BLOG | 83 च्या निमित्ताने...
BLOG : 25 जून 1983. हाच तो ऐतिहासिक दिवस. ज्या दिवशी लॉर्डसवर इतिहास घडला. कपिल देव यांनी झळाळता विश्वचषक उंचावला आणि तमाम भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. भारतीय क्रिकेटच्या कक्षा रुंदावणारा तो सुवर्णक्षण होता. तो सुवर्णक्षण आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. किंबहुना त्या स्पर्धेत भारताने लिहिलेल्या विजयगाथेचं सिनेरुपी दर्शन आपल्याला होणार आहे. त्या 83 च्या वर्ल्डकपवेळी आमची पिढी एकेरी संख्या असलेल्या वयात होती. अवघ्या 5-6-7 वर्षांची.
क्रिकेटची बाराखडीही आम्हाला तितकीशी माहीत नव्हती. आजच्यासारखी स्पोर्टस चॅनल्स, सोशल मीडिया विस्तीर्ण मैदानासारखा पसरला नव्हता. म्हणजे माझ्या बाबांची पिढी आम्हाला त्यावेळच्या आठवणी सांगते, रेडिओ कॉमेंट्रीतून आम्ही मॅच नुसती ऐकायचो नाही तर बघायचो. याकरता आम्ही जीवाचा कान करायचो. रेडिओ समालोचक त्यांच्या प्रभावी सादरीकरणातून, आवाजातून क्रिकेटचं स्टेडियम जणू घरात आणत. पुढे आम्ही जसं क्रिकेट कळत्या वयात आलो, तसं या विश्वविजयाचं मोल कळलं. त्या 1983 च्या फायनल मॅचचा थरार इंटरनेटवर पाहिल्यानंतर कपिलच्या टीमने कोणतं एव्हरेस्ट सर केलं होतं, हे लक्षात आलं. गेल्या दोन दशकांमध्ये ऑसी टीमचा जसा दबदबा राहिलाय, तसा दरारा त्यावेळी लॉईडच्या विंडीज टीमचा होता. त्याच विंडीज टीमने 1975 आणि 1979 असे दोन विश्वचषक प्रतिस्पर्ध्यांना चिरडत खिशात घातले होते. 1983 च्या फायनललाही तीच बलाढ्य कॅरेबियन टीम भारतासमोर उभी ठाकलेली. ग्रिनिज, हेन्स, रिचर्डस, लॉईड, गोम्स. फलंदाजीला येणारा प्रत्येक फलंदाज मागच्या फलंदाजापेक्षा ब्लड प्रेशर वाढवणारा. समोरच्या टीमच्या उरात धडकी भरवायची. सिंहांची फौज जणू शिकारीला आल्यागत गत व्हायची समोरच्या टीमची. त्यात फायनलमध्ये 183 चं विंडीजसाठी माफक ठरणारं टार्गेट टीम इंडियाने दिलं.
सुरुवातीचे फलंदाज बाद झाल्यानंतर विवियन रिचर्डस यांनी खेळायला नव्हे, बरसायला सुरुवात केली. सात चौकारांसह 28 चेंडूंत 33 धावा. आजच्या ट्वेन्टी-20चा ट्रेलरच जणू. त्या वेळी कपिल देव यांच्या मनात मात्र काही औरच होतं. मदनलाल यांच्या गोलंदाजीवर कपिल यांनी घेतलेला कॅच आजही अंगावर शहारे आणतो.
त्या मॅचमधल्या आणखी दोन गोष्टी इम्पॅक्ट करणाऱ्या होत्या. त्यातील पहिली श्रीकांत यांची बिनधास्त फलंदाजी. म्हणजे आताच्या काळात जयसूर्या, सेहवाग, रोहित शर्मा यांच्या फटाकेबाजीने आपले डोळे दिपतात. त्या सुरुवातीच्या ओव्हर्समधील फटक्यांची पहिली माळ त्या काळात बहुदा श्रीकांत यांनीच लावली होती. म्हणजे ज्या काळात चेंडू हवेत मारल्यास प्रशिक्षक त्या खेळाडूला मैदानाला फेऱ्या मारण्याची किंवा तत्सम शिक्षा करत असे, (असे किस्से आम्ही ऐकलेत) त्या काळात श्रीकांत आग ओकणाऱ्या विंडीज गोलंदाजांच्या डोक्यावरुन चेंडू भिरकावत होते. ही फलंदाजी त्या काळात क्रांतिकारक होती. रॉबर्टस, गार्नर, मार्शल आणि होल्डिंग. वेगवान चौकडीची धार फलंदाजांना कापून काढायची. अशा गोलंदाजीसमोर श्रीकांत यांनी दाखवलेला अप्रोच कमाल होता. 57 चेंडूंमध्ये 38 धावा ज्यामध्ये सात चौकार आणि एक षटकार. ही बहुदा विजयाच्या किल्ला सर करण्यासाठी कूच करणारी पहिली पायरी होती.
याच मॅचमध्ये बलविंदर संधू यांनी ग्रिनिज यांची घेतलेली विकेटही अशीच मनावर कोरली गेली आहे. ग्रिनीज यांनी तो चेंडू वेल लेफ्ट केला होता. इंग्लिश खेळपट्ट्यांवर चेंडू, वातावरण आणि खेळपट्टीचा रोमान्स पाहायला मिळतो. हे प्रेम छान जुळून आलं आणि मैदान सोडून जाण्याच्या विरहाची वेळ आली ग्रिनिज यांच्यावर. तो चेंडू बेल्स उडवून गेला.
आजच्या जमान्यात अष्टपैलू खेळाडूंचं महत्त्व किती अनन्यसाधारण आहे, हे आपण जाणतो. पण, त्या काळात कपिल, मोहिंदर अमरनाथ, कीर्ती आझाद, यांच्यासारखे अष्टपैलू खेळाडू आपल्या टीममध्ये होते. इंग्लिश वातावरणाचा उत्तम फायदा उठवू शकणारे ग्रेट कपिल देव यांच्यासह संधू, मदनलाल , बिन्नी होते. समतोल संघाने एका दादा संघावर मात करत त्या दिवशी नवा इतिहास लिहिला आणि जागतिक क्रिकेटला भारताचं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. तो भारतीय क्रिकेटचा टेकऑफ पॉईंट होता. त्या संघर्षकहाणीचं प्रत्येक पान शिकवून जाणारं आहे.
स्पर्धेतील कपिल देव यांची झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातील नाबाद 175 धावांची अद्वितीय खेळीही इतिहास बनून राहिली आहे. ज्याचं व्हिडीओ चित्रण त्यावेळी कुठल्याशा संपामुळे कुठेही उपलब्ध नाही. क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी सर नेहमी म्हणतात, त्याप्रमाणे कदाचित त्या सुंदर खेळीला तीट लावली बहुदा देवाने. म्हणून ते क्षण आपण पाहू शकलो नाही. त्या सामन्यात पाच बाद 17 अशा केविलवाण्या स्थितीतून कपिल देव यांनी सामना ३६० अंशात फिरवला आणि त्या सामन्यानंतर तितक्याच टक्क्यांनी टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कपिल यांच्या इनिंगची आकडेवारी पाहा, 138 चेंडूंत 16 चौकार, 6 षटकारांसह नाबाद 175. बिन्नी, मदनलाल आणि किरमाणी या लोअर मिडल ऑर्डरच्या साथीने त्यांनी फक्त चिवट झुंजच दिली नाही तर, वादळी हल्ला केला. ज्यात झिम्बाब्वेचा संघ पालापाचोळ्यासारखा उडून गेला.
हे सारं आताच्या पिढीला सिनेरुपात का होईना पाहायला मिळणार आहे. याआधीही बायोपिकच्या रुपात खेळाडूंची जीवनकहाणी आपण पाहिली आहे. भाग मिल्खा भाग, धोनी-द अनटोल्ड स्टोरी हे त्यातलेच काही. त्याच माळेत '83' हा ऐतिहासिक विश्वविजयाचा बायोपिक ठरावा. भारतीय क्रिकेटला नवा आयाम देणाऱ्या थरारक प्रवासाचं दर्शन यातून आपल्याला घडणार आहे. क्रिकेट हे भारतात खेळापलिकडचं प्रेम आहे. सिने जगतातले दिग्गज राज कपूर हे भारताच्या विजयदिनी चक्क आनंदाने नाचले होते, अशी आठवण ज्येष्ठ सिने लेखक दिलीप ठाकूर आवर्जून सांगतात. सिनेमा आणि क्रिकेटचं नातं असंच घट्ट, मनाजवळचं आहे. क्रिकेटचा खेळ देशाला एकत्र आणतो. सकारात्मक ऊर्जा देतं. क्रिकेट देशाभिमान तर जागृत करतच, शिवाय चैतन्य, उत्साहाचं ओतप्रोत भरलेलं टॉनिक देतं. जे मिळालं की, कोणत्याही वेगळ्या विटॅमिनचं औषध घेण्याची गरज लागत नाही.
कपिल यांच्या विश्वविजयी कामगिरीने भारतीय क्रिकेटच्या पणतीची मशाल व्हायला सुरुवात झाली. आजच्या कोरोना काळात याच विजयोत्सवाची कहाणी पडद्यावर पाहून आपल्याही मनात सकारात्मक ऊर्जेची पणती प्रज्ज्वलित करेल हे निश्चित. आजच्या काळात याची खरी गरज आहे.