एक्स्प्लोर
Advertisement
दिल्लीदूत : जेव्हा मनमोहन सिंह बोलतात...
मनमोहन सिंह हे राज्यसभेत काहीतरी जोरदार बोलत आहेत आणि मोदी ते निमूटपणे ऐकत आहेत असलं काही चित्र आपल्याला पाहायला मिळेल असं दिल्लीत येताना अजिबात वाटलं नव्हतं. पण परवा ते प्रत्यक्षात घडलं. 2014 नंतर संसदेत पहिल्यांदाच मनमोहन सिंह बोलले. 10 मिनिटांचंच भाषण होतं ते. पण या भाषणानं सरकारच्या विस्कळीतपणावर अतिशय नेमक्या, तिखट शब्दांत बोट ठेवलं. मनमोहन सिंह इतकं कडक बोलू शकतात हेही त्यानिमित्तानं कळलं. तसंही राज्यसभेत काँग्रेसच्या भात्यात अनेक अस्त्रं आहेत. पण मनमोहन सिंह यांचा वापर अतिशय योग्यवेळी, हवा तितकाच करण्यात आला.
मुळात नोटबंदी झाल्यानंतर देशाचे माजी पंतप्रधान जे अर्थतज्ज्ञही आहेत, ते का बोलत नाहीत असा प्रश्न अनेकांना पडलेला होता. मनमोहन सिंह हे एकमेव असे व्यक्ती आहेत ज्यांनी आरबीआयचे गव्हर्नर, अर्थसचिव, अर्थमंत्री, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आणि पंतप्रधान या सगळ्या पदांवर काम केलेलं आहे. शिवाय नोटबंदी हा त्यांच्याशीच निगडीत विषय, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला वजन असणार हे उघडच होतं. कुठलाही कागद समोर न धरता, अतिशय उत्स्फूर्तपणे त्यांनी भाषण केलं. संपूर्ण सभागृहात त्यावेळी अगदी पिनड्रॉप सायलेन्स होता. नोटबंदी ही long run मध्ये चांगली आहे असा दावा करणाऱ्यांना त्यांनी जॉन केन्सच्या ‘In the long run, we are all dead’ या वाक्याची आठवण करुन देऊन फटकारलं. परिस्थिती नियंत्रणात आहे हे दाखवण्यासाठी सरकार जे रोज नवनवीन निर्णय जाहीर करतंय. त्यामुळे एकूणच आरबीआय आणि बँकिंग सिस्टीमवर जे प्रश्न उपस्थित होत आहेत, त्यानंही आपण व्यथित असल्याचं त्यांनी नमूद केलं. आरबीआयसारख्या संस्थेची प्रतिष्ठा राखली जात नसल्याची व्यथा त्यांच्या मनात होती.
मनमोहन सिंह यांना पंतप्रधान म्हणून एकसुरी भाषण करताना आपण ऐकलेलं आहे. पण विरोधी बाकांवरचे मनमोहन सिंह वेगळे होते. गरिबांना जो त्रास होतोय त्याला torture, शिवाय सरकारच्या या निर्णयाला organized loot हे खास ठेवणीतले तिखट शब्द त्यांनी वापरलेले होते. त्यांच्या प्रत्येक पंचला काँग्रेस खासदार जोरदार बाकं वाजवत होतं. सत्ताधारी बाकांवर स्मशान शांतता होती. प्रेस गॅलरीतही हे मनमोहन सिंहच बोलतायत ना असे आश्चर्याचे भाव होते. 84 वय झालंय त्यांचं. पण याही वयात आपल्या अनुभवाची समृद्धी जाणवून देणारं त्यांचं भाषण होतं.
दहा वर्षात ते खामोश होते. पंतप्रधान असताना ते कधी इतक्या खुलेपणानं, जनतेला हवं तेव्हा बोलले नव्हते. पण त्या एका तासासाठी रोलची जणू अदलाबदल झाल्यासारखं वाटत होतं. मोदी 2014 ला त्यांच्यावर टीका करुनच सत्तेवर आले. त्यांच्या व्यक्तिमत्वापेक्षा आपलं व्यक्तिमत्व अधिक आक्रमक असल्याचं दर्शवत त्यांनी लोकांची मतं जिंकली. पण आक्रमकता ही केवळ आवेशातून, नाटकीय अभिनयातूनच दाखवता येते असं नव्हे. ती किती संयतपणे, स्वत:च्या व्यक्तित्वाचा बाज राखत मांडता येते हे मनमोहन सिंह यांनी दाखवून दिलं.
काँग्रेसकडून नोटबंदीच्या चर्चेत ओपनिंग आनंद शर्मांनी केलं, मधल्या फळीत मनमोहन सिंह यांनी दमदार प्रदर्शन केलंय. आता शेवट चिदंबरम कसा करणार याबद्दलची उत्कंठा वाढली आहे. शिवाय या नोटबंदीच्या चर्चेत विरोधकांच्या मागणीनुसार पंतप्रधान मोदीही सहभागी होतील हे अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे जेटलींच्या आधी मोदी कशा पद्धतीनं सभागृहाला उत्तर देतील हेही पाहायचंय. मनमोहन यांनी पंतप्रधानांना थेट आव्हान दिलं, एका देशाचं नाव सांगा जिथे स्वतःच्या कमाईचे पैसे बँकेतून काढता येत नाहीत. राज्यसभा लंचब्रेकसाठी तहकूब झाल्यानंतर पंतप्रधान मोदी स्वतः विरोधी बाकांकडे गेले. त्यांनी मनमोहन सिंह यांच्याशी हस्तांदोलन करुन त्यांचं अभिनंदन केलं. पण आपल्या भाषणात ते या प्रश्नांची काय उत्तरं देतायत याकडे सगळ्याचं लक्ष असेल.
दुसरीकडे अजून एक महत्वाची गोष्ट. मनमोहन सिंह यांनी आपल्या भाषणात जीडीपी 2 टक्क्यांनी कमी होईल हा गंभीर इशारा दिला. पण मुळात नोटबंदीचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होणार आहे हे विस्तृतपणे स्पष्ट केलेलं नाहीय. एक अर्थतज्ज्ञ, आरबीआयचे माजी गव्हर्नर या नात्यानं ते आणखी खोलवर नक्कीच शिरु शकले असते. शिवाय आपण नोटबंदीचा पूर्णपणे विरोध करुन काळ्या पैसेवाल्यांची वकिली करतोय असं भासू नये याचीही त्यांनी खबरदारी घेतली. कारण या निर्णयाचं अंतिम फलित काय असणार हे आपण कुणीच सांगू शकत नाही, हे त्यांनी अत्यंत जबाबदारीनं सांगितलं.
नोटबंदीनंतर काँग्रेसकडून मनमोहन सिंह यांना मैदानात उतरवण्याची तयारी एक आठवडयापासून सुरु होती. पहिल्यांदा त्यांनी टीव्हीला एखादी मुलाखत द्यावी या विषयावर अशी रणनीती ठरत होती. पण त्यांच्या प्रकृतीमुळे अशी दीर्घ मुलाखत शक्य नसल्यानं दुस-या शक्यतांवर विचार करण्यात आला. शेवटी संसदेच्या सर्वोच्च व्यासपीठाचाच वापर करण्याचा मार्ग काँग्रेसच्या थिंक टँकनं निवडला. शिवाय मनमोहन सिंह बोलणार आहेत हे सगळ्यांसाठी एक सरप्राईज होतं. अगदी विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही त्या दिवशी सकाळी झालेल्या मीटिंगमध्येच याची कल्पना देण्यात आली. गुरुवारी क्वेशन अवरला मोदी येणार हे गृहित धरुनच हा दिवस निवडण्यात आला. या भाषणानंतर गेली तीन दिवस त्यांच्याच भाषणाची चर्चा सगळीकडे सुरु आहे.
मनमोहन सिंह यांचं भाषण ऐकायला पंतप्रधान नरेंद्र मोदीही सदनात उपस्थित होते हे एक बरं झालं. कारण एका माजी पंतप्रधानाला बोलताना सभागृहानं तेवढा आदर ठेवायला हवा. नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच राज्यसभेत येत होते. ते आल्यानंतर सभागृहात विरोधी बाकांवरुन ‘ओ ओह’ अशा आरोळ्या सुरु झाल्या होत्या. टवाळ मुलं वर्गात ज्या टोनमध्ये एखाद्याची खिल्ली उडवतात, त्या टोनमध्ये.
अधिवेशनाच्या काळात पंतप्रधान रोजच संसदेतल्या त्यांच्या कार्यालयात असतात. पण त्यांनी सदनात कधी हजेरी लावायची हे अनेक राजकीय गणितांवर अवलंबून असतं. बुधवार हा पंतप्रधानांचा लोकसभेतल्या प्रश्नकाळाला हजेरी लावायचा दिवस असतो, तर गुरुवार हा राज्यसभेसाठी राखीव. त्यामुळे ज्या पंतप्रधानांच्या उपस्थितीची विरोधक गेले आठवडाभर मागणी करत होते. ती गुरुवारी पूर्ण झाली. अर्थात ते फक्त प्रश्नकाळासाठीच आले असतील तर चालणार नाही, त्यांनी नोटबंदीवरची सगळी चर्चा ऐकायला हवी. निर्णय त्यांनी घेतलाय, तर सगळ्या सदस्यांचं म्हणणं त्यांच्यापर्यंच थेट पोहचायला हवं या अटीवर प्रश्नकाळ बाजूला ठेऊन चर्चा सुरु झाली. पण पंतप्रधान केवळ प्रश्नकाळाच्या एका तासापुरतेच हजर राहिले. लंचब्रेकनंतर चर्चा पुन्हा सुरु झाली तेव्हा राज्यसभेत ते आलेच नाहीत, त्यामुळे पुन्हा गोंधळ होऊन कामकाज बंद पडलेलं आहे.
या एक तासात मनमोहन सिंह, सपाचे नरेश अग्रवाल, तृणमूलचे डेरेक ओ ब्रायन या तिघांचीच भाषणं झाली. मनमोहन सिंह यांच्या भाषणानं चर्चेची उंची एका पातळीवर नेऊन ठेवली होती. वातावरण काहीसं धीरगंभीर झालं होतं. पण त्यानंतर नरेश अग्रवाल यांचंही भाषण एकदम हलकंफुलकं आणि कोपरखळ्या मारणारं होतं. प्रशंसा प्रत्येक सत्ताधीशाला आवडते. आणीबाणीतही अनेकांनी इंदिराजींना सल्ला दिला होता की जनता आपल्या बाजूनं आहे, निवडणुका करुन टाका. पण काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे. अशा टोल्यानं त्यांनी भाषणाची सुरुवात केली. पण त्यांच्या भाषणात दोनवेळा पंतप्रधान मोदी अगदी खळखळून हसले. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी जेटलींनाही माहिती होतं की नाही याबद्दल शंका उपस्थित केली. त्यांना माहिती असतं तर त्यांनी आमच्या कानात जरूर सांगितलं असतं. या वाक्यावर अगदी शेजारी शेजारी बसलेले मोदी-जेटली खळखळून हसले. जेटलींनी तर मध्येच उभं राहून त्यांना म्हटलं. अभी मुझे मालूम हुआ की आपकी असली तकलीफ क्या है. पंतप्रधान सारखं भावुक होऊन जीवाला धोका असल्याचं म्हणतायत. त्यावर तुम्हीच जर असं म्हणत असाल तर मग देशातल्या जनतेचं काय, आमची सुरक्षा कोण करणार, पाकिस्तानपासून आम्हाला कोण वाचवणार असा सवाल त्यांनी केला. त्यावेळी मोदींच्याच मागे बसलेल्या पर्रीकरांनी हात वर केला. पण यूपीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच हा निर्णय घेतल्याचा आरोप करणा-या अग्रवाल यांनी अतिशय विनोदी शैलीत मोदींना आवाहन केलं. अगर आपकी जान को इतना खतरा हैं, तो मैं तो कहता हूं की आप हमारे यूपी में आ जाईए. खुलेआम घूमिए कहीं भीं. इतनी अच्छी हैं हमारी कानून व्यवस्था...या वाक्यावर पुन्हा मोदींसह सगळं सभागृह खळखळून हसलं.
डेरेक ओ ब्रायन यांचं भाषण तसं नेहमी चांगल्या चांगल्या quotes नी भरलेलं असतं. पण या चर्चेत ममतांचं अधिक गुणगान करण्याच्या नादात त्यांचं भाषण उठावशीर होऊ शकलं नाही. कारण प्रत्येक वाक्यानंतर पुन्हा पुन्हा ते ममतांच्या योगदानाकडे वळत होते. पण या एक तासाच्या चर्चेत मोदींनी फक्त एकदाच बाक वाजवून स्वागत केलं, जेव्हा डेरेक ओ ब्रायन "काळा पैसा संपवायचा असेल तर मग निवडणूक सुधारणांचाही विचार करा." असं म्हणाले. नोटबंदीच्या या चर्चेत अजून जवळपास 20 सदस्य बोलणार आहेत. शिवाय हा ऐतिहासिक विषय असल्यानं वेळेची मर्यादाही ठेवण्यात आली आहे. 28 तारखेला विरोधकांनी देशभरात आक्रोश रॅली आयोजित केलीय. तोपर्यंत तरी सभागृहाचं कामकाज चालणार नाही हे जवळपास निश्चित आहे. त्यानंतर ही चर्चा पुन्हा कधी सुरळीत होते हे पाहावं लागेल.
पण एकूणच या आठवड्याचे मॅन ऑफ दि मॅच हे निर्विवादपणे मनमोहन सिंह हेच होते. ज्यांना दुबळे पंतप्रधान, मौनीबाबा म्हणून विरोधकांनी हिणवलं, त्यांनी सगळ्यांना अगदी योग्य भाषेत, योग्य व्यासपीठावर चोख उत्तर दिलं. मनमोहन सिंह यांना केवळ आवाजच सापडला नाही, तर त्यांना आजच्या राजकारणातलं त्यांचं स्थानही सापडलंय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement