एक्स्प्लोर
चालू वर्तमानकाळ (४३). रताळे, केळे, आंबा, खीर वगैरे
आपल्याकडे पूर्वी सगळं होतं, म्हणणारे लोक तर अगणित आहेत. विमानं होती, संगणक होते, वायरलेस यंत्रं होती, टीव्ही होता, प्लास्टिक सर्जरी होती, अशा शेकडो थापा लोक छातीठोकपणे मारत असतात आणि त्या थापांना वास्तव समजणाऱ्या मुर्खांची तर कमतरता नाहीच.
‘माझ्या शेतातले आंबे खाऊन पुत्रप्राप्ती होते’ या भिडेगुरुजींच्या विधानावर भीडभाड सोडून सोशल मीडियावर धुमाकूळ माजलेला आहे. या आधी अगदी असाच गलका ‘मोराचे अश्रू पिऊन लांडोर गरोदर राहते’ असं विधान राजस्थानमधल्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेशचंद्र शर्मा यांनी केलं होतं, त्यावर झाला होता. मिथककथा, पुराणकथा, लोककथा, रामायण-महाभारतादी महाकाव्ये, प्राचीन काव्यातील प्रतिमा इत्यादी गोष्टींना ‘वास्तव / इतिहास’ मानण्याचा खुळेपणा करणाऱ्या लोकांची आपल्याकडे वानवा नाही. ‘आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला’ म्हणतात, त्याच चालीवर ‘आधीच अंधश्रध्द, त्यात कहाण्या ऐकल्या’ म्हणावं लागेल.
राजहंस दूध आणि पाणी वेगळं करतो, चकोर फक्त चांदणं पिऊन जगतो, चातक फक्त पावसाचं पाणी पितो... अशा कैक कविकल्पना लोकांच्या मनात इतक्या रुजल्या आहेत की, त्या अनेक पिढ्या ऐकून खऱ्या वाटू लागल्या आहेत. या तरी परिचित आहेत, मात्र ‘ऐकीव’ गोष्टी लिहून काढून त्यांना ‘वास्तव’ ठरवणारे मान्यवर अभ्यासकही असे अनेक घोळ घालून ठेवतात.
पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या लेखनात असे दोष काहीवेळा दिसतात. उदा. माकडं नजरेने चेंडू खेळतात, कावळ्यांना पुढचे जन्म दिसतात... अशी विचित्र विधानं त्यांनीही केलेली आहेत. संगणकतज्ञ माधव शिरवळकर यांनी नोटबंदीनंतर Whatsapp वरच्या अफवेवर विसंबून दोन हजारच्या नोटेमध्ये असलेल्या नॅनोचिपवर वृत्तपत्रातून एक मोठा लेखलिहिला होता.
गेल्या आठवड्यात आनंदकुमार भाटेंनी लिहिलेल्या आयुर्वेदाबाबत अनेक आक्षेपार्ह विधानं करणाऱ्या लेखालाही अनेक अभ्यासकांनी सडेतोड उत्तरं दिली.एका व्याख्यानमालेत व्याख्यान द्यायला इस्लामपूर नावाच्या गावी गेले होते. तिथं माझ्याआधी विजय भटकर यांचं व्याख्यान झालेलं. वैद्न्यानिक म्हणून बोलावलेला माणूस प्लँचेटविषयी बोलतोय म्हटल्यावर अनेक लोक उठून निघून गेले.
भटकरांनी व्याख्यानात माणूस कसा मरतो आणि मरताना त्याचा आत्मा कोणकोणत्या छिद्रांमधून बाहेर पडतो हे सविस्तर सांगितलं म्हणे आणि म्हणे की बाकी सगळे अवयव मरत गेले तरी माणसाचे कान सगळ्यात शेवटपर्यंत जिवंत असतात आणि तो पूर्वजांच्या इत्यादी सूचना मरताना ऐकत असतो की मरताना कसं वागायचं, घाबरायचं नाही इत्यादी.
आपल्याकडे पूर्वी सगळं होतं, म्हणणारे लोक तर अगणित आहेत. विमानं होती, संगणक होते, वायरलेस यंत्रं होती, टीव्ही होता, प्लास्टिक सर्जरी होती, अशा शेकडो थापा लोक छातीठोकपणे मारत असतात आणि त्या थापांना वास्तव समजणाऱ्या मुर्खांची तर कमतरता नाहीच.
हे सगळं ऐकलं, वाचलं की वाटतं, विज्ञान शिकले म्हणून कुणाकडे वैद्न्यानिक दृष्टिकोन येत नाही; सगळ्याच क्षेत्रांमधल्या लोकांना ‘वैद्न्यानिक दृष्टिकोन’ अक्षरश: अभ्यासक्रमात नेमून शिकवण्याची गरज आहे.
‘पुत्रप्राप्ती’ हे आपल्याकडचं सगळ्यांत महान आकर्षण. एकूण तब्बल ४५०० व्रतं आपल्याकडे सांगितली आहेत, त्यातली निम्म्याहून अधिक पुत्रप्राप्तीसाठी करण्याची व्रतं आहेत. आणि अर्थातच यातली बहुतांश व्रतं ही बायकांनीच करायची असतात. सासरघराला पुत्र प्राप्त करून देणं, हेच तर या गर्भाशय असलेल्या जिवंत यंत्राचं मुख्य कर्तव्य असतं ना! मग खीर खाल्ल्याने दशरथाच्या राण्यांना पुत्र झाले, अमक्या साधूने दिलेले फळ खाऊन तमक्या निपुत्रिक राणीला पुत्रप्राप्ती झाली, तमुक व्रत केले की हमखास मुलगाच होतो... अशी उदाहरणे असंख्य कहाण्यांमधून दिसतात. ऐकीव गैरसमज तर शेकड्याने असतात. करंजी, बर्फी वगैरे स्त्रीलिंगी पदार्थ आहारात ठेवले तर मुलगी होते आणि लाडूपेढे वगैरे पुल्लिंगी पदार्थ खात राहिलं तर मुलगा होतो... याहून आचरट माहिती अजून कोणती असणार?
‘मराठी वैद्यकग्रंथ सूची’चं १९५१ ते २००० या सालांचं एक काम मी केलं होतं. त्या निमित्ताने वेगवेगळ्या उपचारपद्धतींमध्ये मराठीत काय लिहिलं गेलं आहे, याचा आढावा घेतला गेला. या कामासाठी वेगवेगळ्या संदर्भग्रंथ संग्रहालयांत काही महिने नियमित जाऊन बसत होते. प्राथमिक नोंदी करायच्या असल्या, तरी काही पुस्तकं अधूनमधून कुतुहलानं चाळली जात.
विशेषत: ज्यांवर अनेक आक्षेप घेतले जातात, अशा वैद्यकपद्धतींची बरीच पुस्तकं बाजारात होती. जादूटोण्याच्या पुस्तकांहून ही पुस्तकं जास्त घातक आहेत, हे त्यातले काही नमुने वाचूनच जाणवलेलं. सौन्दर्योपचार सांगणारी पुस्तकं तर कमालीची हास्यास्पद होती आणि ती वाचून कुणी गाढवीचं दूध वगैरे सुंदर दिसण्यासाठी वापरत असेल ही कल्पनाही करवत नव्हती.
आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमातली काही अत्यंत जुनी पुस्तकं चाळताना स्त्रीआरोग्याचा विषय दिसला म्हणून थबकले, तर त्यात ‘पाळीच्या काळात स्त्रियांनी डोळ्यांत काजळ घालू नये’ इथपासून ते ‘पाळीच्या काळात अंघोळ करू नये’ इथपर्यंत काहीबाही लिहिलं होतं; अशा अनेक मुद्द्यांचा एकतर वैद्यकाशी काही संबंधच नव्हता आणि अंघोळ करू नये अशी काही विधानं तर चक्क अनारोग्यास आमंत्रण देणारी होती. मासिक पाळी, गरोदरपण, प्रसूती या तिन्ही बाबतींत अवैद्न्यानिक मुद्द्यांचा अनेक पुस्तकांमध्ये भरणा होता. या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या तर निघत राहिल्या, पण त्या ‘सुधारित’ मुळीच नव्हत्या. माहिती अद्ययावत करावी, असं वैद्यकातल्या एकाही प्राध्यापकाला, तज्ञ लेखकाला वाटू नये, हे चिंताजनक होतं. इतकी नवी संशोधनं होताहेत, नवं ज्ञान निर्माण होतंय; ते जाणून घेण्याचं कुतूहल मग विद्यार्थ्यांमध्ये तरी कसं निर्माण होणार?
या सर्व पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी हाती आली आहे, ती 'एमबीबीएस'च्यावैद्यकीय अभ्यासक्रमात सुयोग्य बदल केला गेला असल्याची. त्यात खासकरून स्त्रियांबाबत जी अवैद्न्यानिक, चुकीची, अवमानकारक, नि:संदर्भ विधानं अभ्यासक्रमात आहेत, ती काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमूक धर्मातल्या स्त्रियांना जास्त मुलं होतात, चाळीशीनंतर बायकांची पाठ दुखत असतेच – तिकडे दुर्लक्ष करावं, काही विशिष्ट मनोविकार महिलांनाच होतात वा जास्त प्रमाणात होतात, अशा स्वरुपाची ही विधानं होती.
आरोग्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘सेहत’ या स्वयंसेवी संस्थेने २०१४ साली वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला 'एमबीबीएस'च्या अभ्यासक्रमातील अनेकविध त्रुटी निदर्शनास आणून दिल्या; त्यात प्रामुख्याने 'इंटर्नल मेडिसिन', 'फॉरेन्सिक सायन्स', 'प्रसूतिविज्ञान शास्त्र', 'मानसोपचार' या विषयांमधल्या त्रुटी सर्वाधिक होत्या. आता प्रथम या ‘उचित माहिती’बाबतचं शिक्षण प्राध्यापकांना दिलं जात आहे आणि त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून ते विद्यार्थ्यांना शिकवतील.
अभ्यासक्रमात जी माहिती दिली जाते, त्याचे प्रतिबिंब प्रत्यक्ष रुग्णांना उपचार देतानाही उमटते.चुकीची माहिती डोक्यात बाळगून, चुकीच्या दृष्टिकोणातून केले जाणारे उपचार देखील केवळ चुकीचेच नव्हे तर घातक ठरू शकतात; त्यामुळे हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे.केवळ स्त्रियाच नव्हे, तर हिजड्यांविषयीही वैद्यकशास्त्रात अनेक गैरसमज होते; तेही आता वगळण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांनी लिंगभेद न बाळगता रुग्णांवर उपचार केले जाण्याचा एक छोटा प्रयोगही सहा महिने करून पाहण्यात आला;रुग्णांसोबतच्या संवादात आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीत त्यामुळे सकारात्मक फरक पडल्याचे दिसले. परिणामी या बदलांना 'मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया'नेही मान्यता दिली.
स्त्रियांकडे, तृतीयपंथीयांकडे आधी माणूस म्हणून पाहिलं जावं, हे निदान वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जरी समजलं, तरी ती एक चांगली सुरुवात आहे असं म्हणता येईल. बाकी केळी, रताळी, आंबे, खिरी खाऊन पुत्रप्राप्ती होते वगैरे मनोरंजन होत राहणार.
संबंधित ब्लॉग :
चालू वर्तमानकाळ (42) : कॅज्युअल सेक्सची पहिली गोष्ट
चालू वर्तमानकाळ (४१) : वय स्वीकारण्यातली सहजता चालू वर्तमानकाळ : मनातल्या मनात मी
चालू वर्तमानकाळ (39) : लेदर करन्सीच्या पायघड्या
चालू वर्तमानकाळ : 38. आमचं काड्यामुड्यांचं घर रं या सरकारा...
चालू वर्तमानकाळ : 37. वंचितांच्या यशाची शिखरं
चालू वर्तमानकाळ : 36. अजून कशा- कशासाठी कोर्टात जायचं?
चालू वर्तमानकाळ 35. त्या पळाल्या कशासाठी?
चालू वर्तमानकाळ 34. बघे, सेल्फीटाके आणि पायकाढे
चालू वर्तमानकाळ : 33. अभ्यासकाचे जाणे!
चालू वर्तमानकाळ : 32 आमचा काय संबंध!
चालू वर्तमानकाळ : (31) आमचा काय संबंध!
चालू वर्तमानकाळ (31) : शेवटचा दिस गोड व्हावा
चालू वर्तमानकाळ (30) : बाई, आई, स्तनपान, चर्चा... वगैरे
चालू वर्तमानकाळ (29) : बरी या (अकलेच्या) दुष्काळे पीडा केली!
चालू वर्तमानकाळ (28) : सुंदर, सजलेल्या, तरुण बाहुल्या
चालू वर्तमानकाळ (27) : दुसरी बाजू… तिसरी, चौथी, पाचवी बाजू वगैरे
चालू वर्तमानकाळ (26) : द आदिवासी विल नॉट डान्
चालू वर्तमानकाळ : 25 : कौमार्य चाचणीचा खेळ व पुरुषार्थ चाचणीचं दिव्यचालू वर्तमानकाळ (24) : पॅनिक बटण आणि इ–संवाद वगैरे
चालू वर्तमानकाळ (23) : पितात सारे गोड हिवाळा?
चालू वर्तमानकाळ २२. लहानग्या सेक्स डॉल हव्यात की नकोत?
चालू वर्तमानकाळ (21) : आनंदाची गोष्ट
चालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षं
चालू वर्तमानकाळ (19) : रोशनी रोशनाई में डूबी न हो…
चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्या
चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही…
चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये!
चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं
चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन
चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’
चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं
चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर
चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड
चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे
चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं
चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं
चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या
चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात…
चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…
चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत
चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!
चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement