BLOG | रेमेडिसिवीर आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन
अमेरिकेतील गिलियाड सायन्सेस या औषध कंपनीकडे ‘रेमडेसीवीर या औषधाचे पेटंट आहे. अनेक देशातील औषध कंपन्या या औषध निर्मितीसाठी गिलियाड सायन्सेसच्या संपर्कात आहेत. रेमडेसीवीर हे औषध प्राथमिकरीत्या इबोला, सार्स या आजाराकरिता बनवलं गेलं होतं.
>> संतोष आंधळे
पूर्वीच्या काळी ढोभळ मानाने विचार करायला गेले तर डॉक्टर कोणते औषध रुग्णाला देतायत हे कुणाला फारसं लवकर कळत नव्हतं. एवढंच माहिती होतं की डॉक्टर जे काही करतील ते चांगलंच असेल. मात्र काळ बदलला इंटरनेटच्या युगात आता डॉक्टरांना जी औषध माहित नसतील त्याचं अगाध ज्ञान आता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना असतं. सध्याच्या या कोरोनाकाळात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि रेमेडिसिवीर ही औषधं चांगलीच चर्चेत आली आहेत. वैद्यकीय तज्ञांच्या मते या दोन्ही औषधांचा कोरोना उपचारात किती फायदा किंवा तोटा दोन्ही सांगणं आताच्या घडीला अवघड आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या काही जणांनी प्रतिबंधात्मक औषध म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध घेऊनही झाले आहे. या दरम्यान, कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी राज्य शासन ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनच्या 10 हजार व्हॉयल्स घेणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानंतर आता या औषधाची चर्चा सुरु झाली आहे.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनऔषधाची चांगलीच चलती होती. खरंतर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन भारतात बनवलं गेलेलं औषध आहे. हे औषध प्रामुख्याने मलेरिया आणि आणि संधिवाताकरिता वापरलं जातं. अमेरिकेनेही आपल्याकडे या औषधाविषयी मागणी केली होती. त्यानंतर या औषधाबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली. लॅन्सेट या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित वैद्यक क्षेत्रातील संशोधन पत्रिकेमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवर पेपर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामध्ये या औषधाच्या उपयुक्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. त्यानंतर हे औषध वापरू नये असं जागतिक स्तरावरून सांगण्यात आलं. अर्थात दोन दिवसापूर्वीच लॅन्सेट याच पत्रिकांमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन बाबत यापूर्वी जाहीर केलेला अभ्यास मागे घेतला आहे. आपला अभ्यास चुकीचा असल्याचे यामध्ये म्हटले आहे. लॅन्सेटने अशा पद्धतीने पेपर मागे घेण्याची ही ऐतिहासिक घटना आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराबाबत कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले आहे. कारण लॅन्सेटमध्ये एखादी गोष्ट प्रसिद्ध झाली की ती जगभरातील डॉक्टर मान्य करत असतात आणि त्याचा दाखला देऊन आपल्या उपचारपद्धतीमध्ये बदल करत असतात. आता काही डॉक्टर लॅन्सेटवर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न विचारू लागलेत.
शनिवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनच्या 10 हजार व्हॉयल्स घेण्यात येणार असल्याचे सांगितले. या औषधांबाबत बोलताना ते म्हणाले, "‘रेमडेसीवीर’ हे इंजेक्शन अॅण्टी व्हायरल आहे. ‘सार्स’ आजारासाठी वापरण्यात आलेले हे इंजेक्शन त्यावर उपयुक्त ठरल्याने कोरोनावरही ते उपयुक्त ठरू शकते असे जागतिक आरोग्य संघटनेने सुचविले आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर या इंजेक्शनचा उपयोग चांगला होऊ शकेल. त्यामुळे राज्य शासनाने 10 हजार इंजेक्शन व्हायल्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) या इंजेक्शनची खरेदी केली जाणार आहे. आतापर्यंत काही रुग्णांकडून हे इंजेक्शन वैयक्तीकरित्या खरेदी करून त्याचा वापर झाला आहे. मात्र सर्वसामान्य रुग्णांना ते घेणे परवडणारे नसल्याने शासनाने त्यांच्यासाठी हे इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे इंजेक्शन उपलब्ध झाल्यावर त्याच्या वापराबाबत प्रमाणित पद्धत (एसओपी) तयार केली जाईल.
याप्रकरणी पुणे येथील केईएम रुग्णालयाचे श्वसनविकारतज्ञ, डॉ. स्वप्निल कुलकर्णी सांगतात की, "रेमडेसीवीर हे विषाणू विरोधक औषध असून इंग्लंडमध्ये या औषधाच्या काही चाचण्या केल्यानांतर पेपर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये रुग्णांना ह्या औषधाने बरे होण्याचा कालावधीत घट दिसून आली आहे. काही चांगले निकाल दिसत आहे. यावर आणखी अभ्यास झाला पाहिजे. मात्र आपल्याकडे हे औषध उपलब्ध नाही ते वापरल्यानंतरच त्याच्याबद्दल अधिक बोलणे उचित ठरेल. तसे तुलनेनं हे औषध महाग आहे, येणाऱ्या काळात आपल्याला याची किती उपयुक्तता आहे ते कळून येईल. "
अमेरिकेतील गिलियाड सायन्सेस या औषध कंपनीकडे ‘रेमडेसीवीर या औषधाचे पेटंट आहे. अनेक देशातील औषध कंपन्या या औषध निर्मितीसाठी गिलियाड सायन्सेसच्या संपर्कात आहेत. रेमडेसीवीर हे औषध प्राथमिकरीत्या इबोला, सार्स या आजाराकरिता बनवलं गेलं होतं. मात्र या कंपनीने हे औषध कोरोनाबाधित गंभीर रुग्णांवर चांगलं काम करत असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाच्या चाचण्यांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर तेथील औषध नियंत्रकांनी यास परवानगी दिली आहे.मुंबई येथील ग्लोबल रुग्णालयाचे श्वसनविकारतज्ञ डॉ. समीर गर्दे यांच्या मते, "आम्हाला रुग्णांसाठी जे औषध चांगले आहे ते आम्ही वापरू. जे काही माध्यमांमध्ये आणि मेडिकल जरनलमध्ये थोडंसं वाचनात आलेलं आहे. अजूनही या औषधांबाबतचे ठोस पुरावे येणं अजून बाकी आहे. कोरोनासाठी आपल्याकडे डॉक्टर सध्या जी औषध वापरत आहेत, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकानेच आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवली पाहिजे. लोकांनी वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे लोकांनी अंगावर दुखणी काढू नये. या आजारात वेळेत उपचार मिळालेल्या रुग्णांचा बरा होण्याचा दर चांगला आहे. "
कोरोनाच्या या काळात अनेक नवनवीन गोष्टी येत आहेत. त्या शास्त्रीय सिद्धांतावर किती टिकतात हे पाहणं गरजेचं आहे. अजूनही अनेक देश या आजारावर औषध बनवत आहेत. काही काळाने त्या सुद्धा आपलं औषध हे कोरोनासाठी गुणकारी असल्याचा दावा करतील. यामध्ये सर्वसामान्य नागरिक फक्त या औषधाची माहिती गोळा करून आपल्या रुग्णांसाठी हेच अमुक औषध द्या म्हणून मागणी करतील. त्यावेळी डॉक्टरांनी नेमकं काय करायचं हा एक मोठा प्रश्न निर्माण निर्माण होईल.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं