एक्स्प्लोर
चालू वर्तमानकाळ : 25 : कौमार्य चाचणीचा खेळ व पुरुषार्थ चाचणीचं दिव्य
एकीकडे स्त्रीचं पावित्र्य, अब्रू, घराण्याची इज्जत, कुटुंबाची प्रतिष्ठा हे सगळं अत्यंतिक महत्त्वाचं मानून त्यावरून वातावरण दंगेधोपे व्हावेत इतकं तापवलं जात असलं तरीही दुसरीकडे बलात्कार, अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, मानवी वाहतुकीत अडकलेल्या मुली, बालविवाहितांची आणि बालवेश्यांची संख्या वगैरे सगळे आकडेही वाढतेच आहेत.
मासिक पाळी, कौमार्य चाचणी, व्यभिचाराविषयी कायदे आणि आपलं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी स्त्रियांना करावी लागणारी लहानमोठी दिव्यं... यात सती जाणं वा जोहार सारख्या प्रथाही आल्या... हे चार मुद्दे या महिन्यात ‘हॉट’ आहेत. अर्थात एकीकडे स्त्रीचं पावित्र्य, अब्रू, घराण्याची इज्जत, कुटुंबाची प्रतिष्ठा हे सगळं अत्यंतिक महत्त्वाचं मानून त्यावरून वातावरण दंगेधोपे व्हावेत इतकं तापवलं जात असलं तरीही दुसरीकडे बलात्कार, अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, मानवी वाहतुकीत अडकलेल्या मुली, बालविवाहितांची आणि बालवेश्यांची संख्या वगैरे सगळे आकडेही वाढतेच आहेत.
परवाच ओडीसामधील एका अल्पवयीन बलात्कारित मुलीने आत्महत्या केल्याची बातमी आहे. तिथे आधी, नुकतीच अशी एक घटना घडली होती; ही दुसरी घटना. पोलिसांची निष्क्रियता आणि न्याय मिळणारच नाही याची खात्री यातून ही आत्महत्या झाल्याचं सांगितलं जातंय. त्या आधीचा बलात्कार तर ‘कथित’ मानला जातोय, कारण आत्महत्या करणाऱ्या पीडित मुलीने चार वर्दीवाल्यांनीच आपल्यावर बलात्कार केल्याचं सांगितलं होतं आणि अखेर गळफास लावून जीव दिला होता.
पावित्र्याचा घोष आणि अत्याचारांचं प्रमाण याची संगती लावून पाहण्याची गरज कुणाला वाटत नाही. आजकाल अनेक सामाजिक प्रश्नांबाबत सोशल मीडियावर आधी चर्चा सुरू होतात, ट्रेन्डींग कसं-किती हे पाहून वृत्तपत्रं त्यातले विषय अग्रलेखांसाठी, पुरवण्यांमधील लेखांसाठी उचलतात. कौमार्यचाचणी या विषयाबाबत हेच झालं. मासिकपाळीचा विषय अक्षयकुमारच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आला आणि ‘पद्मावत’ या चित्रपटाचा बाकीचा गलका जरा विरल्यावर जोहारचा विषय चर्चेत आला. व्यभिचाराच्या गुन्ह्यात फक्त पुरुषांना दोषी न ठरवता स्त्रियांनाही दोषी ठरवावं, याचीही चर्चा सुरू आहे. बहुतेक वृत्तपत्रांच्या स्त्रियांसाठीच्या खास पुरवण्या असतात, त्या पुरवण्यांमध्ये या विषयांवर लेख लिहिले जाणं / लिहून घेतले जाणं सुरू झालं. पैकी कौमार्य चाचण्यांवरील लेख वाचताना मनात काही प्रश्न निर्माण झाले.
कंजारभाट समाजातील काही तरुणांनी 'Stop The V Ritual' म्हणत प्रथम सोशल मीडियावरून आपल्याही जातीत कौमार्य चाचणी करण्याची प्रथा असून ती निषेधार्ह असल्याचं लिहिलं. आपल्या विवाहानंतर आपल्या पत्नीची ही चाचणी आपण करू देणार नाही, असंही जाहीर केलं. जातपंचायती या विविध बहाणे सांगत लोकांना आर्थिकदृष्ट्या कशा लुबाडत असतात याचे तपशील दिले.
विवेक तमाईचेकर यांनी लिहिलं होतं की, “कंजारभाट समाजाताली स्त्री 'व्यभिचारी' आहे की नाही, हे ठरवणारी कौमार्य चाचणी लग्नानंतर घेतली जाते. अरेंज मॅरेज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही कौमार्य चाचणी द्यावी लागते. कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. हिंदू वैदिक पद्धतीने लग्न झाल्यानंतर त्याच लग्नमंडपात लगेचच पंचायत भरवली जाते. तिथे नवविवाहित जोडप्याला कौमार्य चाचणीसाठी मानसिकदृष्ट्या तयार केलं जातं. त्यानंतर कंजारभाट समाजाच्या 'प्रतिसंविधानातील' कलम 38 (1,2,3,4) चा आधार घेत जातपंचायतीतले पंच त्या दोघांना लॉजवर घेऊन जातात. त्यांच्यासोबत दोन्हीकडचे नातेवाईक उपस्थित असतात. इजा करणारी कोणतीही टोकदार वस्तू नाही याची शहानिशा करण्यासाठी त्या रूमची अतिशय बारकाईने तपासणी केली जाते. मग पंचांचा खरा खेळ सुरू होतो, पांढऱ्या चादरीवर रक्ताच्या डागाचा तमाशा पाहणारा खेळ. खासगीपणा अधिकाराला पायदळी तुडवत, वधू आणि वराला अर्ध्या तासाचा वेळ देत, पंच आणि नातेवाईक मंडळी बाहेर बसलेली असतात. सर्व नीट सुरू आहे ना, अशी कधी-कधी बाहेरून विचारणाही केली जाते. काही वेळेस मुलगा दारू पिणारा असेल तर त्याला दारू पाजली जाते, कधी औषधांचा तर कधी ब्लू फिल्मचाही वापर केला जातो. हे सर्व त्या मुलीला निमूटपणे सहन करावं लागतं. याविरोधात कोणी सहसा जात नाही, कारण जातपंचायतीचा कंजारभाट समाजात धाक आहे. कौमार्य चाचणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नवऱ्यामुलीच्या दारात पंचायत भरते. तिथे सगळ्या समाजासमोर पंचमंडळी नवऱ्यामुलाला प्रश्न विचारतात, ‘तुझा माल कसा होता? खरा की खोटा?’ त्याहूनही अतिशय घृणास्पद भाषेत विचारलं जातं. ‘तुला जी गोण दिली होती ती फाडलीस की आधीच फाडली होती?’ त्यानंतर नवऱ्यामुलाने उत्तर देताना त्याचा तीनवेळा पुनरुच्चार करावा लागतो.”
हे विस्ताराने वाचल्यावर मनात पहिला प्रश्न उद्भवतो तो असा की, ही फक्त स्त्रीची समस्या आहे का? ही फक्त तिचीच परीक्षा आहे का? एखाद्या मुलीने अशा प्रसंगी तिच्यावर कुमारिका नसल्याचे / व्यभिचारी असल्याचे आरोप धुडकावून लावत नवऱ्यावरच, पहिल्याच खेपेत त्याला संभोग जमला नाही म्हणून तो पुरुष नसल्याचे आरोप केले तर? ज्या अर्थी नवऱ्यामुलाला दारू पाजणे, ब्लू फिल्म दाखवणे असे उद्योग केले जातात, ते त्याच्या मनावर आलेलं दडपण दूर करण्याचीच ती एक धडपड आहे, हे स्पष्ट कळतं. सेक्सॉलॉजिस्टचे मुद्दे साधे आहेत... नव्या जोडप्याला एकांत हवा, मनावर कुठलं दडपण नको, पोर्न पाहून केलेल्या विकृत कल्पनांचा मागमूसही त्यांच्यात नसावा, पुरुषाला पहिल्याच रात्री पहिल्याच खेपेला संभोग जमलाच पाहिजे अशी मर्दानगीची चुकीची कल्पना नसावी वगैरे. कौमार्यचाचणीच्या कर्मकांडात हे जे नको ते ते सर्व हटकून आहे. लैंगिक नात्याची सुरुवात इतकी बटबटीत पद्धतीने होणार असेल, तर जोडप्याच्या पुढच्या आयुष्यात शृंगाराच्या स्वप्नांना थारा असणार नाही हेही स्पष्टच. लग्न, पर्यायाने संभोग केवळ वंशवृद्धीसाठी करायचा; एरवी नाही, असं म्हणणं हेच मुळात अज्ञानाचं द्योतक. माणसाचं लैंगिक जीवन इतर पशुपक्ष्यांहून निराळं असतं हे माहीत नसण्याचा हा अडाणीपणा.
यात परीक्षा केवळ स्त्रीत्वाची नसून पुरुषत्वाची देखील आहे हे मुळात ध्यानात घेतलं, तर त्याकडे केवळ एक ‘स्त्री प्रश्न’ म्हणून बघणं टळेल. त्यात फक्त स्त्रीला टारगेट बनवणं, दिव्यं करायला लावणं, आरोप सिद्ध झाले तर शिक्षा – दंड करणं, तिच्यासह तिच्या कुटुंबाची मानहानी करणं इत्यादी प्रकारही आटोक्यात येतील. कुठलाही स्त्री प्रश्न हा सामाजिक प्रश्न असतो आणि कुठलाही सामाजिक प्रश्न हाही स्त्रीप्रश्न असतोच. निव्वळ ‘स्त्रिया आणि मुलं’ असा वेगळा विभाग करून ते कधीच सोडवता येत नाहीत. प्रश्न याखेरीजही अनेक आहेत. विवेकने दिलेल्या माहितीनुसार... ‘विवाहबाह्य संबंध असलेल्या स्त्री-पुरुषांचं 'शुद्धीकरण' केलं जातं. भर पंचायतीत लग्न लावून अर्धनग्न करून 150 पावलं चालवलं जातं. त्यांच्यावर गरम पिठाचे गोळे फेकले जातात आणि दुधाने आंघोळ घालत 'शुद्धीकरण' केलं जातं.’ अशी अनेक दिव्यं कंजारभाट समाजातच नव्हे, तर अजूनही अनेक जातींमध्ये आहेत. जातपंचायत नको, जातीचे कायदे नकोत; भारतीय संविधान आणि न्यायालय हवं... हे या तरुणाईचं म्हणणं रास्त आहे आणि त्यांना सर्वांनीच पाठिंबा देणं गरजेचं आहे. जे तरुण या प्रश्नाला ऐरणीवर आणून ठेवून झगडताहेत, त्यांना सर्वांनीच सोबतीची खात्री द्यायला हवी. ‘त्यांच्या जातीतला प्रश्न’ म्हणून बाजूला सारता कामा नये. जात पंचायतीने त्यांना ५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. सामाजिक बहिष्कार घातला जाण्याची शक्यता त्यांच्या कुटुंबियांना भेडसावते आहे. तथापि, आपल्या बाजूने राज्य सरकारचा सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा उभा राहील, अशी आशा त्यांच्या मनात आहे.
प्रसारमाध्यमांनी हे प्रश्न केवळ स्त्रियांचे म्हणून नव्हे, तर संपूर्ण समाजाचे म्हणून अधोरेखित केले पाहिजेत आणि स्त्रियांच्या पुरवण्यांमधून त्यांना बाहेर काढून मुख्य अंकात, मुख्य पुरवणीत स्थान दिलं पाहिजे. मानसिकता सगळ्यांच्याच बदलण्याची गरज आहे.
संबंधित बातम्या :
चालू वर्तमानकाळ (24) : पॅनिक बटण आणि इ–संवाद वगैरे
चालू वर्तमानकाळ (23) : पितात सारे गोड हिवाळा?
चालू वर्तमानकाळ २२. लहानग्या सेक्स डॉल हव्यात की नकोत?
चालू वर्तमानकाळ (21) : आनंदाची गोष्ट
चालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षं
चालू वर्तमानकाळ (19) : रोशनी रोशनाई में डूबी न हो... चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्या चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही... चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये! चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’ चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात… चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील… चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची! चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
शेत-शिवार
क्राईम
Advertisement