इलेक्शन डायरी : गोरखपूरचं समांतर सरकार- योगी आदित्यनाथ इलेक्शन डायरी : वाराणसीत तळ ठोकून का आहेत मोदी? दिल्लीदूत : बीएमसी- दिल्लीकरांनी लादलेलं युद्ध हार्दिक पटेल गुजरातचा बाळासाहेब ठाकरे होऊ शकेल? दिल्लीदूत : सत्तांतराचा लखनवी एपिसोड दिल्लीदूत : एक अनुभव राजधानीतल्या बाबूशाहीचा दिल्लीदूत : गालिब की हवेली दिल्लीदूत : शांतता, गोंधळ चालू आहे! दिल्लीदूत : काही ( खरंच) बोलायाचे आहे… दिल्लीदूत : दीदी बडी ड्रामा क्वीन है.. दिल्लीदूत : जेव्हा मनमोहन सिंह बोलतात…अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement