>> संतोष आंधळे


देशभरात आणि राज्यात शिथिलतेच्या नावाखाली अनेक गोष्टींना सुरुवात केल्याने हळूहळू जीवनमान पूर्वपदावर येत आहे. मात्र याचा अर्थ कोरोना नियंत्रणात आला आहे असा अर्थ काढून सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसून वावर ठेवणे चुकीचे आहे. रविवारी केंद्रीय सरकारने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल आला की सर्व नियमाचे पालन केले तर कोरोनाची साथ येत्या नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यापर्यंत नियंत्रणात येईल. त्यामुळे अनेकांना कोरोनाची साथ आता संपली आता कसंही वागले तर चालेल तर त्या सगळ्यांसाठी निर्वाणीचा इशारा आहे की समितीने साथ नियंत्रणात येईल पण त्याकरिता सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले पाहिजे. आपल्या राज्यात तर अनेक ठिकाणी मागच्या काही दिवसात मास्क न लावणाऱ्या व्यक्तींकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला गेला आहे आणि आजही वसूल केला जात आहे. समितीचा अहवाल जर योग्य ठरवायचा असेल तर नागरिकांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. काही पाश्चिमात्य देशात कोरोनाबाधितांचे रुग्ण पुन्हा मोठ्या प्रमाणात दिसल्याने पुन्हा लॉकडाउन केले जात आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे काही दिवसाने हिवाळा सुरु होत आहे अशा या वातावरण कोरोनाचे वर्तन कसे असेल हे अजून कुणी सांगू शकलेले नाही. त्यामुळे आपल्याकडे सध्या 'शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही' अशीच परिस्थिती आहे.


केंद्र सरकारने कोरोनाच्या सध्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी हैदराबादचे प्राध्यपक एम. विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली दहा तज्ञ सदस्यांच्या समितीची स्थापन केली होती. त्यांनी आपल्या अहवालात काही निरीक्षणे नोंदविली आहेत त्या पैकी एक असे की जर नागरिकांनी सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले तर साथ नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या काळात कोरोना नियंत्रणात येईल, असे सूचित केले आहे.


मात्र देशात सध्या सुरु असणारा आणि येणारा सणासुदीचा काळ आणि हिवाळा पाहता अशा पद्धतीने साथ खरोखरच नियंत्रणात येईल हे आताच सांगणे शक्य नाही. कारण सणासुदीच्या काळात अनेक नागरिकांच्या सामाजिक कारणामुळे भेटी होत असतात. शिवाय छोटेखानी का होईना कार्यक्रम सुरु झाले आहेत. आपल्याकडे शासनाने दिलेले सर्वच नियम नागरिक पाळतात असे नाही. 2009 सालात आलेल्या स्वाईन फ्लू या साथीचे आजही रुग्ण मिळत आहे. त्यामुळे कोरोना असा तात्काळ नाहीसा होणारा आजार नाही हे आपण सगळ्यांनीच मान्य केले पाहिजे. या पूर्वी अनेक वैद्यकीय तज्ञांनी जाहीरपणे सांगितले आहेच की कोरोनाची साथ कधी संपेल कुणालाही ठाऊक नाही. त्यामुळे जो पर्यंत कोरोना बाधितांची रुग्णवाढ मोठ्या पद्धतीने थांबत नाही किंवा मृत्यूचा आकडा नगण्य होत नाही तोपर्यंत सगळ्यांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.


याप्रकरणी, राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ शशांक जोशी सांगतात की, " पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत कोरोनाची साथ नियंत्रणात येईल या केंद्रीय समितीच्या मताशी मी असहमत आहे. कारण काही दिवसाने हिवाळा सुरु होणार त्या काळात कोरोना कशा पद्धतीने वाढेल त्याचे अनुमान आताच सांगणे कठीण आहे. या काळातील कोरोनाचे वर्तन अतिशय थंड असणाऱ्या भौगोलिक प्रदेशात कसे असेल हे पाहावे लागणार आहे. समितीने बाकी काही मत नोंदवले त्याच्याशी मी सहमत आहे. कारण अहवाल किंवा आकड्यांमुळे कोरोनाची साथ कमी होणार नाही. विशेष म्हणजे या काळात नागरिकांचे वर्तन कसे असणार आहे हे महत्त्वाचे आहे. जर नागरिकांनी सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसविले तर कोरोनाचा प्रसार होणार आहे. कोरोनाची साथ पसरू नये यासाठी नागरिकांची साथ महत्त्वाची आहे. त्यामुळे लोकांनी आजही जे काही सुरक्षिततेचे नियम आहेत त्याचे कडेकोट पालन केलेच पाहिजे.


राज्यात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून विविध महत्वाची पावले उचलली जात आहे. केंद्रीय समितीने कोरोनाच्या अनुषंगाने सर्व बाबींचा अभ्यास करून हे अनुमान व्यक्त केले आहे. मात्र त्याकरिता नागरिकांची साथ महत्त्वाची आहे. सध्या तरी जो पर्यंत लस येत नाही तोपर्यंत मास्क वापरणे अनिवार्य आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. मात्र आपल्याकडे मास्कचे खरोखरच पालन होते का महत्त्वाचा मुद्दा आहे. काही लोकं हा नियम मोडतात आणि त्यांच्यामुळे निरागस लोकं अडचणीत येत आहे. तरुणांना कायम वाटते की त्यांना काही होणार नाही. मात्र त्यांच्यामुळे आजूबाजूला असणारे वयस्कर मंडळींना या नियम न पाळणाऱ्या लोकांकडून प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण हे तरुण कदाचित लक्षणंविरहित असतील मात्र त्यांच्या या बेफिकिरीमुळे अन्य लोकांना त्रास होऊ शकतो. कोरोना नियंत्रणात आणण्याची सर्वस्वी जबाबदारी नागरिकांच्या हातात आहे. शासनाला ज्या उपाय योजना करायच्या आहेत ते त्यांचे काम करीत आहे. नागरिकांना त्यांच्या या प्रयत्नांना बळ देणे गरजेचे आहे.


शहरातील मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ अविनाश सुपे सांगतात की, " त्या समितीने अभ्यासाअंती ते अनुमान व्यक्त केले आहे. त्यामुळे ते गृहीत धरून चालण्या पेक्षा आपण या सगळ्या परिस्थितीत सुरक्षित कसे राहू याचा प्रत्येक नागरिकांनी विचार केला पाहिजे. हिवाळ्यात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थंडी पडते त्या ठिकाणी विषाणू कशा पद्धतीने तो राहतो यावर अनेक गोष्टी ठरणार आहे. साधारणतः थंड वातावरण विषाणूंसाठी पोषक असे वातावरण असते त्यांत धुके आणि धूळ याचा समावेश अधिक असलेल्या ठिकाणच्या नागरिकांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे. इटली फ्रान्स देशात पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ त्या देशांवर आली आहे. कारण तेथे कोरोनाची वाढ परत दिसून आली आहे. आपल्याकडे नागरिक साधे मास्क लावण्याचे नियम पळत नाहीत म्हणून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जात आहे, हे तर जे पकडले गेले त्यांच्याकडून दंड वसूल केला गेला यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात लोक नियमाचे पालन करणारे नसणारे असणार आहेत."


7 ऑक्टोबरला 'धोका टळलेला नाही !' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे, रुग्णसंख्येचा चढता आलेख उतरणीला लागला आहे. हे वास्तव असले तरी धोका मात्र अजिबात टळलेला नाही. कारण मागील काही काळातील आपण कोरोनाचे वर्तन बघितले तर लक्षात येते की ज्या ज्या ठिकाणची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या कमी झाली होती. त्या परिसरातील संख्या पुन्हा एकदा वाढीस लागली होती. त्यामुळे राज्यातील काही शहरात आणि जिल्ह्यात ही संख्या कमी होत असली तरी कधीही वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी रुग्णसंख्या कमी झाली असून सगळं काही आलबेल झालं आहे ह्या भ्रमात कदापीच न राहता अधिक सजग राहणे गरजेचे आहे. नाहीतर गफलत होऊ शकते. कोरोना रुग्ण बरे होत असले तरी अनेक रुग्ण असे आहेत की त्यांना घरी जाऊन त्यांना वेगळ्या काही व्याधींना सामोरे जावे लागत असून वेळ प्रसंगी रुग्णालयात पुन्हा उपचाराकरिता दाखल करावे लागत आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून त्यापासून सुरक्षित राहायचे असल्यास सध्याच्या घडीला एक उपाय आहे तो म्हणजे सुरक्षिततेचे नियम पाळणे. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली आहे, ही दुसरी लाट आहे, की आता पिक आहे हे शास्त्रीय आधारावर अजून कुणी सांगू शकलेले नाही, प्रत्येक जण आडाखे बांधत आहे. त्यामुळे कोरोना येत्या काळात कसा वागेल याचा थांगपत्ता कुणालाच नाही. अर्थव्यवस्था हळू हळू पूर्वपदावर येण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्याचा कुणीही गैरफायदा न घेता केवळ आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, कारण कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही.


कोरोनाची साथ जेव्हा केव्हा आटोक्यात काय किंवा नियंत्रणात यायची असेल ती येईल. आता या साथीने बराच काळ आपल्या देशात आणि राज्यात घालविला आहे त्यामुळे या साथीच्या आजाराच्या लांब राहायचे असेल तर काय केले पाहिजे याची जाणीव बहुतांश नागरिकांना आली आहे. त्या पद्धतीने आपला वावर सुरक्षित असला पाहिजे यावर भर देणे गरजेचे म्हणजे तुम्हाला कुठल्या आजाराची लागण होणार नाही.





संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग 


Tags: