एक्स्प्लोर
उत्सवांचा राजा गणेशोत्सव
उत्सव प्रत्यक्षात सुरु होण्याआधीचे काही दिवस कधी मध्यरात्री तर कधी पहाटेपर्यंत जागरण करुनही ताजेतवाने असलेले कार्यकर्ते या उत्सवात नव्या ऊर्जेने सहभागी होत असतात. त्यात रिकाम्या स्टेजवर, रिकाम्या चौरंगावर बाप्पांचं आगमन झाल्यावर तो मंडप काहीतरी वेगळाच भासू लागतो. त्याच्या प्रत्येक कणाकणात मोरयाचा स्पर्श जाणवतो, त्याच वेळी तो घरापेक्षाही प्रिय वाटू लागतो.
गणपती बाप्पा मोरया.... मंगलमूर्ती मोरया..... अवघ्या मुंबईसह महाराष्ट्रात हा गजर सध्या घुमतोय. वातावरण उत्साहाने भरलेलं आणि भारलेलं आहे. खास करुन दक्षिण मुंबईत जर तुम्ही गेलात, तर तुमचा पायही तिथून निघणार नाही. गिरगावात राहण्याचा हा एक फायदा आहे, तुम्ही सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत होता. खास करुन सण आणि उत्सवांची मजा, त्याची परंपरा, त्यांची वैशिष्ट्यं हे सारं काही तुम्हाला इथेच अनुभवायला मिळतं. किंबहुना ते सण किंवा उत्सव तुम्ही फक्त साजरे करत नाही तर अक्षरश: जगता. विशेषत: चाळींमध्ये. त्यातही गणेशोत्सव आणि घरच्यापेक्षा सार्वजनिक उत्सव हा अगदी मनाजवळचा. म्हणजे जेव्हा उत्सव आयोजनाच्या पहिल्या मीटिंगची नोटीस लागते, तेव्हाच मनात उत्साहाचा मंडप आकार घ्यायला लागतो, बाप्पा वर्षभरच मनात असतात, यावेळी ते आपल्या सोबत असल्याची जाणीव आणखी घट्ट होते, त्याचवेळी ते भेटायला येणार या नुसत्या जाणीवेने मन उचंबळून उठतं.
मग मीटिंगसोबतच कामांचं नियोजन, कोण वर्गणीवर भर देतं, तर कोण सजावटीची जबाबदारी घेतं. कोण उत्सवाच्या स्मरणिकेचं काम पाहतं. तर, कोण स्पर्धा आयोजनाची तयारी सुरु करतं. हा उत्सव म्हणजे मॅनेजमेंटचं एक उत्तम उदाहरण आहे. वेगळा डिग्री किंवा डिप्लोमा कोर्स लावायची गरज नाही.
मॅन मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट सारं काही एकाच मंचावर शिकता येतं, तेही अनुभवाची शिदोरी समृद्ध करत, एकही पैसा न घालवता. मी तर म्हणतो, आताच्या पिढीने म्हणजे २०-३० वय असलेल्या पिढीने हे स्किल्स शिकत उत्सव पुढे न्यावेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
या गणेशोत्सवामुळे उत्साह नुसता संचारलेला असतो. कामावरुन कितीही वाजता घरी आलो तरी, पूर्वतयारी सुरु असलेल्या मंडपातली एक विझिट अंगात नवचैतन्य निर्माण करते.
म्हणजे नुसतं दहीहंडीच्या सुमारास मंडप बांधणीच्या साहित्यावर नजर पडली तरीही मन विलक्षण आनंदून जातं. मग बाप्पांच्या आगमानासाठीची एकेक दिवसाची प्रतीक्षा एकेक वर्षासारखी वाटायला लागते. तयारीने वेग घेतलेला असतो, त्यापेक्षा जास्त वेगाने मन बाप्पाच्या आगमनासाठी आतुर होऊन पळत असतं.
यंदाचं आमचं ९० वं वर्ष. त्यात आमची ९२ वर्ष जुनी चाळ. म्हणजे खरोखरच चाळ या शब्दाची प्रत्यक्ष अनुभूती देणारी. घराच्या पुढे मागे गॅलरी, मजल्यावर २०-२० रुम्स. दोन्ही बाजूला जिने आणि कंपाऊंड असणं ही आमच्या चाळीतली चैन आहे. या मजल्याच्या चौकांमध्ये होणाऱ्या गणपतीच्या मीटिंग्जही आम्ही एन्जॉय करत आलोय. म्हणजे मुख्य कार्यक्रमांची बैठक संपायची ती १२ च्या सुमारास नंतरचे दोन तास आमच्या अन्य गप्पा. एरवी बाजूच्या घरात राहणारा आमचा मित्रही आम्हाला खऱ्या अर्थाने भेटतो तो या गणेशोत्सवाच्या निमित्ताने.
मग तो हवाहवासा दिवस येतो आणि मोरया मोरयाचा गजर होत बाप्पा आमच्या मंडपात विराजमान होतो. उत्सव प्रत्यक्षात सुरु होण्याआधीचे काही दिवस कधी मध्यरात्री तर कधी पहाटेपर्यंत जागरण करुनही ताजेतवाने असलेले कार्यकर्ते या उत्सवात नव्या ऊर्जेने सहभागी होत असतात. त्यात रिकाम्या स्टेजवर, रिकाम्या चौरंगावर बाप्पांचं आगमन झाल्यावर तो मंडप काहीतरी वेगळाच भासू लागतो. त्याच्या प्रत्येक कणाकणात मोरयाचा स्पर्श जाणवतो, त्याच वेळी तो घरापेक्षाही प्रिय वाटू लागतो.
म्हणजे हल्लीच्या खाजगी नोकऱ्यांमुळे रजांवर असणारी बंधनं यामुळे सुट्टी तर फार मिळतच नाही. पण, आमच्या बाबांच्या जनरेशनची मंडळी जेव्हा या उत्सवात एकत्र येतात, तेव्हा सांगतात, आम्ही किमान २०-२० जण १० च्या १० दिवस रजा घ्यायचो रे, त्यातही १० जणांकडे तरी घरी गणपती असायचा. तरीही सगळे मंडपात असायचो सकाळी ८ पासून. रात्री झोपेपर्यंत. अगदी रात्री झोपायलाही काही मंडळींचा मुक्का म्हणजे स्टेज. त्या स्टेजवरच्या लाकडी फळ्यांवर आणि त्या गरगरणाऱ्या मोठ्या फॅनसमोर जी समाधानाची झोप लागते ना, ती महागड्या एसी रुममध्ये आणि अंगाला गुदगुल्या करणाऱ्या मऊलुस्स गादीवरही लागत नाही. त्या १० दिवसांमध्ये जेवण हे नावाला असतं. पोट तर मंडपातच भरत असतं. बाप्पांचं दर्शन घेऊन, ते वातावरण जगून. म्हणजे माझ्या पिढीने तर स्पर्धक ते आयोजन समिती सदस्य असा प्रवास आता केलाय. त्याचं थ्रिल आणखी वेगळं आहे. म्हणजे ज्या स्टेजवर एकेकाळी मी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. फॅन्सी ड्रेसमध्ये सहभागी व्हायचो. त्याच स्टेजवर आज आमची मुलं भाग घेताना एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतं, माझी खात्री आहे, हाच फिल आमच्या बाबा मंडळींनी आमच्या लहानपणीही घेतला असेल.
एरवीच्या कोणत्याही स्पर्धेत कितीही मोठं पदक मिळवा, कितीही मोठ्ठालं बक्षीस मिळवा, गणेशोत्सवात मिळालेल्या बक्षिसांची सर त्या कशालाही नाही. त्यातही हल्ली आम्ही मंडळी त्या त्या वयोगटानुसार योग्य अशी बक्षीस आणण्यासाठी जरा जास्त मेहनत करतो. म्हणजे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किंवा बॅग्ज, जरा मोठ्या मुलांना वॉलेट्स आणि तत्सम. एरवी घरी काही आणायचं असेल तर १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ खरेदीला लागला की, मी घामाघूम होतो, इरिटेट होतो. पण, या बक्षिसांसाठी चार-चार तास फिरतानाही पाय फेरारीच्या वेगाने पळत असतात. या उत्सवातल्या स्टेजवरुन जे मिळतं, ते अनमोल आहे, निदान माझ्यासाठी तरी. उत्सवातले विविध दिवसातले कार्यक्रम तर खास असतातच.
म्हणजे ते मोठमोठ्या प्रोफेशनल कलाकारांचे नसले तरीही स्थानिक कलागुणांना वाव देणारे असल्याने त्याचं मोल जास्त. त्यातही आमच्याकडचा स्नेहसंमेलन, श्रीसत्यनारायण महापूजा आणि महाआरतीचा दिवस म्हणजे आमच्यासाठी आमचं श्याम सदन कुटुंब एकत्र येण्याचा सुखसोहळाच. फक्त शरीराने बाहेर गेलेले, पण मनाने नेहमीच्या आमच्यासोबत असलेले माजी रहिवासीही आवर्जून उपस्थित राहतात, काही वेळा अगदी अमेरिकेतूनही उत्सवासाठी पोहोचतात. कटू-गोड आठवणी शेअर होतात. आमच्या उत्सव आयोजन करणाऱ्या टीमला ही मंडळी भेटतात. एकमेकांचे हात हातात घेतले जातात, एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिलं जातं. ज्याची उब वर्षभर सोबत घेऊन आम्ही जगत असतो. प्रीतीभोजनही असतं, सोबत.
पण, पोट आधीच भरलेलं असतं. त्यामुळे तिथे काय जेवलो, काय मेन्यू होता, रिअली डझंट मॅटर. त्या मंडळींची भेट ही पंचपक्वान्न भोजनापेक्षाही जास्त लक्षात राहणारी असते, धावपळीमुळे धकाधकीच्या झालेल्या आयुष्याला गोड चव देणारी. मग अनंत चतुर्दशीचा मन गलबलून टाकणारा दिवस. बक्षीस समारंभ, महाआरती झाल्यावर आम्ही विसर्जनाला निघतो, जड अंत:करणाने. मनात असंख्य आठवणी रुंजी घालत असतात अगदी मीटिंगपासून ते कार्यक्रमांपर्यंतच्या. म्हणजे ढोल-ताशांच्या गजरातही या उत्सवातल्या प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक क्षणाची आठवण मन शहारुन टाकत असते. त्या ढोलच्या आवाजापेक्षाही अधिक.
गिरगाव चौपाटीवर बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन करताना आमच्या मनात अन् डोळ्यातही त्या समुद्रापेक्षा मोठा अश्रूंचा सागर असतो. बाप्पा सोडून जातायत ही भावना स्वीकारणं खरंच कठीण असतं. आमची इमारत सोडून गेलेले अन् गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी बाप्पाच्या दर्शनाला आवर्जून उपस्थित राहणारे माजी रहिवासी, ज्यांच्या फिटनेसला सलाम ठोकावासा वाटतो, ते ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचं वाक्य मग आठवतं, 'जब तक साँस मे साँस है तब तक आता रहूँगा.' ग्लॅमरच्या चमचमत्या दुनियेत राहून, आलिशान मर्सिडिजमधून फिरणारा, लॅव्हिश जागेत राहणारा हा स्टार असं म्हणतो, ते ऐकून प्रत्येक वर्षी त्याला मनोमन सलाम ठोकतो, आपण. जो अभिनेता वयाच्या १८-१९ व्या वर्षी ही जागा सोडून गेलाय, तो आज वयाच्या ७६ व्या वर्षीही पहिल्या दिवशी न चुकता हजेरी लावतो, मनोभावे आरती करतो, आस्थेवाईकपणे आपल्या मित्रपरिवाराशी अस्खलित मराठीत दिलखुलास गप्पा मारतो. सारं काही विस्मयचकित करणारं.
विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीचं मंडपातलं वातावरण मात्र मन विषण्ण करणारं असतं. म्हणजे बाप्पांच्या आगमनाआधी आतुरलेला मंडप आता ओसाड, उजाड वाटायला लागतो. तो रिकामा चौरंग पाहून सुरु होणारे अश्रूंचे पाट थांबता थांबत नाहीत. मग मोबाईलमधल्या फोटोंचा रुमाल करुन हे अश्रू पुसण्याचा एक प्रयत्न सुरु होतो. सारं काही परत आठवू लागतं. म्हणजे केवळ आपल्याच नव्हे तर इतर मंडळांमध्ये आपण दिलेल्या भेटींपासून, आलेल्या पाहुण्यांपर्यंत. मोबाईलपेक्षा भारी मेमरी असलेलं मन त्यावेळी रितं होत असतं अन् पुढच्या वर्षीच्या आगमनाची तुतारीही फुंकू लागतं. मनाचा ढोलताशा पुन्हा निनादून लागतो...गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया....
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement