एक्स्प्लोर
उदित नारायण : एका दशकावर प्रभाव टाकणारा ओरिजनल आवाज
मास्टर ब्लास्टरच्या झंझावातासमोर संयमी द्रविड नेहमीच थोडा झाकोळला गेला . कुमार शानू आणि उदित नारायणच्या बाबतीत पण हेच घडलं .

कधी कधी दोन अतिशय कर्तबगार माणसं एकाच कालखंडात आणि एकाच क्षेत्रात कार्यरत असल्यावर दोघांपैकी एकाला जरा झुकत माप मिळत आणि त्यामुळे दुसऱ्या कर्तबगार माणसावर किंचित अन्याय होण्याची शक्यता बळावते . टेनिस या खेळातले एक उदाहरण बघण्यासारखं आहे . जग राजबिंड्या , जेंटलमन , आणि महान खेळाडू असणाऱ्या रॉजर फेडररच्या इतक्या प्रेमात आहे की राकट रांगड्या राफेल नदालकडे तुलनेने जगाचं दुर्लक्ष होत . सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडची क्लासिक केस तर सगळ्यांनाच माहित आहे . मास्टर ब्लास्टरच्या झंझावातासमोर संयमी द्रविड नेहमीच थोडा झाकोळला गेला . कुमार शानू आणि उदित नारायणच्या बाबतीत पण हेच घडलं . मी कुमार शानूवर लिहिलेल्या 'कुमार शानू -एका दशकाचा आवाज ' या लेखात असं लिहिलं होत -मी शाळेत असताना माझ्या बेंचवर मुक्तदीर अन्सारी बसायचा . आमच्या दोघांनाही चित्रपटसंगीताचा नाद लागला होता . कुमार सानू म्हणजे अन्सारीचा जीव की प्राण . मी उदित नारायण कॅम्पमधला . आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण उदित की सानू यावरून भरपूर वाद व्हायचे . आता अजूनही इतक्या वर्षानंतर उदीतच माझा खूप आवडता आहे . पण सानू हाच नव्वदच्या दशकाचा आवाज होता हे मी मनाशी कधीच मान्य केले आहे . पर्यायच नाही . दोन वर्षांपूर्वी 'दम लगा के हैशा ' चित्रपट येऊन गेला . त्या चित्रपटाला एक नव्वदच्या दशकाचं नॉस्टॅल्जीक मूल्य होत .चित्रपट जोरदार चालण्यामागे त्याचा मोठा वाटा होता . कुमार शानूची पूर्ण चित्रपटावर छाप आहे . चित्रपटाचा नायक सानूचा मोठा फॅन असतो . चित्रपटात एका सीनमध्ये सानू झळकला होता आणि टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट झाला होता . खूप वर्षाने सानूच गाणं पण होत सिनेमात . त्या अर्थाने 'दम लगा के हैशा ' हा जितका दिग्दर्शक शरत कटारियाचा , आयुष्मान खुराणाचा , भूमी पेडणेकरचा आणि अनु मलिकचा तेवढाच कुमार सानूचा पण होता . चित्रपटाने सानूच्या कारकिर्दीला एकप्रकारे मानवंदनाचं दिली होती . असा 'दम लगा के हैशा ' उदित नारायणला मिळेल असं वाटत नाही . कारण नव्वदच्या दशकाचा एकच आवाज होता . कुमार सानू .
पण हा लेख प्रकाशित झाल्यावर , तुम्ही उदितवर अन्याय केला आहे अशा अर्थांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता . मला पण शानूच कौतुक करण्याच्या ओघात आपण उदित नारायणवर थोडा अन्यायच केला की काय अशी बोच वाटायला लागली . हा लेख त्याचं परिमार्जन करण्याचा एक प्रयत्न आहे .
एखाद्या क्षेत्रात एक असा महान कलावंत होऊन जातो की त्याचा प्रभाव त्याच्या क्षेत्रातल्या पुढच्या अनेक पिढ्यांवर कमी जास्त प्रमाणात झिरपत जातो . दिलीप कुमार यांच्या अभिनयाचा प्रभाव कारकिर्दीतल्या सुरुवातीच्या टप्प्यात बच्चनवर होता असं म्हंटल जात . शाहरुख खानवर तर तो उघडच होता . तसाच के .एल .सैगल यांचा प्रभाव अनेक लोकप्रिय यशस्वी प्लेबॅक सिंगर्सवर होता . अनेक गायक दुसऱ्या गायकांच्या प्रभावाखाली गात असताना स्वतःचा ओरिजनल आवाज आणि गायकी असणारे गायक हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत . सध्याच्या काळात स्वतःचा ओरिजनल आवाज असणारे दोन नाव चटकन आठवतात . पहिल उदित नारायणच आणि दुसरं केकेचं . उदित नारायणचे समकालीन असणाऱ्या कुमार शानू आणि अभिजित यांच्यावर किशोर कुमारचा जाणवण्याइतपत प्रभाव होता .आपल्या समकालीन गायकांमध्ये उदितचा आवाज त्यामुळे वेगळा जाणवतो .
उदित नारायण झा याचा जन्म आईच्या माहेरी झाला असला तरी वडील नेपाळी असल्याने त्याचं लहानपण नेपाळमध्ये गेलं . संगीताचं प्रेम उदीतला आईकडून वारशाने मिळालं . उदितची आई भुवनेश्वरी देवी या स्वतः गायिका होत्या .आपल्या गायक म्हणून कारकिर्दीची सुरुवातउदितने रेडियो नेपाळ साठी मैथिली भाषेतली गाणी गाऊन केली .आठ वर्ष नेपाळी आणि मैथिली भाषेतली गाणी गायल्यावर नेपाळ मधल्या भारतीय दूतावासाने दिलेल्या स्कॉलरशिपच्या पाठबळावर उदित मुंबईला स्थलांतरित झाला .आणि उदितचा बॉलिवूडमधला संघर्ष सुरु झाला .एका छोट्या रूममध्ये दाटीवाटीने राहणे , लोकलचे तिकीट परवडत नसल्याने पायी पायीच मुंबईमध्ये भटकणे , खाण्यापिण्याची आबाळ ही या काळातली नेहमीचीच गोष्ट . खूप संघर्ष केल्यावर उदितला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला . संगीतकार राजेश रोशन यांनी 'उन्नीस -बीस ' सिनेमात उदितला पार्श्वगायक म्हणून पहिली संधी दिली . त्या पहिल्या गाण्यात उदितचे सहगायक कोण असतील ? दस्तुरखुद्द मोहम्मद रफी . राजेश रोशन यांचा निरोप काहीसा उशिरा मिळाल्याने कसाबसा रेकॉर्डिंगला पोहोंचला आणि समोर मोहम्मद रफी साहेबांना बघूनच त्याचे हातपाय गारठले . इतक्या मोठ्या गायकाच्या सुरात सूर आपण कसा मिळवणार या भावनेने नवोदित उदित भांबावला . पण मोहम्मद रफी साहेबांच्या मृदु वागण्याबोलण्याने त्याचा सुरुवातीचा अवघडलेपणा दूर झाला .मग मोठ्या झोकात उदितने आपलं पहिलं वहिल रेकॉर्डिंग पूर्ण केलं . पण पहिला ब्रेक मिळाला म्हणून संघर्ष संपला असं झालं नाही . उदितने नंतर अनेक गाणी गायली पण गायक म्हणून त्याचा ठसा अजून हवा तसा उमटला नव्हता .आर्थिक स्थैर्य अजून वाकुल्या दाखवतच होत . दरम्यानच्या काळात त्याचं लग्न पण झालं होत . त्याचा मुलगा आदित्यचा जन्म १९८७ ला झाला आणि उदितच नशीब पालटायला सुरुवात झाली . आदित्यचा जन्म होण्याच्या काही दिवसांपूर्वीच उदितने आनंद मिलिंद या नवोदित संगीत दिग्दर्शकांसाठी काही गाणी रेकॉर्ड केली . नवोदित दिग्दर्शक , नवोदित अभिनेते आणि नवोदित संगीत दिग्दर्शक असणारा सिनेमाची गाणी रिलीज झाली आणि इतिहास घडला . तो सिनेमा होता 'कयामत से कयामत तक'. त्यातलं 'पापा कहते है बडा नाम करेगा ' हे सुपरहिट गाणं जेंव्हा उदितने रेकॉर्ड केलं तेंव्हा तो लवकरच बाप बनणार होता हा एक छान योगायोग . 'कयामत से कयामत तक' ची गाणी प्रदर्शित झाल्यावर मात्र उदीतला मागे वळून बघण्याची गरज पडली नाही . नंतर सातत्याने त्याने हिट आणि लोकप्रिय गाणी दिली .
उदितने गायलेल्या गाण्यांकडे काळजीपूर्वक बघितलं असता एक बाब लक्षात येते . उदित रोमॅंटिक गाण्यांचा बादशहा आहे . अजून कुठल्याही गाण्यांपेक्षा रोमँटिक गाणी त्याला जास्त मानवतात .पहिल्या वहिल्या सुंदर प्रेमाची तरल अनुभूती देणार 'पहेला नशा '(जो जिता वो ही सिकंदर ) हे गाणं गाव उदीतनेच . 'मुझे निंद न आये ' (दिल ) मधून होरपळवून टाकणाऱ्या विरहाची जाणीव करून द्यावी ती उदितनेच . 'परदेसी परदेसी जाना नही ' (राजा हिंदुस्तानी ) म्हणून प्रेमिकेला मला सोडून जाऊ नकोस अशी आर्त साद द्यावी उदितनेच .'ताल ' मधलं 'ताल से ताल मिला ' गाणं खरं तर अलका याज्ञीकचं . पण मध्येच उदित येतो आणि गायला सुरुवात करतो 'माना अंजान है ,तू मेरे वास्ते ' आणि हे गाणं वेगळ्याच उंचीवर जात .उदित नारायण हा आमिर खानचा पडद्यावरचा आवाज मानला जातो . आमिर सोबत उदितने 'जो जिता वो ही सिकंदर ', ' दिल ' , 'राजा हिंदुस्थानी ' , ' रंगीला ' आणि कित्येक सुपरहिट अल्बम दिले . पण शाहरुखच्या कारकिर्दीचे विश्लेषण केलं असता शाहरुखच्या कारकिर्दीत पण उदितचा मोठा वाटा असल्याचं दिसत . शाहरुखने 'डर ' मध्ये एकतर्फी प्रेमाचा भीषण चेहरा दाखवला होता . तो भीषण चेहरा पण 'जादू तेरी नजर ' या गाण्यामध्ये उदितच्या आवाजाने काही क्षणांपुरता सुंदर वाटायला लागतो . 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ' या शाहरुखला सुपरस्टार म्हणून प्रस्थापित केलेल्या सिनेमात सगळी गाणी पुन्हा उदितचीच आहेत . तत्कालीन तरुणाई ज्या 'कुछ कुछ होता है ' च्या प्रेमात पडली होती त्यात पण बहुतेक गाणी उदितचीच होती .'मोहोब्बते ' मध्ये शाहरुखचा राज आर्यन 'दुनिया मे कितनी है नफरते ,फिर भी दिलो मे है चाहते ' हे ढोल वर बुलंद आवाजात म्हणतो , तेंव्हा प्रेमावरचा विश्वास पुन्हा प्रस्थापित व्हायला लागतो . शाहरुख उदित कॉम्बिनेशनच फक्त माझंच नव्हे तर अनेक जणांचं सर्वाधिक आवडत असेल 'दिल से ' मधलं 'ए अजनबी ' हे गाणं . हे गाणं डोळे बंद करून निवांत ऐकण्यासारखं आहे . उदित आणि रेहमान या गाण्यात आपल्याला सुरांच्या अनोख्या जगात बोट पकडून फिरवून आणतात . या गाण्यात हाय पिच मध्ये 'तू है कहाँ कहाँ है ' असा सूर उदित लावतो तेंव्हा उदितच्या आवाजाला शरण जाण्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही .
उदितची लोकप्रिय गाणी सगळ्यांनाच माहित आहेत . पण त्याची काही अतिशय अप्रतिम गाणी लोकांना फारशी माहित नाहीत . संजय गुप्ताच्या 'हमेशा ' नावाच्या रद्दड सिनेमात अनु मलिकने उदितला 'ए दिल हमे , इतना बता' नावाचं फार सुंदर गाणं दिल आहे . राजेश रोशनने 'दस्तक ' नावाच्या सिनेमात 'जादू भरी आंखो वाली सुनो ' हे लूप वर ऐकण्यासारखं नितांतसुंदर गाणं उदित कडून गाऊन घेतलं .विशाल शेखरने 'टशन ' मध्ये उदितला दिलेलं 'फलक तक चल ' गाणं पण अप्रतिम आहे .
आनंद मिलिंद , नदीम श्रवण , अनु मलिक , हिमेश रेशमिया , विजू शाह ,जतीन ललित यांनी उदित ला अनेक अप्रतिम गाणी दिली असली तरी रेहमान आणि उदित या समीकरणात एक जरा वेगळीच मौज आहे . नव्वदच्या दशकातल्या इतर कोणत्याही गायकापेक्षा रेहमानने उदीतच्या आवाजाचा फार जास्त आणि सुंदर वापर केला आहे . 'स्वदेस ' या सिनेमात 'अहिस्ता अहिस्ता ' नावाचं एक फार अप्रतिम अंगाई गीत उदीतने गायलं आहे .दुर्दैवाने सिनेमाच्या फायनल कट मध्ये हे गाणं आलं नाही . 'लगान ' मधल्या 'मितवा मितवा , तुझको क्या डर है ' गाण्यात उदीतचा आवाज तुम्हाला एक ऊर्जा देऊन जातो . प्रेयसीला मी तुझ्यावर प्रेम करतो हे कस सांगायचं याची कश्मकश 'रंगीला मधल्या 'क्या करे क्या ना करे 'गाण्यात उदीतने नजाकतीने पेश केली आहे .
उदितचा आवाज गेल्या काही वर्षात ऐकू येणं हळूहळू बंद होत गेलं . संगीतकारांची नवीन पिढी (शंकर एहसान लॉय , विशाल शेखर , इत्यादी ) पुढं येत गेली तस तस सानू , उदित या लोकांचे आवाज ऐकू येणं हळूहळू बंद होत गेलं . हल्ली उदित फारच क्वचित फिल्ममधली गाणी म्हणतो . तो जास्त बिझी असतो ते लाईव्ह इव्हेंटस मध्ये . त्या कार्यक्रमांना होणारी तुफान गर्दी पाहून उदीतची लोकप्रियता आज पण अबाधित आहे याची खात्री पटते . २०१६ मध्ये त्याला 'पदमविभूषण ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं . एका नेपाळी मूळ असणाऱ्या माणसाला आपल्या देशात इतका मोठा सन्मान मिळाला . उदितचा आवाज खरं तर चिरतरुण आहे . वृद्धत्वाने त्याच्या आवाजाला अजून स्पर्श पण केलेला नाही . नुकत्याच नेटफ्लिक्सवर येऊन गेलेल्या 'लव्ह -पर स्क्वेयर फूट ' मध्ये पोरगेल्या विकी कौशलला त्याने आवाज दिला होता . रणबीर , रणवीर ,वरुण धवन यांच्यासारख्या तरुण अभिनेत्यांना त्याचा आवाज आज पण फिट बसू शकतो . पण आजचे संगीतकार उदितला वापरून घेण्यास अनुत्सुक असावेत किंवा सध्याच्या टेक्नो सॅव्ही सांगीतिक युगात उदितच आऊटडेटेड झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही . आजच्या इंटरनेटच्या युगात तरुण पिढी नव्वदच्या दशकातल्या संगीताला आणि पर्यायाने उदीतच्या गाण्यांना एक्सप्लोर करत आहे . उदित ची गाणी अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये जागा पटकावून आहेत .एका पिढीसाठी उदित नेहमी त्यांच्या अभिव्यक्तीचा आवाज राहील हे नक्की .
View More
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
करमणूक
महाराष्ट्र

























