BLOG | गुन्हा नाही हे तर अॅडिक्शन..
सरते शेवटी हेच सांगायचंय की व्यसनमुक्ती ही त्वरित होणारी गोष्ट नाही. तर ही आयुष्यभराची लढाई आहे. म्हणून आपण सर्वांनी त्यांच्याकडे कलुषित नजरेनं न पाहता त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल हे पाहणे गरजेचे आहे, इतकंच.
यांचा दिवस सुरू होतो योगासनांनी. पर्वतासन, अनुलोम-विलोम, शवासन अशी जी बसून करायची आसने असतात ती त्यांच्याकडून करून घेतली जातात. प्रात:विधी आणि न्याहरी नंतर सुरु होतं फिजिओथेरपीचे सत्र. यामध्ये त्यांना शरिराचा तोल नीट सांभाळता यावा म्हणून त्यांच्याकडून विविध प्रकारचे व्यायाम करून घेतले जातात. इतरही व्यायाम प्रकारातून त्यांचे आरोग्य कसे जपले जाईल यावर लक्ष दिलं जातं. या दिनचर्येच्या वर्णनावरून हे एखादे आरोग्य शिबीर आहे असं, तुम्हाला वाटू शकतं. पण हा दिनक्रम आहे केईम रुग्णालयाच्या व्यसनमुक्ती केंद्रामधील ड्रग्सच्या आहारी गेलेल्या रुग्णांचा. बातमीच्या निमित्ताने सतत ये जा असलेल्या केईम रुग्णालयाच्या या व्यसनमुक्ती केंद्राची ओळख झाली. या विभागात डॉक्टर्स, मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून अंमली पदार्थांची नशा करणारे हे रुग्ण त्यांच्या व्यसनाधिनतेतून मुक्त होतात.
या रुग्णांच्या दिनक्रमात व्यसनांपासून दूर रहावे यासाठी अनेक गोष्टींचा समावेश असतो. दुपारच्या जेवणानंतर त्यांच्याकडून पुन्हा योगासने करून घेतली जातात. त्यानंतर ते विश्रांती करतात. या कालावधीत त्यांचे नातेवाईक त्यांना भेटू शकतात. संध्याकाळचा तास असतो तो स्वत:ची कौशल्ये विकसित करण्याचा, काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा. हे रुग्ण वेगवेगळ्या कला सादर करतात. कोणी गाणं म्हणतं, कोणी कविता करतं, कोणी सुंदरसं चित्र काढतं. काहीजण त्यांच्या हस्तकौशल्यातून वेगवेगळ्या वस्तू बनवतात. या रुग्णांसाठी टीव्ही आणि रेडिओचीही व्यवस्था आहे ज्यावर ते बातम्या पाहतात, क्रिकेटचं समालोचन ऐकतात.
त्यांची ही दिनचर्या सर्वांसमोर मांडण्याचं एकच कारण की अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्ती रुग्ण असतात. त्यांच्यावर उपचार करून त्यांना व्यसनांपासून मुक्त केले पाहिजे. त्यांना गुन्हेगार म्हणता येणार नाही. सध्या प्रसारमाध्यमांवर जे ड्रग्जनाट्य सुरू आहे त्यासाठी केलेले हे विधान. सुशांतच्या या प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि बॉलीवूडमधील अनेक नट्यांची नावे पुढे आली. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांना चौकशीलाही सामोर जावे लागले. प्रसारमाध्यमांनी या मसाल्याचा पुरेपूर वापर करून रस्सेदार तर्री बनवली. समजा त्या व्यसन करतही असल्याचं आपण गृहित धरलं तरीही त्यांना समाजात वावरण्यासाठीचा आदर पाहिजे तो दिला गेलाच पाहिजे. व्यसनाधीन व्हावं असं कोणालाही वाटत नाही. व्यसनाधीन होण्याचं कारण शरीरशास्त्रात दडलेलं आहे. इन्शुलीन ग्रंथीमुळे ज्याप्रकारे मधुमेह होतो त्याचप्रकारे शरीराच्या न्युरोकेमिकल्समध्ये बिघाड झाल्याने व्यसनाधीन होण्याची शक्यता असते. त्यामुळे या समस्येकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे.
व्यसनमुक्ती कशाप्रकारे होते हे पाहण्याची संधी मला मिळाली. केईमच्या व्यसनमुक्ती विभागात दोन प्रकारचे रुग्ण असतात. एक बाह्यरुग्ण तर दुसरे आंतररुग्ण. ज्यांच्या समस्या तीव्र आहेत त्यांना आंतररुग्ण विभागात 14 दिवसांसाठी दाखल केले जाते. तर बाह्यरुग्णांना रुग्णालयात दाखल केले जात नाही. या दोन्ही प्रकारच्या रुग्णांना अमली पदार्थांचे सेवन करण्यांची तल्लफ कमी व्हावी यासाठी औषधे दिली जातात. ही प्रक्रिया संथगतीने आणि सौम्य पद्धतीने केली जाते. याचे कारण अंमली पदार्थांची व्यसनाधीनता तीव्र असते. या प्रक्रियेत त्यांना थोडाही त्रास झाला तर ते व्यसनांकडे पुन्हा वळण्याची शक्यता असते. त्याचबरोबर त्या रुग्णांचे समुपदेशन केले जाते. जास्तीतजास्त प्रकरणांमध्ये कुटुंबीयच रुग्णांना रुग्णालयात घेऊन येतात. त्यांच्याकडून व रुग्णांकडून त्यांच्या या व्यसनाबाबत पूर्ण माहिती विचारली जाते. ते कुठल्या अंमली पदार्थांचे सेवन करतात? याची सुरुवात कधी आणि कशी झाली? त्यांचे कौटुंबिक वातावरण, कुटुंबात कोणी अशापद्धतीचे व्यसन करते किंवा केलेले आहे का? त्यांचे शिक्षण, त्यांची नोकरी, शारिरीक समस्या आणि त्यांचे इतर त्रासही समजून घेतले जातात. त्याचबरोबर अमली पदार्थांच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी त्यांची मानसिक तयारी आहे का? हेही लक्षात घेतले जाते. ती तयारी व्हावी म्हणून त्यांचे समुपदेशन केले जाते. यात केवळ रुग्णांचे समुपदेशन होत नाही तर त्यांच्या कुटुंबियांचेही समुपदेशन केले जाते. त्यामध्ये त्यांच्याविषयीची जास्तीतजास्त माहिती मिळवली जाते. या रुग्णांची समुहचिकित्साही केली जाते. ज्यामध्ये सर्व रुग्णांना एकत्र बसून त्यांना बोलण्याची संधी दिली जाते. त्यांच्या समस्या, या उपचारांचा योग्य परिणाम होतोय का? हे विचारात घेतले जाते. ते त्यांचे अनुभवही सर्वांसमोर सांगू शकतात.
या संपूर्ण प्रक्रियेत त्यांना नोकरी मिळावी म्हणूनही प्रयत्न केले जातात. विभागातील सामाजिक कार्यकर्ता रुग्णांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. काहीवेळा त्यांची जुनी नोकरी परत मिळवून दिले जाते. यासाठी सामाजिक कार्यकर्ता त्यांच्या मालकाशीही संवाद साधतो. हे रुग्ण बरे झाल्याने त्यांना नोकरीवर परत घ्या अशी विनंती केली जाते.
या व्यसनमुक्ती केंद्रात वयात आलेली मुलेही दाखल होतात. त्यांच्यात रस्त्यावरील मुले असतात, सामाजिक संस्थांनी आणलेली मुले असतात. काही मुलांना त्यांचे आईवडिल घेऊन येतात. त्यांच्यावर उपचार करण्याची पद्धत इतर रुग्णांसारखीच असते मात्र, त्यांची जी आजूबाजूचे वातावरण कसे आहे? ते विचारात घेतले जाते. त्यांच्यावर उपचार करताना त्यांना अमली पदार्थांचे काय धोके असतात ते शिकवले जाते. त्यांच्या आईवडिलांचेही सतत समुपदेशन सुरु असते. त्यात त्यांचे मित्रमैत्रीणी कोण आहेत. त्यांच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे हे लक्षात घेतलं जातं.
सरते शेवटी हेच सांगायचंय की व्यसनमुक्ती ही त्वरित होणारी गोष्ट नाही. तर ही आयुष्यभराची लढाई आहे. म्हणून आपण सर्वांनी त्यांच्याकडे कलुषित नजरेनं न पाहता त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल हे पाहणे गरजेचे आहे, इतकंच.