BLOG : इतर खेळांनाही ‘नवीन’ ‘नायक’ मिळावेत...
नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने केलेल्या कामगिरीने अवघ्या भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. पुरुष आणि महिला या दोन्ही गटात एकाच देशाच्या संघांनी उपांत्य फेरी गाठण्याचं हे अतिशय दुर्मिळ उदाहरण ठरलं. यामुळे छाती आणखी अभिमानाने फुलून आली. खेळाडू, सपोर्ट स्टाफ, कोच या साऱ्यांचं कौतुक तर आहेच. याशिवाय हॉकीतल्या कामगिरीने जो कळस गाठला, त्याचा पाया रचण्यात एका व्यक्तीचा मोठा वाटा आहे. ते म्हणजे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक. हॉकी प्लेअरच्या टी-शर्टसवर ओडिशा ही अक्षरं लक्ष वेधून घेत होती. त्या मागची कहाणी याबद्दलच्या सविस्तर बातम्या वाचल्यानंतर कळली.
नवीन पटनायक यांच्या हॉकी प्रेमाबद्दलच्या जितक्या बातम्या वाचल्या, त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, तिथे अन्न,वस्त्र, निवारा इतकंच हॉकीलाही महत्त्व आहे.
एखाद्या राज्य सरकारने एखाद्या खेळाच्या टीमला स्पॉन्सर करावं, हे कदाचित अतिशय दुर्मिळच उदाहरण ठरावं. याआधी तरी असं झाल्याचं ऐकिवात नाही.
आपला राष्ट्रीय खेळ म्हणून हॉकीचा उल्लेख आपण वारंवार करतो. त्यात मिळालेल्या पदकांच्या कहाण्या गौरवाने सांगत असतो.
पण, त्याच राष्ट्रीय खेळाचं पीक अधिक सकस येण्यासाठी त्याला सोयीसुविधारुपी खत घालण्याची गरज होती. तेव्हा फक्त पटनायक ठामपणे पाठीशी राहिले.
दोन्ही टीम्सना त्यांनी स्पॉन्सरशिप देतानाच सरावाकरता सोयीसुविधांसह सर्व पोषक वातावरण निर्माण केलं, त्याचा परिणाम आपल्याला दिसला. पुरुष हॉकीत कांस्य तर महिला हॉकी संघ चौथ्या स्थानावर.
विशेष म्हणजे देशातील श्रीमंत किंवा आर्थिकदृष्ट्या मोठा आवाका असलेल्या राज्यांचा उल्लेख जेव्हा जेव्हा येतो, तेव्हा कधी ओडिशाचं नाव समोर आलं नाही. तरीही या राज्याने, त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हे शिवधनुष्य उचललं आणि पेललंही.
त्यांचं वाचनात आलेलं एक वाक्य फारच बोलकं आहे. हॉकी इंडियासोबत २०१८ मध्ये ५ वर्षांचा करार झाला, तेव्हा पटनायक म्हणाले, ओडिशातील जनतेसाठी हॉकी हा जणू जगण्याचा मार्ग आहे. तिथे त्याला खेळापेक्षा अधिक मानलं जातं. खास करुन आदिवासी भागात मुलं हॉकी स्टिकला धरुन चालणं शिकतात. हॉकीचा पाया तिकडे पक्का झाला आणि मजबूतही. हा खेळ तिकडे रुजवण्यात आलाय आणि तो आणखी कसा फुलेल याचीही दक्षता घेण्यात आलीय. पटनायकांकडे हॉकीसारख्या खेळांसाठी दीर्घकालीन योजना तयार असल्याचं त्यांच्या नियोजनावरुन दिसतं. म्हणजे, २०२१-२२ मध्ये अर्थसंकल्पात खेळांसाठीच्या सुविधांकरता ४०० कोटींची मोठी तरतूद. २०२३ मध्ये ओडिशातील भुवनेश्वर आणि रुरकेला या ठिकाणी विश्वचषक हॉकी सामने खेळवण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलंय, या शिवाय सुंदरगढमध्ये ओडिशा सरकारने २० हजार क्षमतेचं हॉकी स्टेडियम बांधण्याचंही ध्येय बाळगलंय. याचसोबतीने पुढच्या १० वर्षांकरता भारतीय हॉकी टीम्सना स्पॉन्सर करण्याचं पटनायक यांनी निश्चित केलंय.
ऑलिम्पिक हॉकीपटू दिलीप तिर्की यांना खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवणं हेदेखील या सगळ्यात महत्वाचं पाऊल म्हणून पाहिलं जातंय.
खेळाबद्दलचं प्रेम आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर काय होऊ शकतं, याचंच दर्शन यातून घडतं.
राष्ट्रीय खेळ हॉकीच्या सर्वांगीण विकासासाठी पटनायक यांनी उचललेली ही पावलं अन्य खेळांच्या विकासाच्या दृष्टीने नक्कीच दिशादर्शक आहेत. फारशा चर्चेत नसलेल्या मणिपूरसारख्या राज्यातून मीराबाई चानूसारखी पदकविजेती आपल्याला गवसते. यावरुनच आपल्या देशात गुणवत्ता कानाकोपऱ्यात ठासून भरलीय हे सिद्ध होतं. ती मीराबाई तिला सरावासाठी इम्फाळला पोहोचायला लिफ्ट देणाऱ्या ट्रकचालकांची मेडल जिंकल्यावरही जाण ठेवते, त्यांचा सत्कार करते अशी सोशल मीडियावरची पोस्ट जेव्हा वाचनात येते, तेव्हा तिच्या मनाच्या श्रीमंतीची आणि आपण सोयीसुविधांनी किती गरीब आहोत याची जाणीव नक्कीच होते.
क्रिकेटसारखा खेळ भारतात आर्थिकदृष्ट्या श्रीमंत झाला, प्रगत सुविधा उपलब्ध झाल्या. आणि त्याच सुमारास खेळातली टीमची दादागिरी आणखी ठळक होत गेली. गेल्या काही वर्षांत तर जागतिक स्तरावर असलेली क्रिकेट संघाची ताकद साऱ्यांनाच थक्क करणारी आहे. त्यामुळे कोणताही खेळ जर फुलवायचा असेल तर आधी त्यासाठी पोषक वातावरण, सोयीसुविधा, उत्तम प्रशिक्षण व्यवस्था हे सारं हवंच. शिवाय खेळाडूंना त्यांच्या आर्थिकदृष्ट्या सुदृढ भविष्याची खात्रीही मिळायला हवी. पटनायकांच्या ऑलराऊंड प्लॅनिंगने तेच अधोरेखित होतंय.
मुख्य मुद्दा हा आहे की, पटनायकांनी जसं लाँग टर्म प्लॅनिंग केलं, तसा एकेक खेळ आर्थिक क्षमता असलेल्या राज्यांनी, खोऱ्याने पैसा कमवणाऱ्या कंपन्यांनी दत्तक घेतला तर, किंवा केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने यात काही भूमिका बजावत काही कंपन्यांना यासाठी गळ घातली तर, भारतासारख्या महाकाय देशात ही फार अशक्य बाब नाही. हरयाणासारख्या राज्याने बॉक्सिंग आणि कुस्तीला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतल्याचं समोर आलंय, ज्याची फळंही पुनियासारख्या पदकविजेत्यांच्या रुपात दिसू लागलीत.
पटनायक फॉर्म्युला इतरही ठिकाणी अंमलात आणला तर पदकांबाबतीत एकेरी आकड्यांभोवती घुटमळणारं भारतीय ऑलिम्पिक पथक एका दिवशी टॉप टेनमध्ये धडक नक्की मारेल. म्हणून देशातल्या प्रत्येक खेळाला गरज आहे ती नवीन नायक लाभण्याची. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने इतकी अपेक्षा आपण नक्कीच करु शकतो.