महाराष्ट्राच्या राजकारणातले छोटे भाऊ, मोठे भाऊ? मविआचा 'दादा' कोण? मविआत पुन्हा 'भाऊ'बंदकी!!!
दोन भाऊ... त्यांच्यातला एक जण म्हणतो मी मोठा भाऊ... तर दुसरा म्हणतो मी मोठा भाऊ... आता दोघेही मी मोठा, मी मोठा म्हणत असतील तर मग, कोण होणार छोटा भाऊ? अंदाज आलाच असेल की गोष्ट कुणाची सुरु आहे.. बरं, दोन ओळींमध्येच तुमच्या डोळ्यांसमोर अजित पवार (Ajit Pawar) आले असतील तर थांबा, कारण आम्हीच मोठा भाऊ म्हणणारे अजित पवार काही पहिलेच आणि एकमेव नेते नाहीत.
दादांच्या दाव्यानंतर मविआत (Maha Vikas Aaghadi) मोठा भाऊ, की काँग्रेस-राष्ट्रवादीत मोठा भाऊ? यावर चर्चा होण्यापेक्षा आकड्याच्या खेळात कोण पुढे हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण, 1990 साली आकड्याच्या खेळात खूप मागे असलेल्या भाजपनं 2019 साली शिवसेनेला मागे टाकत, मोठ्या भावाची जागा मिळवली होती. बहुदा अशा आकड्यांच्या जोरावर अजित पवारांनी आपणच मोठा भाऊ आहोत, असा दावा केला असेल. पण, आकड्यांनुसारही त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं जड आहे.
आधी काँग्रेस राष्ट्रवादीचं गणित समजून घेवू... 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाली. पक्षाची स्थापना झाल्यानंतर काही महिन्यातच शरद पवारांनी काँग्रेससोबत आघाडी केली. त्यावेळी पहिल्याच दमात पक्षांनं 58 जागांवर यश मिळवलं होतं. काँग्रेसला 75 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता स्थापन केली. 2004 साली जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसनं 157 तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 124 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यावेळी राष्ट्रवादीनं 71 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 69 जागा होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद मिळालं असतं मात्र, शरद पवारांनी मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिलं.
आकड्याच्या खेळात घड्याळाची टिकटिक जोरात
2009 मध्ये काँग्रेसनं 170 तर राष्ट्रवादीनं 113 जागांवर निवडणूक लढवली. 2014 साली दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली तर 2019 साली काँग्रेसनं 147 तर राष्ट्रवादीनं 121 जागांवर निवडणूक लढवली. या आकड्यांचा अर्थ हाच होता की, राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला मतदार तयार केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस तीन वेळा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन वेळा जागांच्या तुलनेत आघाडीवर होता.. 2014 नंतर देशात काँग्रेस पक्ष रसातळाला गेला होता. 2019 च्या लोकसभेत तर त्यांना विरोधीपक्ष नेतेपद मिळेल इतक्याही जागा जिंकता आल्या नव्हत्या.. याच मोदींच्या लाटेत राष्ट्रवादीचंही नुसकान झालं होतं. 2019 साली राज्यात राष्ट्रवादीचे 4 तर काँग्रेसचा एक खासदार जिंकला होता. त्यामुळे आकड्यांच्या खेळात राष्ट्रवादी इथंही पुढे गेली..
राज्यात अनपेक्षित आघाडीचा जन्म झाला. मविआचा प्रयोग यशस्वी झाला. त्याच आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर (छोटा भाऊ) बनली. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागांच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकावर गेला. तेव्हा शिवसेनेकडे 56 आमदार होते. तर राष्ट्रवादीकडे 54 आमदार होते. शिवसेनेकडे 18 खासदार असल्यानं शिवसेनाच मविआत मोठा भाऊ झाला होता. पण, जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली. 40 आमदार आणि 12 खासदार सोबत नेले तेव्हा मात्र आकड्यांच्या खेळात ठाकरेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आणि मविआत राष्ट्रवादी पहिल्या नंबर पोहोचली. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांमध्येही मविआत राष्ट्रवादीच अव्वल ठरली. बहुदा याच आकड्याच्या आधारे अजित दादानं आपणच मोठा भाऊ आहोत, असा दावा केला असावा..
मविआतल्या जागावाटपाचा फॉर्म्युला - शक्यता क्रमांक एक
दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानंही आपणचं मोठे भाऊ असू असं सांगण्यासाठी लोकसभा 2024 सालच्या निवडणुकांचा आधार एक मोठा दावा केला. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यात 2019 साली शिवसेना-भाजप एकत्र लढली होती. त्यावेळी सेनेला 18 ठिकाणी यश आलं होतं आणि आता संजय राऊतांच्या मते, त्या सगळ्या जागा पुन्हा निवडणूक येणार म्हणजेच शिवसेनेचा आजघडीला किमान 18 जागांवर तरी दावा आहे हे स्पष्ट आहे. पण, गोष्ट इथंच थांबत नाही राजकीय वर्तुळातील चर्चांनुसार शिवसेनाला या 18 जागांशिवाय उरलेल्या 30 जागांमध्ये समान हिस्सा हवाय, म्हणजेच आधीच्या 18 आणि उरलेल्या 30 पैकी समान हिस्सा काढला तर एकूण 28 जागा. असं झालं तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या हिश्याला 10-10 जागा येतील त्यात जर मित्रपक्षांना एक-दोन जागा सोडल्या, तर याच पक्षाचा आकडा 8-9 वर येईल अर्थात यावर अजूनही अधिकृत भाष्य कोणत्याही पक्षानं केलेलं नाहीय. पण, शिवसेनेकडून असा दावा केला जाण्याची दाट शक्यता आहे..
मविआत आणखी एका फॉर्म्युल्याची शक्यता तो म्हणजे राज्यात वर्षाकाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू शकतात त्याच निवडणुकांच्या निकालांनंतर मविआतील प्रत्येक पक्षाचा प्रभाव स्पष्ट होईल.. तिथे मिळालेल्या यशानुसार मविआत जागावाटप होवू शकते. जो पक्ष सर्वाधिक ठिकाणी यश मिळवेल त्याला लोकसभा आणि विधानसभेत जास्त उमेदवारी मिळू शकते. संजय राऊतांकडून वारंवार जागांवर भाष्य होतं असतानाही, काँग्रेस राष्ट्रवादीकडून जागावाटवर तसं भाष्य होत नाहीय. त्यात एक मात्र,खरं, प्रत्येक पक्ष आपआपली चाचपणी करतोय. जो पक्ष स्थानिक निवडणुकांमध्ये जास्त जागा जिंकेल त्याला जास्त उमेदवारी, असं गणित मान्य करण्याची वेळ आली तर, त्यात एक अडचण आहे ती म्हणजे 2014 साली युतीत असताना शिवसेनेनं 151 जागांची मागणी भाजपसमोर केली होती. ती मागणी पूर्ण होत नव्हती म्हणूनच की काय, त्यामुळेच 2014 ला लोकसभा एकत्र लढवल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली विधानसभा स्वबळावर लढली. मग, आता हीच ठाकरेंची शिवसेना असा फॉर्म्युला मान्य करेल का?
मोठा भाऊ-छोटा भाऊ इतिहास! आकड्याचा खेळ
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भाऊ - छोटा भाऊ अशा गोष्टी युती सरकारमध्ये अनेकदा ऐकायला मिळाल्यात. 26 जून 1975 रोजी आणीबाणी घोषित केली आणि जेव्हा देशात आणीबाणी होती त्याला त्याआधीच शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेवर कोणतीही बंदी नव्हती. दुसरीकडे जनसंघासह जवळपास सगळ्याच विरोधकांवर बंदी आणली होती. जेव्हा आणीबाणी उठवली गेली. देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्यानंतर काँग्रेसला परिणामी इंदिरा गांधींना मोठा फटका बसला होता.
1975 ते 1990, या पंधरा वर्षांमध्ये शिवसेनेनं अर्थात बाळासाहेबांनी आपला झेंडा मुंबईपासून मराठवाड्यापर्यंत पोहोचवला होता. मुंबईनंतर मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये (तत्कालीन औरंगाबाद) पालिकेवर ताबा मिळवला होता. देशात 90च्या काळात राममंदिर आंदोलनामुळे देशात हिंदू समाज एकजूट होत होता. त्याच काळात बाळासाहेब ठाकरेंनी 'गर्व से कहो हम हिंदू है!' असा नारा देत, राजकीय ट्रेण्ड बदलून टाकला होता. याच आंदोलनात भाजपचाही सक्रीय सहभाग होता, पण पक्ष फक्त शहरांपुरताच पक्ष अशी ओळख होती. महाराष्ट्राविषयी बोलायचं झालं, तर शिवसेना जिथंवर पोहोचली होती, त्याच्या आसपासही भाजप पोहोचला नव्हता. अर्थात बाळासाहेबांच्या नेतृत्वात शिवसेना गावागावत पोहोचली, तिथं भाजपमध्ये मात्र, अनेक नेते असूनही पक्ष तळगळात पोहोचला नव्हता. मुंडे, महाजन, खडसे अशा नेत्यांनी पक्ष शहरातून गावात नेण्याचे प्रयत्न केले, त्यांना त्यात यशही आलं.
विशिष्ठ समाजाचा पक्ष अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्यासाठी शिवसेनेचाच आधार घेतला. 1985 ते 1995 याच दशकात भाजपनं आपलं राजकीय अस्तित्व निर्माण केलं होतं. वसंतदादांपासून शरद पवारांपर्यंत एकहाती सत्ता आणणाऱ्या नेत्यांच्या झंझावात बाळासाहेबांनी शिवसेनेला घराघरात पोहोचलं. तर भाजपनंही मतदार तयार केला होता. 1995 सालच्या महाराष्ट्र विधानसभा निकाल लागले. शिवसेना-भाजपनं सत्ता मिळवली. शिवसेनेचे 73 तर भाजपचे 65 आमदार जिंकले होते. दोन्ही पक्षांसाठी हा विजय प्रचंड मोठा होता. जास्त जागा असल्यानं शिवसेनाचाच मुख्यमंत्री झाला.
1990 पासून शिवसेना राज्यात मोठा भाऊ होता, तर भाजप केंद्रात मोठा भाऊ होता. असं म्हणण्याचं कारण, आहे विधानसभा निवडणुकांमधलं जागावाटप. 1990 साली बाळासाहेबांच्या हयातीतच शिवसेना-भाजप युती झाली. युतीच्या पहिल्याच निवडणुकीत 1990 साली शिवसेनेनं 183 तर भाजपनं 104 जागा लढल्यात. त्यानंतरच्या 1995 साली जेव्हा महायुतीचं सरकार आलं, तेव्हाही जागावाटपात शिवसेनाच पुढे होती. सेनेनं 1995 साली 169 तर भाजपं 116 जागा लढल्या होत्या. पुढे 2014 पर्यंत शिवसेनेनं 160 पेक्षा कमी जागांवर कधीही तडजोड केली नाही. दुसरीकडे भाजपनंही 119 जागांपेक्षा जास्त जागांवर कधीही निवडणूक लढवली नव्हती.
आकड्यांच्या खेळात भाजपची बाजी, बनले मोठा भाऊ?
म्हणूनच 2014 सालच्या निवडणुकांमध्ये मोठा भाऊ, छोटा भाऊ असा वाद टोकाला गेला होता. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं केंद्रात एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपनं महाराष्ट्रात समसमान जागांवर दावेदारी केली होती, जी तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मंजूर नव्हती. तेव्हाही ठाकरेंनी हाच दावा केला होता, की राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ तर भाजप केंद्रात मोठा भाऊ. असं असलं तरी जागावाटपाच्या तिढ्यातून 25 वर्षांची यूती तुटली आणि दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपनं पहिल्यांचा महाराष्ट्रात 260 तर शिवसेनेनं 282 जागांवर उमेदवार उभे केले होते. निकाल लागले, भाजपचे 122 तर शिवसेनेचे 63 आमदार निवडूण आले होते.
1990 पासून राज्यात छोटा भाऊ असलेल्या भाजपनं एकट्या जीवावर 122 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे 2019 सालीही जेव्हा पुन्हा एकदा शिवसेनेसोबत युतीची चर्चा सुरु झाली, तेव्हा त्यांनी राज्यात आम्हीच मोठे भाऊ आहोत, असा दावा करत जास्त जागांवर निवडणूक लढण्याचं ठरवलं. तेव्हाही ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल येत नव्हता. पण, अमित शाहांच्या मध्यस्थीनं तिढा सुटला. 1990 साली 104 जागांवर लढणाऱ्या भाजपनं 2019 साली 164 ठिकाणी आपले उमेदावर दिले. तिकडे 1990 साली 183 ठिकाणी उमेदवार देणाऱ्या शिवसेनेला मात्र, 126 जागाच मिळाल्या.
अर्थात, नेत्यांच्या दाव्यांमध्ये काहीही असो!
आकड्याच्या खेळात, भाजपनं शिवसेनेला ओव्हरटेक करत मोठ्या भावाची जागा घेतली होती हेच खरं! मविआतही हेच अंकगणित जो पक्ष जुळवणार, तो ठरणार... मोठा भाऊ
(या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या लेखातील व्यक्त झालेली मते संबंधित लेखकाची स्वतःची आहेत. एबीपी माझा किंवा एबीपी नेटवर्कची ही मते किंवा भूमिका नाही.)
शिशुपाल कदम यांचे इतरही महत्त्वाचे ब्लॉग :
कर्नाटकच्या जनतेनं भाकरी फिरवली... महाराष्ट्रातली जनता भाकरी फिरवणार?