फूडफिरस्ता : आठवणी भुर्जीपाववाल्यांच्या
शनिवार पेठेत अहिल्यादेवी शाळेच्या बाहेरच्या कोपऱ्यावर साधारण 2000 सालापर्यंत एक काका भुर्जीपावची गाडी लावत असत. अंडा भुर्जीची येवढी चकाचक हातगाडी मी आजतागायत पाहिली नाही. बघायला गेलं तर साधी हातगाडीच पण रॉकेलच्या दिव्याच्या जागी ट्यूबलाईट, गाडीवरची स्वच्छता फाईव्हस्टार हॉटेलना लाजवेल अशी.

मागच्या ब्लॉगमधे भुर्जीपावबद्दल लिहिताना मनात, जुन्या दिवसांच्या अनेक आठवणी दाटून आल्या. उमेदवारीचे दिवस होते, वय कमी असल्याने ढोर मेहनत झाली असली तरी दिवसभराचे काम संपवल्यावर दोस्त लोकांची आठवण व्हायचीच. सुदैवानी सबंध पुण्यात पसरलेला मित्रपरिवार असल्याने, कोणी ना कोणी, कुठे तरी भेटायला तयार असायचंच! त्यामुळे आधी सायकलवर, नंतर दुचाकीवर रात्री अपरात्री पुण्यात, सुट्टीच्या आदल्या रात्री पुण्याच्या आसपास निरर्थक भटकंती ठरलेली.
दोस्त लोकांना भेटल्यावर तासंतास मैफिली रंगायच्या. त्यातून फुरसत मिळाल्यावर कधीतरी पोटात, पेटलेल्या भुकेची जाणीव व्हायची. खिशात पैशांच्या नावाने खडखडाट ठरलेला असायचा. आमच्या तुटपुंज्या बजेटमधे जिथे जाऊ शकायचो, ती हॉटेल्स कधीच बंद झालेली असायची. पोटात भूक तर मी म्हणत असायची.
“ऐसे बुरे वक्त मे जिसका कोई नही होता, उसका भुर्जीवाला होता है” ! हा साक्षात्कार अस्मादिकांना त्याच सुमारास झाला. खिशात फार पैसे नसताना अवेळी खाण्यानी आयुष्यभर न विसरता येण्यासारखे अनुभव दिलेत. किस्से तर अगणित घडलेत.
असाच एकदा एका जवळच्या मित्राबरोबर बुलेट घेऊन डेक्कनवरुन रात्री एकच्या आसपास येत होतो. हातात बुलेट असली तरी खिशातल्या दमड्यांचा आवाज बुलेटच्या आवाजापेक्षा अगदीच क्षीण होता. पोटात भुकेने तर नेहमीप्रमाणे कळस गाठला होता. जंगली महाराज रस्त्यावर पोचल्यावर, एका ठिकाणी लांबून ‘घासलेट’चा मिणमिणता दिवा बघून भुर्जीवाल्याकडे निदान एक भुर्जी तरी दोघात खाऊ अश्या विचाराने गाडी थांबवली.
योगायोगाने दोघांच्याही अंगात पांढरे शर्ट्स, वरती मिल्ट्री कलरची जर्किन्स, नेमक्या खाकी रंगाच्या आसपासच्या रंगांच्या पॅंट.गाडीवर उतरलोही नव्हतो त्याआधीच भुर्जीवाल्याने दोघांना सलाम ठोकला. आम्ही एकमेकांकडे फक्त एकदाच तिरक्या नजरेनी बघितलं आणि कुठल्याही स्क्रिप्टशिवाय आपोआप एक नाटक सुरु झालं.
भुर्जीवाला पोरगा नवशिका कळत होता, आम्ही काहीच न बोलता तो आम्हाला पोलिसवाला समजला होता. आम्ही फक्त तेच नाटक कंटिन्यू केलं.
बुलेट बाजूला लावत पहिल्यांदा त्याला गाडी उशीरा सुरु ठेवण्याबद्दल, ठेवणीतल्या आवाजात दरडावलं. त्याने दिलेलं थातूरमातूर उत्तर पटल्यासारखं दाखवून आमच्यासाठी दोन डबल भुर्जी, कडक भाजलेले पाव ‘लावायला’ सांगितले. त्या बिचाऱ्यानेही आधीपासून थांबलेल्या इतरांच्या ‘पब्लिकच्या ऑर्डरी’ थांबवत साहेबांची ऑर्डर आधी करायला घेतली.
होणाऱ्या बिलासाठी लागणारे पैसे तर दोघांच्या खिशात मिळूनही नव्हते. आता नाटक सुरु ठेवायला पर्याय नव्हता. म्हणून मग दोन पोलिसांच्या आपापसात ज्या चर्चा असू शकतात, तश्या गप्पा सुरु केल्या. त्यात आमच्या दोघांच्या समस्त मित्रांना (यूपीएससी, एमपीएससी न करता) पोलिसांमधल्या अधिकारी पदांचं सढळ हाताने वाटत, समोर आलेल्या 'स्पेशल' भुर्जी + आग्रहाने आणलेल्या बॉईल्ड अंड्याचा (एकीकडे राऊंडला खऱ्या पोलिसांची गाडी येत नाहीये ना ह्याचा अंदाज घेत ) फडशा पाडून, खिशात असलेले दहा रुपये गाडीवाल्याला टीप म्हणून देऊन, बुलेटवर स्वार झालो. डेक्कन कॉर्नरला येऊन गाडी स्टॅंडला घेऊन, पुढची दहा मिनिटं पोट दुखायला लागेपर्यंत हसत बसलो होतो, हे आजही आठवतंय.
आज माझा तो मित्र एक प्रतिथयश राजकारणी आणि उद्योजक बनला आहे. पण ही आठवण तोही विसरला नसणारे !
नंतर एकदा खिशात पैसे असताना त्या मुलाला बिलापेक्षा दुप्पट पैसे देत, मी त्या दिवशीचं न बोलता पापप्रक्षालन करायचा प्रयत्न केला तो भाग वेगळा. त्याने मला ओळखलं नाही हेच नशीब !
पण खिशात पैसे नसतानाही भरपेट भुर्जी त्या नाटकामुळेच खाता आली हे तेवढंच सत्य! सरधोपट मार्गापेक्षा, अश्या अनेक अतरंगी अनुभवांनी आपले खाद्यजीवन समृद्ध झालेलं असलं की बरं असतं.
पूर्वी आपला एक भुर्जीवाला दोस्त नासीर होता. जंगली महाराज रस्त्यावर, जिथे मॅकडोनाल्ड आहे त्याच्या समोर. बंगाली बाबू होता लहानपणी घर सोडून गावोगाव भटकंती करुन दुनियादारीचा भरपूर अनुभव घेऊन आलेला, त्यात स्वभाव गप्पिष्ट. मराठी सोडून अनेक भाषा बोलता यायच्या त्याला. गोड्या पाण्यातले मासे ह्या विषयात पीएचडी समान ज्ञान. भुर्जीपावाबरोबर कुठूनतरी अफलातून बांगडे निवडून आणून बनवायचा. तसे भरलेले बांगडे आजवर पुण्यात दुसरीकडे मिळाले नाहीत मला.
नासिरच्या गाडीवर रात्रीपर्यंत शेजारच्या वाईन शॉपमधून बाटली आणून प्लॅस्टिकच्या ग्लासमधून पिणाऱ्यांची गर्दी जास्त असायची. अश्यावेळी नासिर, “बोले तो भोत बिझी” ! कारागीर म्हणूनही तो कलंदरच होता. हातातल्या सुरीने एकाचवेळी 3-4 कांदे एकसारखेच बारीक चिरायचा. चिरलेला कांदा व्यवस्थित भाजत, एका हाताने अंडी फोडून त्यात सोडायचा. त्यात सराईत हाताने ऑर्डरप्रमाणे टोमॅटो, मिरची पडायची. तोंडाची टकळी नॉनस्टॉप सुरु आणि मधूनच बाजूला ठेवलेल्या सिगरेटचा झुरका घेत नासिरचे काम एका लयीत सुरु असायचे. पलिकडे ठेवलेल्या स्टीलच्या पिंपापाशी एखादा इसम ‘अर्धोन्मिलित’’ नजरेनी स्वतःचा ‘पव्वा’ संपवत उभा ठाकलेला असायचा. दुसऱ्या तव्यावर बांगडे तळायला ठेवलेले असायचे. त्याचा घमघमाट सुटलेला असायचा. ह्या अशक्य वासानीच तर मला नासिरच्या गाडीकडे पहिल्यांदा खेचत नेलं होतं !
पहिल्याच भेटीत ह्या बाबूने हाताच्या चवीनी दिल खुश हुवां ! गाडीवर सतत गर्दी असली तरी हा मनुष्य गर्दीपेक्षा दर्दी शोधणारा. त्याला खरा रस भुर्जीपावापेक्षा ‘कस्टंबर’ला मासे खायला घालण्यातच. मी स्वतः ओढत नसलो तरी त्याच्याकडे जाताना अधूनमधून त्याच्यासाठी एखादं ‘चार्म्स’’ चं पाकिट घेऊन जाऊन त्याला द्यायचो. मग तर त्याच्या गाडीवरच्या गिऱ्हाईकांच्या सततच्या गर्दीतही आमच्या गप्पांच्या अनेक मैफिली रंगायच्या. खाणारेही आमच्या अजब गप्पा क्रिकेट कॉमेंट्रीसारख्या ऐकत थांबायचे. ‘उकडलेल्या अंड्यांची भुर्जी’ हा प्रकार मी पहिल्यांदा त्याच्याच गाडीवर खाल्ला. एकदा माझ्या फर्माईशीवर त्याने खास माझ्याकरता शेजारच्या चायनीजवाल्याची कढई आणून कलकत्ता स्टाईल तेलात तळलेले (डीप फ्राय) “ओ अंबर बाबू अभी ये खा के देखो” म्हणत, आम्लेट बनवून घातलं होतं, अतिशय चविष्ट !
नासिरची गाडी 2002 पर्यंत तरी तिथेच होती. त्यावेळी काही महिने मला तिकडे जायला जमलं नाही, त्या मधल्या काळात तो कुठे गायब झाला कुणास ठाऊक ?
ह्या निमित्ताने आठवतंय, शनिवार पेठेत अहिल्यादेवी शाळेच्या बाहेरच्या कोपऱ्यावर साधारण 2000 सालापर्यंत एक काका भुर्जीपावची गाडी लावत असत. अंडा भुर्जीची येवढी चकाचक हातगाडी मी आजतागायत पाहिली नाही. बघायला गेलं तर साधी हातगाडीच पण रॉकेलच्या दिव्याच्या जागी ट्यूबलाईट, गाडीवरची स्वच्छता फाईव्हस्टार हॉटेलना लाजवेल अशी. समोरच्या स्वच्छ पुसलेल्या काचेवर अँटिनासह सुसज्ज अवस्थेतला एक मिनी टीव्ही ठेवलेला. विविधभारतीवर हळू आवाजात जुनी हिंदी मराठी गाणी सुरु. एकंदरीत शनिवार पेठेला तंतोतंत शोभेल असा अवतार. शुद्ध स्पष्ट उच्चारात, स्वच्छ पेहराव असलेले शिडशिडीत बांध्याचे आणि गव्हाळ रंगाचे ते काका "बोला साहेब,किती भूर्जी देऊ? असा खडा सवाल करत.
त्यानंतर कांदा, स्वच्छ धुतलेल्या टॉमॅटोची नाजूक हाताने बारीक छाटणी करायचे. अंड्याला कुठे त्रास होऊ नये (!) अश्या बेताने ते फोडून, कांदा टोमॅटोच्या मध्ये हातातल्या मॅशरने खड्डा करुन निगुतीने भुर्जी बनवत असत. बनवल्यावर शेजारी टांगून ठेवलेल्या फडक्याला हात पुसून स्वच्छ हाताने स्टीलच्या प्लेटमधे ( हे अजून एक वेगळेपण ) भुर्जी पसरुन त्यावर, घरुन बारीक चिरुन आणलेली कोथिंबीर पसरुन आपल्याला देत. भुर्जी बनवल्यावर फोडलेली अंडी, कांद्याची फोलफटं, टोमॅटोची सालं कडेला ठेवलेल्या पिशवीत जपून ती परत नेऊन कोपऱ्यावरच्या कुंडीत टाकून देत असत. एकदम स्वच्छ कारभार !
जरा परिचय झाल्यावर एकदा, चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवायचा प्रयत्न करत मी विचारलं, "काका, अंडा आम्लेटवर समजा कधी काळा डाग आलाच, तर ते तुम्ही ते कचऱ्यात टाकून देता का ओ ?" त्यावर (तेवढं एकदाच ) मनमुराद हसलेलं पाहिलं त्यांना. “काय साहेब चेष्टा करता म्हाताऱ्याची ?" असं काहीसं पुटपुटत स्वतःच्या चकाचक गाडीकडे एकदा अभिमानानी नजर टाकून पुन्हा स्वतःशीच हसले.
त्यानंतर मात्र दरवेळी गेलो की या ! म्हणत स्वागत करायचे. भुर्जी बनवेपर्यंत न मागता एखादे बॉईल्ड एग स्टीलच्या प्लेटमधे समोर ठेवायचे. त्याचे पैसे घ्यायला नम्र नकार द्यायचे आणि हात जोडून अतिथी देवो भव म्हणायचे !
दोन-तीनदा त्यांनी अंड्याचे पैसे घेतले नाहीत म्हणून त्यांच्याकडे गेलो नाही मी काही काळ आणि नंतर राहूनच गेलं... का कुणास काही महिन्यांनी त्यांची गाडी दिसणं बंदच झालं. मनाला रुखरुख लागून राहिली ती कायमची. कारण मितभाषी असले तरी असा ‘स्वच्छ’ भुर्जीवाला ह्यापुढे कधी भेटेल असं मला आज तरी वाटत नाही.
छोट्या हातगाडीवर का होईना पण ताठ मानेनी स्वतःचा व्यवसाय करणारी साधी माणसं असतात ही. जाताजाता दोन शब्द गोड बोलले, त्यांची जराशी चौकशी केली तरी त्यांच्या श्रमाचे चिज झाल्यासारखं वाटतं त्यांना.
सगळ्यांशी आपली मैत्रीच होते, अश्यातला काहीच भाग नसतो. काहींची नाव आठवतात, काही विसरली जातात; तर काहींची नावंही आपल्याला धड माहितीही नसतात.
पण सरळ व्यवसाय करतानाही समोरच्याला आपल्याकडून त्यापेक्षा काहीतरी "जास्ती" द्यायची ह्या लोकांची भावना मला कायम त्यांच्याकडे जायला भाग पाडते. नाहीतर भुर्जी, वडे ह्यासारखे पदार्थ बनवणार्यांची कमी नाही आपल्याकडे !























