एक्स्प्लोर
रो'हिट' मॅन....लगे रहो....
म्हणजे पहिले १०० तू केलेस ११५ चेंडूंत...नंतरचे फक्त ३६ चेंडूंमध्ये. ओखी वादळाचे आफ्टर इफेक्ट जणू. याला म्हणतात, महान फलंदाजाची आकडेवारी. सिच्युएशननुसार अॅडजस्ट होऊन खेळणं किती महत्त्वाचं असतं हे पुन्हा एकदा समोर आलं.
प्रिय रोहित,
सर्वप्रथम वन डेतील तिसऱ्या द्विशतकाबद्दल तुझं मनापासून अभिनंदन. वनडे सामन्यांमध्ये दोनशेची वेस ओलांडणं तीही तीन वेळा. खायचं काम नाहीये. प्रतिस्पर्धी गोलंदाजीची ताकद कशीही असो, मैदान किंवा खेळपट्टी कशीही असो....५० ओव्हर्समध्ये एका प्लेअरने तीन वेळा डबल सेंच्युरी करणं..खरंच हॅट्स ऑफ. यातून तुझा क्लास दिसतो. खासकरुन मालिकेतील पहिल्या वनडेत २९ ला सात आणि नंतर ११२ ला लंकेने आपलं पॅकअप केलं, तेव्हा आमच्या उराची धडधड वाढली. लकमल आणि कंपनीसमोर अशी दाणादाण. पुढे दक्षिण आफ्रिकेत दरबान, जोहान्सबर्गला काय होईल? तेही रबाडा, मॉर्कलसारख्या भेदक वेगवान गोलंदाजांसमोर. धरमशालाची ही मॅच हरल्यावर तू बोललास देखील...आय ओपनर परफॉर्मन्स फॉर अस. बरं वाटलं, तुझ्यातला कर्णधार बोलला असेल....पण, खेळाडूलाही ते जाणवलं असणार.
दुसऱ्याच मॅचमध्ये तू फक्त डोळे उघडले नाहीस, ते इतके वटारलेस की, समोरच्या गोलंदाजांची झोप उडवलीस. सुरुवातीची १० षटकं शिखर धवनच्या साथीने संयमाने खेळून काढल्यावर तू योग्य वेळी गियर बदललास. बुकलून काढणं, झोडून काढणं हे शब्दही सौम्य वाटावे इतका प्रखर हल्ला तू केलास. म्हणजे पहिले १०० तू केलेस ११५ चेंडूंत...नंतरचे फक्त ३६ चेंडूंमध्ये. ओखी वादळाचे आफ्टर इफेक्ट जणू. याला म्हणतात, महान फलंदाजाची आकडेवारी. सिच्युएशननुसार अॅडजस्ट होऊन खेळणं किती महत्त्वाचं असतं हे पुन्हा एकदा समोर आलं.
टेस्ट मॅचच्या बाबतीत असं म्हटलं जातं, ‘यू गिव्ह फर्स्ट अवर टू बॉलर. नेक्स्ट फाईव्ह अवर्स विल बी यूअर्स’ वनडेबद्दलही तसंच आहे. जिथे कंडिशन्स, पिच सुरुवातीला बॉलर्सना फेव्हरेबल असेल तिथे सुरुवातीच्या १० षटकांमध्ये त्यांचा सन्मान करावा. एकेरी-दुहेरी धावांचा खुराक घ्यावा. नंतर मात्र ताव मारावा. तुझ्या इनिंगचं स्टार्टर असंच होतं.....सुरुवातीला फक्त एखाद-दुसरा व्हेज रोल आणि हराभरा कबाब. नंतर तू मेन कोर्सला तू इतकं भरभरुन जेवलास. पंचपक्वान्न विथ डेझर्ट अँड आईस्क्रीम. इतकं की लंच ब्रेकमध्ये लंकन गोलंदाज तुझ्या इनिंगच्या इम्पॅक्टने तहानभूक विसरले असतील. म्हणजे खास करुन द्विशतकाच्या दुसऱ्या शतकाकडे झेपावतानाची तुझी फलंदाजी 'अविश्वसनीय' या शब्दाचा प्रत्यय देणारी होती.
५०० आणि १००० ची नोटांची जशी व्यवहारामध्ये बंदी आली तशी तुला जणू एकेरी धावा आणि चौकारांची धावाबंदी झाली होती त्यावेळी. अशा थाटात तू षटकारांचा पाऊस पाडलास. ऑफ साईडला तू स्क्वेअरला मारलेला सिक्स तर केवळ अनबिलिव्हेबल. मग एक लॉन टेनिस स्टाईल फोरहॅण्ड चापट सिक्स. त्याच वेळी जागेवर बसून फाईन लेगला तू गोलंदाजांना इतका लीलया भिरकावत होतास की, फोटोला पोझ देत देत तू खेळतोयस असं वाटलं. शाळकरी गोलंदाजांसमोर आंतरराष्ट्रीय बॅट्समन बॅटिंग करतोय, असा भास तुझ्या खेळीने झाला.
आधीच्या मॅचला आपल्या टीमला ११२ ला ऑल आऊट केलं त्याचा जणू तू राग काढलास. ते व्हायलाच हवं होतं, कारण जी टीम इंडिया गेल्या वर्षभरात जवळपास प्रत्येक मालिका खिशात टाकतेय, अगदी ऑसी टीमलाही आरामात हरवतेय ती लकमल आणि त्याच्या सहकाऱ्यांसमोर अशी कोसळते. आधी २९ ला सात आणि नंतर ११२ ला ऑल आऊट. ये बात कुछ हजम नही हुई.
म्हणून नंतरच्याच मॅचमध्ये असाच राग काढणं अपेक्षित होतं. धो डाला.. स्टाईल. विराटला विश्रांती देण्यात आली असल्याने या सीरिजला तू कॅप्टन आहेस. त्यात ओपनिंग बॅट्समन. आणखी भर म्हणजे आपण टॉस हरलो, सारं काही तुझ्या टॅलेंटला न्याय देण्यासाठी आव्हान देणारं होतं. तू ही सिच्युएशन दोन्ही हातांनी ग्रॅब केलीस. या खेळीने तुझ्यातली ठासून भरलेली गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. तसंही तुझ्या दर्जाबद्दल आमच्या मनात कधीही तसूभरही शंका नव्हती.
तुझी स्थानिक क्रिकेटमधील कामगिरी, २००७ टी ट्वेन्टी वर्ल्डकपमधील तुझी बॅटिंग, नंतर ऑस्ट्रेलियातील व्हीबी सीरिजमध्ये सचिनसोबत मॅचविनिंग इनिंग्ज हे सारं अगदी कालपरवा झाल्यासारखं वाटतंय. नंतर मात्र म्हणावं तसं सातत्य तुझ्या फलंदाजीत पाहायला मिळालं नाही. विराट कोहली आणि तुझ्या आकडेवारीची तुलना नको करुया, फक्त काही आकडे समोर ठेवून विचार करुया.
म्हणजे विराट कोहली २०२ वनडे आणि ९०३० रन्स, ज्यात ३२ शतकं आणि ४५ अर्धशतकं तर तुझ्या नावावर १७३ वनडेंमध्ये ६४१७ रन्स, ज्यामध्ये १६ शतकं आणि ३४ अर्धशतकं. म्हणजे फरक आहे तो २९ मॅचेसचा. तुझं वनडे पदार्पण २३ जून, २००७ ला आणि कोहलीचं १८ ऑगस्ट, २००८ ला. म्हणजे कोहली जवळपास तुझ्या वर्षभरानंतर आंतरराष्ट्रीय वनडे खेळायला सुरुवात करुन तुझ्यापुढे गेलाय. ही तुलना फक्त आकड्यांचा खेळ करण्यासाठी नाही, तर तुझ्यातला गुणवत्तेची तुला जाणीव करुन द्यायची आहे. तू पेटून उठत आणखी सातत्य आणावंस म्हणून आहे. टीममधली हेल्दी कॉम्पिटिशन ही संघासाठी केव्हाही पॉझिटिव्ह रिझल्ट देणारीच असते. तसं व्हावं म्हणून फक्त ही आकडेवारी मांडली.
तू जेव्हा भारतीय क्रिकेटमध्ये आलास तेव्हा पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजाने सांगितलं होतं, 'रोहित शर्मा इज बेस्ट यंग बॅटिंग टॅलेंट इन द वर्ल्ड'. जगभरातून तुझी अशीच तारीफ होत असताना तुला संघात स्थान पक्कं करण्यासाठी झगडावं लागलं. किंबहुना वनडे संघात तरी. (कसोटी संघात तुला अजूनही सातत्य दाखवायचंय आणि स्थान निश्चित करायचंय) वनडे संघात तू सलामीला खेळू लागलास, तेव्हा खऱ्या अर्थाने तुझ्यातील फलंदाज फुलू लागला. म्हणजे पहिल्या फिल्ड रिस्ट्रिक्शन्सचा फायदा घेऊ लागलास. चेंडू डोक्यावरून भिरकावणं तुला सहज जमतं, तसंच तुझ्याकडे डोळ्याचे पारणे फेडणारे ड्राईव्हजदेखील आहेत. आता कोणाच्याही नावावर नसलेला तीन द्विशतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड तू आपल्या नावावर केलायस. ही लिस्ट वाढतच जावी.
म्हणजे मी मगाशी ओखी वादळाचा रेफरन्स दिला तरी तुझं हे फलंदाजीचं वादळ नेहमी यावं. म्हणजे एखाद-दुसरी जोरात सर नकोय पावसाची. आम्हाला चेरापुंजीत बरसणारा पाऊस बघायचाय तुझ्या बॅटिंगमधून. तुझ्याकडे टायमिंग आहे, फटक्यांची श्रीमंतीही आहे. तुझं धावांचं सातत्य फक्त सचिन आणि कोहलीसारखं हवं. रितिकाला तू परवा अॅनिव्हर्सरी गिफ्ट दिलंस. तसंच आम्हालाही ख्रिसमस आणि न्यू इयरसाठी ही खेळी म्हणजे एक भेटच होती. अशा खेळींचा अल्बम आम्हाला तयार करायचाय. एखाद-दुसरी फ्रेम नकोय. अल्बम हवाय आणि तोही नुसता वनडेमध्ये नव्हे तर टेस्टमध्येही. तीही मैफल गाजवण्याची तुझी कलाकारी तुझ्याकडे आहे.
पुन्हा मुद्दा येतो तो सातत्याचा आणि अॅडप्टेबलिटीचा. याबाबतीतही तू कोहलीचाच आदर्श समोर ठेव. तो बघ. आयपीलमध्ये चार शतकं काय ठोकतो. वनडेत ३२ सेंच्युरींचा पल्ला काय गाठतो, त्याच वेळी चार कसोटी द्विशतकही नावावर करतो. त्याच्यासाठी फक्त क्रिकेट जर्सीचा कलर बदलतो, त्याच्या बॅटिंगचा कलर तोच राहतो. तीच कन्सिस्टन्सी आम्हाला तुझ्याकडून हवीय.
जाता जाता आणखी एक मुद्दा. म्हणजे कोणत्याही टीमचा ओपनर हा त्या मॅचचा टोन सेट करत असतो, खास करुन आता जेव्हा वनडे क्रिकेट इतकं वाढलंय तेव्हा तर ओपनरची भूमिका आणखी महत्त्वाची झालीय. जे संघ सातत्याने जिंकत गेले, त्यांची ओपनर्सची लिस्ट हेच सांगते. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियाचे हेडन-गिलख्रिस्ट, आधीच्या जमान्यातील विंडीजचे ग्रिनिज-हेन्स, अगदी आपल्याच टीममध्ये सचिन-गांगुली, सचिन-सेहवाग. काही काळात अगदी सेहवाग-गंभीरही. सेहवागचा विषय निघाला म्हणून एक सांगतो, त्याची बॅटिंग जशी अपोझिशनसाठी थ्रेट होती, तसा तुझा टेरर गोलंदाजांना वाटला पाहिजे. म्हणजे समोरच्या टीमच्या मेन बॉलरला पहिल्याच स्पेलमध्ये झोपवण्याची क्षमता वीरुमध्ये होती. वर्ल्ड कप २०११ ची ती पाकिस्तानविरुद्धची मॅच आठवतेय. त्या स्पर्धेत त्या मॅचपर्यंत उमर गुल सगळ्यांची दांडी गुल करत होता, त्या मॅचला वीरुने २५ चेंडूंत ३८ रन्सच केल्या. ज्यात होते नऊ चौकार. त्यातले पाच उमर गुलच्या एकाच ओव्हरमध्ये. परिणाम उमर गुलची लाईन-लेंथ गुल. भारताचं काम सोपं केलं सेहवागच्या हल्ल्याने. उमर गुलने या मॅचच्या त्याच्या आठ ओव्हर्समध्ये ६९ रन्सचं भरभरुन दान दिलं. सेहवागने जसं त्याला मेंटली डॅमेज केलं, ती धडकी भरवणारी कपॅसिटी तुझ्यात आहे, ती पुन्हा पुन्हा दिसावी आणि मोठ्या खेळींनी दिसावी यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
तुझा आणि भारतीय क्रिकेटचा चाहता,
अश्विन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement