एक्स्प्लोर
यवतमाळ मराठी साहित्य संमेलन : काही अधिक, काही उणे
संमेलनं म्हणजे फक्त वाद नसतात, साहित्यातलं राजकारणही नसतं. मला वाटतं नवीन विचार पेरणारी प्रेरणास्थळं म्हणून आपण या संमेलनाकडे पाहावं. हा चष्मा सकारात्मकतेचा असला तरच पुढच्या काळात या मंथनातून साहित्यातील नव्या सृजनाचं 'अमृत' येणाऱ्या पिढीला मिळेल.
अनेक कारणांनी गाजलेलं यवतमाळचं 92 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखेर पार पडलं. हे संमेलन वाद, चर्चा, टीका, बहिष्कार, राजीनामा, संमेलनात दुमदुमलेले निषेधाचे सूर आणि साहित्य रसिकांची गर्दी अशा विविध कारणांनी चांगलंच गाजलं. या संमेलनाच्या आधी आलेल्या वादळाने संमेलन निर्विघ्नपणे पार पडतंय की नाही?, याबाबत साहित्यवर्तुळ चिंतेत होतं. मात्र पहिल्या दिवशी नयनतारा प्रकरणावरून आयोजकांना संमेलनाध्यक्ष, पूर्व संमेलनाध्यक्षांनी झोडपल्यानंतर पुढे टीकेचं वादळ काहीसं कमी झाल्याचं जाणवलं.
यवतमाळला झालेल्या या साहित्य संमेलनाला अनेक पैलू अन् कांगोरे होते. तसेच त्याला अनेक वेगळे संदर्भही आहेत. देश आणि जागतिक पातळीवर शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नाने हा जिल्हा बदनाम झालेला. गेल्या दोन दशकांत येथे नापिकी, कर्जबाजारीपणामुळे हजारो भूमिपुत्रांनी मरणाला जवळ केलं. शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नाने या जिल्ह्यावरचं सारंच आकाश अंधारून गेलं आहे. अशा परिस्थितीत याच अंधाऱ्या वाटेवर हसरे दुवे शोधण्याचं प्रयत्न म्हणजे यवतमाळात घेतलं गेलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.
'कापसाचा जिल्हा', 'पांढऱ्या सोन्याचा जिल्हा' अशी यवतमाळची ओळख. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचं नेतृत्व करणारे 'लोकनायक' बापूजी अणेंचा जिल्हा.... महाराष्ट्राला वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक अशी दोन मुख्यमंत्री देणारा जिल्हा, अशी यवतमाळची राजकीय ओळख... यवतमाळच्या मातीतील 'मराठी शायरी'चे जनक भाऊसाहेब पाटणकर, 'विद्यावाचस्पती' प्राचार्य राम शेवाळकर, महेश एलकुंचवार, वसंत आबाजी डहाके, शंकर बडे, मिर्झा रफी अहमद बेग यांच्यासह अनेकांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध करून सोडलं... याआधी यवतमाळला १९७३ साली झालेल्या ४९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान ग. दि. माडगुळकरांनी भुषवलं होतं.
मात्र, तब्बल ४५ वर्षांनी यवतमाळमध्ये झालेलं ९२ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्वार्थाने वेगळं होतं. येथील चांगल्या-वाईट गोष्टींचे तरंग पुढच्या अनेक संमेलनातील घडामोडींवर उठत राहतील. याची सुरूवातच अध्यक्ष बिनविरोध निवडीच्या पायंड्यानं झाली. संमेलनाध्यक्ष निवडणुकीत होणारं कुटील राजकारण टाळत पहिल्यांदाच जेष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांची बिनविरोध निवड झाली. साहित्यातील राजकारणामुळेच अरुणा ढेरेंचे वडील असणारे रा. चिं. ढेरे यांना संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळू शकला नव्हता. मात्र डॉ. अरुणा ढेरे यांना बिनविरोध अध्यक्ष बनवत साहित्य विश्वानं रा. चिं. ढेरेंवरच्या अन्यायाचं कदाचित प्रायश्चित घेतलं असावं. निवडणुकीतील या निवडणुकीच्या या बदलाचं बरंचसं श्रेय साहित्य महामंडळ आणि अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशींचं होतं. मात्र, हेच श्रीपाद जोशी पुढच्या एका घटनेनं या संपूर्ण प्रक्रियेत 'व्हिलन' ठरले.
संमेलनाच्या उद्घाटक म्हणून इंग्रजी साहित्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं नाव असलेल्या नयनतारा सहगल यांना निमंत्रण देण्यात आलं. मात्र यवतमाळातील मनसेच्या स्थानिक नेत्यांनी मराठी संमेलनाच्या इंग्रजी साहित्यिका का? याचा 'विषय' करीत संमेलन उधळण्याचा इशारा दिला. झालं, या संमेलनाला वादाचं ग्रहण लागण्याचं तात्कालिक कारण 'हा'च मुद्दा होता. पुढे यात खुद्द राज ठाकरेंनी सहगल यांना विरोध नसल्याचं सांगत, पक्षाच्या स्थानिक 'प्रसिद्धी पिसाटांचे' कान उपटले. मात्र, तोपर्यंत आग लागून गेली होती. नव्हे तर तिने आक्राळ-विक्राळ रूप घेतलं होतं.
मात्र, आयोजक आणि साहित्य महामंडळात गेल्या तीन महिन्यांत मोठी कुरघोडी सुरू होती. अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशींच्या कारभारानं आयोजक घायकुतीस आले होते. यावरुनच संमेलनापूर्वीच असंतोष धुमसायला सुरुवात झाली. मनसेच्या विरोधाचं कारण फक्त तोंडी लावण्यापुरतंच होतं, खरा मुद्दा होताय नयनतारा सहगल उद्घाटनपर भाषणातून मांडणाऱ्या मुद्द्यांचा... सहगल यांनी विचारांतून प्रगट होण्यात कधीच 'कंजूषी' केली नाही. नयनतारा या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची सख्खी भाची. त्यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडीत यांची कन्या. मात्र ही नाती कधीच नयनतारा यांच्या 'ओळखीची' मोहताज राहिली नाहीत. कारण त्यांची ओळख होती एक स्वतंत्र, सडेतोड विचारांची, ताठ वैचारिक कणा असलेली व्यासंगी लेखिका म्हणून.. त्यांच्या वैचारिक स्पष्टतेच्या फटक्यातून त्यांची पंतप्रधान असलेल्या मामेबहीण इंदिरा गांधीही सुटल्या नव्हत्या. इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचा त्यांनी सर्व ताकदीनिशी विरोध केला होता.
व्यक्तीस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टी जीवनमुल्य म्हणून जपणाऱ्या नयनतारांना मात्र सध्याच्या परिस्थितीनं अस्वस्थ होत्या. देशातील सध्याचं असहिष्णू, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीवर त्या संमेलनाच्या व्यासपीठावरून प्रहार करणार होत्या. त्यांनी आधी पाठवलेल्या लिखीत भाषणानं थेट सध्याच्या वातावरणाविरोधातील संदेश ताकदीनं साहित्यविश्वासह जनसामान्यांमध्ये जाणार होता. संभाव्य वादळ अन 'व्यवस्थे'च्या 'कोपा'च्या भितीने आयोजकांनी नयनतारा सहगल यांना दिलेल उद्घाटनाचं निमंत्रण परत घेतलं. या निर्णयाचे तिव्र पडसाद साहित्यविश्व आणि साहित्यप्रेमींमध्ये उमटलेत.
आयोजकांच्या या अनपेक्षित निर्णयानं हबकून गेलेल्या अनेक साहित्यिक, विचारवंतांनी संमेलनावर बहिष्काराचं अस्त्र उगारलं. मात्र, नयनतारा सहगल यांचं निमंत्रण परत घेण्याच्या निर्णयाच्या जबाबदारीचा 'फुटबॉल' साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी आणि आयोजक एकमेकांवर ढकलत राहिलेत. मात्र, शेवटी या निमंत्रण प्रकरणानं महामंडळ अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशींना राजीनामा देण्यावाचून पर्याय राहिला नाही. संमेलनापूर्वी प्रत्येक निर्णय प्रक्रियेत 'लिड' करणार्या जोशींना संपूर्ण संमेलन सामान्य श्रोता म्हणून पाहावं-ऐकावं लागलं.
नयनतारा सहगल यांच्यासंदर्भात घडलेल्या प्रकारानं देशभरात महाराष्ट्राची मोठी बेअब्रू झाली. ऐनवेळी उद्घाटक म्हणून दिलेलं निमंत्रण जेष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ, ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार आणि ज्येष्ठ विचारवंत-पत्रकार प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी सपशेल नाकारलं.
उद्घाटकांवरून एकामागून एक उठत असलेले वाद आणि वादळांनी सैरभैर झालेले आयोजक आणि महामंडळानं अखेर 'शहाणं' होत एका मोठा निर्णय घेतला. हा निर्णय होता संमेलनाचं उद्घाटन वैशाली येडे या शेतकरी विधवेच्या हातून करण्याचा. वैशाली या कळंब तालूक्यातील राजूर गावच्या. या रणरागिणीचा शेतकरी पतीच्या आत्महत्येनंतर परिस्थिती, नियती, समाज अन व्यवस्थेशी संघर्ष करीत स्वत:सह कुटुंबाला सिद्ध करण्याचा, उभं करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
देशभरातील शेतकरी आत्महत्येनंतर ताकदीनं घर सांभाळणाऱ्या नारीशक्तीचं प्रतिक म्हणजे वैशाली येडे. याच प्रश्नावर प्रकाश टाकणाऱ्या 'तेरवं' या नाटकात वैशालीनं 'जनाबाई' या शेतकरी विधवेची प्रत्यक्ष आयुष्यातली भूमिका साकारली. शेतकरी आत्महत्येची भळभळती जखम वाहणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील साहित्याच्या कुंभाचा ध्वज फडकवण्याचा मान एका विधवेला देत तिच्या संघर्षाला साहित्यविश्वानं केलेला तो सलामच होता.
या संमेलनात स्त्रीशक्तीचा हुंकार पाहायला मिळाला. संमेलन काळातील घटनांनी तीन महिलांची महाराष्ट्राला नव्यानं ओळख झाली. पहिली ओळख होती संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांची. दुसरी ओळख होती ऐनवेळी संमेलनाची उद्घाटक म्हणून मान मिळालेल्या शेतकरी विधवा वैशाली येडे यांची. तिसरी ओळख होती साहित्य महामंडळाच्या प्रभारी अध्यक्षपदाचा भार अतिशय कठीण परिस्थितीत आल्यानंतर परिस्थिती हाताळणाऱ्या विद्या देवधर यांची. तिघींनीही आपल्यावरील जबाबदारी अगदी ताकदीनं पेलत या साहित्यमेळ्यात नारीशक्तीचं एक नवं रूप जगाला दाखवून दिलं.
या संमेलनात एक गोष्ट अतिशय ताकदीनं समोर आली. ही गोष्ट म्हणजे उद्घाटनापासून तर थेट समारोपापर्यंतच्या दमदार भाषणांची. संमेलनातील प्रत्येक सत्र आणि भाषणांवर नयनतारा सहगल प्रकरणाचीच सावली दिसून आली. उद्घाटन सत्रात मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांनी सहगल प्रकरणामुळे व्यथित झालेल्या प्रत्येकाच्या मनातील खदखद, सल अतिशय स्पष्टपणे आणि ताकदीने मांडली.
संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणाताईंचं एक नवं रूप या निमित्तानं महाराष्ट्र आणि साहित्यविश्वानं पाहिलं. स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या आणीबाणीत झालेल्या १९७५ मधील संमेलनाध्यक्षा दुर्गा भागवतांशी ढेरे यांची तुलना होऊ लागली. दुर्गा भागवतांच्या आयुष्यावर अरुणाताईंनी पुस्तक लिहिल्याने ही चर्चा तर अधिकच जोरकसपणे सुरू होती. अरूणाताईंनीही आपल्या भाषणात नयनतारा प्रकरणाचा चांगलाच समाचार घेत आयोजकांना अन त्यांच्या बोलवित्या 'धन्यां'ना चांगलंच सुनावलं. अरुणाताईंनी अनेक सध्याच्या अनेक विषयांना हात घालत अतिशय मौलिक विचार मांडलेत. अलिकडच्या काळातल्या संमेलनाध्यक्षांच्या चांगल्या भाषणांपैकी 'उत्कृष्ठ भाषण' असा त्यांच्या भाषणाचा उल्लेख करावा लागेल.
भाषणांमध्ये सर्वाधिक चर्चा कुणाच्या भाषणाची झाली असेल तर ती संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांच्या भाषणाची... "अडचणीत आलेल्या तोरणा, मरणाले दिल्लीची नाही, तर गल्लीचीच बाई काम आली", असं म्हणत आतापर्यंतच्या उपेक्षेचा जाब त्यांनी समाजाला विचारला. "मराठीच्या मंगल सोहळ्यात कुंकू लावायला माझ्यासारखी विधवाच कामी आली", असं सांगत त्यांनी साहित्यविश्वालाही निरूत्तर केलं. तर "माझ्या पतीची आत्महत्या अन माझं वैधव्य हे व्यवस्थेच्या अपयशानेच ओढवल्याचं' सांगत त्यांनी सरकार आणि व्यवस्थेला 'जाब' विचारला. त्यांचं भाषणाचं सार यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील कवी प्रा. कलिम खान यांच्या कवितेत लपलेलं दिसतं. कवी प्रा. कलिम खान आपल्या कवितेत एका विधवेचं दु:ख लिहितांना म्हणतात की....
'बाहेर आज कुंकू विक्रीस मांडलेले
सौभाग्य हाय माझे रस्त्यात सांडलेले
तो लाल रंग आता रक्तातही न उरला
केंव्हाच तो सख्याच्या प्रेतासवेच पुरला'....
या संमेलनाच्या उद्घाटन सत्रात उपस्थित शिक्षण आणि सासंस्कृतिक मंत्री सहगल प्रकरणात सरकारचा हस्तक्षेप नसल्याचा सांगत हा गोंधळ सरकारला आवडला नसल्याचं सुनावलं. त्यांचं भाषण या संपूर्ण प्रकरणावर 'पॅचिंग' करण्याचा प्रयत्न होता. या संमेलनात सर्वाधिक गाजलेलं राजकीय व्यक्तीचं भाषण होतं नितीन गडकरी यांचं... समारोप सत्रात त्यांनी राजकारण्यांना इतर क्षेत्रातली लुडबूड थांबवण्याचा सल्ला देत सुचक इशारा दिला. 'मतभेद असावेत, मनभेद नकोत' असं सांगत एकप्रकारे सहगल प्रकरणी गळचेपीच्या आरोपात तथ्य असल्याचं सुतोवाच तर गडकरींनी केलं तर नसेल ना?. मात्र, गडकरींचं समारोप सत्रातलं भाषण 'एका साहित्यप्रेमी नेत्याचं अभ्यासू असं चौफेर भाषण' असं करता येईल.
ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग यांची मुलाखत समाजामध्ये नव्या उर्जेची पेरणी करणारी ठरली. तर शेती, मातीचं प्रतिबिंब साहित्यात दिसतं का?, या विषयावरील परिसंवादानं साहित्य क्षेत्राल शेती, शेतकऱ्यांच्या जगण्याच्या संघर्षाकडे नव्या दृष्टीनं बघण्याची अपेक्षा व्यक्त केली. याशिवाय गदिमांच्या रचनांचा संगितमय आढावा घेणारा कार्यक्रम. या कार्यक्रमात सहभागी कलाकारांनी काळी फित दंडाला बांधत केलेला अनोखा निषेध.... उद्घाटन सत्रात नयनतारांचे मुखवटे घालत साहित्यप्रेमींनी केलेला निषेध.... याच सत्रात विनोद तावडेंच्या भाषणादरम्यान 'संभाजी ब्रिगेड'च्या कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ असे निषेधाचे सुरही संमेलनादरम्यामन पाहायला मिळाले.
काही साहित्यिकांच्या मोठेपणाची उपेक्षाही संमेलनादरम्यान खटकली. काही महिन्यांपूर्वी जगाचा निरोप घेतलेले ज्येष्ठ वऱ्हाडी कवी आणि यवतमाळकरांचे 'काका' शंकर बडे यांची कमी प्रत्येकाला भासली. या संमेलन परिसराला यवतमाळच्या मातीचे सुपुत्र आणि मराठी शायरीचे जनक 'भाऊसाहेब पाटणकर' यांचं नाव दिलं गेलं होतं. मात्र, भाऊसाहेबांचं जीवन, त्यांची ग्रंथसंपदा, त्यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं यवतमाळातील त्यांचं घर याची ओळख साहित्य रसिकांना करून देता आली असती तर चांगलं झालं असतं.
संमेलन ठरावात भाऊसाहेबांचं साहित्य, स्मृती जपण्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा ही मागणीही करता आली असती. मात्र, दुर्दैवानं याच मातीचा पुत्र असणारे मराठी शायरीचे जनक भाऊसाहेबच यात उपेक्षितच राहिलेत. त्यांच्याच तत्कालिन शायरीतील संदर्भ आजच्या वर्तमान परिस्थित दुर्दैवाने खरे ठरलेत... भाऊसाहेब पाटणकर आपल्या शायरीत म्हणतात की.....
'अंतरीच्या यातनांना अमरता द्याया खरी
निर्मिला मी ताज माझ्या शायरीचा त्यावरी
वेगळा हा ताज हाही, या जरा घ्या पाहूनी
यमूनेसवे गंगाही येथे वाहते नयनांतूनी'...
मात्र, या संमेलनातील अनेक चांगल्या गोष्टींची पुढच्या काळात अनेक दिवस चर्चा होत राहील. सर्वात महत्वाचं म्हणजे या संमेलनाला भरभरून मिळालेल्या जनप्रतिसादाची. संमेलनातील वादांमुळे लोक संमेलनाकडे पाठ फिरवतील की काय?, अशी भीती होती. मात्र, ग्रंथदिंडीपासून तर समारोपापर्यंत लोकांच्या वाढत्या प्रतिसादानं यवतमाळकरांच्या साहित्य रसिकतेवर शिक्कामोर्तब केलं. यासोबतच पुस्तक विक्रीच्या दालनांवर तीनही दिवस झालेल्या गर्दीनं पुस्तकविक्रीनं लाखोंची उलाढाल केली. विशेष म्हणजे नवी पिढी वाचत नाही, अशी ओरड होत असतांना पुस्तक विक्री दालनांवर तरुणाईची गर्दी या समजाला खोटं ठरवत होती. यामुळेच संमेलन संपल्यानंतरही या दालनांसाठी एक दिवस वाढविण्यात आला, ही बाब वाचन संस्कृती परत बाळसं धरतेय या समजाला बळ देणारी आहे.
या संमेलनाचं मला जाणवलेलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनानं कविता आणि कवींना प्रचंड ताकद, उर्जा आणि संधी दिली. या संमेलनात तीन कवी संमेलनं आणि तिन दिवसही कवी कट्ट्यावर कवितांचा जागर झाला. यात थोडे-थोडके नव्हे तर तब्बल ५०० वर कवींना आपल्या कविता सादर करण्यासाठी व्यासपीठ प्राप्त झालं.
आतापर्यंतच्या सर्व साहित्य संमेलनातला हा कवींना मिळालेल्या संधीचा हा सर्वाधिक आकडा आहे. विदर्भाची बोली असलेल्या 'खास' वऱ्हाडी काव्य संमेलनात तर कवीसंमेलनातील उपस्थितीच्या गर्दीचा कळस गाठला. म्हणूनच यवतमाळच्या साहित्य संमेलनाला 'कवींचं साहित्य संमेलन' असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
पत्रकार, माणूस म्हणून आयुष्यात मी पाहिलेलं, अनुभवलेलं हे पहिलं साहित्य संमेलन. हे संमेलन मला माणूस आणि पत्रकार म्हणून आंतरबाह्य समृद्ध करणारं होतं. या संमेलनाच्या 'रिपोर्टिंग'च्या संधीनं मला साहित्याच्या अंतरंगात डोकावता आलं. ते विचार मनात साठवता आलेत.
साहित्यप्रेमींच्या गर्दीचं विराटरूप आपल्या डोळ्यात साठवता आलं. कधीकाळी शालेय पुस्तकातील कविता, पाठांतून वाचलेल्या लेखक-कविंना प्रत्यक्ष भेटता आलं, त्यांचे विचार ऐकता आलेत. यासोबतच या सोहळ्याच्या 'रिपोर्टिंग'साठी देशभरातून आलेल्या पत्रकारांचं नवं 'गणगोत' अन ऋणानुबंधही यातून जुळल्या गेलेत.
सध्या साहित्यातील साचलेपणावर मोठी चिंता व्यक्त होते आहे. मात्र, या संमेलनाच्या अनुषंगाने भेटलेले अनेक नवोदित कवी, लेखक, गझलकार प्रचंड ताकदीचे आहेत. त्यांच्या रुपानं मराठी साहित्यात येत्या काळात एका जबाबदारीनं सकस लिखाण करणारी नवी पिढी उदयाला येत आहे, हेही लक्षात आलं.
संमेलनं म्हणजे फक्त वाद नसतात, साहित्यातलं राजकारणही नसतं. मला वाटतं नवीन विचार पेरणारी प्रेरणास्थळं म्हणून आपण या संमेलनाकडे पाहावं. हा चष्मा सकारात्मकतेचा असला तरच पुढच्या काळात या मंथनातून साहित्यातील नव्या सृजनाचं 'अमृत' येणाऱ्या पिढीला मिळेल.
अनेक वादानंतरही यवतमाळचं साहित्य संमेलन बेमालुमपणे अनेक सकारात्मक संदेशही देऊन गेलं. नकारात्मकतेच्या वाळवंटाला कवटाळत बसण्यापेक्षा सकारात्मकतेची हिरवळ शोधण्याचा प्रयत्न मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक साहित्यप्रेमीनं करावा. कवीवर्य सुरेश भटांच्या भाषेत बोलायचं झाल्यास, यवतमाळचं साहित्य संमेलन एवढंच म्हणेल की,
'जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला
मी इथे अमृताचे रोपटे रूजवून गेलो'....
उमेश अलोणे, एबीपी माझा,अकोला
(या ब्लॉगमधील मते लेखकाची वैयक्तिक आहेत.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement