एक्स्प्लोर
Advertisement
BLOG | कोविड 19- अनुभव, उपचार आणि बरंच काही
'माझी मनस्थिती अतिशय वेगळी होती. लोकांना माझी काळजी होती. कारण महाराष्ट्रातला पहिला covid-19 बाधित पत्रकार म्हणून आता माझी ओळख होणार होती.'एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांचा कोरोनाशी यशस्वी सामना करुन परतल्यानंतरचा अनुभव...
एका पोलिसाच्या संपर्कात आल्यामुळे अकरा तारखेला मनातली धाकधूक वाढली होती. आपण पण टेस्ट करून घ्यावी का असा प्रश्न निर्माण झाला. ताबडतोब कॅमेरामन, मी आणि माझे एक वरिष्ठ सहकारी यांनी तात्काळ टेस्ट करून घेतली. आतापर्यंत covid-19 संदर्भात शरीरात कोणत्याही प्रकारची लक्षणं दिसून आली नव्हती. निर्धास्त मन घेऊन आम्ही ती टेस्ट केली होती. पण कितीही झालं तरी मनाच्या एका कोपऱ्यात या सगळ्या संदर्भात खूप भीती वाटत होती. जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर काय करायचं असा प्रश्न मला पडला होता. पण गेल्या अनेक दिवसात रिपोर्टिंग करत असताना हवी तेवढी खबरदारी मी घेतली होती. खरं म्हणजे ही खबरदारी घेणे, आपण बोलतोय तितकं सोप्प नाहीये. जे घरी बसलेत त्यांना याबद्दल सांगूनही कळणार नाही, हे सर्व विचार मनात सुरू असतानाच पुन्हा कामाला सुरुवात केली.
11 तारीख गेली. 12 तारखेचा म्हणजेच रविवारचा दिवस उजाडला. इतक्यात तर मी विसरून पण गेलो होतो की मी टेस्ट केली. काही वेळानंतर माझ्या सहकार्याचा कॉल आला, तेव्हा मला आठवलं की अजून टेस्टचा रिपोर्ट आला नाहीये. दिवसभर रिपोर्टची वाट बघून मग संध्याकाळी गाणी ऐकत बसलो होतो. त्याचवेळी फोन वर एक मेल आला. त्यातच माझा रिपोर्ट होता. आणि रिपोर्ट मध्ये माझं आयुष्य बदलून टाकणारा शब्द लिहिलेला होता. तो म्हणजे "Detected"
क्षणात मूड बदलला. स्वतःपेक्षा घरच्यांची जास्त काळजी वाटू लागली. त्यांना काय समजवायचं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. कारण अनेक वेळा विनवण्या करुन देखील मी कोणाचं ऐकलं नव्हतं. आता माझ्या चुकीमुळे त्यांना काही गोष्टी सहन कराव्या लागणार होत्या. अखेर मन अतिशय घट्ट केलं आणि आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी कधी निघायचं, कुठे जायचं या सगळ्या संदर्भात अनेकांशी बोललो. आणि ठाण्याच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ऑफिसमधून धडाधड फोन यायला सुरुवात झाली. त्यासोबत अनेक पत्रकार मित्रांची देखील फोन येत होते. माझी मनस्थिती अतिशय वेगळी होती. लोकांना माझी काळजी होती. कारण महाराष्ट्रातला पहिला covid-19 बाधित पत्रकार म्हणून आता माझी ओळख होणार होती.
13 तारीख उजाडली. आज खूप गोष्टी घडणार याची आधीच कल्पना आली होती. मी हॉस्पिटलला निघून गेल्यानंतर बीएमसी मधून घरी कर्मचारी येणार, आई-वडिलांना विलगीकरण सेंटर वर घेऊन जाणार, सोबत आजूबाजूच्या लोकांना देखील घेऊन जाणार, माझं घर, माझा परिसर सर्व सील होणार, मोठे मोठे बॅनर लावून ठळक अक्षरात "इथे कोरोनाचा रुग्ण राहतो" असं सांगितलं जाणार, आणि पुढचे काही दिवस डिप्रेशन मध्ये जाणार, हे सर्व विचार करूनच मला रडू कोसळलं. अखेर महत्त्वाचं सामान आणि काही कपडे घेउन मी निघालो. आई-वडिलांना यासंदर्भात अर्धी कल्पना मी दिली होती. त्यांना अलविदा न करताच तिथून निघून गेलो. घरापासून लांब ॲम्बुलन्स उभी होती. त्यात बसून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो.
मी इथे आलो असतानाच घरी आईवडिलांची तळमळ सुरू झाली. बायकोचे फोन सुरू झाले. ती माहेरी असल्याकारणाने तशी सुरक्षित होती. काळजी मात्र माझ्या आईवडिलांची होती. घरी असताना मी काळजी घेत होतोच पण, तशी मी फिल्डवर असताना देखील घेत होतोच ना, त्यामुळे मन खूप अस्वस्थ झालं. इथे हॉस्पिटलमध्ये माझ्यावर उपचार सुरू झाले. तर तिथे घरी बीएमसीची प्रोसेस सुरू झाली. माझ्या अंदाजाप्रमाणे आई-वडिलांना आणि आजूबाजूच्या लोकांना बीएमसीच्या विलगीकरण सेंटरवर नेले गेले. एरिया सील करण्यात आला. सगळीकडे निर्जंतुकीकरण करण्यात आलं. त्यानंतर आईवडिलांची टेस्ट करून घेण्यासाठी माझी धावपळ सुरू झाली.
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर दुपारी डॉक्टर भेटायला आले. त्यांनी मला समजावून सगळ्या गोष्टी सांगितल्या. मी Asymptomatic रुग्ण असल्याचं डॉक्टरांकडून कळलं. याचा अर्थ माझ्यात कोणतीही लक्षणं दिसून आली नव्हती. आणि मला त्रास देखील होत नव्हता. मात्र covid-19 चा विषाणू माझ्या शरीरात होताच. त्यामुळे आधी डॉक्टरांनी घाबरून जाऊ नकोस, असा सल्ला दिला. तू हॉस्पिटलमधून पूर्णतः बरा होऊन दहा दिवसांच्या आत घरी परतशील असा विश्वास त्यांनी मला दाखवला. तेव्हाच गेलेला विश्वास परत माझ्या मनात आला. एक गोष्ट तर निश्चित झाली की covid-19 ची बाधा झाल्याने मी मरणार तर नक्कीच नाही. मग डॉक्टरांना विचारलं, की याची पुढची पायरी काय? डॉक्टरांनी संपूर्ण औषधोपचार मला समजावून सांगितले. Asymptomatic रुग्णांना जास्त त्रास होत नसल्याने त्यांच्यावर फार क्वचित मोठे औषध उपचार करण्याची वेळ येते, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर माझे ब्लड प्रेशर, हृदयाचे ठोके तपासले गेले. रक्त चाचणी करण्यासाठी रक्त घेतले गेले. त्यावेळी मला माहिती नव्हतं, की माझ्या दहा दिवसांच्या हॉस्पिटल मधल्या या काळात, मला आज पहिल्या आणि शेवटच्या वेळी सुई टोचली जाणार होती. त्यानंतर पुढील एकाही दिवशी मला सुई टोचली गेली नाही. गेल्या काही दिवसात तुम्ही ज्या औषधाचं नाव वारंवार ऐकलं होतं त्या औषधाची एक स्ट्रीप डॉक्टरांनी आणली. म्हणजेच हायड्रॉक्सीक्लोरीक्वीनच्या गोळ्या मला देण्यात येणार होत्या. सोबत ताप येऊ नये म्हणून असणाऱ्या एका गोळीचं पाकीट, विटामिन बी आणि विटामिन सी च्या गोळ्यांची पाकिटं आणि ॲसिडीटी होऊ नये म्हणून देण्यात येणारी गोळी सुरू करण्यात आली.
हायड्रॉक्सीक्लोरीक्वीनच्या ( एच सी क्यू ) दोन गोळ्या पहिल्या डोसमध्ये एकाच वेळी दिल्या गेल्या. सोबत इतर गोळ्या देखील एक एक दिल्या गेल्या. दुसरा डोस देखील एच सी क्यू च्या दोन गोळ्यांचा होता. त्यानंतर मात्र सकाळ-संध्याकाळ एक, अशी एच सी क्यू मला दिली गेली. विटामिन सी, विटामिन डी आणि अँटी फ्लू च्या गोळ्या देखील सुरू ठेवल्या गेल्या. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा ऍसिडिटीची गोळी देण्यात येत होती. पुढील पाच दिवस सकाळी आणि संध्याकाळी या गोळ्या मी घेत होतो. दुसर्या आणि तिसर्या दिवशी मला एच सी क्यू गोळीचा थोडा त्रास जाणवला. डोकं दुखत होतं आणि पोटात मळमळ सुरू झाली होती. मात्र तीदेखील हळूहळू बंद झाली. याव्यतिरिक्त कोणतेही औषध किंवा उपाय माझ्यावर केले गेले नाही.
Covid-19 च्या औषध उपचाराबद्दल अनेक गैरसमज सध्या व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीमध्ये पसरवले जात आहेत. मात्र ते सर्व खोटे आहेत. कोणत्याही प्रकारचे प्रयोग तुमच्यावर केले जात नाहीत. जर तुम्ही Asymptomatic असाल आणि तुम्हाला इतर कोणताही त्रास नसेल तर हे आणि इतकेच उपचार तुमच्यावर देखील केली जातील. मात्र जर तुम्ही symptomatic असाल आणि तुम्हाला इतर आजार देखील असतील तर मात्र तुमच्यावर यापेक्षा जास्त उपचार केले जाऊ शकतात. मात्र ते देखील गरजेनुसार. डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, जी लोकं आपल्यावर उपचार करत असतात ती लोकं आपल्याशी अजिबात तुच्छतेने वागत नाहीत. उलट आपलं मनोधैर्य कसं वाढेल यासाठीच ते धडपड करत असतात. निदान मी ज्या हॉस्पिटलमध्ये होतो तिथे मला अजिबात वाईट वागणूक मिळाली नाही. ते सर्व लोक खबरदारी म्हणून काही गोष्टी करतात, म्हणजेच सुरक्षित अंतर ठेवणं, आपल्याला जास्त जवळ न येऊ देणं, अशा गोष्टी पाळल्या जातात. मात्र ते त्यांच्यासाठी आवश्यकच आहे.
दहा दिवस माझ्यावर उपचार झाल्यानंतर माझी दुसरी टेस्ट करण्यात आली. जी निगेटिव्ह आली. त्यामुळे लगेच तिसऱ्या टेस्ट साठी नमुने घेतले गेले. दोन दिवसांनी त्याही टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्याचवेळी आमच्या डिस्चार्ज ची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली. तर माझ्या आईवडिलांची टेस्ट देखील बीएमसी मार्फत करण्यात आली होती. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना देखील काही दिवसात घरी सोडण्यात आलं. मात्र आजूबाजूच्या शेजाऱ्यांना 14 दिवस त्याच सेंटरवर ठेवलं गेलं.
या संपूर्ण उपचारांसाठी मला दहा दिवस लागले. दहा दिवसात पूर्णतः बरा होऊन मी बाहेर पडलो. मनोधैर्य आणि आत्मविश्वास या दोन गोष्टी या दहा दिवसात अतिशय महत्त्वाच्या होत्या. अनेक जणांनी फोनवरून मला धीर दिला. अनेकांनी मला आणि माझ्या घरच्यांना प्रचंड मदत केली. माझ्या आई-वडिलांना काही हवं नको ते बघण्यासाठी काही मित्र स्वतःहून पुढे आले. हे दिवस काही प्रमाणात क्लेशदायक जरी असले तरी जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन याच दिवसांनी मला दिला. त्यामुळे covid-19 ची बाधा जर झाली तर मुळात घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून आता सांगू शकतो.
Covid 19 Fighter! कोविड-19 ला हरवणारे एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आणि कॅमेरामॅन विनय राजभर!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement