BLOG : पदवीधारकांचं भविष्य अंधारातच..?

कोरोना व्हायरसमुळे प्रत्येक क्षेत्राला फटका बसला आहे. शैक्षणिक क्षेत्राला याचा बसलेला फटकाही प्रचंड मोठा आहे. मागील वर्षात कोरोनामुळे अनेक परीक्षा ऑफलाइन न होता ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. तर काही परीक्षा मात्र रद्दच करण्यात आल्या होत्या. अंतिम वर्षातील परीक्षा मात्र ऑक्टोबर- नोव्हेंबरला ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात आली होती. अगदी काहीच दिवसांत विद्यार्थ्यांच्या हातात पदवीची गुणपत्रिका पडणार होती. पण, कोरोना बॅच, कोरोना ग्रॅज्युएट, 2020 बॅच, ऑनलाइन परीक्षेवाले असे वेगवेगळे टॅग या विद्यार्थ्यांना लावण्यात येत होते. हे सगळं सहन करीत ग्रॅज्युएट झालेल्या काही विद्यार्थ्यांनी मास्टर करण्याचा निर्णय घेतला, काहींनी आर्थिक सोय व्हावी म्हणून तात्पुरती कुठेतरी नोकरी स्वीकारली. काही जण आजही घरातच बसून आहेत.
2020 बॅचला फायदा असा होता की, त्यांची फक्त अंतिम वर्षातली अंतिम परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाली होती. परंतु 2021 या बॅचचं संपूर्ण शैक्षणिक वर्षच ऑनलाइन झालं. ऑनलाइन लेक्चर, ऑनलाइन सबमिशन्स, ऑनलाइन प्रेझेंटेशन, ऑनलाइन वायवा, ऑनलाइन परीक्षा ते ऑनलाइन फेअरवेल असं सर्व काही ऑनलाइनचं पार पडलं. त्यामुळे पदवीला प्रवेश घेताना रंगवलेली भविष्याची स्वप्नं आता अंधारातच राहणार का, असा प्रश्न उपस्थित होतो. वर्षभर कॅम्पसमध्ये मुलाखती घेण्यासाठी कुणीच न आल्यामुळे या विद्यार्थ्यांना चांगली नोकरी मिळविण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागणार आहे. एकीकडे शैक्षणिक कर्जाच्या रकमेचं ओझं तर दुसरीकडे नोकरीच्या शोधात खर्च होणाऱ्या पैशाचं गणित सोडवावं लागणार आहे. काही कोर्सेसमध्ये अंतिम वर्षांतील प्रॅक्टिकल्सला महत्तवाचं स्थान असतं. परंतु ऑनलाइन लेक्चर्समुळे प्रॅक्टिकल्सवरही मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या आहेत. अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप हा देखील महत्त्वाचा भाग असतो. महाविद्यालयांत जास्तीत जास्त थेअरीवर भर दिला जातो. त्यामुळे प्रत्यक्ष काम कसं चालतं ते शिकण्यासाठी विद्यार्थी इंटर्नशिप करीत असतात. पण, यंदा मात्र वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे त्यालाही विद्यार्थ्यांना मुकावं लागलं आहे.
ऑनलाइन परीक्षांबाबतचा निर्णय होताच काही विद्यार्थ्यांमध्ये निराशा जाणवली तर काही विद्यार्थी मात्र प्रचंड खूश झालेले दिसले. ऑफलाइन परीक्षेत हुशार विद्यार्थी सविस्तर उत्तरे लिहित चांगले गुण मिळवत असतात. या विद्यार्थ्यांना मात्र ही 'मल्टीपल चॉइस क्वेश्चन' पद्धत आवडली नाही. तर दुसरीकडे ऑफलाइन परीक्षा होणार म्हणून आनंदात उड्या मारणारे विद्यार्थी मात्र यातही छुप्या मार्गाने कॉपी करत चांगल्या गुणांनी पास होणार आहेत. ऑनलाइन परीक्षा होणार म्हणून ऑफलाइन परीक्षेचा ज्याप्रकारे विद्यार्थी अभ्यास करत असतात तसं चित्र यंदा मात्र पहायला मिळाले नाही.
काही महाविद्यालयांत परीक्षेत कोणते प्रश्न येऊ शकतात याची यादीच विद्यार्थ्यांना देण्यात आली, तर काही महाविद्यालयांत याच मुद्यांचा फक्त अभ्यास करा असे सांगण्यात आले. काही महाविद्यालयांनी परीक्षेच्या दृष्टीने कोणते मुद्दे महत्वाचे आहेत तेच फक्त विद्यार्थ्यांना शिकवले. तर काही ठिकाणी प्रॅक्टिकल्सला पूर्णपणे वगळण्यात आले. प्रॅक्टिकल्सला वगळण्याने भविष्यात मात्र या विद्यार्थ्यांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे. ऑनलाइन परीक्षा दिल्याने आपल्याला चांगली संधी मिळणार नाही अशी भीती विद्यार्थ्यांना वाटते आहे. विद्यार्थ्यांना नोकरी देताना मुलाखतकाराने फक्त अंतिम वर्षाची गुणपत्रिका न पाहता इतर चार सेमिस्टरच्याही गुणपत्रिका पाहाव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात किती सातत्य आहे ते कळण्यास मदत होईल.

























