WTC Final 2023: लढाई कसोटी अजिंक्यपदाची...!
आयपीएलच्या रंगीत वातावरणातले दिवस सरल्यावर आता पांढऱ्या जर्सीतल्या क्रिकेटच्या महायुद्धाला बुधवारी सुरुवात होतेय. मैदान सजलंय ते जागतिक कसोटी (ICC World Test Championship) अजिंक्यपद फायनलचं...
रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम इंडिया (Team India) कमिन्सच्या (Pat Cummins) ऑसी टीमला (Australia) भिडणार आहे. कसोटी सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारे दोन दादा संघ यावेळी न्यूट्रल वेन्यूवर अर्थात त्रयस्थ ठिकाणी उभे ठाकतायत...
इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर हे घमासान पाहायला मिळेल.
गेल्या दोन महिन्यांमधील क्रिकेटचा विचार केल्यास भारतीय टीममधील 15 पैकी 14 खेळाडू आयपीएलच्या रणांगणात घाम गाळत होते, त्याचवेळी ऑसी संघामधून ग्रीन आणि वॉर्नर हे दोघेच स्पर्धेत खेळत होते. सामन्याच्या भवितव्यावर ही बाब किती परिणाम करणारी ठरेल, हे कसोटी सामन्याचे पाच दिवस आपल्याला सांगून जातील.
इंग्लंडमधील हवामान हे आपल्या मनापेक्षा अस्थिर, चंचल असतं, असं म्हणतात. म्हणजेच घटकेत कडक ऊन, लगेच ढगाळ वातावरण आणि तर काही क्षणात पावसाची एखादी सर, मग पुन्हा ऊन असं सीसॉ वातावरण काही तासात पाहायला मिळतं. कसोटी क्रिकेटमध्ये हवामानाचा लहरीपणा महत्त्वाचा फॅक्टर ठरु शकतो. असं असलं तरी मुख्यत: वेगवान माऱ्याला पोषक ठरणाऱ्या खेळपट्टीचा विचार आपण केल्यास तीन वेगवान गोलंदाज खेळतील अशी अपेक्षा करुया. त्याच वेळी दोन फिरकी गोलंदाज की एक हाही ट्रिकी प्रश्न आपल्यासमोर आहे.
The wait is over. Hello guys, welcome back!😎 #TeamIndia 💪💪@imjadeja | @ShubmanGill | @ajinkyarahane88 | @surya_14kumar pic.twitter.com/UrVtNwAGfW
— BCCI (@BCCI) June 1, 2023
सिराज, शमीला कोण साथ देणार उनाडकट शार्दूल ठाकूर की, उमेश यादव याचं उत्तर द्रविड-रोहित जोडीला शोधायचंय. अर्थात बॅटिंगला ताकद द्यायची असेल तर शार्दूलला झुकतं माप मिळू शकतं. पण, वेग आणि स्विंगचा विचार करायचा झाल्यास डावखुरा उनाडकट किंवा उमेश यादव यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकतं.
आपली कसोटीतली गोलंदाजी ही आता ताकदवान आहे, त्यामुळे समोरच्या टीमला आपण 200-250 पर्यंत रोखू शकतो. गेल्या काही वर्षात आपण ते दाखवूनही दिलंय. प्रश्न आहे तो सातत्यहीन आघाडीच्या फळीचा. रोहित, विराट, पुजारा अशी मोठी नावं असूनही गेल्या काही सामन्यांची आकडेवारी पाहा. आपल्याला मधली फळी किंवा तळच्या फळीनेच हात दिलाय. आघाडीवीर कोसळल्याने आपली नौका संकटाच्या गर्तेत वारंवार गटांगळ्या खाताना दिसलीय तेव्हा कधी शार्दूल ठाकूर, कधी वॉशिंग्टन सुंदर, कधी पंत, कधी अक्षर पटेल तर कधी रवींद्र जडेजा यांनी ती नौका किनाऱ्यावर आणलीय. पण, इथे मैदान इंग्लंडचं आहे, समोर खडूस ऑस्ट्रेलियन टीम आहे. स्टार्क, कमिन्ससारखी अनुभवी वेगवान जोडी ऑस्ट्रेलियाकडे आहे. त्यात आपल्याकडे आघाडीच्या फळीत उजव्या फलंदाजांचा भरणा अधिक असल्याने डावखुऱ्या स्टार्कचे इंग्लिश वातावरणातील उजव्या यष्टीबाहेरचे अँग्युलर चेंडू भारतीय फलंदाजीचा कस पाहणारे ठरतील. त्यात आपले फलंदाज आयपीएलच्या फटेकबाजी झोनमधून बाहेर आलेत की नाही, याची चाचपणी होईल. लायनसारखा अनुभवी ऑफ स्पिनर त्यांच्या ताफ्यात आहे. ग्रीनसारखा इन फॉर्म ऑलराऊंडरही संघामध्ये आहे.
शुभमन गिलने आयपीएलच्या मैदानात धावांची खैरात केलीय. चित्रकार आपल्या ब्रशमधून जशी डोळे तृप्त करणाऱ्या रंगांची उधळण करतो, तशी फटक्यांची चौफेर उधळण शुभमन गिलने आयपीएलमध्ये केली होती. इथे मात्र ऑस्ट्रेलियन कडव्या माऱ्यासमोर त्याला निखाऱ्यावरुन चालावं लागणार आहे. तीच गोष्ट रोहित शर्माची. त्यालाही एका मोठ्या खेळीची आस आहे. पुजारा, विराटकडूनही मोठी इनिंग अपेक्षित आहे. सामन्याचा नूर बदलून टाकणं आणि सामना एकहाती घेऊन जाण्याची किमया बाळगून असणारे हे दोन चॅम्पियन बॅट्समन आहेत. मंच जितका मोठा, तितका परफॉर्मन्स मोठा अशी कामगिरी त्यांच्याकडून व्हावी, अशी आशा आहे. अजिंक्य रहाणेची कमबॅक मॅच आहे. साहजिकच त्याच्याकडून अपेक्षा खूप आहेत आणि त्याच्यावर प्रेशरही. पाच फलंदाज, पाच गोलंदाज आणि एक विकेटकीपर अशा कॉम्बिनेशनने आपण उतरु, अशी अपेक्षा आहे, त्यामुळे रहाणे अंतिम अकरामध्ये खेळेल, असं आता तरी वाटतंय. मॅचची पहिली इनिंग निर्णायक ठरु शकेल. कसोटी सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये वरचष्मा गाजवणारा संघ ती लढाई जिंकण्याकडे कूच करतो, असं बहुतांश वेळा दिसून येतं. त्यात ही एकमेव म्हणजे वन ऑफ टेस्ट आहे. त्यामुळे नॉकआऊट मॅचच म्हणा ना.
म्हणूनच पहिल्या इनिंगमधील स्कोअर जागतिक कसोटी विजेतेपदाचा चषक भारताच्या दिशेने प्रवास करणार की ऑस्ट्रेलियाच्या, ते ठरवून जाईल, असं वाटतंय.
दोन्ही संघ जीवाचं रान करतील, हे निश्चित. अर्थात कांगारुंशी गाठ म्हणजे मनोयुद्धाची लढाई. ती कोण जिंकतंय, यावर सामना कोणत्या कुशीवर वळणार हे ठरु शकेल. गुणवत्ता, संयम, तंत्र आणि मनोयुद्धाची कसोटी पाहणारा हा सामना दर्दी कसोटी रसिकांना सुखावणारा ठरेल अशी अपेक्षा करुया. जाता जाता भारतीय क्रिकेटचाहता या नात्याने रोहितला चषक उंचावण्यासाठी ऑल द बेस्ट म्हणूया.