>> संतोष आंधळे
कोरोना काळात जशी कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय त्याप्रमाणे रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या काळात सगळंच काही वाईट होतंय असं नाही. जर समाज माध्यमांवर काही दिवसापासून बघितलं असेल तर तुमच्या एक लक्षात आले असेल की लहान मुले कोरोनाच्या या आजारातून मुक्त होण्याचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. काल खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर हॅण्डलवरून एक छोटासा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला. त्यामध्ये 36 दिवसाचं बाळ सायन रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन घरी जात आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते संपूर्ण जगात एकंदर लहान मुलांना कोरोना झाल्यानंतर योग्य उपचाराअंती बरे होण्याचं प्रमाण सर्वात अधिक आहे. कोरोनाच्या या महाभयंकर संकटात, लहान मुलांना या आजाराचा संसर्ग होतोय आणि झालाच तर लहान मुले बरे होतायत, अशा या वातावरणातील हे एक आशादायी चित्रच म्हणावे लागेल.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग दररोज राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल तयार करत असून, यामध्ये त्यांनी कोरोनाबाधित लहान मुलांची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी 10 वर्षापर्यंतच्या मुलांची आकडेवारी वेगळी तर 10-20 वयोगटातील मुलांची आकडेवारी जाहीर केली आहे. या विभागाने 29 मे रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, ज्या 56 हजार 760 रुग्णाचा आकडा घेऊन विश्लेषण केले आहे. त्यानुसार 10 वर्षापर्यंतच्या 2032 मुलांना कोरोनाची बाधा झाली असून 11-20 वयोगटातील 3861 मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विषेश म्हणजे या वयोगटात मृत्यू होण्याचं प्रमाण अतिशय नगण्य आहे.
काही दिवसापूर्वीच पवई येथील हिरानंदानी हॉस्पिटल येथून 18 दिवसाच्या बाळाला डिस्चार्ज देण्यात आलाय. त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या रुग्णालयात कोविड पॉझिटिव्ह म्हणून दाखल करण्यात आले होते. त्या बाळाचा जन्म एका खासगी नर्सिंग होममध्ये झाला होता. जन्म झाल्यापासून त्या बाळाला ताप आणि श्वसनाचा विकार जाणवू लागला होता. आश्चर्य म्हणजे आईची चाचणी मात्र कोरोना पॉझिटिव्ह नव्हती. 16 दिवसाच्या डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर बाळाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर बाळाला डिस्चार्ज देण्यात आला, अशी अनेक चांगली उदाहरणे राज्यात आणि देशात आहेत.
याप्रकरणी, वैजापूर येथील नवजात शिशु तज्ज्ञ डॉ अमोल अन्नदाते सांगतात की, "लहान मुलांमध्ये या विषाणू विरोधात चांगल्या प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे जगभरात या आजरामुळे लहान मुलांमध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण अत्यल्प असून बरे होण्याचा दर तरुणांपेक्षा जास्त आहे."
पालकांनी आपल्या पाल्याकडे या काळात व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे. त्यांनी व्यवस्थित हात चांगले धुतले की नाही याकडे पाहावे. शिवाय सकस अन्नाचे सेवन करणे, शक्यतो बाहेरचे खाद्य पदार्थ टाळावेत. चेहऱ्याला स्पर्श करू नये, शिंकताना, खोकताना तोंडावर रुमालाचा वापर करणे. भरपूर विश्रांती घेणे. हात स्वच्छ धुणे, साबण किंवा हँड सॅनिटायझरचा वापर करावा.
दुसरीकडे आणखी एक गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे ती म्हणजे कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत असताना अनेक गरोदर मातांना जर या आजाराची लागण झाली तर त्यांचं पूर्ण कुटुंब अडचणीत यायचे. विशेष म्हणजे मुंबई महापालिका रुग्णालयात 200 पेक्षा जास्त गरोदर माता या ज्या कोरोनाने बाधित होत्या, त्यांना डॉक्टरांच्या दक्षतेमुळे त्यांच्या नवजात बाळांना कोरोनाची लागण झालेली नसल्याचे दिसून आले आहे.
"खरं सांगायचं यावर अनेक ठिकाणी संशोधन सुरु आहे. मात्र हे वास्तव आहे की लहान मुलांमध्ये कोरोनामुळे बरे होण्याचं प्रमाण अधिक आहे, मात्र याचं नेमकं असं शास्त्रीय कारण सांगणं सध्याचा घडीला सांगणे अवघड आहे. विशेष म्हणजे या आजारामुळे लहान मुलांमध्ये मृत्यदर अत्यल्प आहे. परंतु लवकरच याची उत्तर मिळतील, खरी लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही जमेची बाजू आणि आशादायक चित्र आहे असं म्हणायला हरकत नाही" असे, बालरोग तज्ज्ञ डॉ समीर दलवाई सांगतात.
काही दिवसांनी पावसाळा सुरु होणार असून या काळात आता लहान मुलांची अजून काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुलांची दुखणी कोणत्याच कुटुंबाना आवडत नाही. कोरोनाच्या या काळात लहान मुले सुरक्षित असल्याची माहिती खूप सुखदायक अशी आहे. मात्र त्यातूनच अशी लहान बाळ आणि मुले कोरोनामुक्त होत असण्याच्या बातम्या कानावर पडल्या किंवा प्रसारमाध्यमांवर पहिल्या तर जगण्याला बळ प्राप्त होतं. अशा पद्धतीच्या सकारात्मक बातम्या पहिल्या की कोरोबद्दलची भीती आपोआपच दूर होते.ज्या पद्धीत्ने कोरोनाबाधितांचे मृत्यू संबंध राज्यात होत आहे, त्यामुळे भीतीदायक वातावरण पसरले आहे. म्हणून कधी कधी असं वाटतं लहान पण देगा देवा.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | सह्याद्रीच्या मदतीला देवभूमी?
- BLOG | 'नवरक्षक' पीपीई किट ठरणार वरदान
- BLOG | पांगळी मुंबई कुणाला आवडेल?