BLOG | निसर्ग चक्रीवादळ आणि त्यानंतरचा कोकण जवळून बघताना..
आपल्या कोकणल्या या भावाला, बहिणीला या संकटात एकत्र येऊन साथ द्यायची आहे. महाराष्ट्रच वैभव पुन्हा एकदा उभं करायचंय. या वादळाला दाखवायचं की तू कितीही ताकदवर, वेगाने वाहणारा असला तरी हा माणूस वाकणारा नाही तुझ्याशी झुंज देऊन उभा राहणारा आहे.
निसर्ग चक्रीवादळ. ज्याने अवघ्या चार ते पाच तासात कोकणातल्या अनेक गावांचं होत्याच नव्हतं केलं. ही उद्धवस्त झालेली घरं, उघड्यावर आलेले संसार, पोटच्या मुलासारखी वर्षानुवर्षे जपलेल्या झाडांचं भरुन न काढता येणार नुकसान. हे सगळं आम्ही डोळ्यादेखत पाहत होतो. कोकणातल्या साध्या-भोळ्या, स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख जवळून पाहत होतो. कारण हे वादळ इतक भयंकर रुप घेऊन हे असं नुकसान करुन कैक वर्ष कोकणातल्या या गावांना मागे घेऊन जाईल हे त्या ठिकाणच्या लोकांना स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल. पण हे सगळं कव्हर करताना, हा सगळा आढावा घेताना, वाऱ्याचा थरार अनुभवला, त्यानंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेताना अनेक भावनिक क्षण अनुभवले. हे सगळं मनात साठवलेलं मोकळेपणाने तुमच्यासमोर मांडता यावं असं वाटलं. त्यामुळे अगदी थोडक्यात महत्वाचे प्रसंग यामध्ये मांडतोय.
निसर्ग चक्रीवादळ 3 जूनला धडकणार. श्रीवर्धन, हरिहरेश्वरला याचा मोठा तडाखा बसू शकतो, असं हवामान विभागाने वर्तविल्यानंतर त्यानुसार आम्ही एक दिवस आधीच श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर पोहचलो. त्यानंतर याचा तडाखा हा अलिबागला बसू शकतो असा अंदाज वर्तविण्यात आल्यावर आम्ही काही तास पुन्हा श्रीवर्धनला थांबून लगेच त्याच दिवशी अलिबागकडे निघालो. 3 जूनची सकाळ बघितली तर थोडं ढगाळ वातावरण आणि पावसाच्या रिमझिम सरी असं काहीसं चित्र होतं. त्यामुळे हे वादळ साधारणपणे सकाळी 11 च्या दरम्यान पश्चिम समुद्रकिनार पट्टीवर धडकेल, असे अपडेट येत होते. त्यानुसार, साधारण 12 ते 1 च्या दरम्यान वादळ धडकायला सुरुवात झाली. आमची टीम, सोबत हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे असे आम्ही सगळे अलिबाग समुद्र किनाऱ्यावर या वादळाचा वाढता वेग बघत आढावा घेत होतो. ताशी 80 ते 90 किमी प्रतितास वेगाने वाहणारे हे वारे आपला वेग वाढवत किनारपट्टी लगतच्या गावांमध्ये धडकताना डोळ्याने पाहणं म्हणजे एकप्रकारे वेगळा थरार मी , माझा कॅमेरामन दीपेश महाजन, रायगडचा स्थानिक असलेला मित्र रवींद्र जैस्वाल अनुभवत होतो.
दुपारी एक ते दीडच्या सुमारास याचा केंद्रबिंदू हा अलिबाग दक्षिणेला असल्याची अपडेट मिळताच आम्ही त्या दिशेने गाडी घेऊन निघालो. साधारण 30 किमी प्रवास करताना भयावह, भयंकर रूप वादळाचा पाहताना थोडीशी भीती या वयात कशालाच न घाबरणाऱ्या मनाला वाटली. आपण खऱ्या अर्थाने वादळाची झुंज देत पुढे जातोय हे दिसत होतं. ही मनातली भीती बाजूला ठेवून लवकरात लवकर पुढे कसे जाता येईल हा विचार करतानाच उंचच्या उंच झाडं उन्मळून पडत होती. झाडं मुळासकट उपटून बाहेर येत होती. थोडा थांबायचा विचार आम्ही केला पण भर रस्त्यात जर थांबलं तरी धोका अधिक वाटत होता, कारण रस्त्याच्या दुतर्फा नारळ सुपारीच्या झाडांची रांग आणि त्यात एक जरी झाड किंवा मग त्याची फांदी जरी अंगावर पडली तरी आपलं काही खरं नाही, असं वाटायला लागलं. म्हणून जितक शक्य तितका पुढे जात कुठेतरी आसरा मिळेल, कुठेतरी आडोशाला थांबता येईल, असं ठरवून पुढे जाताना हा वाऱ्याचा वेग ताशी 100 किमी प्रतितास होत गेला.
हे चक्रीवादळ असं अक्राळ विक्राळ रुप धारण करेल हे सुरवतीला अजिबात वाटलं नव्हतं. पण आता याचा सामना करत रिपोर्टिंग करण्याचं आवाहन होतं. एकवेळ ठरवलं की रिपोर्टिंग या वाऱ्याचा वेग कमी झाल्यावर करता येईल पण आता सुरक्षित ठिकाणी जाऊ. पण त्यात जवळच थोडा आडोसा मिळला आणि गाडीतून उतरून ऑफिसला कॉल करत आपण हे दाखवू शकतो अस म्हणत लाइव्हला उभा राहिलो. जेव्हां उभं राहिलो तितक्यात मागचा विजेचा खंबा जोरजोरात या वाऱ्याचा वेगाने हलू लागला आणि हा काही क्षणात कोसळणार हे दिसताच कॅमेरामन आणि मी भीत भीत गाडीत बसून पुन्हा पुढे निघालो. आता पुढे सुद्धा सिमेंटचा विजेचा खंबा पडलेला पाहून गाडी थांबवली. मागे झाडं पडलेली, पुढे खंबे रस्त्यात पडताय. हे पाहून आता नेमकं करायचं काय ? या विचारात जवळच्या मंदिराचा आडोसा घेतला आणि पुन्हा रिपोर्टिंगचा काम सुरू करत लाइव्ह दृश्य प्रेक्षकांना दाखवायला सुरुवात केली. ही तारेवरची कसरत करताना हे वादळ त्यावेळी ज्या प्रकारे सुटलं होतं ते शब्दात मांडण मला खरंच कठीण वाटतं. कारण वादळाला पावसाची साथ मिळाली त्यामुळे हे आता खूप मोठं नुकसान करेल असं त्या क्षणीच वाटत होतं. हे असं वादळ मीच काय या ठिकाणच्या लोकांनी सुद्धा उभ्या आयुष्यात पाहिलं नव्हतं. त्यामुळे मनातली भीती सोबत थरार जे आम्ही अनुभवत होतो ते या ठिकाणचे स्थानिक सुद्धा अनुभवत होते
साधारण, दुपारी 1 वाजता सुरु झालेला हे वादळ साडे 4 च्या दरम्यान कमी होत गेलं. पाऊस सुद्धा थांबला, हलका वारा सुटला. ती वादळनंतरची शांतता युद्ध सपल्यानंतरच्या शांततेसारखी वाटत होती. पुन्हा परतीचा प्रवास अलिबागकडे करताना रस्त्यावर झाडं, फांद्या, विजेचे खांब पडलेले असल्याने खऱ्या अर्थाने अडथळ्यांची शर्यत पार करत अलिबागला संध्याकाळी पोहचलो. अलिबागला पोहचल्यावर वाटलं फार नुकसान नाही झालं. झाड, विजेचे खांब, काही पत्र, छप्पर...बस्स.इतकाच. बरं झालं! असं अनेकांना वाटलं पण जेव्हां ज्या भागाशी जगाचा संपर्क तुटलेला अशा रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक गावांत या वादळाचा तडाखा किती भयंकर होता हे कळायला दुसरा दिवस उजाडला. सकाळी अनेक गावात मोठं नुकसान झाल्याचं कळताच आम्ही सुद्धा त्या गावात लवकरात लवकर पोहचण्याचा प्रयत्न सुरू केला.
अनेक रस्त्यावर खांब, मोठी झाडं पडल्यानं आम्ही तीन रस्ते बदलत सहा तासांनी श्रीवर्धनला पोहचलो. माणगावपासून मोबाइलला रेंज नाही, वीज नाही कोणालाही संपर्क होणार नाही अशा गावात आम्ही नुकसान बघत जात होतो. सगळे संसार उघडल्यावर आलेले दिसत होते, अनेकांच्या घराची छप्पर उडून गेली होती. आता कळायला लागलं की हे वादळ किती भयंकर होतं, त्यानं किती नुकसान केलं. श्रीवर्धनला पोहचल्यावर निसर्ग वैभव प्राप्त असलेला कोकणाच हे रुप पाहून मन सुन्न झालं. नारळाची झाडं, आंबा, सुपारी, फणस सगळी झालं अक्षरशः युद्धात आपलं सैन्य धारातीर्थी पडल्यासारखी दिसत होती. ही झाडं वाढवायला आयुष्य घातलं त्या या कोणातल्या माणसाला वीस वर्ष मागे हे वादळ घेऊन गेल्याची व्यथा अनेकांनी बघायला गेल्यावर मांडली. हे नुकसान न भरून निघणार आहे हे त्या ठिकाणच्या बागायतदारांनी सांगताना हा प्रेमळ कोकणातला माणूस या संकटात सुद्धा 'हा घ्या आंबा, हे घ्या नारळ, शेवटचे आहेत. आता पुढे कधी मिळणार माहीत नाही' हे जेव्हां ते बोलत होते तेव्हां त्यांच्या आतलं दुःख त्यांच्या आतल्या भरुन न काढण्यासारखा जखमा कळत होत्या तेव्हा आतून मनातून आपण सुद्धा खचल्यासारखं वाटायचं
मेटकर्णी, जीवनाबंदर, दिवे आगार, म्हसळा, धामणी, हरिहरेश्वर, कडापे अनेक गावं फिरत असताना आपलं दुःख सांगताना अनेकांना अश्रू आवरत नव्हते. पै-पै जमा करून पंधरा दिवसांपूर्वी बांधलेल्या घराची या वादळाने केलेली अवस्था बघून न आवरता येणारे अश्रू पाहून कणखर असलेला रिपोर्टरचं मन सुद्धा सुन्न होतं. मुंबईत कामानिमित्त राहणारा निनाद केळकर वादळानंतर दिवे आगारला राहणाऱ्या आपल्या आई वडिलांशी कोणातच संपर्क होत नाही म्हणून अडथळे पार करत जेव्हां घरी येऊन सगळं उध्वस्त झालेलं पाहिलेल्या आई वडिलांच्या डोळ्यातले आसवं पाहून रडायला लागतो तेव्हां आपलं सुद्धा मन हेलावून जातं. माणगावजवळच्या कडापे गावात जेव्हां 7 वर्षाची चिमुकली आपल्या घराचं नुकसान झालेला सांगताना दप्तर, वह्या पुस्तक सगळं गेलं म्हणते आणि आपली भावना व्यक्त करताना जेव्हा अश्रू थांबत नाहीत त्यावेळी रिपोर्टर म्हणून आपण सुद्धा निःशब्द होतो.
गाडीतून अनेक गावांत रिपोर्टिंग करत असताना 'माझं गाव बघा' , 'माझं घरं बघा ', 'माझी वाडी बघा', असे अनेक जण म्हणत होते. कळत होतं घर, शाळा, वाडी, झाड, हॉटेल सगळं काही या वादळाने अवघ्या काही तासात संपवलं. पण आता वेळ आहे पुन्हा यांना उभारायला मदत करायची, साथ द्यायची, त्यांच्या पाठीशी भावासारखा उभं राहायचे. काही दिवस, काही महिने लागतील यातून यांना सावरायला. पण आपल्या कोकणल्या या भावाला, बहिणीला या संकटात एकत्र येऊन साथ द्यायची आहे. महाराष्ट्रच वैभव पुन्हा एकदा उभं करायचंय. या वादळाला दाखवायचं की तू कितीही ताकदवर, वेगाने वाहणारा असला तरी हा माणूस वाकणारा नाही तुझ्याशी झुंज देऊन उभा राहणारा आहे.