एक्स्प्लोर
Advertisement
सॅनिटरी पॅड क्रांती गरजेची?
तुम्हाला आश्चर्यानं आवाक करणारा आणखी एक प्रकार आता पाश्चात्य देशात सुरु झाला आहे. ‘रेड टेन्ट’ नावाचा हा प्रकार अगदी अलिकडेच अमेरीका, युरोप या भागात प्रचलित झाला आहे.
‘पॅडमॅन’ आगामी चित्रपटाचं नाव ऐकलं. या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शमवत असताना रिअल पॅडमॅन अर्थात अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या कार्याबदद्ल मुद्दाम माहिती काढून वाचली. महाराष्ट्रातील पॅडवुमन छाया काकडे, मासिक पाळीबद्दलची जनजागृती करणारे प्रवीण निकम यांचं कार्यही अनेकदा वाचनात आलेलं आहे. या सगळ्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली, ती म्हणजे मासिक पाळी या विषयाबद्दल उघडपणे बोलायला सुरवात केली. समाजात पाळीविषयी तयार झालेला एक हिणकस टॅबू तोडायला सुरवात केली. मी आज हा लेख लिहतेय हे याचंच एक प्रतीक म्हणायला हवं. पण तरीही मला काही प्रश्न पडले आहेत, आणि आपली क्रांती चुकीच्या दिशेने तर जात नाहीय ना, हा विचार सतावतो आहे. ते प्रश्न इथे मांडत आहे. यातील कोणताही मुद्दा चुकला असेल किंवा पटला नसेल, तर व्यासपीठ चर्चेसाठी खुलं आहेच.
सर्व्हे विश्वासार्ह आहेत?
अनेक सर्व्हेंचा आधार घेत सांगितलं जातं की, भारतात 88 टक्के स्त्रिया सॅनिटरी पॅड वापरत नाहीत. मुळात मला या सर्व्हेवर जरा शंका आहे. 130 कोटींचा आपला देश त्यापैकी अंदाजे 30 कोटी स्त्रियांना मासिक पाळी येते, असं आपण धरून चालूया. सॅनिटरी पॅड्सचा वापर आकड्यात सांगणाऱ्या या सर्व्हेची सॅम्पल साईझ काय आहे, कोणकोणत्या भागात सर्व्हे झालेला आहे, याबद्दल कोणतीच माहिती समोर नाही. मुळात भारतात भौगोलिक रचनेत आणि पर्यायानं हवामानात विविधता आहे. यात राजस्थानसारखा पाण्याचं दुर्भिक्ष असलेला भाग आहे. ईशान्य भारतासारखा दुर्गम डोंगराळ भाग आहे, काश्मीरसारखा थंड प्रदेश आहे. किनारपट्टीचा घामानं बेजार करणारा भाग आहे. मध्य भारतासारखा कोरड्या हवेचा भाग आहे. या सर्व भागात मासिक पाळी येणाऱ्या स्त्रियांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार या सर्व्हेत झाला आहे का? याबबत कोणतंही भाष्य या सर्व्हेचा आधार घेत बोलणाऱ्यांनी केलेलं नाही.
आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्यविषयक समस्या मांडणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांनी मासिक पाळीतील स्वच्छता आणि भारतीय पद्धती याविषयी भाष्य करताना भारतीय कसे मूर्ख आहेत? याचं रसभरीत वर्णन जगाला दिलं आहे. आणि पाश्चात्यांच्या चमच्यानं दूध पिणाऱ्या आपल्याकडच्या समाज पहारेदारांनी डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवत मासिक पाळीचं हे (नसलेलं) जोखड चुकीच्या दिशेनं ओढायला सुरुवात केली आहे. मुळात सॅनिटरी पॅड्स ही संकल्पना भारतीय नव्हे. ही संकल्पना पश्चिमेकडून आपल्याकडे आली आहे. सॅनिटरी पॅड सदृश्य अनेक गोष्टींचा वापर आपल्याकडे होत आला आहे. ज्यात ज्यूटची जाळीदार पानं, नारळाचं सोडण, वाळलेली पानं, वाळू अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. अनेक पाश्चात्य देशांनी भारतातलं मार्केट ताब्यात घेण्यासाठी काही बेगडी संस्थांना आर्थिक रसद पुरवत, भारतात समाज सुधारणेच्या नावाखाली आपलं दुकान लावून घेतलं आहे. मात्र, आता हळूहळू या पाश्चात्य कंपन्यांच्या सॅनिटरी पॅड्सना सगळीकडून विरोध व्हायला सुरुवात झाली आहे. याचं कारण म्हणजे या पॅड्समध्ये वापरलं जाणारं साहित्य.
पाश्चात्य देशात सॅनिटरी पॅड्स विरोधात जनजागृती
प्लास्टिक आणि निसर्गाला हानी पोचवणारे केमिकल्स यांचा भरभरुन वापर या पॅड्समध्ये होत असतो. वापरल्यानंतर या पॅडसची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी या कंपन्यंनी आपल्या खांद्यावरुन झटकून टाकलेली आहे. साहजिकच अनेक मोठी शहरं जिथे या सॅनिटरी पॅड्सचा वापर मोठा आहे, तिथे त्याचा कचराही शेकडो टनात निर्माण व्हायला लागला आहे. या वापरलेल्या सॅनिटरी पॅड्समध्ये जीवाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे या शहरांचं आरोग्य धोक्यात यायला लागलं आहे. त्यामुळे पाश्चात्य देशात या सॅनिटरी पॅड्स विरोधात जनजागृती व्हायला लागली आहे. ‘यूज अँड थ्रो सॅनिटरी पॅड्स’ ऐवजी ‘रियुजेबल सॅनिटरी पॅड्स’ वापरा, मेन्स्ट्रुअल कप वापरा, असा प्रचार तिथे सर्रास होतो आहे.
आता जरा डोळे उघडा आणि सारासार विचार करा. मासिक पाळीच्यावेळी वर्षानुवर्ष वापरल्या जाणाऱ्या भारतीय पद्धतींना मूर्खपणा म्हणणारे, झोडून काढणारे आता मात्र त्याच वाटेवर येत आहेत. आम्ही का वापरावे तुमचे रियुजेबल सॅनिटरी नॅपकिन्स्? आम्ही वापरत असलेल्या सुती कापडाचा प्रत्येक पदर आम्हाला स्वच्छ धुता येतो. वाळवण्यासाठी त्याला संपूर्णपणे मोकळं ठेवता येतं. रियुजेबल सॅनिटरी पॅड्स पूर्ण स्वच्छ झाले आहेत, हे कसं ओळखता येईल? त्यात जंतूसंसर्ग झाला नाहीये याची खात्री कोण देणार? ज्या पद्धतीला तुम्ही नावं ठेवत होतात, त्याचंच योग्य स्वरूप आमच्याकडे वर्षानुवर्ष वापरलं जातंय. आणि तुम्ही म्हणता आम्ही मूर्ख?
अनेक समाज सुधारकांनी Indian women use sand, ash and dirt during their periods असं जगाला सांगितलं. आणि त्याच्यावर कहर म्हणजे, तोंड वर करून आमची अक्कल काढली. भारताच्या कोणत्या भागात मासिक पाळीत वाळूचा वापर केला जातो, कधी जाणून घेतलंय? राजस्थान पंजाब आणि गुजरातचा काही भाग जिथे वाळवंट आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे, अशा भागात महिला मासिक पाळीत वाळू वापरायच्या. अजूनही वापरत असाव्यात. जिथे प्यायला पाणी नाही, तिथे धुवायला पाणी कुठून मिळणार. अशा वेळी त्या बाईनं काय करावं? तिनं आपल्याला परवडेल असा उपाय शोधून काढला. आणि जर मासिक पाळीत वाळूचा वापर आरोग्याला घातक असता, तर वर्षानुवर्ष तो चालत आला नसता. तो उपाय बायकांनी स्वतःहून सोडून दिला असता. सॅनिटरी पॅडसमध्ये ओलावा राहून जिवाणूंचा प्रादूर्भाव होवू नये, म्हणून तुम्ही वापरलेले केमिकल्स चालतात. आणि आम्ही त्याच कारणासाठी उपयोगात आणलेली वाळू म्हणजे अस्वच्छता? तुमच्या मेन्स्ट्रुअल कपसारखं नारळाचं सोडण आमच्याकडे मेन्स्ट्रुअल कप म्हणून वापरली जायचं.
'रेड टेन्ट'
या सगळ्यावर तुम्हाला आश्चर्यानं आवाक करणारा आणखी एक प्रकार आता पाश्चात्य देशात सुरु झाला आहे. ‘रेड टेन्ट’ नावाचा हा प्रकार अगदी अलिकडेच अमेरीका, युरोप या भागात प्रचलित झाला आहे. मासिक पाळीच्या काळात स्त्रीची मनःशांती खूप महत्वाची असते. तिच्या शरीराला आराम मिळणं अत्यंत आवश्यक असतं. यासाठी महिला आपल्या घरातून निघून ‘ते’ चार दिवस या ‘रेड टेन्ट’मध्ये वस्तीला येतात. आणि आपल्या शरीराला, मनाला आराम देतात. आमच्याकडे पाळीच्या काळात स्त्रीला घरापासून एका बाजूला वेगळ्या खोलीत बसवून ठेवण्याचा प्रकार युगानुयुगं सुरु होता. यावर शास्त्रोक्त विचार होण्याआधी डोळे झाकून टीका सर्वात आधी झाली. ही टीका का झाली? याचं आत्मचिंतनही आपल्याकडे झालं पाहिजे. आपल्याकडे मासिक पाळीला विटाळ बनवून, त्या स्त्रीला तिच्या स्त्रीत्वाचा कंटाळा आला पाहिजे, इतकी परिस्थिती बिकट बनवण्यात आलेली होती. काही ठिकाणी अजूनही आहे. मात्र, आपल्याकडे सांगितलेल्या गोष्टी या बरोबर आहेत का? हे ताडून पाहण्याची इच्छा एकाही शास्त्र पंडिताला किंवा समाजाच्या पहारेदाराला झाली नाही. काही प्रथा परंपरा या कालसुसंगत वाटण्यासाठी बदलल्या पाहिजे. विज्ञानाचा अभ्यास करणारे आपण मासिक पाळी या नैसर्गिक बाबीकडे वाकडा डोळा करुन न पाहता प्रसंगी त्यावर चर्चा करण्याची तयारी ठेवली पाहिजे.
सॅनिटरी पॅड रेव्होल्यूशनची खरंच गरज आहे?
आता प्रश्न सॅनिटरी पॅड रेव्होल्यूशन या गोष्टीचा. आपल्याकडे खरंच सॅनिटरी पॅड रेव्होल्यूशनची गरज आहे? मला हा प्रश्न कायम पडतो 30 कोटी स्त्रिया सॅनिटरी पॅडस् वापरायला लागल्या, तर त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची (जरी तो जैविक कचरा असला तरी) विल्हेवाट कशी लावणार आहोत? याचा विचार कोणी केला आहे. यात एक उल्लेख नक्की केला पाहिजे. काही दिवसांपूर्वी संतोष आंधळे यांच्या फेसबुक पेजवर ‘माय मेडिकल मंत्रा’ या वेबसाईटवरचा लेख वाचला. एका डॉक्टरने त्यात माहिती दिली आहे की, फक्त सॅनिटरी पॅड्स किंवा टॅम्पॉन्स वापरल्यानं सर्वायकल कॅन्सरचा किंवा इन्फेक्शनचा धोका गायब होतो, असं बोलणं धादांत चुकीचं आहे. मुळात ज्याचा दाखला देत सॅनिटरी पॅड रेव्होल्यूशन सुरू आहे, तो सर्वायकल कॅन्सर आणि इन्फेक्शन टाळण्यासाठी पहिलं पाऊल हे स्वच्छता आहे. सॅनिटरी पॅड्स वापरणाऱ्या महिलेनं सुद्धा ते पॅडस् दर 4-6 तासांनंतर बदलणं आवश्यक असतं. ज्या गरीब महिलेला संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत आहे. तिला प्रत्येकी 1 रुपया किमतीचे सॅनिटरी पॅड्स तरी परवडतील का? आणि जर पैसे वाचवण्यासाठी त्या स्त्रीनं एकच सॅनिटरी पॅड अधिक काळ वापरायचं ठरवलं, तर ज्या स्वच्छतेसाठी, संसर्ग टाळण्यासाठी हा अट्टाहास सुरू आहे. ते ध्येय कसं गाठता येईल? त्यामुळे माझ्या मते, आपण महिलांना सॅनिटरी पॅड कसे वापरावे यापेक्षा त्यांच्या मासिक पाळीतल्या पारंपरीक पद्धतीत स्वच्छता कशी राखावी? हे आधी शिकवलं पाहिजे. जर या महिला काही अघोरी पद्धती वापरत असतील, तर त्यांना सुती कापड, सॅनिटरी पॅड्स, टॅम्पॉन्स किंवा इतर काही असे पर्याय सुचवायचे आणि निर्णय महिलांवर सोडून द्यायचा. त्या महिलांना जे योग्य वाटेल, जे परवडेल, जे अवलंबणं सोपं वाटेल, ती पद्धत त्या नक्कीच अंगीकारतील.
आज सॅनिटरी पॅड्सना सबसिडी द्यायची मागणी जोर धरायला लागली आहे. सॅनिटरी पॅड्सवर लावण्यात आलेला जीएसटी सुद्धा कमी करण्याची मागणी जोरदार मांडली जात आहे. यात उदाहरण देताना कॉन्डोम्स टॅक्स फ्री, मग सॅनिटरी पॅड्स का नको? असा युक्तिवादही केला जातो आहे. मुळात ही तुलनाच चुकीची आहे. कॉन्डोम्स हे पुरुषाच्या आरोग्यापेक्षा स्त्रीच्या आरोग्यासाठी जास्त महत्वाचे आहेत. त्यामुळे त्याला टॅक्स फ्री केल्यानं ते स्वस्तात उपलब्ध होतील आणि त्याचा वापर वाढेल, आणि समाजाचं आरोग्य चांगलं राहील. कॉन्डोम्सला त्यापेक्षा स्वस्त पर्याय माझ्या माहितीत बाजारात उपलब्ध नाही. कॉन्डोम्स ही गरज आहे; चैनीची वस्तू नाही. ते टॅक्स फ्री करणं योग्यच आहे. मात्र, आपल्याकडे सॅनिटरी पॅड्सला पर्याय म्हणून अनेक स्वच्छ आणि स्वस्त गोष्टी उपलब्ध आहेत. त्यामुळे मला वाटतं सॅनिटरी पॅड्स ही चैनीची वस्तू(लक्झरी) आहे. माझं हे मत अनेकांना कदाचित पटणार नाही. एखाद्या गोष्टीला सबसिडी केव्हा द्यावी, जेव्हा त्याला पर्यायी स्वस्त गोष्ट स्थानिक पातळीवर उपलब्ध नसते. मात्र, सॅनिटरी पॅड्सच्या बाबतीत असं अजिबात नाही आहे. मग सॅनिटरी पॅड्सना सबसिडी कशासाठी. मी सॅनिटरी पॅड्स विरोधक अजिबात नाही. किंवा ते वापरू नये असं म्हणणारही नाही. सॅनिटरी पॅड्स निसर्गाला हानी न पोचवणारे असावे, हे माझं नक्की म्हणणं आहे. पण सॅनिटरी पॅड्स ना सबसिडी देणं किंवा ते रेशन दुकानावर स्वस्त किमतीत विकणं या मागण्यांना माझा विरोध आहे.
प्रत्येक जीव जेव्हा जन्माला येतो, तेव्हा तो आपल्यासोबत सर्व्हायवल इन्स्टींक्ट घेवून आलेला असतो. सर्व्हायवल टेक्नीक तो आपल्या आई-वडिलांकडून किंवा समाजातून शिकत असतो. मासिक पाळीचंही तसंच आहे. मासिक पाळीला सामोरं जाताना, वापरायची पद्धत त्या स्त्रीला माहित असते. तिला त्यातील स्वच्छता कशी राखावी याचं तंत्र शिकवणं अधिक गरजेचं आहे. मासिक पाळीच्या काळात मुलीला आपल्या आईकडून मार्गदर्शन मिळत असतं. आईला ते तिच्या आईकडून मिळालेलं असतं. कोणतीही आई आपल्या मुलीच्या जीवाला धोका निर्माण करेल, असा जगण्याचा मार्ग तिला नक्कीच शिकवणार नाही. मासिक पाळीला सामोरं जाताना आणि त्या काळात स्त्रीचं आरोग्य जपण्यासाठी आपल्याकडे परंपरेनं चालत आलेल्या पद्धती आहेत. फक्त त्याभोवती एक हिणकस टॅबू आहे. हा टॅबू तोडून मासिक पाळीचा काळ आहे त्याच पद्धती वापरून अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी बनू शकतो. मग आपण सॅनिटरी पॅड रेव्होल्यूशन वगैरे आणायला अविचारानं का धावत बसलोय?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement