एक्स्प्लोर
चालू वर्तमानकाळ : 38. आमचं काड्यामुड्यांचं घर रं या सरकारा...
कमला अजूनही मातीच्या कच्च्या घरात राहते आणि इंदिरा आवास योजनेद्वारे घर मिळावं म्हणून तिनं 2016 साली अर्ज केला होता, त्याची अजूनही दखल घेतली गेलेली नाहीये.

“अशा एखाद्या मोठ्या पदावर राहून काम करता येईल, असा विचार तर मी कधी स्वप्नातसुद्धा केला नव्हता.” कमलाबाई सांगत होत्या.
हे वाक्य तसं अत्यंत साधारण आहे. विशेषत: जिथं स्त्रियांना शिक्षण नीट मिळत नाही किंवा एखाद्या अशिक्षित घरातली, पहिल्यांदाच कुणी तरुणी शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवते,अशा एखाद्या तरुण स्त्रीच्या तोंडून हे वाक्य ऐकायला मिळणं स्वाभाविक वाटतं. कधी
व्यक्तिगत व सार्वजनिक आयुष्यात मोठा संघर्ष करून एखादी स्त्री उच्च पदावर जाते, तेव्हा तीही काहीशा कृतकपणे अशी वाक्यं मुलाखतींमध्ये सहजी बोलून मोकळी होते. पण इथली गोष्टच वेगळी आहे. कमला ही पूर्णत: अशिक्षित असलेली, आदिवासी समाजातली, ६८ वय वर्षांची एक आजी आहे आणि तिने स्वप्नातही विचार न केलेलं पद आहे : ओडिशाच्या राज्य नियोजन आयोगाचं सदस्यत्व!
ओडिशाच्या राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष आहेत मुख्यमंत्री आणि त्यांच्याखेरीज पाच सदस्यांची समिती राज्याचे पुढील पाच वर्षांच्या दीर्घकालीन आणि अल्पकालीन योजनांचे आराखडे तयार करण्याचं काम करत असते. ओडिशामधला कोरापुट हा जिल्हा आपल्या महाराष्ट्रातल्या गडचिरोलीसारखा आहे. दुर्गम भाग. घनदाट जंगल. हा आदिवासीबहुल जिल्हा गडचिरोली प्रमाणेच नक्षलवाद्यांच्या धुमाकुळाने ग्रासलेला. आगामी कादंबरीच्या निमित्ताने मी देशातला लाल पट्टा हिंडले होते, त्या दरम्यान कोरापुटला देखील गेले होते. चांगले सरकारी अधिकारी असतील, तर शासकीय योजना किती उत्तम रीतीने राबवल्या जाऊ शकतात, याचं आदर्श आणि स्वप्नवत दर्शन
तेव्हा घडलं होतं. कमला पुजारी ही वृद्धा याच जिल्ह्यातल्या पात्रापुट नावाच्या खेड्यातली. भूमिया या आदिवासी जमातीत तिचा जन्म झाला. शेती आणि अन्नधान्य या विषयात तिनं काम केलेलं आहेच, आता ‘पाणी’प्रश्नाकडे तिला वळायचं आहे. प्रत्येक खेड्यात पिण्याचं स्वच्छ
पाणी उपलब्ध झालं पाहिजे आणि शासकीय आराखड्यात पाणीप्रश्न प्राधान्याने घेतला पाहिजे, असं तिचं म्हणणं आहे.
आदिवासींच्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे वगैरे लोक सांगत असतात. मात्र माहितीचा पुरवठा व्यवस्थित झाला, तर अशिक्षित आदिवासी देखील प्रथम स्वत:च या नव्या माहितीची सांगड आपल्या पारंपरिक ज्ञानाशी घालून कृती करून पाहतात, हा अनुभव आहे.
कमला पुजारी हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. या बाईनं काय-काय केलंय? तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिनं शेकडो स्थानिक बियाण्यांचं रक्षण आणि जतन केलं. दुसरं म्हणजे रासायनिक खतं न वापरता पारंपरिक पद्धतीने, आजच्या भाषेत सांगायचं तर ‘ऑरगॅनिक’ शेती करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिलं. याच दरम्यान तिला जयपूरमधील स्वामिनाथन रिसर्च फौंडेशनमध्ये ऑरगॅनिक शेतीचं तंत्र शिकण्याची संधी मिळाली; त्या संधीचं तिनं अक्षरश: सोनं केलं. तिथं शिकलेलं प्राथमिक तंत्र तिनं अत्यंत गांभीर्याने घेतलं आणि गावी परत आल्यावर शेतकऱ्यांचे लहान-लहान गट तयार करून त्यांना शिकवायला सुरुवात केली. रसायनांचा घातक परिणाम ती अत्यंत प्रभावीरित्या समजावून सांगते. गावात ही माहिती व्यवस्थित पेरून झालीये, उगवून तिचे चांगले परिणाम दिसताहेत म्हटल्यावर तिने आपला मोर्चा आजूबाजूच्या गावांकडे वळवला. अगदी घरोघर जाऊन माणसांशी संवाद साधला. आज पात्रापुटसह आजूबाजूची अजून काही खेडी रासायनिक खतं आणि औषधी फवारण्यांपासून मुक्त आहेत. २००२ साली जोहान्सबर्ग इथं एमएस स्वामिनाथन फाऊंडेशन द्वारा आयोजित सेंद्रीय शेतीविषयक एका कार्यशाळेत तिनं आपले हे अनुभव जगभरच्या शेतकी संशोधकांसमोर मांडले. याच साली भुवनेश्वर मधल्या ओडिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने तिला Equator of Initiative Award हा पुरस्कार बहाल केला. 2004
साली ओडिशा सरकारकडून तिचा सर्वोत्तम महिला शेतकरी म्हणून सत्कारही करण्यात आला.
ही एक झळकणारी बाजू झाली.
दुसरी काळी, करडी बाजू आहेच.
कमला अजूनही मातीच्या कच्च्या घरात राहते आणि इंदिरा आवास योजनेद्वारे घर मिळावं म्हणून तिनं 2016 साली अर्ज केला होता, त्याची अजूनही दखल घेतली गेलेली नाहीये. तंकधर आणि दुर्योधन ही तिची दोन मुलं आणि सुदामा हा तिचा नातू हाच मुद्दा पुन:पुन्हा मांडताहेत
की, “सरकार तिचं नाव वापरतं आहे, तिचं नाव दिलेल्या इमारतींच्या उद्घाटनासाठी तिला आमंत्रित करतंय, ज्या योजनांमधून या सुविधा दिल्या जातात त्या बोर्डावरही आता तिला सदस्य म्हणून घेतलं आहे... हे सारं चांगलं आहेच; पण या योजना प्रत्यक्षात येण्याचं काय? त्यासाठी काही प्रयत्न होताहेत का? झालेल्या / न झालेल्या कामांचे आढावे घेतले जातात का? आम्हाला अजून पक्कं घर का मिळू शकलेलं नाही?”
थोडक्यात, मूळ मुद्दा आहे तो योजना राबवण्याचा. सरकारी दिरंगाई, दुर्लक्ष आणि भ्रष्टाचार हे खरे पेच आहेत.
गेले काही दिवस आपल्याकडे गडचिरोलीमध्ये पोलिसांनी वर्षभरात किती नक्षलवादी मारले याच्या बातम्या येताहेत. नक्षलवादी आणि पोलीस हे दोन्हीही घटक असे अधूनमधून बातम्यांमधून झळकत असतात; पण या कात्रीत सापडलेले आदिवासी मात्र बातम्यांचा विषय क्वचितच बनतात. त्यांच्याबाबत जे घडतंय ते आणि जे घडत नाहीये तेही जर शहरांमधून, महानगरांमधून घडलं असतं; तर अशक्य कोलाहल माजला असता; पण जंगलातले नगार्यांचे आवाज आमच्या कानापर्यंत पोहोचणं दुरापास्त आहे.
कमला आजही मागतेय काय, तर पिण्याचं पाणी! यानंतर ती कदाचित आरोग्याच्या किमान प्राथमिक सोयी मागेल, शिक्षणाच्या सुविधा मागेल, गावासाठी रस्ता मागेल, वीज मागेल; अशिक्षित, अल्पशिक्षित आदिवासींसाठी रोजगार मागेल. स्वातंत्र्यानंतर अजून किती काळ या
प्राथमिक मागण्याच करत राहायच्या आहेत आज लोकांनी? – हे वाक्यदेखील आता घिसंपिटं झालं आहे; पण ‘जल-जंगल- जमीन’चा वाद मिटत नाही, प्रश्न सुटत नाहीत.
तरीही कमलाला राज्य नियोजन आयोगाचं सदस्यत्व दिलं जाणं, ही मला एक मोठी आणि महत्वाची घटना वाटते. ज्यांनी आयुष्यात कधी जंगलात पाउल ठेवलेलं नाही, शेतात काय जमिनीखाली पिकतं आणि काय जमिनीवर लगडतं याची किंचित माहितीही ज्यांना नाही, ते
शहरी लोक गोल टेबलाभवती बसून आदिवासी बायकांना लोणची-पापड करायला शिकवा, त्यांना शिलाई मशीन द्या; आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बायकांना गाय द्या वगैरे आचरट उपाय सुचवतात, त्याला जरा आळा बसेल. आदिवासींचे प्रश्न काय आहेत, हे आपणच ठरवायचं; त्यावर उपाय काय हेही आपणच ठरवायचं; अंमलबजावणी होतेय की नाही हे मात्र कधीही पाहायचं नाही... या गोष्टींना निदान ओडिशात कमलाच्या नेमणुकीने थोडा चाप बसेल आणि इतर राज्यांना देखील ओडिशाचं अनुकरण करण्याची बुद्धी होईल, ही अपेक्षा!
चालू वर्तमानकाळ सदरातील आधीचे ब्लॉग :
चालू वर्तमानकाळ : 37. वंचितांच्या यशाची शिखरं
चालू वर्तमानकाळ : 36. अजून कशा- कशासाठी कोर्टात जायचं?
चालू वर्तमानकाळ 35. त्या पळाल्या कशासाठी?चालू वर्तमानकाळ 34. बघे, सेल्फीटाके आणि पायकाढे चालू वर्तमानकाळ : 33. अभ्यासकाचे जाणे!चालू वर्तमानकाळ : 32 आमचा काय संबंध!
चालू वर्तमानकाळ : (31) आमचा काय संबंध!
चालू वर्तमानकाळ (31) : शेवटचा दिस गोड व्हावा
चालू वर्तमानकाळ (30) : बाई, आई, स्तनपान, चर्चा... वगैरे
चालू वर्तमानकाळ (29) : बरी या (अकलेच्या) दुष्काळे पीडा केली!
चालू वर्तमानकाळ (28) : सुंदर, सजलेल्या, तरुण बाहुल्या
चालू वर्तमानकाळ (27) : दुसरी बाजू… तिसरी, चौथी, पाचवी बाजू वगैरे
चालू वर्तमानकाळ (26) : द आदिवासी विल नॉट डान्स
चालू वर्तमानकाळ : 25 : कौमार्य चाचणीचा खेळ व पुरुषार्थ चाचणीचं दिव्य
चालू वर्तमानकाळ (24) : पॅनिक बटण आणि इ–संवाद वगैरे
चालू वर्तमानकाळ (23) : पितात सारे गोड हिवाळा?
चालू वर्तमानकाळ २२. लहानग्या सेक्स डॉल हव्यात की नकोत?
चालू वर्तमानकाळ (21) : आनंदाची गोष्ट
चालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षं
चालू वर्तमानकाळ (19) : रोशनी रोशनाई में डूबी न हो…
चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्या
चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही…
चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये!
चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं
चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन
चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’
चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं
चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर
चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड
चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे
चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं
चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं
चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या
चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात…
चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…
चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत
चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!
चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब
View More
Advertisement
Advertisement

























