एक्स्प्लोर

BLOG | साथिया... तूने क्या किया

एस. पी. बालासुब्रमण्यम आपल्या कामाविषयी प्रचंड प्रामाणिक होते. आजच्या घडीला एस.पी. बालासुब्रमण्यम यांच्या नावावर 16 विविध भाषांमध्ये 40 हजारांपेक्षा अधिक गाणी गायल्याचं रेकॉर्ड आहे.

वर्ष होतं सन 2000. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन भारत दौऱ्यावर असताना सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांची ते भेट घेत होते. लता मंगेशकर यांची मोठ्या आदरानं क्लिंटन यांनी विचारपूस केली. लतादीदींच्या आवाजाची जादू जगभर पसरलेली होतीच, पण त्यासोबतच सर्वात जास्त गाणी गाणारी गायिका म्हणून क्लिंटन यांनी लतादीदींचं कौतुक केलं. मात्र लता मंगेशकरांनी क्लिंटन यांना थांबवत तिथे उपस्थित एका गायकाकडे हात करत सांगितलं. "माझ्यापेक्षा जास्त गाणी यांनी गायली आहे." क्लिंटन यांनी त्या गायकाचा हात हातात घेतला. “तुम्ही किती गाणी गायली” ? असं क्लिंटन यांनी विचारल्यावर त्या गायकानं स्मित हास्य करत उत्तर दिलं, "35 हजार". क्लिंटन यांना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं, "किती वर्षात?" त्यावर ते म्हणाले “35 वर्षात..” क्लिंटन यांनी या महान गायकासमोर अक्षरशः हात जोडले. ते गायक होते.. श्रीपती पंडिताराध्युला बालासुब्रमण्यम.

अर्थात ज्यांना इंडस्ट्रित प्रेमानं बाला, बालू किंवा एसपीबी म्हटलं जातं ते एस. पी. बालासुब्रमण्यम. करिअरच्या 35  वर्षांत 35 हजार गाण्यांचं गणित आपल्यासारखी अडाणी माणसं पटकन करतात. मी पण हिशेब लावला. वर्षाला हजार गाणी. दिवसाला साधारण 3 गाणी रेकॉर्ड केली असं म्हणूया. फेब्रुवारी 1981 मध्ये एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी एकाच दिवशी बारा तासात तब्बल 21 गाणी रेकॉर्ड केली. विशेष म्हणजे या 21 गाण्यांपैकी त्यांनी एकाही गाण्याचा सराव केला नव्हता. पहिल्या किंवा फार तर दुसऱ्या टेकमध्ये गाण्याला संगीतकार "ओक्के" म्हणत गेले आणि 12 तासांत 21 गाणी रेकॉर्ड झाली. गाणं गाताना एकाग्रता आणि साधनेतून हे सहज होत गेल्याचं बाला सर सांगायचे. एक काळ तर असा होता की बाला सरांचं दररोज 15  ते 20 गाणी रेकॉर्ड करण्याचं रुटिन झालं होतं. हिंदीमध्ये आनंद मिलिंद या संगीतकार जोडीसाठी त्यांनी सलग 16 गाणी रेकॉर्ड केली होती. एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा हा गायकीचा प्रवास आणि यश सोपं नव्हतं. त्यासाठी अनेक वर्षांची मेहनत, संघर्ष आणि कामाप्रती निष्ठा होती. मुळात बालासुब्रमण्यम यांना गायक वगैरे व्हायचंच नव्हतं.

एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा जन्म 4 जून 1946 रोजी आंध्रप्रदेशच्या नेल्लोरमध्ये झाला. बालांचे वडील हरीकथांचे कार्यक्रम करायचे. घरात नाटक, कलेचं वातावरण होतं पण आपल्या मुलानं इंजिनीअर किंवा डॉक्टर होऊन आर्थिक परिस्थिती बदलावी, अशी मध्यमवर्गीय इच्छा त्यांच्या वडीलांची होती. त्यामुळे बालासुब्रमण्यम यांनी अनंतपूरच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र आजारपणामुळे त्यांना शिक्षण सोडावं लागलं. घरची जबाबदारी असल्यानं त्यांनी चेन्नई (मद्रास) मध्ये नोकरी पत्करली. एस.पी. बालासुब्रमण्यम यांचा आवाज छान होता. म्हणजे मित्र त्यांचं कौतुक करायचे म्हणून ते स्थानिक गायन स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. पण त्याकडे करिअर म्हणून त्यांनी कधी पाहिलंच नव्हतं.

वर्ष 1964 मध्ये नशिबानं बालासुब्रमण्यम यांना एक संधी दिली. घडलं असं की, चेन्नई (मद्रास)मध्ये बाला ज्या रुममेटसोबत राहात होते. त्यानं बालांचं नाव मद्रासमध्ये होणाऱ्या एका स्पर्धेसाठी परस्पर नोंदवून टाकलं. त्यासाठीचे दहा रुपयेही त्यानंच भरले. ही स्पर्धा खूप महत्वाची होती. कारण या स्पर्धेसाठी पी. नागेश्वर राव, घंटसाला आणि दक्षिणामूर्ती हे तेलुगू सिने इंडस्ट्रीतले दिग्गज संगीतकार परीक्षक म्हणून काम पाहणार होते. या स्पर्धेत एकतर नॉन फिल्मी गाणं गायचं होतं. शिवाय ते तुम्ही लिहून कंपोज केलेलं असावं, अशी अट होती. बाला सरांनी आपलं गाणं सादर केलं आणि ते एका कोपऱ्यात जाऊन इतर मुलांचे परफॉर्मन्स बघत बसले. त्याच वेळी बालांजवळ एक व्यक्ती येऊन म्हणाली. "तू खूप छान गायलास. माझ्या पुढच्या सिनेमात तू गाणं गाशील का?"

बाला जरा गोंधळून म्हणाले. "अहो मी तुम्हाला ओळखलं नाही. मला माफ करा, मी चित्रपटात वगैरे गाण्याचा कधी विचार केला नाहीय" ती समोरची व्यक्ती म्हणाली. "माझं नाव एस.पी. कोदान्तापानी आहे, मी संगीत दिग्दर्शक आहे." बालासुब्रमण्यम यांनी कोदान्तापानी यांना विनयपूर्वक नकार दिला. "मला माफ करा, माझे वडील खूप कष्ट घेत आहेत. मला इंजिनिअर होऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे." असं सांगून बालासुब्रमण्यम निघून गेले. त्यांनी कोदान्तापानी यांना घरचा पत्ताही दिला नाही. कोदान्तापानीही तेव्हा नवखेच होते. जवळपास वर्ष दीड वर्ष त्यांनी बालासुब्रमण्य यांचा पाठपुरावा करून गाण्यासाठी तयार केलं. शेवटी बालासुब्रमण्यम तयार झाले. आयुष्यात कधीही सिनेमात गाण्याचं स्वप्न बालांनी पाहिलं नाही. मात्र काही स्वप्न तुमचा पाठलाग करत असतात, बाला सरांच्या बाबतीत तेच घडलं होतं.

वर्ष 1966. रेकॉर्डिंगचा दिवस ठरला. चित्रपट होता 'श्री श्री श्री मर्यादा रामन्ना'. प्रॉडक्शन हाऊसची गाडी बालांना घ्यायला येणार होती. पण ती काय आलीच नाही. शेवटी कंटाळून बाला सरांनी सायकलवरून स्टुडिओ गाठला. त्यात चौकीदार त्यांना आत सोडेना. सायकलवरून धापा टाकत आलेला मुलगा "मी गायक आहे, आज माझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग आहे" असं म्हणत असेल. तर त्यावर कोण विश्वास ठेवणार?. चौकीदारानं बालासुब्रमण्यम यांना अक्षरशः हकललंच होतं. मात्र तेवढ्यात संगीतकार कोदान्तापानी आले आणि त्यांनी बालांना आत नेलं.

त्याकाळी लाईव्ह रेकॉर्डिंग असायचं. शेकडो वाद्यवृंद, संगीतकार, गायक आणि रेकॉर्डिंग करणारी टेक्निकल टीम, क्रू मेंबर्स असा दोन तीनशे जणांचा तामझाम असायचा. बालसुब्रमण्यम यांनी हे असं याआधी कधीच पाहिलं नव्हतं. शिवाय ते ज्यांच्यासोबत गाणार होते. त्या गायिका होत्या सुशिला. ज्यांचं तमिळ, तेलुगू इंडस्ट्रीतल्या टॉपच्या गायिका म्हणून नाव होतं. त्यांच्यासोबत पहिलं गाणं गाण्याची संधी वयाच्या विसाव्या वर्षी एस.पी. बालासुब्रमण्यम यांना मिळाली. काय आश्चर्य पाहा! कसलेले गायकही जिथे एका गाण्यासाठी दिवसभर टेक वर टेक घेतात. तिथे बालासुब्रमण्यम यांनी गायलेल्या गाण्याचा पहिला टेक ओके झाला. इथूनच एस. पी. बालासुब्रमण्यम नावाच्या पर्वाचा सिने जगतातला श्रीगणेशा झाला.

बालांना आता अनेक सिनेमांच्या ऑफर्स येत होत्या. घरची जबाबदारी आणि गाणं असा संघर्ष करत असताना त्यांना वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी लग्न करावं लागलं. त्यांची प्रेमकहाणी सिनेमातल्या कथांसारखीच रंजक आहे. मद्रासमध्ये बाला ज्यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायचे. त्या घरमालकाच्या मुलीसोबतच त्यांचे प्रेमसंबंध जुळले. बालांनी मुलीच्या वडिलांकडे लग्नासाठी रीतसर विचारणा केली. पण त्यावेळी जात समान असली तरी, त्यातही गोत्र वगैरे बघितलं जायचं. अपेक्षेप्रमाणे नकार आल्यावर बालासुब्रमण्यम यांनी पळून जाऊन लग्न केलं. मित्रांनी जमवलेल्या 500 रुपयांत लग्न पार पडलं. तीन चार महिन्यांत सगळ्यांचा राग शांत झाल्यावर ते परत आले. पण सगळं स्थिरस्थावर व्हायला दोन वर्ष गेली.

वर्ष 1969, एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्या आयुष्यात एक सुवर्णसंधी चालून आली. तमिळ सिनेमात ज्यांच्याशिवाय पानही हलत नव्हतं असे सुपरस्टार भारतरत्न एम. जी. रामचंद्रन आणि तमिळची लेडी सुपरस्टार जयललिता (दोघेही नंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते.) यांच्यावर गाणं चित्रित होणार होतं. चित्रपट होता 'आदिमाई पेन्न'. एमजीआर आणि जयललिता यांची लोकप्रियता तेव्हा देवासमान होती. पण एमजीआर मात्र एका नवख्या आवाजाच्या प्रेमात होते. तो आवाज होता एस.पी. बालासुब्रमण्यम यांचा. वय वर्ष 23 असलेल्या कडकडीत आवजाच्या या गायकाला एम.जी रामचंद्रन यांनी बंगल्यावर बोलावलं. " पुढच्या सिनेमात माझ्यावर चित्रित होणारं गाणं तू गावंस अशी माझी इच्छा आहे." अशी विनंती एम. जी. रामचंद्रन यांनी अवघ्या 23 वर्षाच्या एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्याकडे केली. करीअरच्या पहिल्याच टप्प्यात एवढ्या मोठ्या व्यक्तीनं अशी ऑफर देणं हे संधीपेक्षाही प्रचंड जबाबदारीचं ओझं होतं. एमजीआर यांनी संगीतकार के.व्ही. माधवन यांची बालांशी भेट घालून दिली. महिनाभरानंतर हेच गाणं जयपूरला चित्रित होणार होतं. तेव्हा रेकॉर्डिंगही सोबतच व्हायचं. एमजीआर यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्नं अनेकांचं असायचं. बालाचं हे स्वप्नं कारकीर्दीच्या पहिल्या दोन वर्षातच पूर्ण होणार होतं. गाण्याची रिहर्सल सुरू झाली. पण अचानक बालांना टायफॉईड झाला. ते अंथरुणातून उठूही शकत नव्हते. ही मोठी संधी आपल्या हातातून जातेय की काय असं वाटत असतानाच स्वत: एम जी रामचंद्रन यांनी बालांचा हात हातात घेत धीर दिला.

"बालू काळजी करु नकोस. मी गाण्याचं शुटिंग महिनाभर पुढे ढकलतो. हे गाणं तूच गाणार आहेस, लवकर बरा हो!" प्रश्न गाण्याचं शुटिंग पुढे ढकलण्याचा नव्हता, तर एम. जी. रामचंद्रन, जयललिता यांच्यासारखे सुपरस्टार मंडळी ज्यांचा एक एक मिनिट महत्वाचा असायचा. कारण एम.जी. रामचंद्रन यांच्यावर डीएमके पक्षाची खजिनदार पदाची मोठी जबाबदारी होती. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं अशा व्यक्तीनं एका नवख्या गायकासाठी आपलं महिनाभराचं शेड्युल बदललं. जयललिता यांचाही तसाच बोलबाला होता. सोबत शेकडो क्रू मेंबर्स, वाद्यवृंद आणि जयपूरच्या ज्या लोकेशनवर शुटिंग होणार होतं त्या ठिकाणच्या परवानग्या असं सगळंच बदलावं लागणार होतं. या सगळ्यात एमजीआर यांना एस पी बालासुब्रमण्यम यांचा आवाज असणं महत्वाचं वाटलं. यातच सर्वकाही आलं.

70 च्या दशकात एम.जी. रामचंद्रन, जेमिनी गणेसन, शिवाजी गनेसन अशा अनेक सुपस्टारचा आवाज बालासुब्रमण्यम बनले होते. पी. सुशिला, एस. जानकी, वाणी जयराम, एल. आर. ईस्वरी या दिग्गज गायिकांसोबत त्यांचे ड्युएट गाजू लागले. त्यामध्ये 70च्या दशकात इलयाराजा या संगीतकाराचा उदय झाला होता. इलायाराजा यांच्यासोबत केलेली अनेक गाणी हिट झाली. 70चं दशक तेलुगू, तमिळ सिनेसृष्टीत बालासुब्रमण्यम यांनी गाजवून सोडलं. 1979साली 'संकराभारनम' या सांगितीक चित्रपटातल्या गाण्यासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

पण आपल्या सर्वांना एस. पी. बालासुब्रमण्यम यांची ओळख झाली ती 'एक दुजे के लिए' या सिनेमामुळे. मुकेश, मोहम्मद रफी यांच्यानंतर 80च्या दशकाच्या सुरूवातीपर्यंत सिनेमांमध्ये किशोर कुमार यांच्या आवाजातल्या गाण्यांचा बोलबाला होता. अशावेळी एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलं.

वर्ष होतं 1981. तमिळ, तेलुगू सिनेसृष्टीतले दिग्गज दिग्दर्शक बालाचंदर यांनी आपल्या तेलुगू चित्रपट 'मारो चरित्र' चा हिंदी रिमेक करायचं ठरवलं. त्या सिनेमानचं हिंदी नाव होतं 'एक दुजे के लिए'. सिनेमातलं मुख्य पात्र दक्षिण भारतातलं असल्यानं त्याला हिंदी येत नाही. मग सिनेमातली गाणीही दक्षिणेतल्या गायकानं गावी असा विचार झाला. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या कर्णमधूर संगीतावर एस पी सुब्रमण्यम यांच्या आवाजानं चार चाँद लावले. "तेरे मेरे बिच मे कैसा है ये बंधन. अंजाना.... तुने नहीं जाना मैंने नही जाना..." किंवा "हम बने तुम बने इक दुजे के लिएं" या गाण्यात i dont know What u say! असं सहज हसत हसत गाणाऱ्या आवाजानं सगळ्यांना प्रेमात पाडलं. दिग्दर्शक बालाचंदर, अभिनेता कमल हासन, रती अग्निहोत्री यांच्यासह अनेकांचा हा पहिलाच हिंदी सिनेमा होता. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल हे मात्र बालासुब्रमण्यम यांच्या हिंदी उच्चाराबाबत साशंक होते. पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा बालांच्या आवाजाला लोकांनी खूप पसंत केलं आणि सिनेमाला डोक्यावर घेतलं. प्रेमी जीवांचा विद्रोह दाखवणारा 'एक दुजे के लिए' सिनेसृष्टीतला महत्वाचा टप्पा मानला जातो. सिनेमा सुपरहिट तर झालाच. पण या चित्रपटातील गाण्यांनी नवे किर्तीमान स्थापित केले. हे वेगळं सांगायची गरज नाही. त्याच वर्षी 'तेरे मेरे बीच में' या गाण्यासाठी एस. पी. बालासुब्रमण्य यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पहिल्याच हिंदी सिनेमात थेट राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हे बालांसाठी सुरेल पोचपावतीच होती. ‘एक दुजे के लिए’ मधल्या गाण्यांनी हिंदी सिनेमाला एस.पी. बालासुब्रमण्यम - लता मंगेशकर अशी ड्युएट जोडी दिली. पुढे या जोडीनं जवळपास दीड दशक गाजवलं. त्यातला पुढचा टप्पा होता 'मैने प्यार किया'.

'मैने प्यार किया' हा सलमान खानचा पहिलाच सिनेमा. यात सलमानचा आवाज बनले एस. पी. बालासुब्रमण्यम. सलमान तेव्हा अगदीच कोवळा होता. त्याउलट बाला सरांचा आवाज भारदस्त आणि मॅच्युअर्ड असल्यानं तो योग्य वाटेल का? अशी अनेकांना शंका होती. पण ‘मैने प्यार किया’ सिनेमाची गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. आजही ती गाणी तेवढीच लोकप्रिय आहेत. बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकरांच्या आवाजानं सजलेल्या या गाण्यांमुळे सलमान खान रातोरात स्टार झाला. "दिल दिवाना बिन सजना के माने ना..... यह पगला है, समझाने से समझें ना....." ‌या गाण्याठी एस. पी. बालासुब्रमण्यम यांना हिंदीतला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पुढे अनेक सिनेमांत सलमान खानचा आवाज एस. पी. बालासुब्रमण्यम यांचाच असायचा. सलमानचा सिनेमा सुरू असताना गाणं लागलं तर प्रेक्षकांच्या मनात फक्त बालांचाच आवाज असणार हे समीकरणच झालं होतं. मैने प्यार किया नंतर सलमान खानच्या लव, पत्थर के फुल, साजन, अंदाज अपना अपना, हम आपके है कौन या सिनेमांमध्ये बाला सरांचे जादूई स्वर होते. ‘लव’ आणि ‘पत्थर के फुल’ हे सिनेमे दणकून आपटले. पण लव सिनेमातलं " साथिया..... ये तुने क्या किया.." हे गाणं आजही लहान थोरांच्या ओठावर असतं.

हम आपके है कौन मधल्या "भाभी तेरी बहेना को माना, हाय राम कुडियों का है जमाना" हे गाणं आजही युनिव्हर्सल हिट आहे. वंश सिनेमातलं "आके तेरी बाहों मे हर शाम लगे सिंदुरी" हे बाला सरांचं सर्वात लोकप्रिय गाणं.

साजन सिनेमातली आर्त आणि मस्तीखोर अशा दोन्ही अंदाजातली गाणी गाण्याचं कसब एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्याकडे होते. त्यांनी ते सिद्धही केलं. 1985 साली आलेल्या 'सागर' सिनेमातल्या "युंही गाते रहो, मुस्कुराते रहो.... नाचों रे सब झुंम के गाओ रे.. आओ रे...." हे मस्तीखोर गाणं गाण्यासाठी किशोर कुमार यांच्या तोडीस तोड गायक हवा होता. पण किशोर दांच्या समोर टिकायची हिंमत तेव्हा कोणत्याच गायकात नव्हती. अशावेळी एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी ते गाणं गायलं आणि सगळ्यांचीच वाहवा मिळवली. ‘सागर’ सिनेमात ऋषी कपूर यांना किशोर दा यांनी आवाज दिला, तर कमल हासन यांचा आवाज एस.पी. बालासुब्रमण्यम बनले. सागर सिनेमामधलंच.. सच मेरे यार है, बस वही प्यार है, जिसके बदले में कोई तो प्यार दे, बाकी बेकार है, यार मेरे. हो यार मेरे.. हे गाणं माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक आहे.

1991 साली मणिरत्न यांच्या 'रोजा' सिनेमात ए. आर. रहमान यांचं संगीत आणि बाला सरांच्या आवाजातली गाणी कोण विसरू शकेल. " रोजा जानेमन......" हा स्वर सिने रसिकांच्या हृदयावर कोरला गेला तो कायमचाच. याव्यतिरिक्त अनेक हिंदी सिनेमांमधून एस. पी. बालासुब्रमण्यम गात होते. पण 1995-96 नंतर विशेषतः 20 व्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना सिने जगतात अनेक बदल झाले. त्याची बरीच कारणं होती. नवीन संगीतकार आले, नवे गायक आले, तंत्रज्ञान बदललं. निर्माते दिग्दर्शक यांचा व्यवहारीपणा वाढला. अशा वातावरणात बाला सर फार रुळले नाही. त्यांनी बॉलिवूडमधली गाणी गाणं बंदच केलं. मात्र तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नडमध्ये ते गात राहिले. अलिकडेच आलेल्या शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' सिनेमाचं टायटल सॉन्ग एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी गायलं होतं.

आपण एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्या गाण्याविषयीच बोलतोय. पण त्यांची प्रतिभा फक्त गाण्यांपुरतीच मर्यादित नाहीय. बाला सर कमल हासनचा तेलुगू आवाज म्हणूनही प्रसिद्ध आहेत. कमल हासनचे तमिळ सिनेमे तेलुगूमध्ये बालासुब्रमण्य सरांच्या आवाजातच डब केले जातात. कमल हासनच्या ‘दशावतारम’ या तमिळ सिनेमाचं तेलुगू व्हर्जन एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्याच आवाजात रेकॉर्ड करण्यात आलंय. ज्यामध्ये त्यांनी सात वेगवेगळ्या पुरुषांचे आवाज आणि एका स्त्री पात्राचाही आवाज काढला. एवढंच नाही तर एम. जी. रामचंद्रन, गिरीश कार्नाड, अनिल कपूर, के. भाग्यराज, सलमान खान, रजनिकांतपर्यंत अनेक दिग्गजांच्या आवाजाचं डबिंग बाला सरांनी केलंय. सर बेन केंग्जली यांनी गांधीजींची भूमिका साकारलेल्या 'गांधी' या हॉलिवूडपटाच्या तेलुगू व्हर्जनचा आवाजही एस. पी. बालासुब्रमण्यम यांचाच आहे.

गायक आणि डबिंग आर्टिस्ट व्यतिरिक्त एस.पी. बालासुब्रमण्यम हे उत्कृष्ट अभिनेते सुद्धा आहे. तेलुगू, तमिळ, कन्नड अशा तिन्ही भाषांमध्ये त्यांनी तब्बल 75 चित्रपटांमध्ये अभिनयसुद्धा केलाय. आयुष्यात आपण काहीही न करता, वेळ नाही अशी ओरड करत असतो. पण हे असं कर्तृत्व बघितल्यावर आपल्याला प्रश्न पडतो, कधी केलं असेल या माणसानं हे सगळं!

आजच्या घडीला एस.पी. बालासुब्रमण्यम यांच्या नावावर 16 विविध भाषांमध्ये 40 हजारांपेक्षा अधिक गाणी गायल्याचं रेकॉर्ड आहे. ज्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. 6 राष्ट्रीय पुरस्कार, तेलुगू सिनेमातला प्रतिष्ठित नंदी पुरस्कार तब्बल 52 वेळा त्यांनी पटकावलाय. बॉलिवूड फिल्मफेअर अवॉर्ड्स, साऊथचे सहा फिल्मफेअर अवॉर्ड्स, NTR नॅशनल अवॉर्ड, तर 2016 साली नॅशनल फिल्म पर्सनॅलिटी पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. 2001 साली भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि 2011 साली पद्म भूषण पुरस्कारानं एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा गौरव करण्यात आला होता.

एवढं सगळं भरभरून जगलेल्या माणसाची एक छोटीशी शेवटची इच्छा काय असावी? तर त्यांना शास्त्रीय संगीताची एक मैफल सजवायची होती. या वयातही शास्त्रीय गाणं शिकण्याची त्यांची इच्छा होती हे ऐकून आश्चर्य वाटेल पण आजच्या तारखेला 40 हजारांपेक्षा जास्त गाणी गायलेल्या बालासुब्रमण्यम हे कधीही गाणं शिकलेले नाहीत.

गाणं शिकले असता तर आणखी यश मिळालं असतं का? या प्रश्नावर त्यांनी फार छान उत्तर दिलं होतं. "शास्त्रीय गायक फार शिस्तबद्ध आणि साचेबंद गाणं गात असतात. याउलट चित्रपट संगीतात नवरसांचा वापर उलट सूलट आणि मजेशीर पद्धतीनं केला जातो. चित्रपट संगीताला कुठलंही बंधन नसतं, उलट नवीन प्रयोगाचं इथे स्वागत केलं जातं. त्यामुळे शास्त्रिय गाणं शिकलो असतो तर कदाचित मी सिनेमाकडे वळलोही नसतो" असं त्यांना वाटायचं.

एस. पी. बालासुब्रमण्यम आपल्या कामाविषयी प्रचंड प्रामाणिक होते. त्याचं छोटसं उदाहरण सांगतो. ब्रिदलेस हा प्रकार आपल्याला शंकर महादेवन यांच्यामुळे कळला. पण तमिळ सिनेमा ‘केलादी कन्मणी’ मध्ये बालासुब्रमण्यम यांनी ब्रिदलेस गायल्याची चर्चा रंगली होती. त्यावर काही वर्षांनी त्यांनी स्पष्टीकरण दिलं, की ब्रिदलेस गाणं हे गिम्मिक होतं. तुम्ही श्वास रोखून ठेवू शकता. पण गाताना श्वास रोखणं हे केवळ अशक्य आहे. कोणीही गायक साडे तीन ते चार मिनिटांपेक्षा जास्त वेळ श्वास रोखूच शकत नाही. चित्रपटातलं ते ब्रिदलेस गाणं हे टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालं. सिने इंडस्ट्रीतले लोक प्रेक्षकांना असं नवीन काहीतरी करून आकर्षित करत असतात. मला या सगळ्याचं श्रेय घ्यायचं नाहीय." हे त्यांनी अगदी प्रांजळपणे कबूल केलं होतं.

एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा हाच सच्चेपणा त्यांच्या गाण्यात दिसून आला. आपल्या गायकीवर मोहम्मद रफी यांच्या गायकीचा प्रभाव असल्याचं ते सांगत. रफी साहेबच का तर, त्यांचं गाणं डोळे बंद करून ऐकलं तर आपल्या डोळ्यासमोर दृश्यं, ते प्रसंग तो रोमान्स अक्षरशः दिसायला लागतो. इंजिनिअरींग कॉलेजला असताना रोज सकाळी सायकलवरून जाताना ते रफी साहेबांची गाणी ऐकायचे. कोणीतरी प्रेयसी तुमच्या कानाजवळ येऊन तुम्हाला साद घालतेय की काय असं रफी साहेबाचं गाणं ऐकताना वाटायचं. कारण रफी हे एक सहृदयी व्यक्ती होते. म्हणूनच एक चांगला गायक होण्याआधी तुम्ही एक चांगली व्यक्ती असायला हवं. हे ते सगळ्या गायकांना आवर्जुन सांगायचे. चांगल्या व्यक्तीचा चांगुलपणा कलेतही उतरतो आणि कला बहरत जाते असा त्यांचा विश्वास होता. या विचारांशी बांधील राहून ते जगलेही तसेच. त्यामुळे एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा आवाज हा आपला वाटतो, जिव्हाळ्याचा वाटतो.

🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाला सर 🙏🙏

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Embed widget