एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माँ तुझे सलाम.....
न्यूजअँकर म्हणून रोज निरनिराळ्या बातम्या हँडल कराव्या लागतात. कधी प्रत्येक बुलेटिनलाही नव्या बातमीशी सामना होत असतो. अशीच एक बातमी शुक्रवारी समोर होती, नवी मुंबईतील चिमुकलीला मारहाणप्रकरणाची. ही बातमी आमच्या चॅनलने गुरुवारी रात्री पहिल्यांदा दाखवली, मात्र शुक्रवारी म्हणजे मी ज्या बुलेटिनला अँकरिंग करत होतो, त्यावेळी बातमीसोबतच त्या चिमुकलीच्या आईशी लाईव्ह संवाद साधायचा होता. त्यांची वेदना जाणून घ्यायची होती. पोलीस तपासात त्यांना मिळालेली उत्तरं, डे केअर सेंटरकडून मिळालेली उत्तरं, सारं त्यांच्याकडून जाणून घेत महाराष्ट्रासमोर, जगासमोर ठेवायचं होतं, त्या माऊलीचं रक्तामासाचं अवघं १० महिन्याचं बाळ अंडर ऑब्झर्वेशन आहे. तरीही रुचिता सिन्हा बोलायला तयार झाल्या.
पहिल्याच बुलेटिनला माझ्या घशाला विचारांनीच कोरड पडली. मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात करण्याआधीच याही मनोवस्थेत आमच्याशी बोलणाऱ्या, आपली व्यथा मांडणाऱ्या त्या मातेला मनातल्या मनात साक्षात दंडवत केला, पहिला प्रश्न विचारला, घटना घडल्यापासून ते आता तपास सुरु होईपर्यंत तुमच्यासोबत जे घडलं ते सांगा. त्यांनी हुंदकळत सांगायला सुरुवात केली, बाळाची काळजी, घटनेबद्दलचा संताप, त्याचवेळी त्यांच्या मते होत असलेली कारवाईतली दिरंगाई हे सारं त्यांच्या गदगदणाऱ्या आवाजात जाणवत होतं, पहिलं उत्तर पूर्ण करता करताच त्यांच्या अश्रूंचा बांध जो त्यांनी रोखून ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता, तो फुटला.
पुढला प्रश्न विचारण्याआधी त्यांना मी म्हटलं, ज्या वेदनेतून, परिस्थितीतून तुम्ही जाताय, त्यावरुन आम्ही तुमचं मन समजू शकतो, पण तुम्ही आज बोललात, तर इथून पुढे तुमच्या आणि तुमच्यासारख्या इतर पालकांच्या लहान बाळांना अशा अमानुष परिस्थितीला सामोरं जावं लागणार नाही. सत्य समोर येईल, लोक आणखी अवेअर होतील, आपल्या बाळांच्या सुरक्षिततेसाठी. तुम्ही आत्ता बोलताना दाखवत असलेली हिंमत खरोखरच दाद देण्याजोगी आहे, तुमच्या बाळाची तब्येत लवकर सुधारावी, हीच आमची प्रार्थना आहे, डॉक्टरांच्या प्रयत्नांसोबत आम्हीही प्रार्थना करतोय. असं म्हणत पुढल्या संवादाला सुरुवात केली.
तिथून पुढे मध्ये मध्ये अश्रूंनी डबडबलेले त्यांचे शब्द मनाला चिरून जात होते, मनात विचार आला, त्यांचं निपचित पडलेलं बाळ जेव्हा त्या मातेने संध्याकाळी डे केअरमध्ये आल्यावर पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा त्यांना काय झालं असेल......आईची आपल्या मुलाशी असलेली अटॅचमेंट हा खरं म्हणजे कोणतंही बिरुद किंवा विशेषण लावण्याचा विषय नाही, तर मायेचा तो ओलावा फक्त अनुभवायचा असतो, एकवेळ महासागरालाही सीमा, बंधन असेल, पण, आईच्या मायेच्या सागराला नाही, कधीच नाही. ते प्रेम असीम, अतुलनीय आहे, इथे तर अवघ्या १० महिन्याचं बाळ आहे. ज्याला शरीरावर काही ठिकाणी दुखापती झाल्यात, त्याच्या डोक्याला मार लागलाय, ते अंडर ऑब्झर्वेशन आहे. ही सारी परिस्थिती लक्षात घेऊन त्या मातेच्या मनाचा ठाव घेतला तर तिने दाखवलेली जिगर पाहून तिला साष्टांग नमस्कारच घालायला हवा.
त्यांच्या मनात एकाच वेळी चिंतेचं वादळ घोंघावत असणार. त्याच वेळी संतापाचा ज्वालामुखी धुमसत असणार, अशा वेळी बॅलन्स राहणं खरंच कठीण आहे, भल्या भल्यांना हे जमत नाही, ते रुचिता सिन्हा यांनी करून दाखवलं.
त्यातच सीसीटीव्ही फुटेज पाहून अंगाचा तिळपापड होत होता, इतक्या लहान बाळाला अशा पद्धतीने उचलून आपटण्याची, फेकण्याची ही वृत्ती नव्हे विकृती कुठून येते. त्याच वेळी त्या बाळासाठी तुम्ही आम्ही काहीच न करु शकल्याची खंतही अस्वस्थ करत होती, म्हणूनच या मातेच्या हिमतीला खरोखरच सलाम. रुचिता यांनी सारं काही सांगितलं, मी त्यांना विचारलं, आता तुम्ही पोलिसांच्या कारवाईच्या दृष्टीने तुम्ही पुढची पावलं कशी टाकताय? त्या म्हणाल्या, आधी आमच्या बाळाची तब्येत सेटल होऊ दे....मग आम्ही पुढचा विचार करु. या प्रश्नोत्तरांबद्दल काही जण आता इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या नावाने बोटंही मोडतील, कदाचित. पण, त्या बुलेटिनला तसंच माझा विशेष कार्यक्रमातही रुचिता यांनी आमच्या चॅनलचे आभार मानले, माझ्या मुलीवर झालेल्या अन्यायाला तुम्ही वाचा फोडली, त्या म्हणाल्या. त्यांनी आमची पाठ थोपटली म्हणून नाही म्हणत, पण त्यावेळी आम्ही जे केलं, तो खरोखरच लोकशाही मार्गाने या उन्मत्त, अन्याय्य आणि घृणास्पद वृत्तीवर प्रहार होता, ज्याला ताकद मिळाली होती, त्या मातेच्या धैर्याची.
आम्ही या बातमीच्या बॅकग्राऊंडला महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडेही कडक कारवाईच्या उद्देशाने धाव घेतली, त्यांनी तसं आश्वासन दिलं आणि पाळणाघरांना सीसीटीव्ही अनिवार्य केल्याची घोषणा केली. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी पाळणाघरांसाठीचे अतिशय कडक नियम लागू करुन, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश काढले, तपास अधिकारीही बदलला गेलाय, पुढची कारवाई आणखी कडक होईल, अशी आता आशा निर्माण झालीय. या बातमीचा आमच्या चॅनलने असा अगदी मुळापर्यंत जाऊन फॉलोअप घेणं म्हणजे माझ्या मते सकारात्मक आणि प्रगल्भ पत्रकारितेचं दर्शन होतं, ज्या बातमीची सुरुवात आमच्या चॅनलचे सीनियर प्रोड्युसर संदीप रामदासी यांच्यापासून झाली, त्यांचंही नाव इथे मेन्शन करणं मला गरजेचं वाटतं.
अर्थात हे सगळं शक्य झालं ते त्या धैर्यवान आईमुळे. रुचिता सिन्हा आणि त्यांच्या पतीने रजत सिन्हा यांनी तसंच खारघर सिटीझन फोरमने केलेल्या पाठपुराव्यामुळे. खास करून त्या आईसमोर नतमस्तक व्हावं असं वाटतं. रुचिता सिन्हा यांना किती पातळ्यांवर लढावं लागलं पाहा ना.... नोकरी व्यवसायासाठी आपलं अवघं १० महिन्याचं बाळ एक आई कुण्या एका डे केअर सेंटरमध्ये परक्यांकडे सोपवून जाते काय आणि संध्याकाळी येऊन बघते तो अनेक जखमा अंगावर घेत बाळ निपचित पडलेलं. अशा वेळी एका आईला आपल्या बाळाला बरं करायचंय, त्याच वेळी कारवाईची पावलं योग्य टाकली जावीत, याचा फॉलोअप घ्यायचाय. एकाच वेळी तिला अन्याय्य परिस्थितीला भेदणारा त्रिशूळ उगारायचा होता आणि मायेची पखरण करणारी उबही आपल्या बाळाला द्यायची होती. अशा स्थितीतही सद्सद् विवेक शाबूत ठेवून, कोणत्याही प्रकारे मनाचा समतोल न ढळू देता, ती आई बोलली. बाळाच्या काळजीपोटी. फक्त तिच्या काळजाच्या तुकड्यासाठी नव्हे तर असंख्य मातांच्या बाळांच्या काळजीपोटी....शेवटी आई ही आईच असते....
माँ तुझे सलाम !
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement