एक्स्प्लोर

रेड लाईट डायरीज : पोलिस, प्रशासन आणि कुंटणखाने (उत्तरार्ध)

मुलींना ज्या ठिकाणाहून आणलेले असते त्याचे पत्ते सर्रास खोटे दिलेले असतात, मुलींच्या नातलगांची नावे खोटी सांगितली जातात जेणेकरून पोलिसांना त्यांच्या मुळाशी जाता येऊ नये.

कुंटणखान्याच्या टिप्स मिळाल्यावर धाडी टाकल्या जातात. पोलिसांची ही 'रेड' कधी कधी आपले नाव ठराविक कालावधीनंतर रेकॉर्डवर यावे म्हणून 'पाडून' घेतल्या जातात. या पूर्वनियोजित धाडींची कुंटणखान्याच्या मालकिणीला वा चालकाला पूर्वकल्पना असते, त्यांनी याला व्यवस्थित मॅनेज केलेलं असते. या धाडीत रेकॉर्डवर काय आणायचे हे आधीच निश्चित केलेलं असतं. वर्षदोन वर्षाला एखादी धाड पाडून घेऊन त्यात केवळ मुद्देमाल हाती लागू द्यायचा, बायका पोरींना अन्यत्र हलवायचे अशी सोय करून ठेवली की त्या लॉजेसची, रिसॉर्टची, ठिकाणांची नावे ब्लॅकलिस्टमध्ये येत नाहीत. धाड पडून गेल्यानंतर दोनेक वर्षे जोमात धंदा करायचा असे गणित असते. सर्वच धाडी अशा बनावट नसतात. बऱ्याचदा सेक्सवर्कर्ससाठी काम करणाऱ्या एनजीओज, समाजिक कार्यकर्ते यांनी पुराव्यासहित तक्रारी दिल्यावरही धाडी टाकल्या जातात. यात मात्र फारशी बनवाबनवी करता येत नाही. अनेकदा अशा धाडींचीही माहिती पोलीस खात्या कडून लीक करण्याचा प्रयत्न केला जातो. माहिती लीक झाली तर अड्डेवाले सावध होतात आणि मुली दडवल्या जातात. छापा टाकायला गेलेल्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागते. बऱ्याचदा छापे टाकताना सामान्य पोलिस कर्मचाऱ्यांसोबत काही सामाजिक सुरक्षा शाखेचे विशेष पोलिस, महिला पोलिस, तक्रारदार एनजीओचे प्रतिनिधी, महिला पुनर्वसनच्या कर्मचारी यांनाही पथकात सामील करून घेतले जाते. प्रत्यक्ष धाड टाकताना अनेक नाट्यमय प्रसंग घडतात. जवळपास सर्व धाडसत्रात बनावट कस्टमर तयार करून त्याला आत पाठवले जाते. त्या आधारे रंगे हात पकडता येते. न्यायालयात या गोष्टीची मदत होते. पैसे देऊन देहविक्रय चालत होता हे सिद्ध करण्यासाठी ही क्लृप्ती वापरली जाते. पण धंदेवाले यावरही तोडगा काढतात. ज्या व्यक्तीने पैसे स्वीकारले ती व्यक्तीच आपल्या इथली नसल्याचा दावा केला जातो, त्यासाठीचे बनावट पुरावे तयार केले जातात. धाडीची थोडी जरी चुणूक लागली तरी त्या जागी अल्पवयीन मुली असल्यास त्यांना लोखंडी ट्रंक, भिंतीतले माळे, कपाटे, पाण्याच्या टाक्या, चोरकप्पे यात लपवले जाते. कधीकधी तर लपवलेल्या जागी प्लायवूडला खिळे ठोकून नामोनिशान मिटवले जाते. काही पोटमाळे, चोरकप्पे मोठाल्या फरशा लावून बंद केले जातात, यामुळे तिथे काही असेल याची शंका येत नाही. त्या जागेत पोलिस असेपर्यंत लपलेल्या मुलींचे श्वास कंठाशी येतात. त्यांचा जीव गुदमरून जातो. पोलिस निघून गेल्यावर सगळीकडे सामसूम झाल्यावर या मुलींना बाहेर काढले जाते. अनेक ठिकाणी केवळ पोलिस धाडीपुरते या मुलींना लपवले जाते तर काही ठिकाणी मात्र मुली खूपच अल्पवयीन असल्या तर त्यांना केवळ धंद्याच्या टाईमपुरते बाहेर काढले जाते, अन्य वेळी जेमतेम काही फुट लांबी रुंदीची अंधारी चिंचोळी जागा हाच त्यांचा आडोसा होऊन जातो. दिवसातले वीस तास त्यांना त्या नरकात काढावे लागतात. इथे या मुलींचे इतके भयानक खच्चीकरण होते की धाडीत कधी अशा मुली सापडल्या तर कित्येक दिवस त्या बोलू शकत नाहीत, त्या सतत भीतीग्रस्त असतात, त्यांना अक्षरशः प्रकाशाचीही धास्ती वाटते. अल्पवयीन मुलींना देहविक्री करायला भाग पाडणे, त्यांना फूस लावणे, त्यांची विक्री करणे, त्यांचे हस्तांतरण करणे, त्यांचे अपहरण करणे, त्यांना शारीरिक हानी पोहोचवणे, त्यांचे शोषण करणे, लैंगिक अत्याचार करणे अशा अन्वयाची कलमे अशा अपराधात लावली जातात. यात पुष्कळवेळा मुलगी अल्पवयीन आहे किंवा नाही हे ठरवणे जाणीवपूर्वक क्लिष्ट केले जाते. धाडीत पकडलेल्या मुली अल्पवयीन आहेत याची खात्री होण्यासाठी व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची पुष्टी होण्यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. याच्या अहवालात मेख मारण्याचे काम कुंटणखान्याशी संबंधित दलाल करतात. पैसे टाकले की आपल्या देशात कशाचीही तोडी करता येते हा मंत्र इथे कामी येतो. मुलींना ज्या ठिकाणाहून आणलेले असते त्याचे पत्ते सर्रास खोटे दिलेले असतात, मुलींच्या नातलगांची नावे खोटी सांगितली जातात जेणेकरून पोलिसांना त्यांच्या मुळाशी जाता येऊ नये. त्यांचे खरे वय कळू नये यासाठी हे सर्व केले जाते. मुलींना स्टिरॉईडस देऊन आधीच त्यांच्या शारीरिक रचनेत बदल घडवून आणलेला असतो आणि पैसे चारून अहवाल चुकीचे मिळवले की ती मुलगी अल्पवयीन असूनही सज्ञान सिद्ध केली जाते. केस ‘फेल’ केली जाते. ताब्यात घेतलेल्या मुली सुधारगृहात ठेवल्या जातात. त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला जातो. या पॉइंटवर पुन्हा एकदा दलाल आणि खबरी सक्रीय होतात. मुलींचे पत्ते शोधून त्यांच्या नातलगांच्या हवाली केल्यानंतर पोलिसांचा कार्यभाग संपतो. मात्र मुलींचा भोग संपलेला नसतो. अनेक प्रकरणात मुलींना त्यांच्या पालकांनीच हस्ते परहस्ते विकलेले असते त्यांना ही 'ब्याद' नकोशी वाटते, तर काहींना मुली परत आल्याने आर्थिक नाकेबंदी जाणवू लागते कारण त्या मुली आपल्या कमाईतला बहुतांश हिस्सा घरीच पाठवत असतात. तर काही ठिकाणी फुस लावून पळवून नेलेल्या मुली परतल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस मायेच्या ओढीने निघून जातात पुढे मात्र समाज काय म्हणेल या रोगाने ते कुटुंब ग्रासले जाते. काही प्रकरणात घरच्या जाचाला कंटाळून वा कुठल्या तरी आमिषाला बळी पडून मुली स्वतःहून पळून आलेल्या असतात, त्यांच्या घरात मुलगी परतल्यानंतर वातावरण दुषित झालेले असते. जवळपास नव्वद टक्के प्रकरणात परतलेल्या मुलींना वाईट वागणूक दिली जाते. मुलींचा छळ होऊ लागतो. या मुलींची पार्श्वभूमी समाजाला कळाली तर त्यांच्या टवाळकीला सुरुवात होते, संपूर्ण कुटुंबास लक्ष्य केले जाते. आर्थिक आणि सामाजिक कुतरओढीतून या मुली कधी स्वेच्छेने तर कधी नाईलाजाने पुन्हा धंद्यात येतात. मुलींचे पुनर्वसन होण्याचे दोन मार्ग प्रामुख्याने अवलंबले जातात. एक म्हणजे त्यांना या दलदलीतून बाहेर काढून स्वतःच्या पायावर उभे करणे आणि दुसरे म्हणजे त्यांच्या संमतीने त्यांचे लग्न लावून देणे. समाधानाची बाब अशी की अलीकडील काळात अशा मुलींशी लग्न करण्यास अनेक तरुण पुढे येताहेत पण स्वावलंबनाच्या वाटेवरून जाणाऱ्या अशा मुलींची पार्श्वभूमी उमगताच पांढरपेशी समाजातील पशु जागे होतात आणि त्यांच्या मार्गात काटे वाढत जातात. तरीही नेटाने त्यांचे पुनर्वसन व्हावे म्हणून प्रयत्न केले जाताहेत. या पातळीवर एनजीओंचे काम अनेक पटीने आणि सहस्त्रावधी हातांनी वाढण्याची गरज आहे तर शासकीय पातळीवरची या उदासीनता मात्र अत्यंत जीवघेणी आहे. या दृष्टीकोनात बदल होणे आवश्यक आहे. ह्या व्यवसायातून बाहेर पडलेल्या मुलींकडे बघण्याची समाजाची  मानसिकता बदलण्यासाठी खूप वेळ लागणार आहे हे मान्य केले तरी त्या दृष्टीने कुटुंबियांचे कौन्सेलिंग केलं जाणे तरी नितांत गरजेचे आहे. अल्पवयीन मुलींना देहविक्रयास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींवर प्रिवेन्शन ऑफ इम्मोरल इम्मोरल ट्रॅफिकिंग ऍक्टअन्वये गुन्हे दाखल होतात. गुन्हे सिद्ध झाल्यास त्यात लावलेल्या कलमानुसार शिक्षा होते. हा कायदा १९५६ सालचा असून त्यातील कलमात आणि मुद्द्यात अनेक कालसुसंगत बदलांची गरज आहे. १९८६ साली यात केली गेलेली सुधारणा आता कालबाह्य झालीय. काही गुन्ह्यात जुवेनाईल जस्टीस ऍक्टच्या सेक्शन २३ नुसार एफआयआर दाखल केले जातात. यातील शिक्षांचा कालावधी आणि परिमाण यात आणखी कठोरता हवी. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल ‘निर्भया’प्रकरणी जे निकष लावले जाताहेत तसेच निकष अशा प्रकरणी लावले जावेत. कारण या मुलीही अल्पवयीनच आहेत, यांच्यावरही बळजोरीच होते आणि यातही आपखुशी नसते. शिवाय या मुलींवर शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या लोकांवरही बलात्काराचे आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. शायना एन.सी. यांनी या प्रकरणी एक ऑनलाईन याचिका दाखल केलेली आहे पण तिची परिणामकारकता किती असेल याची कल्पना नाही. ‘दरबार’ आणि ‘शक्तीवाहिनी’ सारख्या एनजीओ यात धडाडीने काम करताहेत. मुंबईतील ‘प्रेरणा’चे कामही यात उल्लेखनीय आहे. या सर्व प्रकरणात एक दुवा जाणीवपूर्वक कमजोर ठेवला जातो तो म्हणजे कुंटणखान्याचा चालक मालक. ज्या जागेत हा व्यवसाय चालतो त्या ठिकाणांवर कारवाई केली जात नाही. जागामालकांना अभय देण्याकडे कल जास्ती असतो. वास्तविक पाहता या ठिकाणांना सील केलं जाणं अपेक्षित असताना कधी कधी नाममात्र दंड करून वा थातूर मातुर गुन्हा नोंद करून पुन्हा धंदा करण्यासाठी मोकळीक दिली जाते. ज्या जागात हे व्यवसाय चालत असतात तिथे वीजेचे कनेक्शन असते, पाणीपुरवठा होत असतो, अन्य नागरी सुविधाही पुरवल्या जातात, या जागांचे करवसुलीचे कामही रीतसर सुरु असते. विविध प्रशासकीय खात्यांचे लोक याच्याशी निगडीत असतात. या सर्व लोकांना येथे कोणता व्यवसाय सुरु आहे हे ठाऊक असते असे असूनही याला आळा घालण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. या व्यवसायातून मिळणारा पैसा अफाट आहे, हा पैसा वरपर्यंत पोहोच केला जातो. एकट्या दिल्लीतील जीबी रोडच्या रेड लाईट एरियात एका अनुमानानुसार आठ ते दहा हजार स्त्रिया या व्यवसायात गुंतल्या आहेत. एक स्त्री एका ग्राहकाकडून किमान दोनशे ते पाचशे रुपये घेते. तर काही महिला दिवसाकाठी हजार ते पाचहजार रुपये घेऊन ‘सेवा’ पुरवतात. काही स्त्रिया दिवसाकाठी अनेक वेळा देहविक्रय करतात तर काहींना एकही ग्राहक भेटत नाही. तरीही सरासरी काढली तरी दिवसाकाठी आठहजार महिलांचे ऐंशी लाख रुपये होतात. एका महिन्याची रक्कम होते चोवीस कोटी ! अन्य एका अहवालानुसार हा आकडा शंभर कोटींचा देण्यात आला आहे. तो अतिशयोक्तीपूर्ण धरला तरी महिन्याकाठी एका शहरातून चोवीस कोटी गृहीत धरल्यास पूर्ण देशभरातून स्कीन करन्सीची किती मोठी उलाढाल होत असेल याचा नेमका अंदाज लागत नाही. जागामालक, कुंटणखाना चालवणारी व्यक्ती, मुलींचे दलाल यांच्यात पैसा वाटला जातो. प्रत्यक्षात स्वतःला विकणाऱ्या मुलींच्या हाती खूप छोटी रक्कम येते. या सर्वात एक न दिसणारा घटक वाटेकरी असतो तो म्हणजे या व्यवसायाला अभय देणारी व्यक्ती. सर्व पक्षीय राजकारणी व्यक्ती, सेफ्टी पुरवणारे हार्ड कोअर गुन्हेगार आणि पोलिस –प्रशासनातली मंडळी यांनाही याचा एक मोठा वाटा हिस्सा म्हणून पेश केला जातो. सर्वसामान्य माणसांना हे चेहरे कधीच ओळखता येत नाहीत कारण व्यवहारिक जगात यांचे मुखवटे वेगळे असतात. यांच्या कॉलरला हात लावण्याचे धाडस आपल्या देशात जोवर होत नाही किमान तोवर तरी हा धंदा कधी आटोक्यात येणार नाही. काही लोकांना 'रेडलाईट डायरीज'च्या या पोस्ट अतिरंजित वाटतात, काही प्रमाणात खोट्या वाटतात. मागे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या उझबेग, केनियन, नायजेर आणि झेक मुलींच्या सेक्सवर्किंगवर पोस्ट लिहिल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. यंदाच्या जुलैमध्ये पुण्यातच थाई मुली मुक्त केल्या गेल्या. तब्बल पाच मुली रेडमध्ये सापडल्या होत्या. या सर्व मुली यातल्या सराईत ट्रिकनुसार टुरिस्ट व्हिसावर आल्या होत्या. पिंपळे सौदागर येथील रेनबो मॉलमधील स्पा सेंटरमध्ये हा उद्योग सुरु होता. या मॉलमध्ये येणाऱ्या लोकांच्या भुवया नक्कीच उंचावल्या, पण तात्कालिकच ! पोलिस नाईक नितीन लोंढे यांना दिलेल्या टीपवरून पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील टीमने ही धाड टाकली होती. नोव्हेंबर २०१३ मध्ये बालेवाडीतल्या सना हॉटेलध्या पार्किंगमध्ये अकरा मुली आणि सात दलाल पकडले होते. फेब्रुवारी २०१४ मध्ये पुणे बंगलोर हायवेवरील हॉटेल राज येथे धाड टाकली होती तेंव्हा दलालांची अंतरराज्यीय टोळी हाती लागली होती. ओडिशाचा अमरेंद्र साहू, नेपाळमधला मोतीराम दंगवारा यांचा त्यात समावेश होता. माझ्या सोलापूर जिल्ह्यातील बामणी नावाच्या छोट्याशा खेड्यातील गोपाळ पवार या दलालाचेही या यादीत नाव होते. तीन वेगवेगळ्या भूप्रदेशातील लोकांनी विविध राज्यातून आणलेल्या मुलींचे पत्ते डोके चक्रावून टाकणारे होते, यावरून दलालांचा हा नेक्सस किती दाट आणि खोलवर विणला गेला आहे याची कल्पना यावी. यातही विशेष बाब अशी की, ऑक्टोबर २०१३ मध्ये याच हॉटेलवर धाड टाकून मुली सोडवल्या होत्या. ताथवडे येथील हॉटेल योगी आणि सांगवी येथील हॉटेल संदीप इथल्या धाडीत दिल्ली, कोलकता आणि दिसपूर -गौहाटीकडच्या मुली सोडवल्या होत्या. १३ मार्च २०१४ मध्ये बालेवाडीतल्या एका अपार्टमेंटमध्ये धाड टाकून दोन तरुण मुली सोडवल्या गेल्या. 'द फ्रीडम प्रोजेक्ट इंडिया'च्या तक्रारीवरून २० जानेवारी २०१७ मध्ये टाकलेल्या धाडीत वेगवेगळ्या ठिकाणाहून तब्बल तीसेक मुली- महिला मुक्त केल्या गेल्या. याच पुणे बंगलोर हायवेवरील नवले पुलानजीकच्या निखील गार्डन लॉजवर यंदाच्या वर्षी ११ जुलैला छापा टाकून चार मुली सोडवल्या गेल्या. फक्त पुण्यापुरते बोलायचे झाल्यास वर्षाकाठी साठ ते शंभर धाडी टाकल्या जातात. यात वर्षाकाठी शेकडो मुली रिस्क्यू केल्या जातात. प्रिव्हेन्शन ऑफ इम्मोरल ट्रॅफिकिंग ऍक्ट अन्वये यात गुन्हे नोंदवले जातात. बहुतांश खटले निकाली निघतात पण सजा लागण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. शिक्षा देखील अगदीच किरकोळ आहे. परवा दिवशी बालेवाडीच्या त्याच परिसरात एका पंचतारांकित हॉटेलसमोर एका उझबेग आणि रशियन मुलगी यात हाती लागलीय. मुंबईच्या अंधेरीचा मधच रिकाडा स्मिथ आणि सानिया जीवनलाल बधवाना हे दलाल हाती लागलेत. त्यांच्या सोबत एक भारतीय तरुणी देखील या चमडी बाजारमध्ये पकडली गेलीय. पूर्वी गोरगरीब नडलेल्या बायका यात हाती लागत आता पैसा कमी पडू लागला म्हणून स्वखुशीने यात उतरलेल्या कुठल्याही स्तरातील मुली यात आढळतात. टीव्हीवरील महिला कलाकार आणि मॉडेलिंगच्या मोहजालात अडकलेल्या मुली दोन तासाला एक लाख रुपयात पुण्यातल्या याच भागात मिळतात. उझबेग आणि झेक मुली बहुत करून बॉलीवूडच्या ग्रुप कोरस डान्सिंगसाठी मागवलेल्या असतात त्या जाताना वरकमाईसाठी हे उद्योग करून जातात. त्यांच्या टीपवरून पुढे हॉटेल व्यवस्थापन आणि दलालांचे रॅकेट नव्या मुलींशी संधान साधते. आधी येऊन गेलेल्या मुली नव्या मुली पाठवत राहतात. यात दलालांना मोठी रक्कम मिळते. विदेशी मुली असल्याने त्यांच्यावर गुन्हे नोंदवताना आणखी अडचणी निर्माण होतात. यातील नव्वद टक्के प्रकरणात हॉटेल्स किंवा धाडीच्या जागा 'पीटा'नुसार सील केल्या जात नाहीत. याची अनेक कारणे आहेत त्यामुळे नुसत्या पोलिस यंत्रणेच्या नावाने बोटे मोडून चालणार नाही. असो. पूर्वी फक्त बुधवार पेठेत हा धंदा चालत होता तेंव्हा अनेक जण नाके मुरडत, अनेक जण नाकाला रुमाल लावत चालत असत, अनेक जण अजूनही याला नरक असेच समजतात, इथल्या बायकाच नीच आहेत असा एक समज हेतूपुरस्सर रुजवला गेला, आता अनेक बेनामी फ्लॅटमध्ये , गगनचुंबी इमारतीतील अपार्टमेंटमध्ये, चकाचक मॉलमध्ये, थ्री स्टार - फाईव्हस्टार हॉटेलध्ये हा धंदा चालतो. आता कोणालाच कळत नाही की कुठे हा धंदा चालतो आणि कुठे याची पाळेमुळे रुजतायत. या हायफाय एरियात आता कोण नाकाला रुमाल लावणार आहे ? आता कोणाला इथे शिसारी येते का ? या धाडीत सापडणारी मुलगी नेमकी कोणाची आणि कुठली असणार आहे याची शाश्वती आता देता येत नाही कारण हा नासूर इतका खोलवर पसरलाय की आता उपायापेक्षा अटकाव करणे हितावह ठरेल अशी वेळ आलीय. एकाच भागात चालत असणारा हा धंदा शहरभर कसा पसरला याची कारणे धक्कादायक तर आहेतच पण थक्क करणारीही आहेत. देशभरातील शेकडो शहरापैकी एका पुणे शहरातील एका रहिवासी उपनगरीय भागातील ही अवस्था आहे, संपूर्ण पुण्यातील अवस्था कशी असेल ? संपूर्ण राज्यातील आणि देशातील चित्र किती भयावह असेल? संबंधित ब्लॉग : रेड लाईट डायरीज : पोलिस, प्रशासन आणि कुंटणखाने पवित्र ... रेड लाईट डायरीज : आज्जी आणि चाईल्ड सेक्स वर्कर्स.... रेड लाईट डायरीज : रंगरुपाचे रेड-लाईट लॉजिक...   रेड लाईट डायरीज : रेड लाईट एरियातली नोटाबंदी  रेड लाईट डायरीज : वेश्येतले मातृत्व …… इंदिराजी …. काही आठवणी … रेड लाईट डायरीज : गिरिजाबाई ….. रेड लाईट डायरीज : सेक्सवर्कर्सचे रॅकेट – 2 ‘रॅकेट’ रेडलाईट एरियाचे…   नवरात्रीची साडी… रेड लाईट डायरीज – शांतव्वा…. रेड लाईट डायरीज – ‘धाड’! गणेशोत्सवातल्या आम्ही (उत्तरार्ध) गणेशोत्सवातल्या आम्ही… (पूर्वार्ध) उतराई ऋणाची… स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव… गीता दत्त – शापित स्वरागिनी
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Thane Mahangarpalika Election results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Election Results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Thane Mahangarpalika Election results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Election Results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Thane Mahanagarpalika Election 2026: ठाण्यात तुफान राडा, मिनाक्षी शिंदें-भोईरांचे कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज, डोळ्यात मिरची पावडर फेकल्याचा आरोप, प्रचंड तणाव
ठाण्यात तुफान राडा, मिनाक्षी शिंदें-भोईरांचे कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज, डोळ्यात मिरची पावडर फेकल्याचा आरोप, प्रचंड तणाव
Embed widget