Appasaheb Dharmadhikari: व्रतस्थ कर्मयोगी!
श्रीमत दासबोधाचं निरुपण करून समाजमनात सकारात्मक बदल करण्याचा यज्ञ ज्येष्ठ निरूपणकार डॉ. श्री. नारायण विष्णू ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांनी आठ दशकांपूर्वी सुरू गेला. हा यज्ञ त्यांचे चिरंजीव ज्येष्ठ निरुपणकार तसेच पद्मश्री किताबाने सन्मानित डॉ.दत्तात्रेय ऊर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पेटता ठेवला आहे. एवढंच नाही तर आता आप्पासाहेबांचे चिरंजीव सचिनदादा धर्माधिकारी यांनीदेखील याच कार्यात स्वत:ला झोकून दिलं आहे. आता तर ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी हे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी झाले आहेत. ही त्यांच्या समाजकार्याला मिळालेली राजमान्यता म्हणावी लागेल.
समाजातील व्यसनाधीनता, अंधश्रद्धेवर आघात करून समाजमन घडवणाऱ्या नानासाहेबांचं, आप्पासाहेबांच्या आणि सचिनदादांनी हे काही सहज करून दाखवलेलं नाही. विवेकातून वैराग्य मिळवलेल्या ज्येष्ठ निरूपणकार ड़ॉक्टर श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांना समाज मनाच्या ह्दयात अढळ स्थान मिळवलं आहे. अत्यंत साधी राहणी, तेवढीच साधी वेशभूषा आणि सर्व विकारांकडे पाठ फिरवण्याचं सामर्थ्य असलेल्या नानासाहेबांनी आणि आप्पासाहेबांनी दासबोधाच्या माध्यमातून समर्थांची शिकवण सर्वसामान्यापर्यंत पोहोचवली. त्यापूर्वीही दासबोध वाचला जायचा मात्र, आप्पासाहेबांनी याच दासबोधावर निरूपण केलं आणि त्यातून समर्थ समाज घडवला. म्हणूनच आज कोट्यवधी लोक श्रीसेवक बनू शकलेत. त्यांचं आयुष्य बदलून गेलं आहे.
ज्येष्ठ निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1945 मध्ये त्यांनी श्री समर्थ प्रासादिक आध्यात्मिक सेवा समितीची स्थापना करून खऱ्या अर्थानं समाज प्रबोधनाचा पाया रचला. त्यावेळी त्यांच्यासोबत होते अवघे सात समर्थ सेवक. संतांचं कार्य पुढे नेणाऱ्या नानासाहेबांना तत्कालीन समाजाच्या निंदा, नालस्ती, टीकेला तोंड द्यावं लागलं होतं. मात्र, श्रवण बैठकीच्या माध्यमातून होणारं निरूपण आणि त्यातून बदलणारा समाज पाहून हळुहळू नानासाहेबांना विरोध कमी होत गेला. इतकेच कशाला खुद्द विरोध करणारे नंतर दासबोधावर होणाऱ्या श्रवण बैठकीला बसू लागले. नानासाहेब धर्माधिकारी यांनी निरुपणातून समाज घडवायला सुरुवात केली. त्यांचं हेच कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू ठेवलं. धर्माधिकारी आणि श्रवणाची बैठक हे अनोखं समीकरण आहे. बैठकीमुळे मनुष्याच्या मनावरील भावनेचा पडदा दूर होऊन तो कर्तव्यदक्ष होतो. समाजातल्या जाती आणि धर्माच्या भिंती कोसळून पडतात. धर्म-अर्थ-काम-मोक्ष यांचा नेमका अर्थ कळतो. अंधश्रद्धा, अज्ञान, अनिष्ठ रूढी, व्यक्तिपूजा नष्ट होतात.
या श्रवण बैठकांना येणाऱ्यांचं आयुष्यच बदलून जातं, हा अनुभव आहे. त्यांचा चुकीचा मार्ग बदलला जातो. समाज व्यसनमुक्त होऊ लागतो. त्यांना परमार्थ म्हणजे काय याची जाणीव होऊ लागते. आपण देशाच्या, समाजाच्या, आईवडिलांच्या ऋणात आहोत याची जाणीव करून दिली जाते. यातूनच समर्थ समाजाचा पाय घातला गेला. या श्रवण बैठका आठवड्याच्या सातही दिवस चालतात. केवळ रायगडमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातल्या आदिवासी पाड्यांपासून शहरांपर्यंत तसेच अगदी देशातील बहुतांश सर्व राज्यांत एवढंच नाही तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका सारख्या अनेक देशांत नियमित श्रवण बैठका होतात.
8 जुलै 2008 रोजी नानासाहेबांचं देहावसान झालं. नानासाहेबांच्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारने गौरव केला होता. आता याच महाराष्ट्र भूषण पुरस्कारचे आप्पासाहेबही मानकरी झाले आहेत. नानासाहेबांचं समाज घडवण्याचं कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिनदादा धर्माधिकारी यांनी अखंड सुरू ठेवलं आहे. समाजातील अंधश्रद्धा दूर करतानाचा जाती-धर्माचा पगडा दूर करणे, देश एकसंध ठेवण्यासाठीही निरूपण बैठकांच्या माध्यमातून कार्य केलं जातं. आप्पासाहेब आणि सचिनदादा धर्माधिकारी श्रवण बैठकीतील सदस्यांना नेहमीच धर्माधिकारी कुटुंबाचे सदस्य मानतात.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची चळवळ मोठ्या प्रमाणात राबवली जातेय. या माध्यमातून आतापर्यंत लाखो वृक्ष जगवण्यात आले आहेत, हजारो हेक्टर जमीन हिरवीगार झाली आहे. याशिवाय गावांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी तलावं, विहिरी साफ करणे, धरणांमधील गाळ काढणे, रक्तदान शिबीर आयोजित केले जातात. श्रवण बैठकीच्या माध्यमातून अंधश्रद्धेवर प्रहार करण्याचं आणि त्यातून लोकशिक्षणाचं महान कार्य त्यांनी उभं केलंय. स्वच्छता मोहीम राबवताना गावं, वाड्यावस्ती, शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमी उपक्रम राबवले जातात. हे कमी म्हणून की काय, स्मशानभूमी, कब्रस्थानांचीही स्वच्छता केली जाते. कोल्हापूर महापुराच्या विळख्यात असताना तिथल्या रस्त्यांवरील चिखल उपसण्याचं मोठं कार्य श्रीसेवकांनी केलं होतं. गणेशोत्सवाच्या काळात निर्माल्य गोळा करून त्याचा खत निर्मितीसाठी उपयोग करण्याचं नियमित कार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जातो. तसेच व्यसनमुक्तीसाठी कायम पुढाकार घेतला जातो.
माणसातील अवगूण काढले की तो गुणी होतो, असं आप्पासाहेब धर्माधिकारी नेहमी सांगतात. आणि हे अवगूण काढण्याचं कार्य श्रवण बैठकीच्या माध्यमातून केलं जातं. आपल्या संतांनी समाजसुधारणेचं खूप मोठं कार्य केलंय, आपल्या संतांनी कधीही चमत्कार, कधीही अंधश्रद्धेला खतपाणी घातलं नाही. देव कोपत नाही, देव कुणाचंही वाईट करत नाही, असं आपले संत सांगतात. हेच आप्पासाहेबांनी श्रवण बैठकांमधून सांगितलं आहे. प्रत्येक जण कर्माने स्वत:चं चांगलं किंवा वाईट करतो, याची जाणीव श्रवण बैठकीतून करून दिली जाते.
श्रीमत दासबोधाच्या निरुपणातून समाजसुधारणेचं कार्य करणारे ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या समाजसुधारणेच्या महान कार्याला 'एबीपी माझा'चा प्रणाम!