ऑस्ट्रेलियन भूमीवर ‘विराट’ पराक्रम
71 वर्षांत पहिल्यांदा अशी कामगिरी आपल्या नावावर जमा झाली. इतक्या प्रदीर्घ कालावधीमुळे या विजयाचं मोल मोठं आहे. तसेच सिडनी कसोटीत ऑसी टीमला टीम इंडियाने दिलेला फॉलोऑन हा गेल्या 31 वर्षातला ऑस्ट्रेलियन भूमीवरचा त्यांना दिलेला पहिला फॉलोऑन होता. यावरुन ऑस्ट्रेलिया टीम आपल्या देशात किती ताकदीची राहिलीय, हे तर अधोरेखित होतं.
अखेर भारतीय क्रिकेटप्रेमी म्हणून जे स्वप्न माझ्यासह अनेक पिढ्या त्यांच्या त्यांच्या लहानपणापासून पाहत होत्या, ते स्वप्न साकार झालं. कांगारुंना त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत धूळ चारण्याची किमया आपल्या विराटसेनेने करुन दाखवली. 71 वर्षांत पहिल्यांदा अशी कामगिरी आपल्या नावावर जमा झाली. इतक्या प्रदीर्घ कालावधीमुळे या विजयाचं मोल मोठं आहे. तसेच सिडनी कसोटीत ऑसी टीमला टीम इंडियाने दिलेला फॉलोऑन हा गेल्या 31 वर्षातला ऑस्ट्रेलियन भूमीवरचा त्यांना दिलेला पहिला फॉलोऑन होता. यावरुन ऑस्ट्रेलिया टीम आपल्या देशात किती ताकदीची राहिलीय, हे तर अधोरेखित होतंच, शिवाय विद्यमान मालिकेतील भारतीय संघाच्या परफॉर्मन्सची धार किती तीक्ष्ण होती हे जास्त ठळकपणे दिसून येतं, जर पावसाचा व्यत्यय आला नसता तर सिडनी कसोटीही खिशात टाकता आली असती. विजयाचा फरक 3-1 ने वाढला असता. असो.
तर, लेट्स सेलिब्रेट द व्हिक्टरी ऑफ टीम इंडिया, यंग टीम इंडिया. असं मी म्हणेन. ज्याचा महानायक होता चेतेश्वर पुजारा. एरवी कोहली, रहाणे खेळपट्टीवर असताना सहनायकाची भूमिका घेणाऱ्या पुजाराने यावेळी संघाची नौका एकहाती खांद्यावर घेतली आणि ध्यानस्थाप्रमाणे खेळपट्टीवर जणू ठाण मांडलं, एक-दोन नव्हे तर तीन तीन कसोटी शतकं ठोकत टीकाकारांच्या तोंडाला कडी घालून वर कुलुपही लावलं. परदेश भूमीवर पुजाराचा मॅच विनिंग किंवा सीरिज विनिंग परफॉर्मन्स याआधी पाहायला मिळाला नव्हता, तो इथे आपण बघितला. पुजाराने सिच्युएशननुसार, जो मालिकेत खेळ केला, त्याला तोड नाही. म्हणजे जेव्हा गरज लागली तेव्हा त्याने नांगर टाकला, जेव्हा दुसऱ्या एन्डने फलंदाज बाद होत तळाची फळी त्याच्या सोबत खेळायला आली, तेव्हा गियर बदलत धावांचा वेगही वाढवला. मुख्य म्हणजे एक एन्ड धरुन ठेवण्याचं काम त्याने केलं आणि मोठे स्कोरही. चार कसोटीत तीन शतकं. ऑसी भूमीवर आपल्याकडून असा विक्रम आधी गावसकर आणि विराट यांच्या नावावर आहे. यावरुन ऑस्ट्रेलियन भूमीवर शतक हे किती किमती असतं ते दिसून येतं. पुजाराच्या या परफॉर्मन्सने द्रविडनंतर कसोटी संघात खेळताना नंबर तीनचा मुकुट त्याला आता फिट बसलाय, असं म्हणायला काही हरकत नाही. इंग्लंडच्या मालिकेत पहिल्या कसोटीत संघात स्थानही न मिळणारा पुजारा या मालिकेत सर्वोत्तम खेळाडू ठरलाय, याला नियतीने न्याय केला, असं म्हणायचं का?
स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीने भारताचं काम सोपं केलं, असं काही मंडळी या कामगिरीनंतर म्हणू शकतील. पण, ही झाली अर्धीच बाजू. हे मान्य की, त्यांच्या फलंदाजीची बाजू या दोघांच्या अनुपस्थितीने कमकुवत झाली. पण, गोलंदाजी धारदार होतीच की. नागाच्या फण्यासारखा भसकन चेंडू आत आणणारा डावखुरा भेदक स्टार्क होता. अचूक टप्पा ठेवणारा हेझलवूड होता. तर वेग आणि स्विंगचं भन्नाट मिश्रण असलेला कमिन्स अन् अचूक टप्पा पकडत भल्याभल्या फलंदाजांची परीक्षा पाहणारा जगातील अव्वल ऑफ स्पिनर नॅथन लायनही टीममध्ये होता. ही चौकडी मॅकग्रा, ली , गिलिस्पी आणि वॉर्न यांच्या तोडीची नसेलही भले. पण, आपल्याच म्हणजे त्यांच्या घरच्या मैदानात खेळताना धोकादायक नक्कीच होती. त्या चारही गोलंदाजांना आपण निष्प्रभ ठरवलं. खास करुन स्टार्कला. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये मोहम्मद आमीरने जशी भारताची आघाडीची फळी कापून काढली, त्यानंतर स्टार्कही डावखुरा असल्याने तसाच डेंजरस ठरेल का, अशी धाकधूक मनात होती. पण, आपल्या फलंदाजांनी खास करुन पुजाराने स्टार्क नावाच्या अस्त्राची धार संयम, बचाव आणि शिस्तबद्धतेने बोथट केली, तिथेच कांगारु बॅकफूटवर गेले.
याशिवाय कोहलीचं शतक, रहाणेच्या काही खेळी वगळता जर भारतीय फलंदाजीचा भार कोणी वाहिला असेल तर तो मयांक अगरवालने. नवखेपणा अजिबात न दाखवता, त्याने दमदार आणि कॉन्फिडंट बॅटिंग केली. सलामीच्या राहुल आणि विजयने गमावलेलं त्याने कमावलं. त्याच्या नावावर दोन शतकं सहज लागली असती. बेटर लक नेक्स्ट टाईम.
ऋषभ पंतची अष्टपैलू कामगिरी, होय. बॅटिंगमध्ये साडेतीनशे रन्ससह मालिकेतला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आणि यष्टीपाठी 20 विकेट्स. ही कामगिरी अष्टपैलूच म्हणावी लागेल. रिकी पॉन्टिंगला त्याच्यात उद्याचा गिलख्रिस्ट दिसतोय. तुलना हिमालयाशी आहे. पंतचे हे कसोटी क्रिकेटमधील दुधाचे दात आहेत. मात्र दुधाचे दात इतके मजबूत असतील तर पक्के दात आल्यावर त्याची ताकद काय वाढेल. एक मात्र नक्की, की त्याच्यात गिलख्रिस्टच्या पावलांवर चालण्याची क्षमता नक्कीच आहे. मात्र त्याने सातत्य दाखवण्याची, परिस्थितीनुरुप खेळण्याची, खास करुन फलंदाजीत, खरी गरज आहे. तूर्तास त्याचा हा हिमालय चढण्याचा प्रवास सुरु झाला असला तरी प्रत्यक्ष शिखर बरंच दूर आहे याचं भान त्याला संघातले ज्येष्ठ खेळाडू, टीम कोच नक्कीच देतील.
बूम बूम बुमराह असं आता गोलंदाजीत आपल्याला म्हणावं लागेल. इन स्विंगर्स, यॉर्कर्ससह ओल्ड बॉल उत्तम वापरण्याचं कसब. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 140 किमी प्लस स्पीडने बॉलिंग करतानाच चेंडूची दिशा आणि टप्पा एखाद्या 100 कसोटी खेळलेल्या गोलंदाजासारखा एकदम स्पॉट ऑन. या त्याच्या गुणांनी बुमराहला कमी कालावधीत जास्त धोकादायक बनवलंय. तो आतापर्यंत खेळलेल्या 10 कसोटीत 49 विकेट्स, तर या मालिकेतील चार कसोटी सामन्यांमध्ये 21 विकेट्सह मालिकेतील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज. हे आकडे जगभरातील बॅट्समनच्या मनात धडकी भरवणारे आहेत. वनडे आणि टी-ट्वेन्टी क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पहिली पायरी चढणाऱ्या बुमराहकडे फक्त वनडे बॉलर म्हणून आधी पाहिलं जात होतं. त्याला मात्र कसोटी क्रिकेट खेळायचं होतं, त्याने ते आधी बोलूनही दाखवलेलं.
दक्षिण आफ्रिका, इंग्लंड भूमीवरील मालिकांमध्ये प्रत्येक सामन्यागणिक त्याने सुधारणा करत आपला ठसा उमटवला आणि या मालिकेत मोहोर. ऑसी भूमीवरच्या कसोटी मालिकेत त्याला चारही कसोटी सामन्यात खेळवण्यात आलं, हे महत्त्वाचं. कसोटीमध्ये न थकता चारही सामन्यात त्याने सुमारे 150 हून अधिक ओव्हर्स टाकल्या. या स्टॅमिनाचं, अथकपणे जास्त ओव्हर्स टाकण्याच्या फिटनेसचं श्रेय त्याने स्थानिक क्रिकेटला दिलं. आयपीएलमधून उदय झालेला बुमराह कसोटी क्रिकेटच्या क्षितिजावर सूर्यासारखा तळपत राहावा, अशा अपेक्षा त्याने या मालिकेत निर्माण केल्यात.
ही मालिका म्हणजे सांघिक कामगिरीचा उत्तम नमुना होती. याचं कारण, पहिल्या तीन सामन्यात इशांत शर्माचं सातत्य, शमीचं जुना चेंडू वापरण्याचं स्किल, अश्विन, कुलदीप, जडेजाच्या फिरकीचं जाळं. म्हणजे एक परिपूर्ण आहार असावा, तसा या टीमच्या कामगिरीत सारं काही होतं. आता फक्त पृथ्वी शॉ फिट झाल्यावर संघात आला की, अगरवालच्या साथीने तो डावाची सुरुवात करायला उतरेल, तेव्हा ही यंग टीम इंडिया कसोटी क्रिकेटच्या मैदानात विजयांच्या माळा लावायला काही हरकत नाही. या मालिकेत कोहलीच्या कॅप्टन्सीलादेखील मार्क द्यायला हवेत.
आता हा संघ क्रमवारीत नंबर वन असला तरीही इतक्यात विश्वविजेता म्हणण्याची घाई आपण करता कामा नये. याचं कारण, इंग्लंडला त्यांच्याच मैदानात आणि दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच मातीत आपण लोळवत नाही. तोपर्यंत अशी पाठ आपल्याला थोपटता येणार नाही. असं असलं तरीही ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत हराने का मजाही अलग है....हा आनंद सेलिब्रेट करुया आणि असे क्षण परदेश भूमीवर लीप इयर सारखे आपल्या वाट्याला न येता सातत्याने यावेत यासाठी कोहली अँड कंपनीला शुभेछा देऊया.